ORDER | निकालपत्र ( पारित दिनांक :30/10/2014) ( मा. अध्यक्ष, श्री. प्रकाश एल. जाधव यांच्या आदेशान्वये) तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार विरुध्द पक्षा विरुध्द नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा की, त.क.हे शिरपूर (होरे), तह. देवळी, जि. वर्धा येथील रहिवासी असून ते शेतकरी आहे. शेत सर्व्हे नं. 254 आराजी 1.63.00 हे.आर. त्याच्या व त्याच्या आईच्या नांवे आहे व त्या शेतात विहीर असून त्यावर इलेक्ट्रीक मोटरपंप बसविले आहे. तसेच शेत सर्व्हे नं. 470, आराजी 1.74.00 हे.आर. हे त्याच्या मुलाच्या नावांवर आहे. त.क. ने वि.प. 1 व 2 कडून सदरील इलेक्ट्रीक मोटरपंपसाठी विद्युत मीटर क्रं.391627000251 प्रमाणे विद्युत पुरवठा घेतलेला आहे व विहिरीचे पाणी इलेक्ट्रीक मोटरपंपाच्या सहाय्याने त्याच्या शेतीत व मुलाच्या शेतीत बागायती पीक घेतो. त्यातून रु.2,00,000//- चे उत्पन्न होते. त्याप्रमाणे त.क. वि.प. 1 व 2 चा ग्राहक आहे. त.क.ने दि. 21.09.2011 रोजी पर्यंतचे सर्व देयक रक्कम भरलेली आहे व त्यानंतरचे देयक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे निरंक आहे. त.क.ने वेळोवेळी बिलाची रक्कम रु.10,800/-भरणा केली आहे, त्या मोबदल्यात वीज वापरासाठी विकत घेत आहे. त.क.ने पुढे असे कथन केले की, तीन- चार वर्षापूर्वी त्याच्या विहिरीवरील मोटारपंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता व इतर काही शेतक-यांचा विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला होता. त.क.ने तसेच इतर लोकांनी त्यासंबंधी ब-याच तक्रारी केल्या होत्या. त.क.ने दि. 20.03.2012 व 10.09.2012 रोजी लेखी तक्रार वि.प.कडे नोंदविली होती. वि.प.ने लक्ष्मणरावजी शेंडे, शामरावजी नाल्हे, गुलाबराव येडमें, बाबाराव महल्ले व भिमरावजी काळे यांचा विद्युत पुरवठा सुरु केला. परंतु त.क. चा विद्युत पुरवठा अद्याप चालू केलेला नाही. तथापि त.क.ने वि.प.ला ब-याच वेळा भेटून खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली. परंतु वि.प.ने कोणतेही लक्ष दिले नाही व ग्राहकांचे, शेतक-यांचे उत्पन्नाचा कसलाही विचार न करणारे धोरण स्विकारुन सेवेत कमतरता व दिरंगाईचे कृत्य केले आहे. तसेच वर्षापासून तुटलेल्या तारा जोडून न देता टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त.क.ला मानसिक व शारीरिक त्रास व शेतीच्या उत्पन्नात नुकसान झाले आहे. म्हणून त.क.ने सदरील तक्रार दाखल करुन बियाण्याच्या खरेदीचा खर्च रु.80,000//-, त्याला झालेल्या मनस्ताप व कर्जावर लागलेले व्याज रु.2,75,000/-, तक्रारीचा खर्च मिळून रु.5,000/- असे एकूण नुकसान रु.4,00,000/-ची मागणी केलेली आहे.
- वि.प. 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब नि.क्रं. 11 वर दाखल केला आहे व कबूल केले आहे की, त.क. हा शेतकरी असून त्याचे नांवे शेत सर्व्हे नं. 254 व मुलाच्या नांवे शेत सर्व्हे नं. 470 आहे व त.क.च्या शेतात विहीर असून त्यावर इलेक्ट्रीक मोटारपंप बसविले आहे व त्याची शेती ओलीत करीत होता व वि.प. कडून विद्युत पुरवठा घेतलेला होता व तो वि.प.चा ग्राहक आहे , इतर सर्व आक्षेप अमान्य केले आहे. वि.प. चे म्हणणे असे की, त.क.चे, लक्ष्मणरावजी शेंडे, शामरावजी नाल्हे, गुलाबराव येडमें, बाबाराव महल्ले, भिमरावजी काळे यांचे लघु विद्युत वाहिनीचे तार साधारण 3 वर्षापूर्वी चोरीस गेले. त्यापूर्वी 2-3 वेळा संपूर्ण वाहिनीचे तार चोरीस गेले होते व ते तार पुन्हा टाकून विद्युत पुरवठा चालू करण्यात आला होता. त्यावेळेस त.क.चे मोटारपंपाचा विद्युतपुरवठा सुरळीत न होण्या मागचे कारण म्हणजे त्याच्या विहीरीपर्यंत जाणा-या लघु विद्युत वाहिनीचे 4 सिमेंट खांब पडले होते व ते खांब उभे करण्यास त्यांच्या शेजारी असणा-या शेतक-यांनी विरोध केला. त्यामुळे त.क.चा विद्युतपुरवठा ताबडतोब सुरळीत सुरु होऊ शकला नाही. पावसाळयात पेरणी झाल्यानंतर खांब उभारणीचे काम जमीन सुकल्या शिवाय होऊ शकत नाही व शेजारी असणा-या शेतक-यांनी मनाई केल्यामुळे पर्याय काढून विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. जाणूनबुजून त्याचा विद्युत पुरवठा सुरु करण्यास विलंब करण्याचे कोणतेही कारण नव्हते.
- वि.प.ने पुढे असे कथन केले आहे की, त.क.ला दि. 30.09.1996 ला विद्युत पुरवठा देण्यात आला. त्यानंतर 8 वर्षाने दि. 29.04.2008 ला पहिले वीज देयकाचा भरणा केला व दुसरे वीज देयक दि. 30.12.2011 ला भरले आहे. त.क.ने विज देयकाचा भरणा 18 वर्षात केवळ 2 वेळा केला आहे. त्यावर तो किती जबाबदार व कर्तव्य पालन आहे हे दिसून येते. त.क.च्या शेतामध्ये तार पडून होते. परंतु शेजारच्या शेतक-यांचे तार देखील चोरीस गेले होते व 4 खांब पडले होते. त्यामुळे विलंब झाला. त्यामुळे वि.प.च्या सेवेत दोष व कमतरता आहे असे म्हणता येत नाही.त.क. त्यांचे शेतातून दरवर्षी सोयाबीन, कपाशीचे पीक घेतात व सन 2010-11 साली त्यांनी गव्हाचे पीक सुध्दा घेतलेले आहे. त्यामुळे त.क.चे पीकाचे नुकसान झालेले नाही. त.क.ने जाणूनबुजून खोटी तक्रार दाखल केलेली आहे. ती खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- त.क.ने त्याच्या कथनाच्या पृष्ठयर्थ स्वतःचे शपथपत्र नि.क्रं. 12 वर दाखल केलेले आहे व वि.प.ला दिलेल्या तक्रार अर्जाची झेरॉक्स प्रत, त्याच्या शेताचा 7/12 चा उता-याची झेरॉक्स प्रत व विजेचे देयक भरल्याची पावतीची झेरॉक्स, व तलाठयाचे प्रमाणपत्र वर्णनयादी नि.क्रं.4 वर दाखल केलेली आहे. वि.प.ने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ कोणताही तोंडी पुरावा किंवा कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही.
- त.क. ने नि.क्रं. 13 वर लेखी युक्तिवाद दाखल केला. वि.प. ने त्याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.17 वर दाखल केला. त.क. व वि.प.च्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्यात आला.
- वरीलप्रमाणे त.क. व वि.प. यांचे परस्पर विरोधी विधानावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ काढून त्यावरील कारणेमिमांसा खालीलप्रमाणे आहे.
अ.क्रं. | मुद्दे | उत्तर | 1 | विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत न करुन सेवेत त्रृटीपूर्ण व्यवहार व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? | होय | 2 | तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्यास पात्र आहे काय ? | अंशतः होय | 3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशतः मंजूर. |
: कारणेमिमांसा :- - मुद्दा क्रं.1,व 2 बाबत ः-त.क. शेतकरी आहे व त्याच्या , त्याच्या आईच्या व मुलाच्या नांवावर मौजा शिरपूर (होरे), तह. देवळी व जि. वर्धा येथे शेत जमीन आहे व त्या शेत जमिनीत विहीर असून त्यावर इलेक्ट्रीक मोटारपंप बसविले आहे व त्यावर वि.प.कडून विद्युत पुरवठा घेतला आहे हे उभयतांना मान्य आहे.तसेच मध्यंतरी त.क.च्या विहिरीवरील इलेक्ट्रीक मोटारपंपचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता हे सुध्दा उभयतांना मान्य आहे. त.क. ने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे निश्चित कारण आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलेले नाही. परंतु वि.प.चे लेखी जबाबावरुन असे निदर्शनास येते की, विद्युत वाहिनीचे तार चोरीला गेल्यामुळे व त.क.च्या इलेक्ट्रीक मोटारपंपाला विद्युत पुरवठा करण्यासाठी लावलेले खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. हे म्हणणे चुकिचे आहे असे दाखविण्यासाठी त.क.ने आपले शपथपत्र नमूद केलेले नाही किंवा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे एक गोष्ट निश्चित सिध्द होते की, लघुविद्युत वाहिनीचे तार वेळोवेळी चोरीला गेल्यामुळे त.क.च्या शेतातील विहीरीवरील इलेकट्रीक मोटारपंपाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तसेच इतर शेतक-यांचा सुध्दा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
- त.क.च्या तक्रारीप्रमाणे तक्रार दाखल करण्याच्या 3-4 वर्षापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. म्हणजेच साधारणतः 2010-2011 वर्षी विद्युत पुरवठा खंडित झाला असावा. त.क.ने वि.प.कडे दिलेल्या तक्रार अर्जावरुन असे दिसून येते की, त.क.ने प्रथमतः दि.20.03.2012 रोजी व दि. 10.09.2012 रोजी वि.प.कडे विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी विनंती केली होती. दि. 20.03.2012 च्या तक्रार अर्जात त.क.ने स्पष्टपणे नमूद केले आहे की, मौजा हुसनापूर शिवारातील विहिरीवरील पंपाची लाईन व इतर शेतक-यांची लाईन 3-4 वर्षापूर्वी चोरीला गेली होती. त्यानंतर काही इतर शेतक-यांची लाईन पूर्ववत सुरु करण्यात आली. परंतु त्याचा विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला नाही. वि.प.च्या मागणीप्रमाणे त्.क.ने विजेचे थकित बिल रु.10,800/-जमा केलेले आहे. दि. 10.09.2012 च्या अर्जावरुन सुध्दा असे दिसून येते की, वि.प.च्या सांगण्यावरुन वीज देयक रु.10,800/-त.क.ने जमा केलेले आहे. वि.प.ने त्याच्या लेखी जबाबात विजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. तो लेखी जबाब त्याने दि. 23.05.2013 रोजी दाखल केलेला आहे. त.क.ने दि. 7.12.2012 रोजी दाखल केलेली आहे.
- तक्रारीत त्याचा विद्युत पुरवठा पूर्ववत चालू केलेला नाही असे नमूद केले आहे. परंतु त.क.ने विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यात यावा अशी मागणी मंचासमोर केलेली नाही. फक्त झालेल्या नुकसान भरपाईची मागणी त.क.ने केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, वि.प.ने विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु केला आहे. जर वि.प.ने विद्युत पुरवठा पूर्ववत केला नसता तर निश्चितच त.क.ने त्याच्या तक्रारीमध्ये विद्युत पुरवठा चालू करण्याची विनंती केली असती. त्यामुळे कोणत्या काळात विद्युत पुरवठा खंडित होता व त्या काळात त.क.चे खरोखरच नुकसान झाले काय ? हे पाहणे जरुरीचे आहे.
- त.क.ने त्याच्या शपथपत्रात मोघम असे एकूण रु.4,00,000/-चे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. त.क.ने तलाठयाने दि. 14.09.2013 रोजी दिलेले प्रमाणपत्र दाखल केलेले आहे. त्या प्रमाणपत्रावरुन असे निदर्शनास येते की, त.क. ने त्याच्या शेतातील विहीरीवरुन सन 2010-11 ते 2012-13 या काळात कोणतीही ओलीत केलेली नाही. परंतु त.क.ने सन 2010-11 पूर्वी त्याच्या शेतात बागायती पीक घेत होते हे दाखविणारा पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त.क.ने फक्त त्याचे व मुलाच्या शेतीचा 7/12 नि.क्रं. 4(4) व 4(6) वर दाखल केलेला आहे. नि.क्रं. 4(4) व 4(6) चे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सन 2010-11 या हंगामात त.क.ने त्याच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी खरीप पीके घेतलेली आहे व 40 आर. जमिनीतून रब्बी पीक म्हणजेच गव्हाचे पीक घेतलेले आहे. म्हणजेच सन 2010-11 साली विद्युत पुरवठा त.क.च्या शेतामध्ये सुरु होता. त्या नंतरचा 7/12 उतारा स्वतःचा व मुलाचा शेताचा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच कोणती बागाईत पीके त.क. त्याच्या शेतात घेत होता याचा उल्लेख शपथपत्रात किंवा तक्रारीत नमूद केलेला नाही.
- त.क.ने मोघम स्वरुपात बियाण्यांचा खर्च रु.80,000/-, लागवडीचा खर्च रु.40,000/- कर्जावरील व्याज व झालेल्या शारीरिक, मानसिक मनस्तापाबद्दल रु.2,75,000/-ची मागणी केलेली आहे. परंतु कोणत्या वर्षी सदरील बियाण्यांचा खर्च व लागवडीचा खर्च केला ते नमूद केलेले नाही किंवा त्यासंबंधी कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. बियाणे खरेदी करुन सुध्दा त्याला विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे त्याच्या पिकाला पाणी देता आले नाही म्हणून बियाण्याचे नुकसान झाले असे कुठेही त्याने नमूद केलेले नाही. तसेच त.क.ने कोणाकडून कर्ज घेतले व त्यावर त्याला व्याज भरावे लागले यासंबंधीचा खुलासा त्याने तक्रारीत किंवा शपथपत्रात केलेला नाही व त्यासंबंधीचा कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे त.क.ला कर्जापोटी व व्याजापोटी रु.2,75,000/-चे नुकसान झाले असे म्हणता येत नाही.
- त.क. ने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन एक मात्र निश्चित होते की, दि. 20.03.2012 व 10.09.2012 ला तक्रारी नंतर सुध्दा व विजेचे देयक रु.10,800/- दि. 30.12.2011 रोजी भरुन सुध्दा त्यावेळेस ताबडतोब त.क.ला विद्युत पुरवठा देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याला त्याच्या शेतात पिकाला पाणी देता आले नाही, त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. सन 2011-2012 नंतरचा 7/12 उतारा रेकॉर्डवर आला असता तर कोणती पिके कोणत्या वर्षी घेतली किंवा त्याची जमीन पडीत होती हे रेकॉर्डवर आले असते. परंतु सन 2012 साली वेळेत विद्युत पुरवठा न केल्यामुळे निश्चितच त.क.ला त्याचे शेतात पिकाला पाणी देता आले नाही व उत्पन्नात वाढ करुन घेता आली नाही. त.क.च्या नावांने व त्याच्या आईच्या नांवावर 1.63 हे.आर. सामायिक जमीन आहे व त्याच विहिरीवर फक्त इलेकट्रीक मोटारपंप होता. त्यामुळे फक्त एक वर्षात झालेली नुकसान भरपाई मिळण्यास त.क. हक्कदार आहे. त.क.ला त्या कालावधीत त्याच्या शेतात पाणीपुरवठा न झाल्यामुळे पीक घेतले नाही असा कोणताही दस्त रेकॉर्डवर घेतलेला नाही. परंतु विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु झाला असता तर निश्चितच त्याचे उत्पन्नात वाढ झाली असती. त.क.च्या शेतात घेतलेल्या पिकाचे व त्याचे क्षेत्रफळाचा विचार केला असता त.क.ला एकरी 5,000/-रुपये म्हणजेच एकूण रु.15,000/-नुकसान भरपाई देणे योग्य राहील असे मंचास वाटते. तसेच त.क.ला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
म्हणून वरील दोन्ही मुद्दयाचे उत्तर होकारार्थी देण्यात येते. सबब खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येते. आदेश 1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला झालेल्या एक वर्षाचे नुकसान संदर्भात रु.15,000/- तक्रार दाखल तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्त्याचा हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासह द्यावी. 3 विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 ने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- द्यावे. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत विरुध्द पक्ष क्रं. 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या करावी. 4 मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात. 5 निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्यात याव्यात. | |