::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :26/03/2015 )
(घोषित द्वारा: श्री. अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा दर्जीबोरगाव ता. रेणापुर येथील रहिवाशी असून तक्रारदार हा एकत्र कुटूंबकर्ता आहे. तक्रारदाराच्या एकत्र कुटूंबामध्ये 2 हे 18 आर क्षेत्र असून, तक्रारदाराच्या नावे गट क्र. 232/1 मध्ये 30 आर , तक्रारदाराच्या मयत पतीच्या नावे 230/1 मध्ये 91 आर, तक्रारदाराच्या मुलाच्या नावे गट क्र. 232/1 मध्ये 97 आर असे क्षेत्र आहे. सदर क्षेत्रात तक्रारदाराच्या नावे सामनेवाला यांच्याकडून सर्व कागदपत्राची पुर्तता करुन 5 एच.पी. शेती पंपासाठी विदयुत कनेक्शन प्राप्त केले त्याचा ग्राहक क्र. 570430082681 असा आहे.
दि. 03.02.2013 रोजी सकाळी 10.30 वा.च्या सुमारास तक्रारदाराच्या विहीरीवर विदयुत जोडणी केलेल्या तारा ढिले व सैल पडलेल्या असल्यामुळे 2 तारांतील संघर्षाने स्पार्कींग होवुन बांधावरील गवताने पेट घेतला. सदर गवतातील आग वाढत व पसरत जावुन शेतातील कडब्याच्या पेंडया व जवळच असणारा सोयाबीन पिकाच्या काढलेल्या ढिगा-यास आग लागुन नष्ट झाले, सोबत दोन ताडपत्रे, व शेती औजारे , ऊसाचे वाढे, गव्हाचे पीक, विदयुत वायर असे अडीच ते तीन लाख रुपयाचे नुकसान झाले असे म्हटले आहे. तक्रारदाराने एकुण 5 बॅग सोयाबीन पेरणी केले होते. 800 ते 1000 कडब्याच्या पेंडया असे एकुण रु. 2,91,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 04.02.2013 रोजी लेखी पत्राद्वारे सदर घटनेची माहिती व नुकसानी बाबत पाहणी करुन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. सामनेवाला यांनी तक्रारीस नुकसान भरपाई न दिल्यामुळे दि. 22.03.2013 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवली . सामनेवाला यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने रु. 2,91,000/- ची नुकसान भरपाई सामनेवाला यांनी दयावे , मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- तक्रारीचे खर्चापोटी रु; 10,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 15 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 11.11.2014 रोजी दाखल झाले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार हा ग्राहक होत नाही. तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व घटना काल्पनीक व चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दि. 04.02.2013 रोजी दिलेल्या तक्रारदाराच्या अर्जावरुन घटनास्थळी पाहण्यासाठी गेले असता, तक्रारदाराने पाहण्यास मज्जाव केला, असे म्हटले असून, तक्रारदाराने केवळ सामनेवाला यांच्याकडून चुकीच्या पध्दतीने पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केली असल्यामुळे, तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ फक्त सामनेवाला क्र. 2 यांचे शपथपत्र दाखल केले आहे, आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ सामनेवाला यांनी अन्य कोणतेही कागदपत्रे या न्यायमंचात दाखल केलेले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे आणि दोघांचा दि. 23.03.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने आपले तक्रारी सोबत सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले AG90 लाईट बिल दाखल केले आहे. यावरुन तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक होतो.
तक्रारदाराने सदर घटनेची बाब सामनेवाला क्र. 2 यांना 24 तासात लेखी दिले आहे. सामनेवाला यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर वीज नियमाक आयोगाच्या मार्गदर्शक नियमानुसार विदयुत निरिक्षक यांना कळवुन त्याचा पंचनामा करुन घेणे बंधनकारक आहे, तसेच सामनेवाला यांनी केले आहे, याबद्दलचा पुरावा या न्यायमंचात दाखल नाही. त्याचप्रमाणे पोलिस निरिक्षक रेणापुर व तहसीलदार रेणापुर यांनाही दिले आहे. तहसीलदारच्या वतीने करण्यात आलेला पंचनामा दि. 07.03.2013 रोजी झाला, असून त्यात त्यांनी तक्रारदाराने तक्रारीत सांगीतल्या प्रमाणे शॉर्टसर्कीटमुळे आग लागुन नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराने दि. 07.02.2015 रोजी विदयुत निरीक्षक लातूर यांचा अभिप्राय दाखल केला आहे. सदर अभिप्रायात सुस्पष्टता दिसून येत नाही. व घटना घडल्यानुतर साधारणत: 1 वर्षे 10 महिन्याने अर्ज केलेला दिसत आहे. तक्रारदाराने एकुण 6 रंगीत फोटो दाखल केले आहेत. यावरुन तक्रारदाराच्या शेतात जळुन नुकसान झाल्याचे दिसून येते. तक्रारदाराने आपले तक्रारीच्या पुष्टयर्थ दि. 07.02.2015 रोजी तक्रारदाराचे व त्याच्या मुलाचे सरतपासणीचे शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात पाहणी व पंचनामा करण्यासाठी गेले असता, तक्रारदाराने त्यांना येण्यास मज्जाव केला असे म्हटले आहे. ही बाब प्रत्यक्ष व्यवहारात योग्य असल्याचे वाटत नाही. कारण सामनेवाले यांच्याकडे त्यांची स्वतंत्र पोलिस यंत्रणा कार्यरत असतांना त्यांनी या यंत्रणे मार्फत योग्य ती कार्यवाही करता आली असती पण तशी कार्यवाही त्यांनी केल्या बद्दलचा कोणताही पुरावा या न्यायमंचात सादर केला नाही. संबंधीत अधिकारी मंडळ पाहणी व पंचनाम्यासाठी गेले होते या बद्दलचे त्यांना शपथपत्र दाखल करता आले असते. पण तशी तसदी सामनेवाला यांनी घेतलेली नाही. यावरुन सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने केलेली दिसून येत असल्या कारणाने तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कसुर केला आहे हे दिसून येते.
एकंदर पुर्ण तक्रारी वरुन तक्रारदाराचे नुकसान झाले आहे हे दिसून येते. परंतु तक्रारदाराने किती सोयाबीन पेरले, सोयाबीनचा किती मोठा काढलेला काड होता, याची सुस्पष्टता दर्शविणारा पुरावा कायदयानुसार योग्य असेल असा पुरावा, या न्यायमंचात सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने केलेली मागणीचा विचार करता, तक्रारदार हा अंदाजे रु. 1,00,000/- नुकसान भरपाई , मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 4000/- मिळण्यास पात्र आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनवेाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शेतातील विजेच्या शॉर्ट सर्कीटच्या आगीमुळे झालेल्या नुकसानी पोटी रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 4000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.