--- आदेश ---
(पारित दि. 23-02-2007 )
द्वारा श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार श्री. गजेंद्र निळकंठ सिंगनजुडे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. अर्जदार यांनी स्वयंरोजगार योजने अंतर्गत मागील दहा वर्षापासून गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून विद्युत कनेक्शन घेवून तिरोडा बस स्टॅंडमध्ये वेल्डींग वर्कशॉप जीवन निर्वाहाकरिता लावले त्याचा ग्राहक क्रं. 432430100880 व सी.एल.नं. 003371 असा आहे. अर्जदार नेहमी मीटर रिडींगप्रमाणे बिल भरत आहे.
2. दि. 11.09.06 रोजी भंडारा भरारी पथकचे पालेवार साहेब अर्जदाराचे दुकानात आले त्यांनी मीटरचे सील तोडून चेक केल्यावर मीटर स्लो फिरत आहे असे सांगितले व मीटरचा पंचनामा बनवून सुध्दा त्याची एक प्रत अर्जदार यांना दिली नाही व कळविले की, तुमचे मीटर टेस्टींग साठी गोंदियाला घेवून जातो व गै.अ.क्रं. 2 चे ऑफिस मधून टेस्ट रिपोर्ट व मीटर घेवून जावे. अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2 यांचे ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी तुमची रिपोर्ट आली नाही असे सांगितले. अर्जदार सतत ऑफिसमध्ये जात असतांना दि. 25.09.06 रोजी गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदार यांना कळविले की, त्यांच्या विरोधात चोरीची केस बनविली आहे. त्यांना रु.9580/- व रु.30,000/- चे बील मुदतीचे आत भरण्यास सांगण्यात आले अन्यथा पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
3. गैरअर्जदाराच्या गैरकायदेशीर कृत्यांमुळे अर्जदाराला दि. 11.09.06 पासून रु.300/- रोज याप्रमाणे आर्थिक नुकसान व मानसिक त्रास तसेच शारीरिक त्रास होत आहे.
4. अर्जदार यांनी मागणी केली आहे की, अर्जदार यांना दिलेले रु.9580/- व रु.30,000/-चे विद्युत देयक रद्द करण्याचे आदेश व्हावेत , दि. 11.09.06 पासून विद्युत पुरवठा पुर्ववत करेपर्यंत रु.300/- रोज याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.3000/- मिळावेत.
5. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी बयान नि.क्रं. 11 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदार हा विजेचा उपयोग व्यवसाईक कामासाठी करतो त्यामुळे अर्जदार हा ग्राहक या व्याख्येत बसत नाही. सदर प्रकरण हे विज चोरीशी संबंधित असल्यामुळे ग्राहक मंचास ते चालविण्याचा अधिकार नाही.
6. गैरअर्जदार त्यांच्या लेखी बयानात पुढे म्हणतात की, गैरअर्जदार क्रं. 1 यांच्या विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता (फिरते पथक) त्यांच्या नियमीत वीज चोरीची प्रकरणे शोधण्याच्या कार्यक्रमा अंतर्गत त्यांच्या सहका-यांबरोबर अर्जदाराच्या वर्कशॉप मध्ये दि. 11.09.06 ला दुपारी सुमारे 12.40 वाजता मीटरची पाहणी करण्यास गेले. त्यावेळी अर्जदार स्वतः तेथे उपस्थित होते. त्यांच्या समक्ष मीटरची तपासणी केली. मीटरची तपासणी करतांना सर्व प्रथम मीटरच्या दोन्ही बाजूस लावलेले लोड सील्स डॅमेज केलेले आढळले. मीटर टर्मीनलला पूर्वी लावलेले सील उपलब्ध नसून टर्मिनल उघडे आढळले. हया संशयावरुन मीटरची त्याच स्थळावर चाचणी केली असता मीटर 52.9 टक्के स्लो आढळले. तेव्हा सदर मीटरला जागेवर उघडण्यात आले. मीटर उघडल्यावर असे आढळले की, मीटरमध्ये इनकमींग फेस व आऊटगोईंग फेस मध्य रेजिस्टेंट लावले होते. त्यामुळे मीटर 52.9 टक्के स्लो असलेले आढळले अशाप्रकारे अर्जदार यांनी मीटरमध्ये फेरफार करुन मीटर स्लो करुन विजेची चोरी केली आहे.
7. वीज चोरी केल्यामुळे अर्जदार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन तिरोडा येथे 01.11.06 ला क्रं. 40/06 हा एफ.आय.आर. नोंदविण्यात आला.
8. अर्जदार यांचे मीटर 52.9 टक्के स्लो असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या नुकसान भरपाईची रक्कम आकारणी करुन रु.9580/- चे देयक तसेच तडजोड करावयाची असल्यास रु.30000/- चे देयक अर्जदार यांना देण्यात आले. परंतु अर्जदार यांनी ती देयक भरलेली नाहीत.
9. गैरअर्जदार म्हणतात अर्जदार हे स्वच्छ हाताने ग्राहक मंचात आलेले नाहीत. अर्जदार यांची ही तक्रार खोटी, बनावटी, ग्राहक मंचाची दिशाभूल करणारी असल्यामुळे सदर तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
10 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे,पुरावा, शपथपत्र, व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार हे वेल्डींग वर्कशॉप हा व्यवसाय चालवत असले तरी ते तो व्यवसाय स्वयंरोजगार म्हणून चालवतात ही बाब गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी बयानात कुठेही नाकारलेली नाही म्हणून अर्जदार हे ग्राहक या संज्ञेत येत नाहीत या गैरअर्जदार यांच्या म्हणण्यास अर्थ नाही.
11 अर्जदार यांचे मीटर स्लो होते असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी बयानात 52.9 टक्के स्लो होते असे म्हटले आहे. तर गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या मीटर पाहणी अहवाल दस्ताऐवज ब-9 मध्ये मीटर 53 टक्के स्लो तर टेस्ट सर्टिफिकेट मध्ये मीटर 60 टक्के स्लो होते असा उल्लेख आहे. मीटर स्लो असण्याच्या टक्केवारीत तफावत आढळून येत असल्यामुळे गैरअर्जदार यांचा मीटर तपासणी अहवाल बरोबर नाही असे म्हणता येते. तसेच गैरअर्जदार यांनी मीटरचा पंचनामा तिरोडा येथे केला तेव्हा बोलावलेले पंच हे गोंदिया व गणखेडा येथील आहेत. ही सुध्दा संशयास्पद बाब आहे.
12 गैरअर्जदार यांनी खालील केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहेत.
अ IV (2004) सीपीजे 26
ब IV (2004)सीपीजे 490
क IV(2004) सीपीजे 351
छ I (2006) सीपीजे 377
इ- 2006(4) एम.एच.जे.482
13 अर्जदार यांचा वेल्डींगचा व्यवसाय हा स्वयंरोजगार असल्याने व ही बाब गैरअर्जदार यांनी नाकारलेली नसल्यामुळे IV(2004) सीपीजे 26, .IV (2004)सीपीजे 490 व IV(2004) सीपीजे 351हे केस लॉ सदर प्रकरणास लागू होत नाहीत.
14 गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या विरोधात एफ.आय.आर.दाखल केल्याचे व अर्जदार यांच्यावर वीज चोरीबाबत केस सुरु असल्याचे म्हटले आहे. संबंधित न्यायालय हे त्यांच्यापुढे आलेल्या पुराव्यावरुन अर्जदार यांनी वीज चोरी केली अथवा नाही हे ठरवेल. त्यामुळे अर्जदार यांनी वीज चोरी केली आहे असे आज म्हणता येणार नाही. ते नैसर्गिक न्यायाच्या विरोधात होईल. गैरअर्जदार यांनी दाखल केलेला I (2006) सीपीजे 377 हा केस लॉ सदर प्रकरणास भिन्न तथ्य व परिस्थिती असल्यामुळे लागू होत नाही.
15 बी.एस.ई.एस.(वाय)पॉवर लिमिटेड वि. निरजकुमासर या I (2007) सीपीजे 1 मध्ये प्रकाशित झालेल्या आदरणीय दिल्ली राज्य आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल असेल तरी सुध्दा ग्राहक न्यायालयाला ग्राहक विवाद असल्यामुळे अशी प्रकरणे चालवण्याचा अधिकार आहे.
16 गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या 2006 (4) एम.एच.एल.जे. 482 या प्रकरणात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने वीज चोरीशी संबंधित प्रकरणे ही ग्राहक न्यायमंचाने चालवू नये असे कुठेही म्हटलेले नाही. इलेक्ट्रीसिटी अक्ट 2003 च्या प्रावधानानुसार व त्याच्याशी संबंधित नियमांना अनुसरुन ग्राहक वाद निकालात काढल्या जावा असे निर्देश आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
17 सुमन आईस फॅक्टरी विरुध्द उपविभागीय अधिकारी, एच.एस.ई.बी. व इतर या II (1998) सीपीजे 37 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय हरियाणा आयोगाने असे मत व्यक्त केले आहे की, जर मीटर स्लो आहे असे निदर्शनास आले तर ग्राहकाला नोटीस द्यायला हवा व त्याला तपासात सहभागी करुन घेतल्यानंतरच देयक दिल्या जावे. परंतु एकतर्फी निर्णय घेवून सरासरीच्या आधारे अतिरिक्त रकमेचे देयक पाठविणे व ग्राहकाची वीज कापणे हे संयुक्तिक नाही व अशा प्रकारांना उत्तेजन देता येत नाही.
18 बी.एस.ई.एस.यमुना पॉवर लि. विरुध्द स्नेहलता गोगीया या II (2006) सी.पी.जे.315 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय दिल्ली राज्य आयोगाने असे म्हटले आहे की, फक्त मीटरला सील नसने याचा अर्थ मीटर बरोबर छेडछाड केली असा होत नाही. चोरी झाली हे फक्त तेव्हाच गृहीत धरले जावू शकते जेव्हा मेन लाईनवरुन थेट विजेचा पुरवठा घेतल्या गेला असेल.
19 एच.एस.डब्ल्यु.ई.बी. (आता) एच.व्ही. पी.एन व इतर विरुध्द भूषणलाल या IV (2006) सीपीजे 193 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय चंदिगढ आयोगाने प्रतिपादन केले आहे की, मीटरच्या टर्मिनल सील हया हरविलेल्या असणे व एम व टी सील्स याबरोबर छेडछाड केल्या गेली असणे यावरुन विजेची चोरी झाली अाहेच असा निष्कर्ष काढता येत नाही. विरुध्द पक्षाचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी समांतर मीटर लावून दोन्ही मीटर मध्ये वीज वापरामधील फरक याची नोंद घेतली पाहिजे.
20 सदर ग्राहक तक्रारीत असे निदर्शनास येते की, अर्जदार यांना मीटर तपासणीत सहभागी करुन घेतल्या गेले नाही. अर्जदाराच्या मीटरबाबत ते स्लो असण्याची टक्केवारी लेखी बयाणात 52.9 टक्के, मीटर पाहणी अहवालात 53 टक्के व टेस्ट सर्टिफिकेट मध्ये 60 टक्के अशी दाखल आहे. जी विश्वासाहर्य नाही त्यावरुन ग्राहकाने वीज चोरी केली असे म्हणता येत नाही.
अशा स्थितीत सदर आदेशपारितकरण्यातयेतआहे.
आदेश
1 गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दिलेले रु.9580/- व रु.30,000/- चे देयक रद्द करण्यात
येत आहे.
2 गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.3000/- तर ग्राहक
तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
3 वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी आदेशाचे तारखेपासून एका महिन्याचे आत करावे. अन्यथा गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे दंडहार्य कारवाईस पात्र असतील.