घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने दिनांक 9/3/2009 रोजी दुकान नंबर 7 गुलमोहर अपार्टमेंट, जुना बाजार, औरंगाबाद श्री काझी अथर अहेमद नसीरोद्यीन यांच्याकडून दुकान खरेदी केले. त्या दुकानासाठी त्यांना नवीन मीटर कनेक्शन पाहिजे होते. म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदार महावितरण कंपनीस अर्ज दिला. तक्रारदाराने जे दुकान खरेदी केले ती जागा पूर्वी श्री काझी अथर अहेमद नसीरोद्यीन यांची होती. त्यांच्याकडे 490011521042 हे वीज मिटर होते. त्याची थकबाकी 35,760/- रुपये अशी होती. ती त्यांनी भरली नाही. दुकानावर मिटरची थकबाकी आहे म्हणून महावितरण कंपनी तक्रारदारास नवीन कनेक्शन देत नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार, वीजमिटर मागतात तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु 10,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदाराने सोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले आहे. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने खरेदी केलेले दुकान पूर्वी काझी अथर अहमद चे होते. त्यांच्याकडे दिनांक 29/1/2010 पर्यंत 35760/- रुपये वीजेची थकबाकी आहे. त्यामुळे काझी अथर अहमदचे मीटर कायम स्वरुपी बंद करण्यात आले. तक्रारदाराने ज्यांच्याकडून हे दुकान खरेदी केले त्यांच्याकडूनच दुकान खरेदीवेळेस वीज बिलाची बाकी क्लिअर करुन घेणे गरजेचे होते. जोपर्यंत थकीत बील भरले जात नाही तोपर्यंत नवीन वीज कनेक्शन विद्युत कायद्यानुसार देता येत नाही. वरील कारणावरुन तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करावी अशी मागणी करतात. दोन्ही पक्षकाराने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी मंचानी केली. तक्रारदाराने श्री काझी अथर अहमद यांच्याकडून दिनांक 9/3/2009 रोजी दुकान खरदी केले. त्यावेळेस गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार 35,760/- रुपये वीजेची थकबाकी होती. गैरअर्जदारानी दिनांक 9/1/2010 रोजीचे दुकान नंबर 7, जुना बाजार, काझी अथर अहमद नसीरोद्यीन यांच्या नावाचे रु 35,760/- चे बील दाखल केले. त्याचा भरणा केल्याबद्दलचा कुठलाही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. थकबाकी आहे म्हणून गैरअर्जदारा कंपनीने कायमस्वरुपी वीजपुरवठा बंद केला. त्याच दुकानास पुन्हा वीजपुरवठा चालू करुन द्यावयाचा असल्यास त्याची आधीची थकबाकी मागण्याचा वीज कंपनीस पूर्ण अधिकार आहे. म्हणून मंच, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करीत आहे. आदेश तक्रार नामंजूर करण्यात येते. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |