// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
दाखल दिनांक : 20/12/2014
निर्णय दिनांक : 06/05/2015
श्रीमती शांताबाई साहेबराव वानखडे
वय 72वर्षे, धंदा – गृहीणी
रा. तिवरा ता. धामणगांव रेल्वे
जि. अमरावती. : तक्रारकर्ती
// विरुध्द //
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित,
ग्रामीण विभाग अमरावती तर्फे
कार्यकारी अभियंता,
विद्युत भुवन, शिवाजी नगर,
अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ती तर्फे : अॅड. आर. कलंत्री
विरुध्दपक्ष 3 तर्फे : अॅड. अळसपुरकर
…......................................................................................................................................................
: : न्यायनिणर्य : :
(पारित दिनांक 06/05/2015)
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..2..
मा. रा.कि. पाटील, सदस्य ः
1. तक्रारदार हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, तिच्या शेतातील विहीरीवर मोटर पंप बसविण्यात आले असून त्यावर विजेचे कनेक्शन आहे. दि. २४.५.२०१४ रोजी तिवरा भागात झालेल्या जोरदार वादळामुळे तक्रारकर्तीचे शेतातील विज खांबा वरील विद्युत तारा तुटुन पडल्या व विद्युत प्रवाह खंडीत झाला. विरुध्दपक्षाला वारंवार तोंडी व लेखी विनंती करुन सुध्दा दि. १९.६.२०१४ पर्यंत विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात आला नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या शेतातील संत्रा झाडांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यामुळे 50 संत्रा झाडे पुर्णपणे सोकुन गेलेत त्यामुळे रु. 30 लक्ष रुपयाचे नुकसान झाले. त्याकरीता नुकसान भरपाई मिळण्याकरीता ही तक्रार दाखल केली. त्यामुळे असे घोषीत करावे की, विरुध्दपक्षाने तक्रारदाराला सेवा देण्यास कसुर केला व तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणून रु. 20 लक्ष व त्यावर द.सा.द.शे 12 टक्के दराने व्याज, तक्रार दाखल केल्याचे तारखे
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..3..
पासुन तर रक्कम देई पर्यंत देण्यात यावे. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत निशाणी 2 प्रमाणे दस्तऐवज 1 ते 13 दाखल केले.
3. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 12 प्रमाणे लेखी जबाब सादर करुन प्राथमिक आक्षेप घेवून नमुद केले की, दि. २५.५.२०१४ रोजी झालेल्या जोरदार वादळामुळे तक्रारदाराच्या शेतातील विहीरीवरील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याबद्दल नुकसानी खातर दाखल केला आहे त्यावेळी तक्रारदार हया विरुध्दपक्षाच्या ग्राहक नव्हती त्यामुळे सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
4. तक्रारदाराच्या परिच्छेद क्र. 1 अमान्य करुन परिच्छेद क्र. 2 प्रमाणे तक्रारकर्ती व विरुध्दपक्षामध्ये ती ग्राहक नसल्यामुळे कोणताही करार नाही. त्यामुळे तक्रारदार ही विरुध्दपक्षा विरुध्द तक्रार करु शकत नाही. परिच्छेद क्र. 3 मधील म्हणण्याला अंशतः दुजोरा देऊन नैसर्गीक आपत्तीमुळे, तिवरा व आजुबाजीच्या भागात अंदाजे विजेचे 30 खांब तुटुन पडले होते व परिस्थिती आटोक्याबाहेर होती. अशा प्रकारे नैसर्गीक आपत्तीमुळे सेवा विस्कळीत झाली होती. अशी सेवा त्रुटीची सेवा म्हणता येणार नाही. सदर परिच्छेदामधील इतर म्हणणे नाकबुल केले.
5. तक्रारकर्तीच्या इतर परिच्छेद क्र. 4 ते 11 व प्रार्थनेमधील विधाने व मागणी नाकबुल करुन, अतिरिक्त जबाबात
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..4..
म्हटले की, तक्रारदार ही विरुध्दपक्षाची ग्राहक नसल्यामुळे तक्रार अर्ज रद्द करावा व उपरोक्त काळात नैसर्गीक आपत्तीमुळे, विस्कटीत झालेली सेवा व इलेक्ट्रीक खांब उभे करण्यासाठी बराच अवधी लागतो तरी पण विरुध्दपक्षाने अधिक परिश्रम घेवून विद्युत
पुरवठा दि. १८.६.२०१४ रोजी म्हणजे तक्रार प्राप्त झाल्यापासुन 16 दिवसात सुरु करण्यात आला. अशा प्रकारे विरुध्दपक्षाकडून कुठलीही कुचराई किंवा त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून सदर तक्रार रद्द होणेस पात्र आहे. विरुध्दपक्षाने निशाणी 14 प्रमाणे दस्त 1 ते 4 दाखल केले आहेत.
6. तक्रारदाराने निशाणी 16 प्रमाणे अतिरिक्त दस्त 1 व 2 सादर केले.
7. तक्रारकर्ताची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब, दाखल असलेले कागदपत्र तसेच तक्रारदाराचा वकीलांचा व विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद, यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आली.
मुद्दे उत्तर
- तक्रारदार हया विरुध्दपक्षाच्या ग्राहक
आहेत काय ? ... होय
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..5..
- सदर तक्रार अर्ज या मंचाच्या अधिकार
क्षेत्रात येतो का ? ... नाही
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
8. तक्रारदारा तर्फे अॅड. आर. कलंत्री यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात कथन केले की, तक्रारदाराच्या पतीच्या नावे सदर शेती असुन पतीच्या निधनानंतर तक्रारदार हया वारसदार म्हणून व स्वतःच्या उपजिवीकेसाठी सदर शेती करतात. त्यामुळे सदर विद्युत पुरवठा पण ते शेतीच्या मशागतीसाठी विज पंपासाठी वापरतात. सदर विद्युत कनेक्शन हे तक्रारदाराच्या पतीच्या नावावर होते व ते तक्रारदाराच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी पैसे भरले तसेच 7/12 च्या उता-यावर तक्रारदाराच्या पतीचे व दुसरे मुलाचे नाव आहे. त्यांच्या इतर युक्तीवादात तक्रारी मधील नमुद केलेल्या वक्तव्याचा पुर्नउच्चार करुन तक्रारकर्तीला झालेली नुकसान भरपाई रु. 20 लक्ष व त्यावर विनंती प्रमाणे व्याज देण्याची प्रार्थना करुन तक्रार अर्ज मंजूर करण्याची विनंती केली.
9. विरुध्दपक्षा तर्फे अॅड. अळसपुरकर यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात कथन केले की, जोपर्यंत सदर विद्युत कनेक्शन हे तक्रारदाराच्या नांवे ट्रान्सफर होत नाही तो पर्यंत तक्रारदार हे
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..6..
विरुध्दपक्षाचे ग्राहक नसल्यामुळे तक्रार करण्यास पात्र नाही म्हणून सदर तक्रार ही खर्चासह रद्द होणेस पात्र आहे. अॅड. अळसपुरकर यांनी त्यांच्या उर्वरित युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन, व नैसर्गीक आपत्तीमुळे उशीरा दिलेली
सेवा ही सेवेत त्रुटी होऊ शकत नाही, म्हणून तक्रार रद्द करण्याची विनंती वि. मंचाकडे केली.
10. मुद्दा क्र. 1 चा विचार करता, तक्रारदार हिने दाखल केलेले दस्त 2(1), प्रमाणे सदर शेत हे तक्रारदार व त्यांच्या मुलाचे नावावर दिसुन येते व त्यामधील विद्युत पुरवठा हा दस्त 2(2) प्रमाणे श्री. साहेबराव बापुरावजी वानखडे यांचे नांवे असुन ग्राहक क्र. ३६८३१३३०२८४६ असा आहे. तक्रारदाराने सदर पुरवठा त्यांचे नावे करण्यासाठी दि. २१.११.२०१४ रोजी रु. १४००/- चा भरणा विरुध्दपक्षाकडे केल्याचे दिसुन येते.
11. तक्रारदाराच्या मुळ अर्जातील, शपथपत्रासह नमुद केलेल्या परिच्छेद क्र. 2 प्रमाणे तक्रारदाराच्या पतीचे निधन झाल्यामुळे सदर पुरवठा तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी अर्ज दिला व तक्रारदार हया कायदेशीर वारस असल्यामुळे, त्या विद्युत पुरवठयाचा उपयोग घेतात. कायदेशीर बाबींचा विचार करता, पतीच्या निधानानंतर त्यांच्या मालमत्तेचा उपभोग त्यांच्या पत्नी व
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..7..
मुलांनी घेणे यात काहीही गैर नाही व तक्रारदाराने सदर पुरवठा त्यांचे नावे करण्यासाठी अर्ज पण दिला आहे व त्या विद्युत बिलाचा भरणा नियमीतपणे करतात हया विषयी विरुध्दपक्षाची काहीही तक्रार नाही. म्हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम
2(1) ड(2) मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे जी व्यक्ती पुर्ण किंवा अंशतः मोबदला देऊन सेवा घेते किंवा अशी एखादी पध्दत असेल की ज्या व्यक्तीने ती सेवा यांचा उपयोग दुस-या व्यक्तीने घेणे शक्य व योग्य असेल अशी दुसरी पुर्णता किंवा अंशतः मोबदला देणारी किंवा देण्याचे कबुल केलेली व्यक्ती सदरच्या ग्राहक व्याख्ये वरुन तक्रारदार हया विरुध्दपक्षाच्या ग्राहक आहेत हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असुन मुद्दा क्र. 1 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
12. मुद्दा क्र. 2 चा विचार करता, तक्रारदार हिने तिच्या प्रार्थनेतील विनंतीप्रमाणे नुकसान भरपाई रु. 20 लक्ष व त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह, तक्रार दाखल केलेच्या तारखे पासुन तर रक्कम मिळेपर्यंत मागणी केली आहे.
वरील सर्व रक्कम खचितच व्याजासह रु. 20 लक्षाच्या वर आहे. त्यामुळे Consumer Protection Rules 1987 नियम 9 ए प्रमाणे वि. मंचाला फक्त 20 लक्ष व त्याचे आत पर्यंतच प्रकरणे हाताळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सदर प्रकरण
ग्राहक तक्रार क्रमांक : 289/2014
..8..
वि. मंचाच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे, तक्रारदाराच्या मुळ तक्रारीवर भाष्य करु इच्छित नाही.
13. तक्रारदाराने सदर प्रकरण राज्य आयोगाकडे किंवा सक्षम न्यायालयात दाखल करणे योग्य राहील, असे वि. मंचाला वाटते, वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते. व खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 06/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष