निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 31/08/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 31/08/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19 /08/2013
कालावधी 11 महिने. 19 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
उध्दव पिता उत्तमराव काळदाते. अर्जदार
वय 42 वर्षे. धंदा.शेती. अड.एस.एस.चव्हाण.
रा.ब्राम्हणगांव.ता.जि.परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. अड.एस.एस.देशपांडे.
कार्यालय,(ग्रामीण भाग) जिंतूर रोड,परभणी.
2 उप-कार्यकारी अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.
कार्यालय,(ग्रामीण भाग) जिंतूर रोड, परभणी.
3 सहाय्यक अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.
कार्यालय,(ग्रामीण भाग) जिंतूर रोड, परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने निष्काळजीपणाची सेवा देवुन अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाईस गैरअर्जदार जबाबदार आहे,याबद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा ब्राम्हणगांव ता.जि.परभणी येथील रहिवासी असून तो शेतकरी आहे व त्यास गट क्रमांक 359 मध्ये 2 हेक्टर 17 गुंठे जमीन आहे व सदर जमिनीचा अर्जदार मालक व प्रत्यक्ष कब्जेदार आहे.सदरची जमीन ही ब्राम्हमणगांव शिवारा मध्ये आहे. सदरची जमीनी मध्ये अर्जदाराने स्वतः विहीर पाडलेली आहे व विहीरीवर मिटर बसवून सदरील शेतात पाईप लाईन करुन अर्जदार सदरची शेती करतो. सदरच्या विहीरी वरील मिटरसाठी विद्युत कनेक्शन गैरअर्जदार कंपनीकडून घेतलेले आहे.त्यामुळे अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचा ग्राहक आहे.सदरचे मिटर कोटेशन अर्जदाराच्या वडीलांच्या नावे उत्तमराव माणिकराव काळदाते यांच्या नावाने गेल्या 34 वर्षा पूर्वी घेतले होते व वडील मयत झाल्यानंतर देखील विद्युत मिटर अर्जदाराने आपल्या नावे न करता वडीलांच्या नावाने आहे, परंतु सदरील विद्युत वापराची आकारणी शुल्क अर्जदार नियमितपणे गैरअर्जदाराकडे भरतो. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरील गट क्रमांक 359 मध्ये अर्जदाराने एक टिनशेड व परटयाचे झोपडे घातलेले असून त्यामध्ये अर्जदाराचे साल गडी राहतात. आणि विहीरीच्या बाजुला विद्युत पोल असून त्याला लागुन अर्जदाराने जनावरांचा कडबा अंदाजे 3,000/- पेंड्या त्याच्या विशिष्ट प्रकारे बांधणी करुन ठेवलेली होती व त्या कडब्यांच्या बाजुला लगेच शेतीचे उपयोगी साहित्य नागर, वखर, औत, वेठन इत्यादी साहित्य ठेवलेले होते.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदारास मागील 3 वर्षांपासून वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात तक्रार केली होती की, अर्जदाराच्या शेतातील विद्युत पोलवरच्या 3 विद्युत वाहिणी तारा या पोलवरुन ढिल्या झाल्या असून ते एकमेकांस घासत आहेत, तसेच विद्युत पोलाच्या बाजुला पोलासाठी सपोर्ट दिलेले नाही.विद्युत पोलवर चिमण्या बसविलेले नाहीत, त्यामुळे पोलवरच्या विद्युत वाहीणीतारा सहजपणे एकमेकांस स्पर्श करीत असून त्यामुळे सदरचे तारा दुरुस्त करणे आवश्यक आहे व सुरक्षित करणे आवश्यक आहे. या बद्दलची तक्रार दिली होती, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराची दखल घेतली नाही.त्यामुळे अर्जदारास त्रुटीची सेवा गैरअर्जदाराने दिलेले आहे व यामुळेच दिनांक 18/05/2012 रोजी दुपारी अंदाजे 12.30 वाजता प्रखर उन्हाने व हवेने विद्युत वाहीणीतारा एकमेकांस स्पर्श होवुन शॉर्टसर्किट झाले व विजेच्या ठिणग्या खाली जमिनीवर पडल्या व सदरच्या ठिणग्या जमिनीवर असलेल्या कडब्याच्या पाल्या पाचोळयाने अचानक पेट घेवुन अर्जदाराचा संपूर्ण कडबा 3,000/- पेंड्या जळून खाक झाला.त्यामुळे अर्जदाराचे 60,000/- रुपयाचे नुकसान झाले. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचा कडबा जळाला त्यावेळी कडब्याचा भाव एका पेंडीस 20/- ते 25/- रुपये असा होता. तसेच सदरच्या आगीत कडब्याला लागुन असलेल्या शेती साहित्य नागर, अंदाजे 2,000/- रुपये, वखर अंदाजे 1500/- रुपये वेठन अंदाजे 200/- रुपये व औत अंदाजे 1500/- रुपये असे एकूण 65,200/- रुपयांचे नुकसान झाले व त्यास गैरअर्जदाराच पूर्णपणे जबाबदार आहेत जर गैरअर्जदाराने सदरच्या तारा वेळेत दुरुस्त केल्या असत्यातर अर्जदाराच्या शेतात सदरची घटना घडली नसती, त्यानंतर अर्जदाराने सदरची घटनेची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशन परभणी व तहसिलदार परभणी यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यावेळेस संबंधीत पोलिस स्टेशन व संबंधीत तहसिलदार यांनी स्थळ पाहणी केली व स्थळ पाहणी करुन पंचनामा केला अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरच्या घटने नंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांस सदरील घटनेमुळे झालेली नुकसानी 75,000/- रुपये मला द्यावी.म्हणून वारंवार विनंती केली म्हणून अर्जदाराने 17/07/2012 रोजी गैरअर्जदारास लेखी तक्रार देवुन नुकसान भरपाई देणे बाबत विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्यास स्पष्टपणे नकार केला.
सदरची आग लागली त्यावेळेस गैरअर्जदाराने 18/05/2012 रोजी अग्नीशमकदल यांना तात्काळ बोलावून कडबा विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु कडबा पूर्णपणे जळून नष्ट झाला होता.म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे व अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचे अर्ज मंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांस असा आदेश व्हावा की, अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासा बद्दल रुपये 10,000/-व अर्जाचा खर्च म्हणून रुपये 5,000/- व कडबा व शेतीचे साहित्य जळून नष्ट झाल्यामुळे रुपये 65,200/- असे एकूण 80,200/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 7 कागदपत्रांच्या यादीसह 7 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 6/1 वर 7/12 उतारा, 6/2 वर तहसिलदाराने केलेल्या पंचनाम्याची प्रत, 6/3 वर परभणी नगर परीषदेची 5,00/- रुपयांची पावती, 6/4 वर अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले निवेदन, 6/5 वर गैरअर्जदारास अर्जदाराने दिलेल्या निवेदनाची प्रत, 6/6 वर घटनास्थळाची फोटो, 6/7 वर विद्युत मिटरचे बिल इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला, व सदरची तक्रार मेरीटवर निकाली काढण्याचे ठरविले.
अर्जदाराच्या लेखी कैफियतीवरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदारांने अर्जदारास चुकीची व त्रुटीची सेवा देवुन
अर्जदारास दिनांक 18/05/2012 रोजी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे
नुकसानीस गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.ही बाब नि.क्रमांक 6/7 वरील दाखल केलेल्या विद्युत बिलावरुन सिध्द होते. तसेच दिनांक 18/05/2012 रोजी अर्जदाराच्या मौजे ब्राम्हंणगाव येथील शिवा-यात गट क्रमांक 359 मध्ये क्षेत्रात विजेच्या ताराचा घर्षण होवुन शॉर्टसर्किट होवुन कडब्यास आग लागली होती ही बाब नि.क्रमांक 6/2 वरील तसेच 6/6 वरील दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तसेच 6/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते,परंतु अर्जदाराचे म्हणणे की,सदरच्या आगीमुळे त्याचे 65,200/- रुपयांचे नुकसान झाले हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण की, अर्जदाराने त्याबाबतचा सबळ पुरावा मंचासमोर आणला नाही व अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 6/2 वरील पंचनाम्यावरुन फक्त अंदाजे 3,000 पेंडी कडबा व शेतीचे इतर सामान असे एकुण 65,200/- रुपयांचे नुकसान झाले असे म्हंटले आहे.त्यामुळे सदरच्या आगीत अर्जदाराचे अंदाजित वस्तुस्थिती व कागदपत्रे पाहता अर्जदाराचे 10,000/- रुपयांचे नुकसान झाले असे मंचास वाटते. व सदरच्या नुकसानीस गैरअर्जदाराच जबाबदार आहेत.गैरअर्जदाराने योग्य ती काळजी घेवुन अर्जदाराच्या शेतातील तारा दुरुस्त केल्या असत्यातर अर्जदाराचे शेतातील सदरील घटना टळली असती,यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने निष्काळजीपणा दाखवुन सेवेत त्रुटी दिली आहे.गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही आपला लेखी जबाब दाखल केला नाही व तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता व त्यास देखील येनकेण प्रकारे गैरअर्जदाराने उत्तर देण्याचे टाळले. यावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे नुकसान एकप्रकारे मान्यच केलेले आहे.गैरअर्जदाराने अर्जदाराचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे टाळून सेवेत त्रुटी दिली आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या आदेश तारखे पासून
30 दिवसांच्या आत अर्जदारास रुपये 10,000/- फक्त (अक्षरी रु.दहाहजार
फक्त ) नुकसान भरपाई द्यावी.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- फक्त (अक्षरी
रु.दोनहजार फक्त ) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- फक्त
(अक्षरी रु.एकहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष