(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष) तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे. तक्रारदार बलवंतसिंग तेजसिंग हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. तक्रारदार रविंद्र सोलूलाल रामैय्या यांनी सदरील दुकान दि.15.02.2002 मध्ये अंबेकर कुटूंबियाकडून खरेदी केले होते, परंतू दुकानाचे मीटर अद्यापपर्यंत बलवंतसिंग तेजसिंग यांच्या नावावरच आहे. रविंद्र सोनूलाल रामैय्या हे खरेदी केलेल्या दुकानात पुस्तके व स्टेशनरी विक्रीवरच दुकान चालवितात. दि.29.01.2008 रोजी रस्त्यावरील विद्युत खांबावरुन दुकानामध्ये वीज पुरवठा घेतला होता. दि.29.01.2008 रोजी शहरामध्ये सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत लोड शेडींग होते. त्यानंतर सुमारे 11 वाजता विद्युत पुरवठा सुरु झाला आणि 11 वाजून 15 मिनीटांनी अचानक तक्रारदाराच्या दुकानाशेजारी असलेल्या विद्युत खांबावरुन दुकानात घेतलेल्या वीज कनेक्शनचे सर्व्हिस वायरमध्ये जास्त दाबाचा वीज पुरवठा झाल्याने अचानक स्पार्किंग होऊन ते सर्व्हिस वायर जळत तक्रारदाराच्या दुकानात असलेल्या इलेक्ट्रीक मीटर पर्यंत आले, व अचानक स्फोट होऊन दुकानास आग लागली. तक्रारदारानी कनिष्ठ अभियंता, कार्यालय वीज महावितरण कंपनी वैजापूर, तसेच कोपरगांव नगरपालिका, कोपरगांव जिल्हा अहमदनगर येथील अग्निशामक दल तसेच येवले येथील नगरपरिषद या सर्वांना दुकानात लागलेल्या आगीची माहिती दिली. तसेच वैजापूर पोलीस ठाणे यांना ही कळविले. पोलीसांनी घटनास्थळास भेट देऊन, घटनास्थळ पंचनामा केला, अनेकांचे जबाबही घेतले. तहसिलदार कार्यालयाने घटनास्थळास भेट देऊन तलाठयामार्फत पंचनामा केला. तक्रारदारानी, गैरअर्जदाराकडे अर्ज करुन नुकसान भरपाई मागितली. त्यानंतर गैरअर्जदारानी घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळ पंचनामा केला व सदरील प्रकरण औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयास वर्ग केले. पुन्हा एकदा औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयाने विद्युत निरीक्षक यांना कळविले. त्यानंतर विद्युत निरीक्षकांनी त्यांचा अहवाल दिला. की, महावितरणने योग्यवेळी सर्व्हिस वायरची देखभाल व दुरुस्ती केली असती तर, सदरील घटना घडली नसती असा अहवाल दिला. असा अहवाल देऊनही गैरअर्जदार महावितरण कंपनीने तक्रारदारास नुकसान भरपाई दिली नाही, म्हणून तक्रारदारानी दि.20.01.2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. गैरअर्जदार क्र.2 यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई म्हणून रु.7,20,000/- 18% व्याजदराने, शारिरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान भरपाई म्हणून रु.6,000/- आणि तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी लेखी जबाबासाठी संधी देऊन दाखल केले नाही, म्हणून त्यांच्याविरुध्द नो से चा आदेश मंचानी पारित केला. तक्रारदारानी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदाराचे भारत बुक डेपो हे स्टेशनरी व पुस्तकांचे दुकान होते. त्यास दि.29.01.2008 रोजी 11 वाजता आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले. असे तक्रारदार म्हणतात. त्यासाठी तक्रारदारानी दि.28.08.2008 रोजी त्यांच्या दुकानामध्ये रु.6,51,778/- चा माल होता अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दुकानाला आग लागल्याचे व ते विझविल्याचे कोपरगांव नगरपरिषद, येवला नगरपरिषद यांनी अग्निशामक वाहने पुरविल्याबददलची दाखले दिलेली आहेत, त्यावरुन दिसून येते. तक्रारदारानी इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टरचा अहवालही मंचात दाखल केला. विद्युत निरीक्षक औरंगाबाद यांनी दि.13.06.2008 रोजीच्या पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वैजापूर यांना दिलेले पत्र मंचात दाखल केलेले आहे, त्यांच्या अहवालात त्यांनी खालीलप्रमाणे निष्कर्ष दिलेला आहे. “घटनास्थळावर केलेले निरीक्षणे, पोलीस पंचनामा व घेतलेले जबाब यावरुन असा निष्कर्ष निघतो की, दिनांक 29.01.2008 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत गावात लोडशेडींग होते. विद्युत पुरवठा सुरु झाल्यावर अंदाजे सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास भारत बुक डेपो या दुकानात येणारी म.रा.वि.वि. कंपनीची सर्विस वायरमध्ये स्पार्कींग होऊन सर्विस वायर जळण्यास सुरुवात झाली. सर्विस वायर जळत जळत ग्राहकांचे मीटर पर्यंत आली व आग लागून दुकानातील सर्वर विद्युत उपकरणे, दुकानातील सर्व साहित्य व आतील सर्व वायरींग त्या आगीत जळाली. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. यांनी वेळेवर सर्विस वायरची देखभाल व दुरुस्ती केली असती तर सदरील घटना घडली नसती, म्हणून या घटनेत भा.वि.नि.1956 चे नियम क्रमांक 29 चा भंग झालेला आहे”. तक्रारदारानी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्यांना रु.3,33,118/- फुल अड फायनल सेटलमेंट म्हणून दिल्याचे व्हाऊचर दाखल केलेले आहे. तक्रारदारास याबददल विचारणा केली असता, त्यांना ही रक्कम मिळाल्याचे, त्यांनी सांगितले. तक्रारदारांनीच दि.28.01.2008 रोजी त्यांच्या दुकानामध्ये 6,51,778/- रुपयाची पुस्तके व स्टेशनरी स्टॉक असल्याचे कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारानी शॉपकिपर पॉलीसी घेतली होती, त्यामध्ये स्टॉकचा समावेश होता, त्यासाठीचे म्हणून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने त्यांना रु.3,33,118/- ही रक्कम दिलेली आहे. शॉपकिपर पॉलीसीमध्ये फर्निचर आणि फिक्चरचा समावेश नाही, केवळ स्टॉक बददलच इन्शुरन्स आहे. तक्रारदारानी, तलाठी वैजापूर यांनी केलेला पंचनामा दाखल केला, त्यावर दिनांक दिसून येत नाही. लाकडी फर्निचर रु.20,000/- लाकडी सागवानी साठा रु.60,000/- असा पुसट आकडा दिसून येतो. शालेय पुस्तके रु.6,25,000/- व बाकीच्या सर्व साहित्याबददलची रक्कम दिसून येते, असे एकूण रु.8,32,000/- चे नुकसान झाल्याचे तलाठयाच्या पंचनाम्यावरुन दिसून येते. आणि रु.8,32,000/- चीच मागणी तक्रारदार आपल्या तक्रारीत करतात. गैरअर्जदारानी रु.20,000/- चे फर्निचर आणि रु.60,000/- चे लाकडी सागवानी साठा याचे मुल्यांकन केले आहे. तेवढी रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. कारण, शालेय पुस्तके किंवा इतर स्टॉकची रक्कम तक्रारदारास इन्शुरन्स कंपनीने दिलेली आहे. तक्रारदाराच्या दुकानास आग लागल्याचे, विद्युत निरीक्षकांनी अहवाल देऊन तसेच, इन्शुरन्स कंपनीने सुध्दा क्लेमची रक्कम दिलेली आहे यावरुन सिध्द होते. म्हणूनच मंच गैरअर्जदारास असा आदेश देते की, त्यांनी लाकडी फर्निचरची रक्कम रु.20,000/- आणि लाकडी सागवानाचा साठा रु.60,000/- असे एकूण रु.80,000/- दि.29.01.2009 पासून 9% व्याजदराने, आणि तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा. वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1) गैरअर्जदारांनी, तक्रारदारास रक्कम रु.80,000/- दि.29.01.2009 पासून 9% व्याजदराने, आणि तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावेत. या आदेशाची पुर्तता निकाल दिनांकापासून सहा आठवडयाच्या आत करावी. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |