निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/02/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 09/02/2012
तक्रार निकाल दिनांकः- 05/06/2013
कालावधी 01 वर्ष.03 महिने. 27 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
गणेश पिता शामराव शेळके. अर्जदार
वय 35 वर्षे. धंदा.शेती. अड.व्हि.डी.पाटील.
रा.आनंदवाडी,पो.उमरी,ता.जि.परभणी.
विरुध्द
कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या,परभणी. अड.एस.एस.देशपांडे.
कार्यालय,जिंतूर रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराने डी.पी.च्या शॉर्टसर्किटने ऊसाचे पीक जळाल्याची नुकसान भरपाई विज कंपनी कडून मिळण्यासाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज केला आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे रा. आनंदवाडी पो. उमरी तालुका जि. परभणी येथील रहिवासी असून तो त्याच्या शेतातून विद्युत वितरणाकरीता गेलेल्या खांब विज कंपनीने उभारल्यामुळे तो विज कंपनीचा कायदेशिर ग्राहक आहे. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदार हा शेतकरी असून त्यास मौजे आनंदवाडी तालुका जिल्हा परभणी येथे शेत गट क्रमांक 13 व 15 मध्ये सन वर्ष 2010-2011 मध्ये एक हेक्टर एवढया क्षेत्रात ऊसाची लागवड शास्त्रोक्त पध्दतीने व कृषी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केलेली होती, व तसेच सदरील ऊसाचे पीक हे अतिशय जोमदारपणे वाढून परिपक्व अवस्थेत उभे होते अर्जदाराच्या सदरील शेताला लागुन मुंजाजी किशनराव शेळके, बापुराव किशनराव शेळके, अंकुश हरीभाऊ शेळके, राजेभाऊ हरीभाऊ शेळके, बालासाहेब, अशोक व माणिक नामदेव शेळके तसेच लिंबाजी किशनराव शेळके यांच्या ऊसाचे फड एकमेका लगत असून गैरअर्जदार यांच्या कार्यालया मार्फत सदरील शेत शिवारात विद्युत पुरवठा करण्यासाठी एक डी.पी. कार्यरत केलेली असून सदरील डी.पी. मधून ब-याचशा शेतक-यांना विद्युत पुरवठा झालेला आहे. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरील डी.पी. ही अतिशय दुरावस्थेत असून अर्जदाराने व तसेच इतर ब-याच लोकांनी वेळोवेळी गैरअर्जदाराकडे सदरील डी.पी दुरुस्ती बाबत विनंती करुन देखील गैरअर्जदाराच्या संबंधीत अभियंता यांनी दुरुस्ती व देखभाल केलेली नसल्याने सदरील डी.पी. ही धोकादायक अवस्थेत होती. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, दिनांक 13 फेब्रुवारी 2011 रोजी दुपारी अंदाजे एक वाजण्याच्या सुमारास सदरील डी.पी. मध्ये स्फोट होवुन शॉर्टसर्किट झाले व त्यामुळे मोठया प्रमाणात जाळ व ठिणग्या निघाल्यामुळे अर्जदाराच्या तसेच वर उल्लेख केलेल्या शेत शेजा-यांच्या तोडणी योग्य परिपक्व अवस्थेतील ऊस संपूर्णतः गैरअर्जदार व त्यांच्या कार्यालयाच्या चुकीमुळे जळालेले असून अर्जदाराचे खालील प्रमाणे नुकसान झालेले आहे. ऊसाचे क्षेत्रफळ एक हेक्टर एकरी 50 टन या हिशोबाने रु.2000/- या दराने निव्वळ ऊसाचे नुकसान 2,50,000/- रुपये, ऊसाच्या वाडयापासून चारा एकरी रु.10,000/- प्रमाणे 25,000/- रुपये ऊसाची पाचटापासून होणारे कंपोस्ट खत एकरी 5,000/- रुपये प्रमाणे 12,500/-, जळालेल्या निरुपयोगी ऊस स्वखर्चाने तोडून शेताच्या बाहेर काढून टाकण्यासाठी लागलेली मजुरी एकरी रुपये 5,000/- प्रमाणे 12,500/- व ऊस जळालेल्या पुढील ऊसाच्या खोडव्याचे कमी फुटवे फुटल्यामुळे होणारे नुकसान एकरी 5,000/- रुपये प्रमाणे 12,500/- व सदरील ऊसाची लागवड करीत असतांना एकरी 25,000/- रुपये प्रमाणे झालेल्या लागवड खर्चावरील व्याजदर 10 टक्के प्रमाणे 6,200/- व मानसिकत्रासा बद्दल व न्यायालयीन खर्चा बद्दल 10,000/- रुपये असे एकुण 3,28,700/- रुपयांचे निव्वळ नुकसान गैरअर्जदाराच्या कार्यालयाने कर्मचा-यांच्या चुकीच्या व्यवस्थापणामुळे तसेच सदोष डी.पी. बसविल्यामुळे तसेच वेळोवेळी योग्यती सफाई व दुरुस्ती व देखभाल न केल्यामुळे अर्जदाराचे अतोनात नुकसान झाले असून त्यास गैरअर्जदार वैयक्तिक व संयुक्तिकरित्या सदरील नुकसानीस जबाबदार आहेत. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरील घटना झाल्या बरोबर अर्जदाराने व तसेच संबंधीत शेतक-यांनी आग विजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु सोसाट्याचे वारे व डी.पी. जळाल्यामुळे थांबलेला विद्युत पुरवठा या कारणाने कोणत्याही प्रकारचा अवरोध निर्माण करता आला नाही, सदरील घटनेची ताबडतोब माहिती पोलीस मुख्यालया मार्फत अग्नीशामक दल यांना देवुन त्याची मदत घेण्यात आली, परंतु अग्नीरोधक वाहन अर्जदाराच्या शेता पर्यंत येई पर्यंत अर्जदाराचा संपूर्ण ऊस जळाला होता सदरील घटनेची माहिती मंडळ अधिकारी सिंगणापूर व तलाठी सज्जा उमरी यांना दिली व त्यांनी 13/02/2011 रोजी यथास्थित पंचनामा करुन शासनास अहवाल सादर केला तसेच पोलीस स्टेशन दैठणा यांनी देखील आपल्या सक्षम अधिका-यांना पाठवुन दिनांक 14/02/2011 रोजी घटनास्थळ पंचनामा केला अग्नीशमन कार्यालय परभणी यांनी दिनांक 24/02/2011 रोजी आवश्यक ते प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने व तसेच गावातील हितसंबंधी लोकांनी दिनांक 14/02/2011 रोजी गैरअर्जदाराच्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम अभियंता शाखा दैठणा यांना रितसर अर्ज देवुन ऊसाची नुकसान भरपाई देण्या बद्दल विनंती केली, तसेच दुय्यम अभियंता यांनी सहाय्यक विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग परभणी यांच्याकडे अहवाल मागविण्या संबंधी पत्र व्यवहार केलेला असून सदरील पत्र दिनांक 15/02/2011 रोजी संबंधितास प्राप्त झाले आहे, परंतु अद्याप पर्यंत विद्युत निरीक्षकाचा अहवाल आलेला नाही,असे वारंवार गैरअर्जदाराच्या अधिपत्त्या खालील कार्यालया मार्फत अर्जदारास सांगण्यात येत आहे. तसेच नुकसान भरपाई देण्या संदर्भात देखील गैरअर्जदार कार्यालया कडून कोणतीही हालचाल झालेली नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या अधिपत्त्या खालील अधिका-यांना वेळोवेळी तोंडी विनंती करुन देखील नुकसान भरपाई देण्या संदर्भात पोकळ आश्वासना शिवाय अर्जदाराच्या पदरात काहीही पडलेले नाही. गैरअर्जदाराच्या कार्यालयातून प्रत्येकवेळी विद्युत निरीक्षकाचा अहवाल आल्या नंतर नुकसान भरपाईची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे तोंडी आश्वासने सतत अर्जदारास दिले जात होते म्हणून आज पर्यंत अर्जदाराने गैरअर्जदारावर विश्वास ठेवुन कायदेशिर कारवाई केली नाही, परंतु गैरअर्जदारास यांच्या कार्यालया मार्फत निव्वळ वेळ काढू धोरण अवलंबविले जात असल्याचे तसेच अर्जदाराची जाणीवपूर्वक फसवणुक केली जात आहे असे निदर्शनास आले, म्हणून गैरअर्जदारास दिनांक 12 ऑगस्ट 2011 रोजी कायदेशिर नोटीस देण्यात आली सदरील नोटीस गैरअर्जदारास पोंहचली असून त्यांच्याकडून उत्तरादाखल 10/10/2011 रोजी नोटीसचे प्रती उत्तर अर्जदारांना मिळाले व त्यामध्ये देखील विद्युत निरीक्षक विद्युत निरीक्षण विभाग यांच्याकडून अपघाताची चौकशी चालू आहे हे मान्य केले, परंतु अद्याप पर्यंत अर्जदाराना कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही, म्हणून प्रस्तुत प्रकरण दाखल करण्यात येत आहे. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराची काहीही चुक नसतांना व गैरअर्जदाराच्या कर्यालयाच्या चुकीमुळे अर्जदाराचे वरील विवेचन केल्या प्रमाणे रु.3,28,700/- एवढया रक्कमेचे नुकसान झालेले असून गैरअर्जदार यांचे कार्यालय सदरील नुकसान भरपाई देण्यास कायद्या प्रमाणे बांधील आहेत, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराच्या सदरील शेता मधील ऊस जळाल्यामुळे एकुण रु.3,28,700/- नुकसान भरपाई गैरअर्जदारा कडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र नि. क्रमांक 2 वर दाखल केले आहे. तसेच नि.क्रमांक 5 वर अर्जदाराने एकुण 10 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केली आहे यामध्ये नि.क्रमांक 5/1 वर अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 12/08/2011 रोजी कायदेशिर नोटीस दिल्याचे कार्यालयीन प्रत तसेच नि.क्रमांक 5/2 वर गट क्रमांक 15 व नि.क्रमांक 5/3 वर गट क्रमांक 13 चे प्रमाणित 7/12 चा उतारा व नि.क्रमांक 5/4 वर गैरअर्जदारानी दिनांक 10/10/2011 रोजी अर्जदाराच्या नोटीसीस दिलेल्या उत्तराची प्रत व तसेच नि.क्रमांक 5/5 वर अर्जदारासह संबंधीत शेतक-यांनी गैरअर्जदाराकडे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान झाल्या बाबतचे तक्रारी अर्ज व तसेच नि.क्रमांक 5/6 वर तहसिल कार्यालय पाहणी पंचनामा केलेली प्रत व तसेच नि.क्रमांक 5/7 वर सदरील घटनेची एफ.आय.आर. ची प्रत व तसेच नि.क्रमांक 5/8 परभणी नगर परिषदाने दिनांक 24/02/2011 रोजी दिलेली पावतीची झेरॉक्स प्रत अग्नीशामक अधिकारी तसेच नि.क्रमांक 5/9 वर महाराष्ट्र अगिनशमन व आणीबाणी सेवा अग्नीशमन कार्यालय परभणी यांनी दिलेल्या जळीत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत व नि.क्रमांक 5/10 वर दिनांक 15/02/2011 रोजी दुय्यम अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा दैठणा यांनी सहाय्यक विद्यक निरीक्षक विद्युत निरीक्षण विभाग परभणी यांनी दिलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या त्याप्रमाणे गैरअर्जदार मंचासमोर हजर, परंतु गैरअर्जदाराने आपले लेखी म्हणणे मुदतीत सादर न केल्यामुळे दिनांक 08/06/2012 रोजी विना जबाब दाव्याचा आदेश पारीत करण्यात आला,म्हणून प्रकरण अंतिम निकालासाठी घेण्यात येत आहे.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदाराच्या शेतातील जळालेल्या ऊस पीकाची
नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय.
2 अर्जदार किती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे ?अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार मौजे आनंदवाडी ता.जि. परभणी येथे गट क्रमांक 13 मध्ये 10 गुंठे जमीन तसेच गट क्रमांक 15 मध्ये 84 गुंठे जमीन आहे व तसेच सदरील शेतामध्ये अर्जदाराने सनवर्ष 2010-2011 या वर्षी ऊस पीकाची लागवढ केली होती हे अर्जदाराने नि.क्रमांक 5/2 व 5/3 वरील दाखल केलेल्या प्रमाणे 7/12 च्या उता-यावरुन सिध्द केले आहे, तसेच दिनांक 13/02/2011 रोजी अर्जदाराच्या शेतात डी.पी.चा स्फोट होवुन शॉर्टसर्किट झाला व त्यातून जाळ व ठिणग्या निघाल्यामुळे अर्जदाराचे एक हेक्टर ऊसाच्या पिकाचे जळून नुकसान झाले ही बाब अर्जदाराने त्याने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/5 व 5/6 व तसेच एफ.आय.आर.ची प्रत नि.क्रमांक 5/7 वर व अग्नीशमन कार्यालय परभणी यांनी दिलेल्या जळीत प्रमाणपत्र नि.क्रमांक 5/9 वरुन सिध्द केले आहे, पण सदरील जळीत ऊस हे किती फुट उंचीचा होता व त्याची लागवढ केव्हा केली होती हे काहीच कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही, त्यातून प्रतीएकरी किती टन ऊस होतो याचा काही अंदाज काढता येत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या शेताच्या बाजूस डी.पी. इन्स्टॉल केलेली होती आणि तेथून अनेक शेतक-यांना विज पुरवठा केला होता सदरचा विज पुरवठा हा Hazardous स्वरुपाचा होता त्यामुळे डी.पी.चा स्फोट होवुन त्यातून आगीचे ठिणग्या पडून अर्जदारासह अनेक शेतक-यांचा ऊस जळून गेले, यातून असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने निष्काळजीपणा दाखवून “Hazardous service” which is hazardous to life and safety of the public when used are being offered for sell to the public देवुन अर्जदाराच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार आहे. गैरअर्जदाराला due deligence दाखवून सदरची घटना टाळता आली असती पण गैरअर्जदाराने तसे न करता स्वतःचा निष्काळजीपणा (Negligence) दाखवला आहे.
गैरअर्जदाराने मंचाची नोटीस मिळून देखील आपले म्हणणे मंचासमोर मांडण्याचे टाळले यावरुन देखील त्याचा निष्काळजीपणा सिध्द होतो.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, त्याचे रु.3,28,700/- चे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने कोणताही सबळ पुरावा मंचासमोर आणून ते सिध्द केलेले नाही, म्हणून त्याचे रु.3,28,700/- एवढे नुकसान झाले हे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही.अर्जदाराचे ऊस जळून नुकसान झाले हि गोष्ट त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द झाली असल्यामुळे मंचास प्रती एकरी approximately रुपये 15,000/- ची नुकसान भरपाई देणे हे योग्य वाटते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत
रु,34,000/- फक्त ( अक्षरी रु.चौतीसहजार फक्त) द्यावे.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी स्वतः सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष