जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 74/2012 तक्रार दाखल तारीख – 17/05/2012
निकाल तारीख - 04/02/2015
कालावधी - 02 वर्ष , 08 म. 17 दिवस.
1) रामलिंग संग्राम बुदले,
वय – 59 वर्षे, धंदा – शेती,
रा. बडुर, ता. निलंगा,
2) सौ. फुलाबाई राम कोकणे,
वय – 61 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. कासार बालकुंदा, ता. निलंगा,
3) मथुराबाई रामलिंग अंबाळे,
वय – 45 वर्षे, धंदा – घरकाम,
रा. संत ज्ञानेश्वर नगर, ता. लातुर.
4) भरत संग्राम बुदले,
वय – 40 वर्षे, धंदा – शेती,
रा. बडुर, ता. निलंगा.
5) शत्रुघ्न संग्राम बुदले,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती व नौकरी,
रा. बीदर, ता व जि. बीदर. ....अर्जदार
विरुध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या,
मु. निलंगा, ता. निलंगा, जि; लातुर.
2) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या,
मु. कासारशिरशी, ता. निलंगा, जि. लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. आर.व्ही.सिध्दश्वरे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे :- अॅड. के.एच.मुगळीकर.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार क्र.1 ते 5 मयत संग्राम बापुराव बुदले यांचे वारस आहेत. मयत संग्राम बुदले यांच्या नावावर मौजे बडुर ता. निलंगा, जि. लातुर येथे गट क्र. 248 मध्ये 95 आर शेतजमीन होती. सदरील जमीनीत जानेवारी 2011 मध्ये ऊसाची लागवड केली होती. मयत संग्राम बुदले यांनी गैरअर्जदाराकडुन विदयुत पुरवठा घेतला होता त्याचा ग्राहक क्र. 614520001962 आहे. अर्जदाराच्या शेताच्या उत्तर बाजुस गट क्र. 249 असुन सदर बांधावर विदयुत डिपी आहे. सदर डिपी मधून मयत संग्राम बुदले यांच्या गट क्र. 248 च्या बांधावर पुर्व पश्चिम या दोन दिशेला विदयुत प्रवाहाच्या एल. टी लाईन गेल्या आहेत. मयत संग्राम बुदले सदर शेतामध्ये ऊसाची लागवड करुन दरवर्षी गु-हाळ करुन गुळाचे उत्पन्न घेत होता, त्याला प्रतिवर्षी 1,75,000/- गुळाचे उत्पन्न होत असे. अर्जदाराचे गट क्र. 248 मध्ये दि. 26/01/2012 रोजी दुपारी 2.00 वाजता विदयुत एल.टी लाईनला तारेची आडी बसून घर्षन निर्माण होवून त्यातून ठिणग्या पडून ऊसाच्या पाचटास आग लागली व त्यात सदर शेतातील एक एकर ऊस जळून गेला. अर्जदाराचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. मयत संग्राम बुदले यांनी सदर घटनेची माहिती गैरअर्जदार क्र. 2 ला दि. 27/01/2012 रोजी दिली. अर्जदाराने पोलीस स्टेशनला दि. 26/01/2012 रोजी सदर घटने संदर्भात अर्ज दिला. अर्जदाराचे शेतातील ऊसाचे पीक जळाल्याचा पंचनामा मंडळ अधिकारी, तलाठी यांनी केला. अर्जदाराने नुकसान भरपाई मिळावी म्हणून दि. 27/01/2012 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्ज दिला. अर्जदाराने दि. 22/03/12 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जात दि. 26/01/2012 पासुन नुकसान भरपाई रु. 2,00,000/-त्यावर 9 टक्के व्याजासह तसेच मानसिक व शारिरीक रु. 10,000/- तक्रारीचा खर्च रु. 10,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे व त्यासोबत एकूण – 11 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराने सिध्द करावे की, गट क्र. 248 मध्ये 95 आर ऊसाचे पीक होते. अर्जदाराने सिध्द करावे की, गट क्र. 248 च्या उत्तर बाजुस गट क्र. 249 मध्ये विदयुत डिपी सदरच्या बांधावर असून त्याच्या विदयुत वाहीन्या पुर्व पश्चिम आहेत. अर्जदाराने जानेवारी 2011 मध्ये ऊसाचे पीक गट क्र. 248 मध्ये घेतले, त्याला गुळाचे उत्पन्न रु. 1,75,000/- झाले हे अर्जदाराने सिध्द करावे. अर्जदाराचे शेतात दि. 26/01/12 रोजी दुपारी विदयुत वाहिन्याची स्पार्कींग होवून गट क्र. 248 मध्ये उत्तर दक्षिण दिशेस विदयुत ठिणग्या पडुन आग लागून एक एकर ऊसाचे पीक पुर्णत: जळाले हे अर्जदाराने सिध्द करावे. गैरअर्जदारास मान्य नाही की, अर्जदाराचे दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. अर्जदाराने सिध्द करावे की, दि. 27/01/2012 रोजी गैरअर्जदारास सदर घटनेबद्दलचा अर्ज दिला. अर्जदाराने सदर घटनेची माहीती पोलीस स्टेशन, तलाठी यांना दिली. अर्जदाराने सिध्द करावे की, सदर घटनेचा घटना स्थळपंचनामा अधिका-यानी केला. गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली नाही. गैरअर्जदार नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. अर्जदाराने दि. 29/01/2012 रोजी कनिष्ठ अभियंता कासारशिरशी यांना अर्ज दिला, हे सिध्द करावे.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे अर्जदार व गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तीवाद दि. 20/11/2014 रोजी केला, त्याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे :- मयत संग्राम बुदले यांनी गैरअर्जदाराकडुन डिमांड रक्कम भरुन विदयुत पुरवठा घेतला होता. सदरची डिमांड रक्कम गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार क्र. 1 ते 5 मयत अर्जदार संग्राम बुदले यांचे वारस या नात्याने लाभार्थी ग्राहक या संज्ञेत येतात. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे :- अर्जदाराचा ग्राहक क्र. 614520001962 आहे. सदरचे विदयुत कनेक्शन हे मयत संग्राम बुदले यांच्या नावावर होते. त्यांचा मृत्यू दि. 29/08/2014 रोजी झाला. मयत अर्जदाराचे वारसाने दुरुस्तीचा अर्ज दि. 08/12/2014 रोजी दिला आहे. सदरचा अर्ज मंजुर करण्यात आला आहे. अर्जदार क्र. 1 ते 5 हे मयत संग्राम बुदले यांचे वारस असल्याचे वारसाचे प्रमाणपत्रावरुन दिसुन येते. अर्जदारास मौजे बडुर ता. निलंगा जि. लातुर येथे गट क्र. 248 मध्ये 95 आर शेतजमीन आहे. अर्जदाराचे शेताच्या उत्तर बाजुस गट क्र. 249 असुन सदर बांधावर विदयुत डिपी आहे. सदर विदयुत डिपी मधून अर्जदाराच्या शेतात उत्तर दक्षिण दोन दिशेला विदयुत प्रवाहाच्या लाईन गेल्याचे घटनास्थळ पंचनाम्यावरुन दिसुन येते. अर्जदाराच्या शेतात सन – 2011 मध्ये ऊसाचे पीक होते हे गट क्र. 248 च्या 7/12 चा उतारा यावरुन दिसुन येते. अर्जदाराचे शेतात दि. 26/01/2012 रोजी दुपारी 2 वाजता विदयुत एल.टी लाईनला आडी पडुन त्यात घर्षण निर्माण होवून त्यातून ठिणग्या बाहेर पडुन ऊसाच्या पाचटास आग लागून अर्जदाराचा ऊस जळून गेला, हे घटनास्थळ पंचनाम्यावरुन दिसुन येते. अर्जदाराने दि. 26/01/2012 रोजी पोलीस स्टेशन कासारशिरशी यांना सदर घटनेची माहिती दिल्याचे दिसुन येते. सदरचा अर्ज निशाणी क्र. 2 वर आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यास दि. 27/01/2012 रोजी सदर घटनेची माहिती दिली आहे. सदरचा अर्ज निशाणी क्र. 4 वर आहे. अर्जदाराने दि; 27/01/2012 रोजी तहसील कार्यालय, निलंगा सदर घटनेचा पंचनामा केला आहे. त्यात अर्जदाराचा 40 आर ऊस जळून खाक झाला असून, अंदाजे रु. 1,00,000/- चे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. सदरचा पंचनामा निशाणी क्र. 5 वर आहे. अर्जदाराने दि. 27/01/2012 रोजी कनिष्ठ अभियंता, कासारशिरशी यांचे विज सेवक श्री. विश्वास बब्रुवान जाधव यांनी सर्व्हे क्र. 248 ची स्थळ तपासणी केली असता, एल.टी लाईनच्या विदयुत वाहिनीला आडी पडून सदरची घटनेत अर्जदाराचे, अंदाजे एक एकर ऊस जळालेला आहे, असे दिसुन येते. सदरचा अर्ज निशाणी क्र. 6 वर दाखल आहे. अर्जदाराने दि. 22/03/2012 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठविल्याच्या पावत्या, पोहच दाखल केली आहे. सदरची नोटीस निशाणी क्र. 8 वर, पावती व पोहच निशाणी क्र. 9 व 10 वर दाखल आहे. अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरचा तक्रारी अर्ज सिध्द केला आहे. अर्जदाराने दीड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले याबद्दलचा सबळ असा पुरावा दिलेला नाही. तसेच अर्जदाराने कोणत्या कारखान्याचे सभासद आहे, ऊस जळाल्यानंतर अर्जदाराने सदर ऊस कारखान्यास दिला किंवा त्याचा गुळ केला याबद्दलचा कोणताही पुरावा कायदयानुसार योग्य असेल असा दाखल केला नाही. अर्जदाराचा तक्रारी अर्ज व गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे व सोबतचे पंचनामे याचे बारकाईने निरीक्षण केले असता अर्जदाराचा 1 एकर ऊस जळाल्याचे निष्पन्न होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार अर्जदाराच्या परिसरातील ऊस या पिकाचे शेती उत्पन्न एकरी 30 ते 35 टन असल्याचे अहवालानुसार दिसुन येते. तक्ररीतील प्राप्त परिस्थितीनुसार अर्जदाराचे नुकसान झाले हे जरी खरे असले तरी अर्जदाराने मागील वर्षाच्या उत्पन्नाबाबत व गु-हाळाचे उत्पन्न घेतल्याबाबत तक्रारी अर्जात मुद्दा क्र. 4 मध्ये म्हणले आहे, एकरी गुळाचे उत्पन्न याचे प्रमाण अर्जदारास देता आले असते पण अर्जदाराने तसे केले नाही. अर्जदाराने दि. 02/02/12 रोजी विदयुत निरीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे त्याचा अहवाल दाखल करण्याची तसदी अर्जदाराने घेतली नाही. अर्जदाराने आपली तक्रार योग्य प्रकारे सिध्द करु शकला नाही म्हणून हे न्यायमंच अर्जदारास ऊस जळीत नुकसान भरपाई पोटी अंदाजे रक्कम रु. 30,000/- देणे योग्य होईल. अर्जदाराने घटनास्थळ पंचनामा, तहसीलचा पंचनामा, गैरअर्जदार क्र. 2 च्या विज सेवकानी केलेला पंचनामा यावरुन अर्जदाराचे सदर घटनेमुळे ऊस जळून नुकसान झाल्याचे दिसुन येते. अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरची तक्रार सिध्द केल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने सदरची नुकसान भरपाई न देवून सेवेत त्रुटी केल्याचे दिसुन येते. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे :- अर्जदार हा जळीत ऊसाची नुकसान भरपाई रु. 30,000/- व मानसिक, शारिरीक त्रासापोटी व तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 ते 5 यांना समान हिस्स्यात
रक्कम रु. 30,000/-(अक्षरी तीस हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 ते 5 यांना प्रत्येकी
मानसीक व शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- आदेशाची प्रत
प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.