(घोषित दि. 26.04.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया,सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीचे ग्राहक असून त्यांनी दुकानासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या चुकीच्या वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न असल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार ते जालना येथील रहिवासी असून त्यांनी गैरअर्जदार महावितरण वीज कंपनीकडून दुकानासाठी वीज पुरवठा घेतला आहे. सदरील दुकान हे त्यांच्या चरितार्थाचे साधन आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार वीज पुरवठा घेतल्या पासून 2007 पर्यंत त्यांनी विद्युत देयके नियमितपणे भरली आहेत. अर्जदाराने मीटर फॉल्टी असल्याबाबतची तक्रार दिनांक 26.11.2007 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे केली. परंतू त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर दिनांक 20.08.2008 व दिनांक 29.03.2010 रोजी त्यांनी पत्राद्वारे पुन्हा मीटर फॉल्टी असल्याची तक्रार गैरअर्जदार यांच्याकडे केली. गैरअर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे दिनांक 15.02.2010 रोजी मीटर तपासणी पोटी रुपये 300/- गैरअर्जदार यांच्याकडे जमा केले. गैरअर्जदार यांनी मीटर टेस्टींगचा अहवाल दिला नसल्याचे अर्जदाराने तक्रारीत म्हटले आहे. दिनांक 18.06.2011 रोजी त्यांनी मीटर फॉल्टी असल्याबाबतचा पुन्हा एकदा गैरअर्जदार यांच्याकडे अर्ज दिला. त्यावेळेस गैरअर्जदार यांनी त्यांना मीटर तपासण्यात आले असून ते योग्य असल्याचे सांगितले. मीटर तपासणी लवकर न केल्यामुळे त्यांना वीज बिलात व्याज व दंड आकारण्यात आल्याचे अर्जदाराने गैरअर्जदार यांना निदर्शनास आणून दिले. अर्जदाराने व्याज व दंड रद्द करण्याची मागणी केली. परंतू गैरअर्जदाराने अर्जदाराची मागणी मान्य न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने सुधारीत वीज बिल व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत गैरअर्जदार यांच्याकडे केलेली तक्रार, मीटर तपासणीसाठी भरलेल्या रकमेची पावती इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास मीटर वरील रिडींगप्रमाणे दिलेले बिल योग्य आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत अर्जदाराचे सी.पी.एल. मंचात दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून स्वत:च्या दुकानासाठी वीज पुरवठा घेतला आहे. सदरील दुकान हे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचाने तक्रार स्विकारली. अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून नोव्हेंबर 1993 मध्ये वीज पुरवठा घेतला असून त्याचा ग्राहक क्रमांक 510030246908 असा आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबासोबत अर्जदाराचे जानेवारी 2007 पासून नोव्हेंबर 2011 पर्यंतचे सी.पी.एल दाखल केले आहे. सदरील सी.पी.एल चे निरीक्षण केल्यावर जानेवारी 2007 मध्ये अर्जदाराकडे बसविण्यात आलेल्या मीटरचा क्रमांक 8000174856 असा होता. जानेवारी 2007 ते ऑक्टोबर 2007 या कालावधीत अर्जदारास कधी शून्य युनिट कधी 151 युनिट असे दर्शवून सरासरीवर अधारीत वीज बिल आकारणी करण्यात आल्याचे दिसून येते. या कालावधीत मीटर स्टेटस फॉल्टी दर्शविण्यात आले आहे. नोव्हेंबर 2007 मध्ये गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 8000174856) बदलून त्या जागी नवीन मीटर (क्रमांक 8000105567) बसविले. सदरील मीटरच्या रिडींगवरुन नोव्हेंबर 2007 ते सप्टेंबर 2008 या कालावधीत अर्जदारास वीज बिल आकरण्यात आल्याचे दिसून येते. अर्जदाराने दिनांक 26.11.2007 रोजी मीटर फॉल्टी असल्याबाबतची पहिली तक्रार नोंदविली आहे. अर्जदाराने सदरील तक्रार नोंदविल्यानंतर त्यांना देण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येत नाही. गैरअर्जदार यांनी सप्टेंबर 2008 मध्ये अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 8000105567) बदलून त्याजागी नवीन मीटर (क्रमांक 8000106462) बसविले व या मीटरवरुन अर्जदारास ऑक्टोबर 2008 ते फेब्रूवारी 2011 पर्यंत वीज बिलाची आकारणी केल्याचे दिसून येते. या कालावधीत देखील अर्जदाराने वीज बिलाचा भरणा केलेला दिसून येत नाही. फेब्रूवारी 2011 मध्ये व्याज व दंडासहीत अर्जदाराकडे एकूण थकबाकी रक्कम 65777.97 अशी होती ज्यापैकी मार्च 2011 मध्ये अर्जदाराने 50,000/- रुपये भरले आहेत. वीज मीटर वीज वापराची योग्य नोंद घेत असताना देखील अर्जदाराने मार्च 2011 व पुढील कालावधीत वीज बिल भरले नसल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराचे दोन वेळेस मीटर बदलण्यात आले असून त्यांना देण्यात आलेली वीज बिले मीटर वरील नोंदी प्रमाणे आहेत. मीटर बदलण्यात आल्यानंतर बिल फॉल्टी समजून अर्जदाराने नोव्हेंबर 2007 मध्ये गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली. परंतू त्यानंतर पुढील कालावधीसाठी देण्यात आलेले बिल नियमित व बरोबर असताना देखील अर्जदाराने त्याचा भरणा केलेला नाही. त्यामुळे वीज बिलातून व्याज व दंड माफ करावा ही मागणी मंच मान्य करीत नाही.
आदेश
- अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
- खर्चाबद्दल आदेश नाही.