::: विरुध्द पक्षाने दाखल केलेला तक्रार खारिज करणेबाबत अर्जावर आ दे श :::
( पारित दिनांक : 25/04/2018 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) विरुध्द पक्षाचा अर्ज व त्यासोबत दाखल दस्तऐवज तपासले तसेच या अर्जावर तक्रारकर्तीने दाखल केलेले निवेदन वाचले.
2) सदर तक्रार, तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाविरुध्द त्यांनी तक्रारकर्तीच्या मालकीच्या शेतीत कडबा कटर व्यवसायाकरिता विद्युत पुरवठा डिमांड नोटनुसार रक्कम भरल्यानंतरही सुरु केला नाही, म्हणून दाखल केली आहे.
3) विरुध्द पक्ष प्रकरणात हजर झाल्यावर त्यांनी तक्रारकर्तीच्या अंतरिम अर्जावर निवेदन दाखल केले होते व त्यानंतर पुढील तारखेवर हा अर्ज, दस्तऐवजासह दाखल केला. विरुध्द पक्षाने पोलीस स्टेशन अधिकारी, महावितरण पोलीस स्टेशन, जालना यांचेकडे दाखल केलेली तक्रारकर्ती विरुध्दची फिर्याद प्रत रेकॉर्डवर दाखल केली. त्यानुसार असे दिसते की, तक्रारकर्तीच्या वादातील शेतात तिने अवैधपणे परस्पर विजेची जोडणी करुन घेतली म्हणून विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीवर विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे विज चोरीची असेसमेंट शिट व ईतर सर्व आवश्यक त्या दस्तांसह गुन्हा दाखल करणेसाठी सदर कैफियत पोलीस स्टेशनला दिली आहे. मात्र ही बाब स्वच्छ मनाने तक्रारकर्तीने तक्रारीत उघड न करता, सदर तक्रार मंचासमोर दाखल केली, असे दिसून येते.
अशा परिस्थितीत विरुध्द पक्षाने दाखल केलेला न्यायनिवाडा, यु.पी.पॉवर कॉर्पोरेशन लिमीटेड अँन्ड अदर्स X अनिस अहमद, निकाल तारीख 1 जुलै 2013 हातातील प्रकरणात लागू पडतो, त्यातील निर्देशानुसार, विज चोरीबद्दल आक्षेप असलेले प्रकरण मंचाला तपासण्याचे कार्यक्षेत्र नाही. म्हणून विरुध्द पक्षाने दाखल केलेला अर्ज मंजुर करण्यात येवून, तक्रार खारीज करण्यात येते.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
:: अंतिम आदेश ::
- विरुध्द पक्षाने दाखल केलेला तक्रार खारिज करणेबाबतचा अर्ज मंजूर केल्यामुळे, तक्रारकर्तीची तक्रार कार्यक्षेत्राअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri