ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :30/10/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार विरुध्द पक्षा विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त.क.हे शिरपूर, तह. देवळी, जि. वर्धा येथील रहिवासी असून ते शेतकरी आहे. शेत सर्व्हे नं. 299, क्षेत्र 0.91 हे.आर.मौजा.शिरपूर ही त्यांच्या वडिलोपार्जित शेती असून ती त.क.च्या नावाने आहे. त.क.ने शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून शासनाकडून रु.75,000/- अनुदान मिळवून व स्वतः जवळचे 65,000/-रुपये लावून असे एकूण 1,40,000/-रु. खर्च करुन मच्छी प्लॉन्ट व्यवसायाकरिता सन 2008 ला त्याच्या शेतात तलाव तयार करुन घेतले. त्यामध्ये शेतातील पाणी जमा करुन 10 डब्बे मच्छी बीज केळझर येथून आणून तलावात सोडले. त्याकरिता पाणी कमी पडू नये म्हणून बॅंक ऑफ इंडिया शाखा भिडी यांच्याकडून कर्ज घेऊन व स्वतः जवळचे नगदी रु.40,000/- असे पूर्ण मिळून रु.1,60,000/- खर्च करुन दि. 01.01.2010 ला शेतामध्ये 400 फु. खोल बोरवेल तयार केली व त्यामध्ये भरपूर पाणी लागले.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, विद्युतपुरवठा घेण्यासाठी वि.प.कडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करुन दि. 24.04.2010 रोजी डिमांड चे पैसे भरुन अर्ज केला. परंतु त्यानंतर दोन वर्षे लोटून सुध्दा वि.प.2 ने विद्युत पुरवठा केला नाही. परंतु त्याकरिता कंत्राटदाराने दि. 15.11.2011 रोजी तार कसून ठेवले व तक्रारकर्त्यास वि.प. 2 कडून 12 व्या महिन्यात विद्युत मीटर मिळाले. त्यानंतर वारंवांर विनंती करुनही शेवटी दि. 13.06.2012 ला 6 महिन्यानंतर त.क.च्या मीटरवरुन विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. सदर कनेक्शन केवळ 5 दिवस चालले. त्यानंतर पावसाळयाच्या पाण्यामुळे विजेचा खांब रोडवर वाकल्या गेले व त्याची सूचना त.क.ने वि.प. 2 ला दिली. वि.प. 2 चे पदाधिकारी श्री. बोंडे स्वतः येऊन पाहणी करुन विद्युत पुरवठा खंडित केला. त्याच दिवशी 4-5 कामगार आणून पोल सुरळीत केले असते तर त.क.चा विद्युत पुरवठा सुरळीत सुरु झाला असता, परंतु वि.प.ने तसे केले नाही. दुस-या दिवशी दि19.06..2012 रोजी रात्रीच्या वेळी वाकलेल्या खांबाला ट्रकने धडक दिल्याने त.क.चे विजेचे तार जमिनीवर विखरुन पडले. त्यानंतर त.क.ने दि. 27.06.2012 ला कनिष्ठ अभियंता भिडी यांना पुन्हा पत्र दिले व 8 दिवसात विद्युत पुरवठा सुरु करण्याची विनंती केली परंतु वि.प.ने आजपर्यंत विद्युत पुरवठा आरंभ करुन दिलेला नाही. त.क.ने वारंवांर वि.प. 2 कडे जाऊन विनंती केली परंतु वि.प. 2 ने उडवाउडवीचे उत्तरे देऊन खोटेनाटे आश्वासन देऊन वेळ काढू धोरण अंगीकारले, त्यामुळे त.क.ने कर्जाऊ घेतलेल्या रक्कमेपासून व बोरवेलपासून विद्युत पुरवठा अभावी शेतीत योजना आखल्याप्रमाणे भरभराट करु शकला नाही व योजना नेस्तनाबूद झाली.
- त.क. ने पुढे असे कथन केले आहे की, दि. 2.8.2012 रोजी पुन्हा वि.प.2 ला पत्र दिले, दि. 15.11.2011 रोजी विजेच्या तारेची फिटींग करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्यास वाटले की, आता विद्युत पुरवठा सुरु होत आहे. म्हणून शासनाकडून फलोद्यान योजने अंतर्गत 180 आवळीचे कलम सेलू येथून आणून शेतात लागवड केली व त्यासाठी रु.25,000/- खर्च आला. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आवळीची बाग व 4 एकर शेती पूर्णपणे पडीत राहिली. त्याकरिता त.क.ने दोन एकर शेत 3 वर्षापासून ठेक्याने करीत आहे. त्याचा ठेका सुध्दा रु.30,000/- त.क.वर अकारण बसला. शेवटी मच्छी तलावातील पाणी कमी होत असल्यामुळे त.क.चे आवळीच्या झाडांना पाणी देऊ शकला नाही व आवळीचे झाडे पाण्याविना अभावी त.क.ची बाग पूर्णतः नष्ट झाली. दोन वर्षाचा कालावधी लोटून ही वि.प. 1 व 2 यांनी त.क.चा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु केलेला नाही व त्यामुळे त.क.ला मत्स्य व्यवसाय योग्यरित्या करता आला नाही व फलोद्यान बागायती सुध्दा करता आली नाही व त.क. सतत कर्जबाजारी होत गेला व त्यावर रु.3,00,000/-चे कर्ज असल्यामुळे गावात कोणीही व्यक्तिगत कर्ज देण्यास तयार नव्हते, त्यामुळे उदरनिर्वाहासाठी व इतर खर्चासाठी त.क.ने निवास उपयोगी त्याच्या मालकीचे अर्धे प्लॉट रु.75,000/- मध्ये विकले व शेती करुन दोन एकर वांगी, मिरची, टमाटर, भेडी, चवळी इत्यादी भाजीपाला घेण्याचे उद्देशाने रोपे तयार केली होती. परंतु विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे ती त्याला घेता आली नाही.
- त.क.ने पुढे असे कथन केले आहे की, वरील सर्व कारणामुळे त.क.ला मनस्ताप झाला व त.क.चे नुकसान झाले, वि.प. 1 व 2 यांनी दोषपूर्ण सेवा दिली आहे. म्हणून त.क.ने प्रस्तुत तक्रार मंचात दाखल केली असून त्यात सर्व मार्गाने झालेली एकूण नुकसान भरपाई रु.9,20,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
- वि.प. 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 13 वर दाखल करुन त.क. हा शिरपूर येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे व त.क. हा वि.प.चा ग्राहक आहे हे मान्य केले आहे. तसेच वि.प.ने हे सुध्दा मान्य केले की, पावसाच्या पाण्यामुळे विजेचे खांब वाकले, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला व रात्रीच्या वेळी वाकलेल्या खांबाला ट्रकने धडक दिली. परंतु इतर सर्व आक्षेप वि.प.ने अमान्य केले आहे. वि.प.चे म्हणणे असे की, माहे जून 2012 च्या पहिल्या आठवडयात एक मोठे चक्रीवादळ आल्यामुळे पडेगांव शिवारातील जवळपास 150 सिमेंट व लोखंडी खांब तुटले व त्यामुळे अंदाजे 90 शेतक-यांच्या कृषि पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच त्या शिवाय जामणी, चिकणी या गावाचे विद्युत खांब व तार तुटले या खांबावरुन लघुदाब व उच्चदाब यांच्या तारा गेल्या होत्या त्यामुळे तीन ही गावांचा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला व विद्युतमंडळाचे फार मोठे नुकसान झाले. विद्युतमंडळाची यंत्रणा पडेगांव शिवारात पोहाचली व सर्वप्रथम गावाचा विद्युत पुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन गावक-यांना विद्युत पुरवठा अभावी पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये आणि तिन्ही गावांचा विद्युत पुरवठा पूर्ववत केल्यानंतर तिन्ही शिवारातील तुटलेल्या खांब व तारांचे निरीक्षण करण्यात आले व किती व कोणाचे पंप बंद आहेत याची माहिती घेण्यात आली व दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर जसजशी सामुग्री व कामगार उपलब्ध होतील त्याप्रमाणे खांबाच्या उभारणीचे काम व तारा ओढण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले. याकरिता येत असलेल्या तांत्रिक व नैसर्गिक अडचणी त.क. व इतर शेतक-यांना समजावून देण्यात आल्या व त्यांचे समाधान ही करुन देण्यात आले. वि.प.ने कोणत्याही प्रकारचा हलगर्जी व निष्काळजीपणा न करता काम पूर्णपणे केले व सेवेत कोणतीही कुचराई व दिरंगाई केली नाही. त.क. व इतर शेतक-यांचे नुकसान होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली. वादळी पावसामुळे शेतातील जमीन पूर्णपणे कोरडी व सुकल्याशिवाय खांबाची उभारणी करणे व तारा ओढणे अशक्य होते, त्यामुळे जाणूनबुजून कोणताही विलंब झालेला नाही. वादळामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तरी त.क.ने त्याच्या शेतातून उत्पन्न घेतलेले आहे, त्याचे उत्पन्नात कोणतीही घट झालेली नाही व कोणतेही नुकसान झालेले नसल्यामुळे त.क.ची मागणी चुकिची व अवाजवी आहे त्यामुळे ती खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र नि.क्रं. 14 व 16 वर दाखल केले व त्यानी वेळोवेळी केलेल्या तक्रारीची झेरॉक्स प्रत, विजेचे बिल, फोटो कॉपी, तलाठयाचे प्रमाणपत्र, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची झेरॉक्स प्रत वर्णनयादी नि.क्रं. 4 सोबत दाखल केलेली आहे. वि.प.ने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ कोणताही तोंडी पुरावा दाखल केलेला नाही. त.क. ने नि.क्रं. 16 वर लेखी युक्तिवाद दाखल केला. वि.प. ने त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.21 वर दाखल केला. त.क. व वि.प.च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणेमिमांसा पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत न करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः | 3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर |
: कारणेमिमांसा :- - मुद्दा क्रं.1,व 2 बाबत ः-त.क.हा शेतकरी असून मौजा शिरपूर, तह. देवळी व जि. वर्धा येथे शेत सर्व्हे नं. 299 क्षेत्रात 0.91हे.आर शेती आहे हे वादातीत नाही. तसेच त.क.ने बँकेकडून कर्ज घेऊन सन 2010 साली त्याच्या शेतामध्ये बोरवेल खोदली व त्यावर विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वि.प.कडे मागणी केली व त.क.च्या मागणीप्रमाणे वि.प.ने दि. 13.06.2012 रोजी विद्युत पुरवठा दिला हे सुध्दा वि.प.ने मान्य केले आहे. तसेच पावसाळयाच्या पाण्यामुळे वि.प.ने दिलेले विद्युत कनेक्शनचे विजेचे खांब वाकले व दुस-या दिवशी ट्रकने धडक दिल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला हे सुध्दा उभयतांना मान्य आहे. विजेचे बिल नि.क्रं. 4(5)वर दाखल करण्यात आलेले आहे. त्यावरुन सुध्दा असे निदर्शनास येते की, जुन 2012 मध्ये त.क.ला वि.प.ने विद्युत कनेक्शन दिले होते व दि. 19.06.2012 ते 19.09.2012 या काळातील वीज वापराचे बिल त.क.ला देण्यात आले. त्यामुळे त.क. हा वि.प.चा ग्राहक होतो.
- त.क.ची तक्रार अशी की, त्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने व शेतामध्ये शेत तलाव सुरु करण्याच्या उद्देशाने शासनाकडून रु.75,000/- अनुदान मिळविले व स्वतः जवळचे रु.65,000/-लावून शेतात शेत तळे तयार केले व शेतातील पाणी जमा करुन 10 डब्बे मच्छी बीज केळझर येथून आणून तलावात सोडले. तसेच बँकेकडून रु.1,20,000/- कर्ज घेऊन व स्वतः जवळचे 40,000/-रुपये लावून एक 400 फु.खोल बोरवेल तयार केली व बोरवेलचे पाणी शेत तळयात सोडण्याकरिता व शेत बागायती करण्याकरिता वि.प.कडून विद्युत पुरवठा घेतला. सदरील विद्युत पुरवठा दि. 13.06.2012 रोजी देण्यात आला होता व पावसाळयाच्या पाण्यामुळे तो पोल वाकला व ट्रकने धडक दिल्याने सदर खांबाच्या तारा तुटल्या. सदरील विद्युत पुरवठा खंडित झाला याची कल्पना वि.प.ला देऊन सुध्दा वि.प.ने विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करुन दिला नाही. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत असल्यामुळे, बागायती उत्पन्न घेऊ शकला नाही व त्याचे नुकसान झाले. तसेच दि. 15.11.2011 रोजी शासनाकडून फलोद्यान योजने अंतर्गत 180 आवळीची कलमे सेलू येथून आणून रु.25,000/- खर्च करुन लावली. परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आवळीचे बाग व 4 एकर शेती पूर्णपणे पडीत राहिली व ठेक्याने घेतलेल्या शेतातून त्याला उत्पन्न त्याला घेता आले नाही. त्यामुळे त्याचे बरेच नुकसान झालेले आहे.
- त.क.ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व वि.प.ने कबूल केल्याप्रमाणे हे सत्य आहे की, त.क.ने त्याच्या शेतात शेत तळे मत्स्य उद्योग सुरु करण्याकरिता सन 2008 साली केले. तसेच सन 2010 साली बँकेकडून कर्ज घेऊन त्याने त्याच्या शेतात बोरवेल केली व त्यावर विद्युत पुरवठा वि.प.कडून घेतला. पावसाळी पाण्यामुळे त.क.ला दिलेल्या विजेचे खांब वाकल्यामुळे व ट्रकने धडक दिल्याने विजेचे तार तुटल्यामुळे विद्युत पुरवठा 5 दिवसातच खंडित झाला. जर वि.प.ने जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात एक मोठे चक्रीवादळ आल्यामुळे पडेगांव शिवारातील 150 सिमेंट व लोखंडी खांब तुटले व अंदाजे 90 शेतक-यांचा कृषी पंपाचा विजपुरवठा खंडित झाला असे नमूद केले असले तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, सदरील घटनेत त.क.ला दिलेल्या विद्युत पुरवठयाचे खांब हे वाकलेले होते व विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त.क. ने दाखल केलेल्या पत्राची झेरॉक्स प्रतवरुन निदर्शनास येते की, त.क.ने ताबडतोब वि.प.2 च्या अधिका-यांच्या लक्षात ही बाब आणून दिली व तारा टाकून खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी विनंती केली. त्यानंतर दि. 27.06.2012 ला पत्र दिले व त्यावर सब इंजिनीयर, भिडी यांनी पोच दिलेली आहे परंतु त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही व त्याप्रमाणे विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात आलेला नाही. त्यानंतर पुन्हा दि. 2.8.2012 ला एक नोटीस देऊन वि.प.ला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी व त्याला झालेल्या नुकसान भरपाईसाठी दिली. त्याप्रमाणे वि.प.ने कारवाई केली असे कुठलेही दस्ताऐवज रेकॉर्डवर मंचासमोर आलेले नाही. वि.प.ने आपल्या लेखी जबाबात रात्रीच्या वेळी ट्रकने वाकलेल्या खांबाला धडक दिली अशी तक्रार वि.प. 2 कडे आली. त्यानंतर योग्य दुरुस्तीकरुन विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करुन दिला परंतु ताबडतोब तसे केले असे नमूद केलेले नाही किंवा कोणत्या तारखेस त्यांनी विद्युत पुरवठा पूर्ववत केला याची माहिती देखील लेखी जबाबात दिली नाही. दि.25.05.2013 ला जबाब दाखल करण्यापूर्वी विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला असावा असा निष्कर्ष काढता येईल. कारण त.क.ने आपल्या तक्रारीमध्ये विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी केलेली नाही. त.क.ने ही तक्रार दि. 19.11.2012 रोजी दाखल केलेली आहे. वि.प.ने त्याचा लेखी जबाब दि. 23.05.2013 रोजी दाखल केला. दि.19.11.2012 पर्यंत वि.प.ने विद्युत पुरवठा सुरळीत केला असा कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, तक्रार दाखल केल्यानंतर विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात आला असावा. म्हणूनच त.क.ने खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करुन देण्याची तक्रार अर्जात मागणी केलेली नाही. फक्त नुकसानीची मागणी केलेली आहे.
- वि.प.ने खंडित झालेला विद्युत पुरवठा त.क.कडून मागणी होऊन सुध्दा वेळेत करुन दिलेला नाही. म्हणूनच निश्चित वि.प.ने दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यामुळे निश्चितच त.क.चे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान संबंधी विचार केला असता एक गोष्ट निश्चित होते की, त.क.ने शेत तळे 2008 साली तयार केलेले आहे व त्यात 2008 सालीच मत्स्य उद्योग सुरु केलेला आहे. त्यावेळेस त.क.च्या शेतामध्ये बोरवेल नव्हते आणि विद्युतपुरवठा सुध्दा घेण्यात आलेला नव्हता. त.क.च्या म्हणण्याप्रमाणे जानेवारी 2010 मध्ये त्यांनी बोरवेल त्यांच्या शेतात करुन घेतली म्हणजेच 2008-2010 या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा वि.प. च्या कृत्यामुळे त.क.चे नुकसान झालेले नाही.
- त.क. च्या म्हणण्याप्रमाणे त्याने दि.24.04.2010 रोजी डिमांड प्रमाणे पैसे भरुन वि.प.कडे विद्युत कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज केला होता, त्याप्रमाणे वि.प.ने दि. 13.06.2012 ला विद्युत पुरवठा केला. दि. 15.11.2011 ला कंत्राटदाराने तार कसून ठेवले त्यामुळे त.क.ला असे वाटले की, आता त्याला विद्युत पुरवठा मिळणार आहे. म्हणून त्याने शासनाकडून 180 आवळीची कलमे सेलू येथून आणून शेतात लावली व त्याकरिता 25,000/-रु. खर्च लागला. परंतु 2012 पर्यंत विद्युत पुरवठा न मिळाल्यामुळे त्याचे फलोद्यानचे नुकसान झाले व 4 एकर जमीन पडीत राहिली. परंतु या ठिकाणी असे नमूद करावयास वाटते की, त.क.ने दि.24.04.2010 ला डिमांड प्रमाणे रक्कम भरुन विद्युत पुरवठयासाठी वि.प.कडे अर्ज केला असा कुठलाही पुरावा मंचासमोर आलेला नाही म्हणून वि.प.ने दि. 24.04.2010 पासून ते 13.06.2012 पर्यंत विद्युत पुरवठा दिला नाही असे म्हणता येणार नाही. त.क. व वि.प.च्या कथनावरुन एक गोष्ट निश्चित होते की, दि. 13.06.2012 ला त.क.ला मागणीप्रमाणे विद्युत पुरवठा करण्यात आला तो फक्त 5 दिवस चालू होता व त्यानंतर तो पावसाळी पावसामुळे पोल वाकला व विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे खरोखरच त.क.चे मत्स्य उद्योगावर परिणाम झाला कां ? किंवा त.क.ने शासनाने फलोद्यान योजने अंतर्गत 180 आवळीची कलमे रु.25,000/-खर्च करुन त्याचे शेतामध्ये लागवड केली होती काय ? त.क.ने 180 आवळीच्या कलमांची लागवड त्याच्या शेतामध्ये केली व ती कलमे सेलू येथूनच आणली होती, याकरिता कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. जर त.क.ने सदरील कलमे सेलू येथून शासनाचे फलोद्यान योजने मधून आणले असेल व शेतामध्ये लागवड केली असेल तर निश्चितच त्यासंबंधीचा पुरावा त.क.कडे असायला हवा व तो मंचासमोर दाखल केला असता. परंतु तसे काही झालेले नाही. तसेच त.क.ने दाखल केलेल्या फोटो कॉपीमध्ये कुठेही आवळीची झाडे वाळून गेल्याचे दिसून येत नाही. तसेच शेत तलावात पाणी न साठल्यामुळे मत्स्य उद्योगाचे नुकसान झाले असा कुठेही उल्लेख नाही. विद्युत पुरवठा देण्यापूर्वी सुध्दा त.क. हा मत्स्य उद्योग करीत होता, त्यावेळेचे उत्पन्नात आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे उत्पन्नामध्ये तफावत असलेला पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. म्हणून त.क.ला तसे नुकसान झाले असे म्हणता येणार नाही.
- त.क.ने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याला बागायती पीक घेता आले नाही. त्याकरिता वर्णनयादी नि.क्रं. 18 वर तलाठयाचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. तलाठयाने दिलेल्या प्रमाणपत्रावरुन असे दिसून येते की, त.क.च्या शेत सर्व्हे नं.299 क्षेत्रफळ 0.91 हे.आर. जमिनीमध्ये बोरवेल आहे. परंतु सन 2010-11, 2011-12, 2012-13 वर्षामध्ये कोणतेही ओलीत केलेले नाही. सन 2010-11, 2011-12 व 2012-13 मध्ये त.क.ला विद्युत पुरवठा वि.प.कडून देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सदरील काळात ओलीत केले नसले तरी ते विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे केले नाही असे म्हणता येणार नाही आणि त्या काळात त.क.ने कोणतेही पीक शेतात घेतले नाही व जमीन पडीत राहिली असे म्हणता येत नाही. कारण पावसाळयाच्या पाण्यामुळे त.क.ने निश्चितच खरीब पीक घेतले असतील. त.क.ने 7/12 चा उतारा सुध्दा मंचात दाखल केलेला नाही. जर 7/12 चा उतारा मंचासमोर दाखल केला असता तर त.क. हा बागायती पीक घेत होता परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याला बागायती पीक त्याच्या शेतात घेता आले नाही हे पाहणे सोपे झाले असते. परंतु त.क.ने 7/12 चा उतारा दाखल न केल्यामुळे तो हेतुपुरस्सर दाखल केला नाही असे समजून त्याची जमीन त्या काळात पडीत होती असे म्हणता येत नाही. तसेच त.क. चे म्हणणे आहे की, त्याचे शेत पडीत असल्यामुळे व उत्पन्नात वाढ न झाल्यामुळे त्याच्यावर रु.3,00,000//-चे कर्ज झाले, त्यामुळे त्याला कोणीही कर्ज देत नव्हते, त्यामुळे त्याला त्याचा प्लॉट विकून शेती करावी लागली व उदरनिर्वाह करावा लागला. सदरील प्लॉट त्याने रु.75,000/- विकले. जर निवास उपयोगी प्लॉट त.क.ने त्याच्या शेतीकरिता व उदरनिर्वाहाकरिता विकले असेल तर त्यासंबंधी कागदोपत्री पुरावा त.क.कडे असणे आवश्यक आहे. परंतु तसा कोणताही पुरावा त.क.ने मंचासमोर दाखल केलेला नाही. म्हणून त्यासंबंधी केलेले कथन हे ग्राहय धरता येत नाही.
- त.क.च्या शपथपत्रावरुन व वि.प.ने लेखी जबाबात कबूल केलेल्या बाबीवरुन एवढे मात्रा निश्चित होते की, सन 2012-13 या वर्षात म्हणजेच एक वर्षाकरिता विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त.क.ला जमीन ओलीत करुन किंवा बागायती पीक द्वारे उत्पनात वाढ करता आली नाही. त्यापूर्वी त.क.ने त्याच्या जमीनित घेतलेल्या उत्पन्ना संबंधी कुठलेही दस्ताऐवज दाखल केलेले नाही. त्यामुळे नुकसान किती झाले हे काढणे शक्य नाही. त.क. कडे फक्त 0.91 आर. जमीन आहे म्हणजेच 0.91 हेक्टर जमीनीचे मालक आहे. व त्याचे 3 एकर जमीन ठेक्याने घेतल्या संबंधीचा कुठलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त.क. फक्त 0.91 आर. जमीन करीत होता. परंतु त्याने खरीप पीक पावसाळयाच्या पाण्यात जर घेतले असेल तर त्याने ओलीताचे पीक घेतलेले नाही, याचा विचार करता जैसेतैस 1 एकर मध्ये 5,000/- पर्यंत नुकसान होऊ शकते असे एकूण 10,000/- ते 12,000/-चे नुकसान झाले असे मंचाला वाटते. त्यामुळे त.क. हा फक्त वि.पने दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे फक्त एक वर्षाकरिता झालेल्या नुकसानीची भरपाई रु.12,000/- मिळण्यास हक्कदार आहे.
- त.क. चा खंडित झालेला विद्युत पुरवठा योग्य वेळेत जोडणी न केल्यामुळे त.क.ला वि.प.च्या कार्यालयात जाऊन फे-या माराव्या लागल्या, निश्चितच त्याला मानसिक त्रास झालेला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता मानसिक व शारीरिक त्रासापोटी झालेली नुकसान भरपाई म्हणून त.क.रु.5,000/- मोबदला मिळण्यास व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
म्हणून वरील दोन्ही मुद्दयाचे उत्तर त्याप्रमाणे देण्यात येते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या एक वर्षाचे नुकसान संदर्भात रु.12,000/- तक्रार दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्त्याचा हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी. 3 विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- द्यावे. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या करावी. 4 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 5 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |