::: आ दे श :::
( पारित दिनांक : 25/07/2017 )
माननिय अध्यक्षा सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांची तक्रार, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला.
उभय पक्षात तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे हा वाद नाही, त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत मंच आले आहे.
तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, त्यांना विरुध्द पक्षाने एप्रिल-2016 या महिन्याचे विज बिल पुरवले नाही, याबद्दल त्यांनी विरुध्द पक्षाकडे अर्ज केला होता. त्यानंतर विरुध्द पक्षाने मे-2016 या महिन्याचे बिल दिले मात्र त्यात थकबाकी रुपये 7,960.48 ईतकी दाखविली आहे. याबद्दल तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या वेबसाईटवर जाऊन चौकशी केली असता रुपये 7,920/- हे एप्रिल महिन्याचे विज बिल व्याजासहीत विरुध्द पक्षाने मे महिण्याच्या विज बिलात दिले. कंझुमर युनिट कंझमशन या आलेखावरुन, एप्रिल-2016 मध्ये सर्वात अधिक 671 युनिट एवढे कंझमशन युनिट लावले आहे. परंतु हे युनिट जास्त आहे याबद्दल विरुध्द पक्षाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे ही सेवा न्युनता ठरते म्हणून प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई रक्कम विरुध्द पक्षाकडून देण्यात यावी.
यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याचे हे विज देयक CPL दस्तानुसार बरोबर आहे व तक्रारकर्ते यांनी त्यांच्या घरातील उपकरणे वापरल्यानुसार ते दिले आहे. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी भरणा करणे आवश्यक आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ते यांच्या घरातील विद्युत उपकरणासंबंधी संपूर्ण तपशील मंचाने मागवावा, असे लेखी युक्तिवादात नमूद केले आहे. परंतु तक्रारकर्त्याच्या विद्युत मिटरवर किती भार आहे याची तपासणी करुन तसा अहवाल विरुध्द पक्षानेच मंचात दाखल करावा लागतो तसेच तक्रारकर्त्याच्या मीटर बद्दलचे CPL दस्त हे सुध्दा विरुध्द पक्षाने दाखल करणे भाग आहे. परंतु विरुध्द पक्षाने रेकॉर्डवर कोणताही दस्त दाखल केला नाही. याऊलट तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या कंझुमर युनिट कंझमशन या दस्तात त्यांचे फक्त एप्रिल-16 या महिण्यात जास्त 671 युनिट एवढा विज वापर दिसून येतो. मात्र तो कसा बरोबर आहे, याबद्दल विरुध्द पक्षाने कागदोपत्री पुरावा दाखल करुन मंचाचे समाधान केले नाही. म्हणून हया सेवा न्युनतेपोटी विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई म्हणून रुपये 3,000/- व प्रकरण खर्च रुपये 2,000/- दिल्यास, ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे तक्रारकर्त्यास सेवा न्युनतेपोटी रुपये 3,000/- ( रुपये तीन हजार फक्त ) तसेच प्रकरणाचा न्यायिक खर्च म्हणून रुपये 2,000/- द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
- उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
svGiri जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.