(पारीत व्दारा श्री. भास्कर बी. योगी, मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक– 19 जुलै, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी विरुध्द दोषपूर्ण सेवा दिल्या बाबत ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे उपरोक्त नमुद पत्त्यावर स्वतःचे घर आहे. तक्रारकर्त्याचे वडील श्री तुकाराम बकाराम मेश्राम यांचे नावाने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे विद्दुत कनेक्शन असून त्याचा ग्राहक क्रं-442410352942 असा असून, मीटर क्रं- 1510812377 असा आहे. तक्रारकर्त्याचे वडीलांचे मृत्यू नंतर तो या विद्दुत कनेक्शनचा उपयोग करीत असून देयकांचा भरणा करीत आहे आणि त्यामुळे तो विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचा ग्राहक असून विरुध्दपक्ष ही एक सेवा देणारी कंपनी आहे.
तक्रारकर्त्याची संक्षीप्त मुख्य तक्रार अशी आहे की, विरुध्दपक्ष म.रा.विज वितरण कंपनी कडून त्याला प्राप्त होणा-या विज देयकांमध्ये त्याचेकडे कोणतीही थकबाकीची रक्कम प्रलंबित नसताना सुध्दा व या बद्दल त्याने वारंवार विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीमध्ये तक्रारी केल्यानंतर सुध्दा त्या तक्रारींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष्य करुन वारंवार थकबाकीची रक्कम पुढील देयकामध्ये दर्शविण्यात येत होती. तक्रारकर्त्याने या बाबत खालील प्रमाणे विस्तृत विवेचन केलेले आहे-
अक्रं | विद्दुत देयकाचा महिना | विद्दुत देयकाची रक्कम रुपया मध्ये | सदर देयकात थकबाकीची दर्शविलेली रक्कम | शेरा |
01 | 02 | 03 | 04 | 05 |
01 | डिसेंबर-2016 | 150/- | .... | सदर देयकाची रक्कम विहित मुदतीत भरली. |
02 | जानेवारी-2017 | 230/- | 150/- | वि.प.क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-80/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला. |
03 | फेब्रुवारी-2017 | 280/- | 150/- | वि.प. क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-130/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
04 | मार्च-2017 | 220/- | 148/- | वि.प. क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-80/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
05 | एप्रिल-2017 | 290/- | 142/- | वि.प. क्रं 2चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-140/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
06 | मे-2017 | 410/- | 146/- | वि.प. क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-270/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
07 | जुन-2017 | 320/- | 137/- | वि.प. क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-170/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
अक्रं | विद्दुत देयकाचा महिना | विद्दुत देयकाची रक्कम रुपया मध्ये | सदर देयकात थकबाकीची दर्शविलेली रक्कम | शेरा |
01 | 02 | 03 | 04 | 05 |
08 | जुलै-2017 | 290/- | 155/- | आर्थिक अडचणीमुळे त.क.नी सदर देयकाची रक्कम भरली नाही. |
09 | ऑगस्ट-2017 | 500/- | 289/- | वि.प. क्रं 2 चे लक्षात सदर बाब आणून दिली असता थकबाकीची रक्कम कमी करुन ते रुपये-350/- चे देण्यात आले व त्याचा भरणा केला |
10 | सप्टेंबर-2017 | 360/- | 149/- | त.क. सदर देयकाची रक्कम भरण्यास तयार आहे परंतु वारंवार तक्रारी करुन सुध्दा त्याच-त्याची चुकांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे प्रकरण मार्गी लागावे म्हणून त.क.ने शेवटी प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल केली. |
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 2 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे साकोली येथील कार्यालयात उपरोक्त विवरणपत्रात नमुद केल्या नुसार वांरवार भेटी द्दाव्या लागल्यात. विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे साकोली येथील कार्यालय तक्रारकर्त्याचे घरा पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे परंतु वारंवार देयका मधील चुका निर्दशनास आणून देऊनही विरुध्दपक्ष यांनी चुकीची विद्दुत देयके त्यास देणे सुरु ठेवले व भेटी देऊन लक्षात आणून दिल्या नंतर थकबाकी निरंक दर्शवून प्रत्यक्ष विज वापराची देयके त्यास देण्यात आली. अशाप्रकारे विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे
त्याला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तक्रारर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- एवढी रक्कम द्यावी
(02) माहे सप्टेंबर-2017 चे बिनचुक नविन विद्दुत देयक त्यात कोणतीही थकबाकी न दर्शविलेले विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
(03) विरुध्दपक्षांना आदेशित करण्यात यावे की, त्यांनी यापुढे विद्दुत देयक देताना चुकांची पुनरावृत्ती करु नये.
(04) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी तर्फे तर्फे एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष पान क्रं 45 ते 49 वर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्त्याचे वडील श्री तुकाराम बकाराम मेश्राम यांचे नावे विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे विद्दुत कनेक्शन असल्याची बाब मान्य केली. मात्र त.क.चे वडीलांचे मृत्यू नंतर सदर विद्दुत कनेक्शन त.क.चे नावे झाल्याने त.क. हा वि.प.चा ग्राहक होत असल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने वडीलांचे मृत्यू नंतर विरुध्दपक्षाचे कार्यालयात येऊन स्वतःचे नावाने विद्दुत कनेक्शन करुन घ्यावयास हवे होते, परंतु तसे त.क.ने केलेले नाही, त्यामुळे त.क. हा वि.प.चा ग्राहक होत नसल्याने प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने रुपये-150/- बिलापोटी भरली असल्याची बाब नामंजूर केली, मात्र तक्रारकर्त्याचे बिलातून रुपये-150/- कमी करुन त्याचे कडून विद्दुत देयकापोटी रुपये-80/- स्विकारण्यात आले ही बाब कबुल केली. तक्रारकर्त्याने विहित दिनांकास बिल न भरल्यामुळे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये भरलेली रक्कम आली नाही व त्यामुळे संगणकीय देयका मध्ये थकबाकी दिसून येत होती कारण सदर संगणकीय सिस्टीम्स मध्ये आपोआप देयके तयार होतात, त्यामुळे विरुध्दपक्षांचा कोणताही दोष नाही, संगणक प्रणाली मध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही, त्यामुळे त.क. स्वतः येऊन वि.प.चे कार्यालयात चुकीच्या रकमेची विद्युत देयके बरोबर करुन घेत होता. तक्रारकर्त्याने शेवटचे पेमेंटचे दिनांकाचा उल्लेख केलेला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां विरुध्द केलेली अन्य सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. आपल्या विशेष कथनात नमुद केले की, त.क.ने त्याचे वडीलांचे मृत्यू नंतर विद्दुत कनेक्शन त्याचे नावावर केले नाही आणि बेकायदेशीरपणे वि.प.ची परवानगी न घेता विद्दुत कनेक्शनचा वापर केला. त.क.ने विज देयके अदा केल्या बाबत एकही कागदपत्र दाखल केला नाही. विद्दुत कनेक्शन असलेल्या घराचा मालकी हक्क त.क.चे नावाने असल्या बाबत पुराव्याचे दस्तऐवज दाखल केलेले नाहीत. त.क.ने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षांना त्रास देण्याचे आणि पैसे उकळण्याचे दृष्टीने केलेली आहे. त.क. हा अनधिकृतपणे विद्दुत कनेक्शनचा वापर करीत असल्याने त्याला तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करण्याचे अधिकार नाहीत. सबब वि.प.क्रं 1 ते 3 यांचे विरुध्द बेकायदेशीररित्या तक्रार केल्या बद्दल त.क. वर खर्च बसविण्यात येऊन वि.प.विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 17 वरील यादी नुसार अक्रं 1 ते 11 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने माहे डिसेंबर-2016 ते सप्टेंबर, 2017 या कालावधी करीता प्रत्येक महिन्याची देयके अशा प्रतींचा समावेश आहे. त.क. तर्फे पान क्रं 68 वरील यादी प्रमाणे अक्रं 1 ते 5 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये सप्टेंबर-2017 ते नोव्हेंबर-2017 या महिन्यांच्या विज देयकांच्या प्रती, त.क.चे वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र अशा दस्तऐवज प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं 50 ते 54 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 62 ते 65 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे पान क्रं 59 व 60 वर सहायक अभियंता, साकोली, जिल्हा भंडारा यांचे शपथपत्र दाखल केले. विरुध्दपक्षा तर्फे पान क्रं 66 वर पुरसिस दाखल करुन त्यांचे लेखी उत्तर हाच त्यांचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा असे नमुद केले.
06 तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री वेगड तर विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशिने यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 विज वितरण कंपनीचे लेखी उत्तर व शपथपत्र तसेच त.क.ने दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्यावरुन मंचा समोर खालील मुद्ये उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
(1) | त.क. हा वि.प.चा ग्राहक होतो काय? | होय. |
(2) | वि.प.यांनी, त.क.ला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय? | होय. |
(3) | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं-1 बाबत-
08. विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी तर्फे लेखी उत्तरात असा आक्षेप घेण्यात आलेला आहे की, तक्रारकर्त्याचे वडील श्री तुकाराम बकाराम मेश्राम यांचे नावे विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे विद्दुत कनेक्शन असून त्यांचे मृत्यू नंतर सदर विद्दुत कनेक्शन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे कार्यालयात येऊन स्वतःचे नावाने करुन घ्यावयास हवे होते, परंतु तसे त.क.ने केलेले नसल्याने त.क. हा वि.प.चा ग्राहक होत नाही करीता प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी.
09. आम्ही प्रकरणात दाखल असलेल्या विद्दुत देयकांची पाहणी केली असता विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी कडून घेतलेले विद्दुत कनेक्शन हे तक्रारकर्त्याचे वडील श्री तुकाराम बकाराम मेश्राम यांचे नावाने असून त्याचा ग्राहक क्रं-442410352942 व मीटर क्रं- 1510812377 असा असल्याचे दिसून येते.
10. तक्रारकर्त्याचे म्हणण्या प्रमाणे वडीलांचे मृत्यू नंतर तो या विद्दुत कनेक्शनचा उपयोग करीत असून विज देयकांचा भरणा करीत आहे आणि त्यामुळे तो विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचा ग्राहक असून विरुध्दपक्ष ही एक सेवा देणारी कंपनी आहे. या संदर्भात तक्रारकर्त्याने त्याचे वडील श्री तुकाराम बकाराम मेश्राम यांचा दिनांक-09.04.2009 रोजी मृत्यू झाल्या बाबत पान क्रं 70 वर ग्राम पंचायत गोंडउमरी यांचे तर्फे निर्गमित मृत्यू प्रमाणपत्राची प्रत दाखल केली. वडीलांचे मृत्यू नंतर त.क. हा सदर विद्दुत कनेक्शनचा वापर करीत असल्या बाबत व त्या संबधाने विज देयके भरल्या बाबत आलेल्या विज देयकांच्या प्रती पुराव्या दाखल दाखल असल्याने त.क. हा सदर विज कनेक्शनचा वापर करीत असून विज देयके भरीत असल्याची बाब सिध्द होते.
11. त.क.चे वडीलांचे नावावर अद्दाप पर्यंत विज कनेक्शन असून त.क.हा त्या कनेक्शनचा वापर करुन देयके अदा करीत असल्याने तो ग्राहक या सज्ञेत मोडतो किंवा कसे या संदर्भात प्रस्तुत ग्राहक मंच ग्राहक संरक्षण कायद्दातील ग्राहका संबधी केलेल्या तरतुदीवर आपली भिस्त ठेवीत आहे-
Para 1.2 | CONSUMER PROTECTION ACT | 2.4 |
Who is a consumer 1.2 Section 2(d) of the Consumer Protection Act says that consumer means any person who— |
1.2-2 Consumer of services - A person is a consumer of services if he satisfy the following criteria :
1.2-2a SERVICES ARE HIRED OR AVAILED OF - The term ‘hired’ has not been defined under the Act. Its Dictionary meaning is - to procure the use of services at a price. Thus the term ‘hire’ has also been used in the sense of ‘avail’ or ‘use’. Accordingly it may be understood that consumer means any person who avails or uses any service.
वर नमुद केल्या प्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्दात ग्राहका संबधी केलेल्या व्याख्ये मध्ये स्पष्टपणे नमुद आहे की, जी व्यक्ती मोबदला देऊन सेवा घेते ती व्यक्ती ग्राहक ठरते.
12. हातातील प्रकरणात वडीलांचे मृत्यू नंतर त्यांचा मुलगा तक्रारकर्ता स्वतः वडीलांचे नावे असलेल्या विद्दुत कनेक्शनचा वापर करीत असून त्या वापरा बद्दलची विद्दुत देयके विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी कडे भरीत आहे. वडीलांचे मृत्यू नंतर त्यांची पत्नी, मुले व मुली हे कायदेशीर वारसदार ठरीत असल्यामुळे, वडीलांचे मृत्यू नंतर, जरी महसूली अभिलेखात मालमत्तेचा फेरफार झालेला नसेल, तरीही वडील वारल्या नंतर, लगेच वारसाहक्का प्रमाणे त्यांची पत्नी, मुले व मुली कायदेशीर वारसदार ठरीत असतात. त्यामुळे जरी वडीलांचे नावे असलेले विद्दुत कनेक्शन त्यांचे मृत्यू नंतर हे त.क.चे नावाने हस्तांतरीत केलेले नसेल तरी वारसाहक्काने त.क. हा त्यांचा मुलगा असल्याने व तो विद्दुत कनेक्शनचा वापर करुन बिले भरीत असल्याने विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कपंनीचा लाभधारी ग्राहक “Beneficiary Consumer” ठरतो.
13. महाराष्ट्र राज्य विद्दुत कायदा आणि ग्राहक संरक्षण कायद्दा यामधील तरतुदी या वेगवेगळया आहेत आणि ग्राहक संरक्षण कायद्दा नुसार ग्राहक मंचाची निर्मिती ही ग्राहकांची तक्रार सोडवण्यासाठी जास्तीची सोय म्हणून केलेली असल्याने येथे ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदींचा विचार होणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे, त्यामुळे त.क. हा वि.प. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचा लाभधारी ग्राहक ठरत असल्याने सदर तक्रार चालविण्याचे संपूर्ण अधिकारक्षेत्र प्रस्तुत ग्राहक मंचास येत असल्याने विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीने घेतलेल्या वर नमुद आक्षेपात मंचास तथ्य दिसून येत नाही, त्यामुळे मुद्दा क्रं 1 चे उत्तर आम्ही “होकरार्थी” देत आहोत.
मुद्दा क्रं-2 बाबत-
14. तक्रारकर्त्याची तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष म.रा.विज वितरण कंपनी कडून त्याला प्राप्त होणा-या विज देयकांमध्ये त्याचेकडे कोणतीही थकबाकीची रक्कम प्रलंबित नसताना व याबद्दल त्याने वारंवार विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीमध्ये तक्रारी केल्यानंतर सुध्दा त्या तक्रारींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष्य करुन वारंवार थकबाकीची रक्कम पुढील देयकामध्ये दर्शविण्यात येत होती आणि ही त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे. तक्रारकर्त्याने आपले तक्रारीचे समर्थनार्थ पान क्रं 17 वरील यादी नुसार माहे डिसेंबर-2016 ते सप्टेंबर, 2017 या कालावधी करीता प्रत्येक महिन्याची देयके तसेच पान क्रं 68 वरील यादी प्रमाणे सप्टेंबर-2017 ते नोव्हेंबर-2017 या महिन्यांच्या विज देयकांच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केल्यात.
15. मंचाव्दारे सदर विज देयकांच्या प्रतींचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, माहे डिसेंबर-2016 चे रुपये-150/- चे देयक त.क.ने भरलेले आहे परंतु माहे जानेवारी-2017 चे देयकात थकबाकीची रक्कम रुपये-150/-दर्शविली असून एकूण देयक रुपये-230/- चे दिलेले आहे. त.क.ने तक्रार केल्या नंतर वि.प. चे कर्मचा-याने हाताने सदर बिलावर रुपये-150/- दिनांक- 28.12.2016 रोजी भरल्याचे लिहून देयक रुपये-80/- चे दर्शविलेले आहे. असे असताना माहे फेब्रुवारी, 2017 चे देयकावर सुध्दा वि.प.तर्फे हाताने दिनांक-28.12.2016 रोजी रुपये-150/- भरल्याचे नमुद करुन सदर देयक रुपये-150/- एवढया रकमेने कमी केल्याचे दिसून येते. माहे मार्च-2017 चे देयकात सुध्दा वि.प. तर्फे हाताने दिनांक-28.12.2016 रोजी रुपये-150/- भरल्याचे नमुद करुन सदर देयक रुपये-150/- एवढया रकमेने कमी केल्याचे दिसून येते. माहे मार्च-2017 देयका मध्ये सुध्दा सदर देयक रुपये-150/- ने मागाहून कमी केल्याचे दिसून येते. माहे एप्रिल-2017 देयका मध्ये सुध्दा रुपये-150/- ने मागाहून कमी केल्याचे दिसून येते. माहे मे-2017 चे देयकाची रक्कम सुध्दा वि.प. तर्फे हाताने कमी केलेली आहे. माहे जुन-2017 चे देयकाची रक्कम सुध्दा वि.प. तर्फे हाताने कमी केलेली आहे. माहे जुलै-2017 चे देयक त.क.ने भरलेले नाही. माहे ऑगस्ट, 2017 चे देयक रुपये-500/- कमी करुन ते रुपये-350/- चे केल्याचे दिसून येते. माहे सप्टेंबर-2017 चे देयक हे रुपये-360/- चे असून त्यामध्ये एकूण विज वापर फक्त 29 युनिट दर्शविलेला असून 29 युनिटसाठी रुपये-360/- एवढे बिल येऊ शकत नाही. माहे ऑक्टोंबर-2017 चे देयक रुपये-650/- दर्शविलेले असून त्यामध्ये विजेचा एकूण वापर हा 47 युनिट दर्शविलेला आहे. माहे नोव्हेंबर-2017 चे देयकात एकूण विज वापर हा 30 युनिट दर्शविलेला असून देयक रुपये-860/- चे देण्यात आलेले आहे, यावरुन विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे दर्शविलेल्या प्रत्यक्ष विज वापरा नुसार बिले आकारलेली नसून थकबाकी नसतानाही थकबाकीची रक्कम दर्शवून जास्तीची बिले त.क.ला निर्गमित करण्यात आलेली आहेत असे देयकांच्या प्रतीवरुन दिसून येते.
16. त.क. हा व्यवसायाने रोज मजूरीचे काम करणारा व्यक्ती आहे. त.क.ने आपल्या शपथपत्रात असे नमुद केले की, त्याला विद्दुत देयकाचे दुरुस्तीसाठी प्रत्येक महिन्यात विरुध्दपक्षाचे साकोली कार्यालयात जावे लागते, जे त्याचे गावा पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे त्याला प्रत्येक वेळी शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. प्रत्येक महिन्यात विद्दुत देयकातील चुक विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे कर्मचा-यांचे लक्षात आणून दिल्या नंतरही ती चुक दुरुस्त न करता सतत माहे जानेवारी-2017 पासून ते माहे नोव्हेंबर-2017 पर्यंत थकबाकीची रक्कम भरलेली असताना सुध्दा ती रक्कम प्रत्येक महिन्याचे बिलात लाऊन चुकीची विद्दुत देयके जवळपास 09-10 महिन्यांचे कालावधीत देणे आणि तक्रारकर्त्याने तक्रार केल्या नंतर मागाहून सदर विद्दुत देयक हाताने दुरुस्त करणे हा सर्व प्रकार हा विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयातील गलथान कारभार आहे असे दिसून येते.
17. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे दाखल पुराव्याचे शपथपत्रात असे नमुद आहे की, माहे डिसेंबर-2016 चे विज देयक हे मुदत संपल्या नंतर शेवटी मिळालेले आहे. बिलाचे काम हे संगणकीय आहे त्यामुळे डाटा एन्ट्री प्रमाणे पुढील महिन्याचे बिल निर्मित होते, बिल तयार करणारी यंत्रणा वेगळी आहे, जर मागील महिन्याचे देयकाची रक्कम मुदत संपल्या नंतर शेवटचे कालावधीत जमा होत असेल तर शेवटचे कालावधीत जमा झालेल्या रकमेची नोंद पुढील महिन्याचे देयका मध्ये येणार नाही कारण पुढील महिन्याचे देयक हे संगणकात अगोदरच तयार झालेले असते परंतु पुढील महिन्यात ग्राहकाने देयक जमा केल्याची पावती दाखविल्यास तेवढी रक्कम सदर बिलातून वजावट केल्या जाते.
18. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे वर नमुद केल्या नुसार घेतलेला बचाव हा तकलादू वाटतो. बिल तयार करणारी यंत्रणा ही जरी वेगळी असली तरी विज वितरण कंपनीचे इतर विभागा मध्ये योग्य तो समन्वय असणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने माहे डिसेंबर-2016 चे देयक हे त्या महिन्याच्या शेवटच्या कालावधीत जरी भरले असले तरी त्या बाबतची सुचना हे बिलींग सेक्शनला देऊ शकले असते व बिलींग सेक्शनला अशी सुचना प्राप्त झाल्या नंतर संगणकीय सॉफ्टवेअर मध्ये तशी दुरुस्त नोंद करता आली असती. हा प्रश्न केवळ तक्रारकर्त्या पुरती मर्यादित नसून विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे असंख्य ग्राहक असून सदरचे ग्राहक हे वेगवेगळया तारखांना बिलांचा भरणा करीत असतात त्यामध्ये काही ग्राहक हे मुदत संपल्या नंतर सुध्दा देयके भरीत असतात, अशा ग्राहकांचे देयकां बाबत बिलींग सेक्शन व अन्य सेक्शन यामध्ये समन्वय व ताळमेळ (Co-ordination) असणे आवश्यक असून मुदत संपल्या नंतर देयकाच्या रकमा भरलेल्या ग्राहकांची वेगळी स्वतंत्र यादी बिलींग सेक्शनला जाणे आवश्यक आहे व बिलींग सेक्शन मधील संगणकीय प्रणाली मध्ये मुदती नंतर भरलेल्या रकमांची योग्य नोंद होणे आवश्यक आहे.
19. तक्रारकर्ता हा व्यवसायाने रोज मजूरीचे कामे करतो आणि माहे डिसेंबर-2016 चे संपूर्ण देयकाची रक्कम रुपये-150/- अदा केलेली असताना पुन्हा पुन्हा पुढील बिलांमध्ये रुपये-150/- एवढी रक्कम लागून येण्याचे कोणतेही प्रयोजन नाही तसेच तक्रारकर्त्याचे गाव विरुध्दपक्ष क्रं 2 विज वितरण कंपनीचे कार्यालय असलेल्या साकोली गावा पासून 25 किलोमीटर दुर अंतरावर असून त.क.ला रोजमजूरीचे कामे थांबवून पायपिट करुन विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात येऊन प्रत्येक महिन्यात सतत बिल दुरुस्त करुन घ्यावे लागत होते. विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात गेल्या बरोबर त्वरीत काम होईल असा अनुभव फार थोडा आहे, त्यामुळे बिल दुरुस्तीसाठी त्याला ताटकळत बसावे लागले असेल आणि परिणामी त्या दिवसाची रोज मजूरी सुध्दा त्याला घालवावी लागली असेल परंतु विरुध्दपक्ष विज वितरण कंपनीचे कर्मचा-यांनी या गोष्टीचा कोणताही विचार एकंदरीत परिस्थिती पाहता त.क.चे प्रकरणात केल्याचे दिसून येत नाही व वारंवार विरुध्दपक्षाचे कर्मचारी त्याच त्या चुका ते करीत गेल्याची बाब दाखल पुराव्या वरुन सिध्द होते आणि ही वि.प. तर्फे त.क.ला मिळालेली दोषपूर्ण सेवा आहे, त्यामुळे त्याला निश्चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे.
20. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचा-यांचे पगार हे देशासाठी कर भरणा-या व्यक्तींचे करामधून होत असतात आणि ते जनतेचे सेवक असतात (Public Servant) ही भावना जर प्रत्येक कर्मचारी/अधिकारी यांनी मनात ठेवली तर त.क.सारख्या ग्राहकास ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याचे कोणतेही प्रयोजन राहिले नसते.
21. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता त.क.ची वि.प. विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारकर्ता हा माहे नोव्हेंबर-2017 चे विज देयक त्यामध्ये कोणतीही थकबाकी न दर्शविता प्रत्यक्ष विज वापरा नुसार मिळण्यास पात्र आहे. प्रकरणातील एकंदरीत परिस्थितीचा विचार करता विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कडून मंजूर करणे मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. तसेच यापुढे विरुध्दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे बिनचुक विज देयक ठराविक मुदतीत त्याला निर्गमित करण्यात यावीत असे निर्देशित करणे योग्य राहिल.
22. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित आणि तिचे अधिकारी अनुक्रमे कार्यकारी अभियंता, कारधा, तालुका जिल्हा भंडारा, उपकार्यकारी अभियंता, साकोली जिल्हा भंडारा आणि कनिष्ठ अभियंता, कारधा, जिल्हा भंडारा यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि तिचे अधिकारी यांना असे आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्यास माहे नोव्हेंबर-2017 चे विज देयक नव्याने त्यामध्ये कोणतीही थकबाकी न दर्शविता प्रत्यक्ष विज वापरा नुसार द्दावे तसेच सदर देयका मध्ये विलंब आकार, व्याज इत्यादीची कोणतीही आकारणी करु नये व असे देयक भरण्यास विज वितरण कंपनीचे नियमा नुसार योग्य ती मुदत त.क.ला देण्यात यावी.(03) विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि तिचे अधिकारी यांना असे आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला यापुढील कालावधीची विज देयके ही बिनचुक आणि विहित मुदतीचे आत निर्गमित करावीत.
(04) विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि तिचे अधिकारी यांना आदेशित करण्यात येते की,त्यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी आणि तिचे अधिकारी यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(06) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(07) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.