::: आ दे श :::
( पारित दिनांक : २८/०२/२०१७ )
आदरणीय सौ.एस.एम.उंटवाले,अध्यक्षा यांचे अनुसार : -
१. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे, कलम : १२ अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता वरील ठिकाणचा रहिवाशी असुन, अत्यल्प भुधारक शेतकरी आहे व त्यांचा गट नं.११४ मध्ये ०.९४ आर.जमीन आहे व मसला खु. येथील धरणातुन वाहणारे पाणी त्यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामधुन वाहते. त्यामुळे तक्रारकर्त्याने दोन्ही पिके म्हणजेच खरीप व रब्बी पिके घेण्याकरीता विरुध्दपक्ष यांचेकडे दि.२६.१२.२०१२ मध्ये रु.५२००/- कोटेशन फी भरली असुन नियमानुसार तक्रारकर्त्याला एका महिन्याच्या आत विज कनेक्शन जोडणे विरुध्दपक्ष यांना बंधनकारक होते. परंतु विरुध्दपक्ष यांनी दि.११.०२.२०१६ पर्यंत विज जोडनी केली नसल्याने शेतामधील खरीप व रब्बी पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे विज जोडनीकरीता वर्षातुन जवळपास ५० चकरा मारल्या अशा तिन वर्षामध्ये १५० चकरा मारल्या तसेच तक्रारकर्त्याला त्याच्या शेतात नाल्याचे पाणी रब्बी व खरीप पिकांना मिळाले असते तर तक्रारकर्त्याला त्यांच्या शेतातुन दरवर्षाला सोयाबीनचे २१ क्विंटलचे उत्पन्न असे तिन वर्षाचे ६३ क्विंटलचे, व रब्बी पिक हरभरा एकरी १२ क्विंटल दोन एकरचे २४ क्विंटल तीन वर्षाचे ७२ क्विंटल असे उत्पन्न मिळाले असते. सोयाबीनच्या पिकास सरासरी रु.४०००/- तसेच हरभरा रु.४०००/- क्विंटल दराने भाव आहे दोन्ही पिकाचे एकंदरीत रु.५,४०,०००/- एवढे होणा-या उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. तक्रारकर्त्याला तिन वर्षामध्ये विनाकारण १५० चकरा विज वितरण कंपनीकडे माराव्या लागल्या त्याकरीता तक्रारकर्त्याला प्रत्येक तारखेला रु.२००/- व मजुरी रु.२००/-असे एकुण रु.४००/- प्रत्येक चकराला नुकसान झाले व सर्व चकरा एकुण रु.६०,०००/- एवढे नुकसान विरुध्दपक्ष यांच्या सेवा न पुरविल्यामुळे झाले व प्रचंड मनस्ताप देखील झाला. त्यामुळे तक्रारकर्ता बॅंक कर्ज रु.३,५०,०००/- परतफेड करु शकले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांना दि.१४.०३.२०१६ रोजी नुकसान भरपाईची नोटीस पाठवली परंतु उत्तर दिले नाही.
तरी तक्रारकर्त्याची विनंती आहे की, तक्रार मंजूर करण्यात यावी, विरुध्दपक्ष क्र.१ व २ यांच्याकडुन रु.९,५०,०००/- चे नुकसान केल्याबद्दल वसुल करुन तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक, शारिरीक नुकसान भरपाई पोटी रु.५०,०००/- व तक्रार खर्च रु.५,०००/- विरुध्दपक्षाकडून वसुल करण्याचा आदेश व्हावा. या उपर योग्य वाटेल ती न्याय व दाद तक्रारकर्त्याचे हितावह करण्यात यावी.
सदर तक्रार तक्रारकर्त्याने शपथेवर दाखल केलेली असुन, त्या सोबत एकुण ०६ दस्ताऐवज पुरावे म्हणुन दाखल केलेले आहे.
२) विरुध्द पक्ष क्र. १ व २ चा संयुक्त लेखी जवाब ः-
विरुध्दपक्षाने त्यांचा लेखी जबाब दाखल करुन बहुतांश विधाने नाकबूल केली आहे. त्याचा थोडक्यात आशय असा,
तक्रारकर्ता यांना शेत जमीन असुन, त्या शेत जमीनीकरीता विज कनेक्शनसाठी दि.२६.१२.२०१२ मध्ये रु.५२००/- कोटेशन फी भरलेली आहे हे म्हणणे बरोबर आहे. तसेच अधिकचे कथन असे कि, तक्रारकर्ता यांना दि.०७.१२.२०१५ रोजी विरुध्दपक्ष यांनी जा.क्र.का.अ./वाशिम/ता/६८६४ नुसार नमुद केले आहे कि, मार्च २०१३ पर्यंत नवीन कृषीपंप विज पुरवठा करीता पैसे भरुन प्रलंबीत असलेल्या ग्राहकांची मे. कस्मुत इंजिनियर्स यांच्याकडे काम करण्याकरीता पत्र क्र.अ.अ./वाशिम/ता/००९४२ व ९४४ दि.२९.०४.२०१५ रोजी सुपूर्द करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे पत्र तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्षानी दिलेले होते. सदर विद्युत कनेक्शनकरीता वरील कंपनीला काम दिले असल्यामुळे विरुध्दपक्ष यांना तक्रारकर्त्याचे नुकसान झाले हे म्हणणे नाकबुल.
विरुध्दपक्ष यांना वि.न्यायालयात आलेला खर्च रु.१०,०००/- प्रत्येकी तक्रारकर्ता यांच्याकडुन देण्याबाबत आदेश व्हावा ही विनंती. तसेच विरुध्दपक्ष यांच्या हितावह व न्यायाच्या दृष्टीने योग्य ती न्याय दाद विरुध्दपक्ष यांच्या तर्फे देण्याबाबत आदेश व्हावा व तक्रारकर्ता यांचे विरुध्द देण्याबाबत आदेश व्हावा. हि विनंती.
करिता विरुध्दपक्षाचा लेखी जवाब/युक्तीवाद दाखल केला आहे.
3) कारणे व निष्कर्ष ः-
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्र.१ व २ चा संयुक्तीक लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, उभयपक्षाचा लेखी युक्तीवाद याचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील प्रमाणे निष्कर्ष कारणे देवुन नमुद केला तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा मिळणेकरिता दि.२६.१२.२०१२ रोजी रक्कम रु.५२००/- कोटेशन फी भरली होती व तक्रारकर्तेजवळ मौजे मसला खु ता.मालेगांव जि.वाशिम येथे गट नं.११४ क्षेत्रफळ ०.९४ आर शेत जमीन आहे ही बाब विरुध्दपक्षाला देखील मान्य आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
दि.११.०२.२०१६ रोजी विरुध्दपक्षाव्दारे तक्रारकर्त्यास कृषीपंपाची जोडणी देण्यात आली आहे ही बाब तक्रारकर्त्यास देखील मान्य आहे. तक्रारकर्त्याच्या मते दि. २६.१२.२०१२ ते ११.०२.२०१६ पर्यन्तच्या कालावधीत विरुध्दपक्षाने कृषीपंपाची विद्युत जोडणी न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला त्यांच्या शेतात खरीप व रब्बी पिकाला पाणी देता आले नाही व शेती ओलीताखाली आणता आली नाही त्यामुळे दर वर्षाला सोयाबीनचे २१ क्विंटलचे व हरभरा एकरी १२ क्विंटल प्रमाणे तीन वर्षाचे ७२ क्विंटल हरभ-याचे नुकसान झाले. जर कृषीपंपाचे कनेक्शन विरुध्दपक्षाने जोडुन दिले असते तर ईतके नुकसान झाले नसते म्हणुन तक्रारकर्त्याने सदरहु पिकाचे दरपत्रक दाखल करुन रक्कम रु.९,५०,०००/- ईतकी नुकसानभरपाई मिळावी तसेच ईतर नुकसानभरपाई व प्रकरण खर्च मिळावा अशी विनंती केली.
तक्रारकर्ते यांनी मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्यमंत्री, कृषीमंत्री, उर्जामंत्री इ.कडे याबध्दल तक्रार अर्ज दाखल केले आहेत, परंतु तक्रारकर्ते यांच्या या प्रकरणातील कथन असे आहे कि, जर विरुध्दपक्षाने कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन वेळेत जोडुन दिले असते तर त्यांना नमुद पिके घेता आली असती व नुकसान झाले नसते परंतु अश्या जर-तर च्या परिस्थीतीत योग्य पुरावा असल्याशिवाय प्रार्थनेतील नमुद नुकसानभरपाई देता येणार नाही मात्र विरुध्दपक्षाने देखील कृषीपंपाचे विज कनेक्शन देण्यात दिरंगाई करुन सेवा न्युनता ठेवली आहे. त्यामुळे यथा योग्य रक्कम रु.१०,०००/- सर्व प्रकारच्या नुकसान भरपाई करीता व न्याईकखर्चाचे रु.३०००/- ईतकी रक्कम विरुध्दपक्ष क्र.१ व २ यांनी वैयक्तीक रित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्त्याला दिल्यास ते न्यायोचित होईल या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला. तो येणे प्रमाणे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्ता यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
२. विरुध्दपक्ष क्र.१ व २ यांनी वैयक्तीक वा संयुक्तपणे सेवा
न्युनतेबध्दलची, शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसान
भरपाई पोटी तक्रारकर्त्यास रक्कम रु.१०,०००/- (अक्षरी, दहा
हजार, केवळ) दयावी तसेच प्रकरणाचा न्यायीक खर्च म्हणुन
रक्कम रु. ३०००/- (अक्षरी,तिन हजार केवळ) द्यावी.
३. विरुध्दपक्ष यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत
मिळाल्यापासुन ४५ दिवसाचे आत करावे.
४. उभयपक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
मा.कैलाश वानखडे, मा.सौ.एस.एम.उंटवाले,
सदस्य अध्यक्षा
दि. २८.०२.२०१७
स्टेनो/गंगाखेडे