--- आदेश ---
(पारित दि. 11-10-2007 )
द्वाराश्रीमतीप्रतिभाबा.पोटदुखे, अध्यक्षा–
तक्रारकर्ता श्री. विजय यशवंतरावजी राणे, यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. तक्रारकर्ता यांनी डीएल-87 ही विद्युतजोडणी ग्राहक क्रं. 432960601014 असलेली विरुध्द पक्ष यांच्याकडून घेतली. त.क.यांना पहिले विद्युत देयक दि. 17-01-04 चे रुपये 70/- या रक्कमेचे व पुढील 3 महिन्याचे कालावधीचे म्हणजेच 23-09-2003 ते 07-01-04 पर्यंतचे पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील 6 महिने वि.प.यांनी रिडिंग घेतली नाही व 33 युनिट प्रति महिना या सरासरीने विद्युत देयकाची आकारणी केली.
2. दि. 13-01-2005 रोजी वि.प.यांनी दि. 23-09-03 ते 07-01-2005 याच 16 महिन्याच्या कालावधीचे एकूण 1954 युनिटचे रुपये 5710/- चे देयक त.क.यांना पाठविले. त.क.यांनी चुकिच्या देयकात सुधारणा करण्याबद्दल अनेकदा वि.प.यांना सांगितले परंतु वि.प.यांनी त्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही.
3. वि.प.यांनी त्यांची चूक मान्य केली व रुपये 6700/- चे देयक त.क.यांना दिले व दि. 22-09-2005 रोजी त.क.यांनी त्या देयकाची रक्कम भरली.
4. परंतु पुन्हा दि. 13-01-2006 रोजी वि.प.यांनी त.क.यांना दि. 07-10-2005 ते 07-01-2006 या कालावधीचे 3696 या युनिटचे रुपये 16070/- चे देयक पाठविले. त्यानंतर वि.प.यांनी त.क.यांना खोटी व जास्तीची बिले पाठविणे सुरु केले. शेवटी दि. 17-05-2007 रोजी त.क.यांना वि.प.यांनी रुपये 39260/- चे विद्युत देयक दिले.
5. त.क.यांनी वि.प.यांच्याकडे अनेकदा चुकिच्या देयकामध्ये सुधारणा करण्याची विनंती केली. परंतु वि.प.यांनी विद्युत देयकामध्ये सुधारणा केली नाही, ही वि.प.यांच्या सेवेतील न्यूनता आहे.
6. त.क.यांनी विनंती केली आहे की, मीटर क्रं.डीएल-87 यावरील दि. 17-05-2007 ची रुपये 39260/- ची विद्युत आकारणी रद्द करण्यात यावी. त.क. यांना यथा योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी व ग्राहक तक्रारीचा खर्च हा वि.प.यांच्यावर लादण्यात यावा.
7. वि.प.यांनी त्यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 9 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त.क.यांना दि. 23-09-2003 रोजी विद्युतजोडणी देण्यात आली व दि. 07-01-2005 पर्यंत मीटर रिडिंग उपलब्ध नसल्यामुळे त.क.यांना सरासरीच्या आधारावर विद्युत देयक जारी करण्यात आले. दि. 07-01-2005 रोजी मीटर रिडिंग घेण्यात आले जे की, 1958 असे होते. सुरुवातीचे मीटर रिडिंग 04 असे असल्यामुळे दि. 23-09-2003 ते 07-01-2005 या कालावधीचे एकूण युनिट हे 1954 असे होते. त्यानुसार दि. 13-01-2005 रोजी विद्युत देयक जारी करण्यात आले. या देयकात रुपये 470.23 ची सूट देण्यात आल्यामुळे हे देयक रुपये 5600/- चे होते. त.क.यांनी शेवटचे देयक हे दि. 16-09-2004 रोजी भरले व त्यानंतर दि. 13-01-2005 पर्यंत कोणतेही देयक भरले नाही त्यामुळे व्याज वाढत जाऊन देयकाची रक्कम वाढली.
8. रुपये 6700/- चे देयक हे एकूण रक्कमेचे देयक नव्हते तर ते सरासरीवर आधारलेले देयक असून त.क.यांना थकबाकी भागविता यावी म्हणून एकूण रक्कमेचा एक भाग म्हणून ते देयक देण्यात आले होते.
9. मीटर रिडिंग ही जानेवारी 2006 मध्ये उपलब्ध झाली तेव्हा दि. 07-01-2006 रोजी मीटर रिडिंग 6176 युनिटचे होते. त्यामुळे त.क.यांना जुलै-05 ते जानेवारी-2006 या 6 महिन्याचे देयक देण्यात आले. त.क. हे नियमितपणे विद्युत देयकाचा भरणा करीत नसल्यामुळे देयकावरील व्याज वाढून दि. 17-05-2007 रोजी रुपये 39,260/- चे विद्युत देयक त.क.यांना जारी करण्यात आले.
10. त.क.यांच्याकडील जुने मीटर क्रं. 1627923 हे दि. 10-10-2006 रोजी बदलल्या गेले. त्यांना 02013858 हे एच.पी.एल. 5000 या मॉडेलचे मीटर देण्यात आले. त.क. यांनी मीटर बद्दल तक्रार केल्यामुळे दि. 15-01-2007 रोजी मीटरची तपासणी करण्यात आली व मीटरमध्ये कोणतीही चूक आढळली नाही, त्यामुळे सदर विद्युत देयके ही चुकिच्या मीटर रिडिंगवर आधारलेली आहे असे म्हणता येत नाही. वि.प.म्हणतात की, त.क. यांनी दाखल केलेली तक्रार ही बनावट व खोटी असल्यामुळे मोठया नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
11. तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प.यांनी त.क. यांना पुढील प्रमाणे विद्युत देयके जारी केलेली आहेत.
---------------------------------------------------------------------------------------
अनु देयकाची देयकाचा कालावधी युनिट रक्कम
क्रमांक तारीख
01 17-01-04 23-09-03 ते 07-01-04 -- 70/-
02 12-07-04 07-04-04 ते 07-07-04 99 430/-
03 12-10-04 07-07-04 ते 07-10- 04 99 240/-
04 13-01-05 07-10-04 ते 07-01-05 1954 5600/-
05 13-04-05 07-01-05 ते 07-04-05 273 6720/-
06 16-07-05 07-04-05 ते 07-07-05 249 7870/-
07 30-08-05 एरिअर्स बिल 6700/-
08 13-01-06 07-10-05 ते 07-01-06 3696 16070/-
09 16-01-06 07-11-06 ते 07-01-07 162 31930/-
10 -------
(30-05-07 पर्यंत 07-03-07 ते 07-05-07 --- 39,211.92/-
भरावयाचे देयक
11 17-05-07 07-03-07 ते 07-05-07 662 39210/-
12 वि.प.यांनी त.क.यांना वेळोवेळी जारी केलेल्या विद्युत देयकांवरुन असे निदर्शनास येते की, वि.प.यांनी त.क.यांना दि. 07-01-04 ते 07-04-04 या कालावधीचे देयक दिलेले नाही. तर दि. 07-07-04 ते 07-10-04 या कालावधीचे 33 युनिटचे सरासरी देयक दिलेले आहे. दि. 07-10-04 ते दि. 07-01-05 या कालावधीच्या देयकात 16 महिन्यांचे देयक असे नमूद आहे तर दि. 07-07-05 ते दि. 07-10-05 या कालावधीचे देयक देण्यात आले नव्हते. दि. 17-10-05 ते 07-01-06 चे देयकात 6 महिन्याचे देयक असे म्हटल्या गेलेले आहे. तर दि. 17-05-07 चे देयकात रिडिंग घेतले नाही असे नमूद केले आहे.
13. हे निर्विवाद आहे की, त.क.यांनी दि. 17-01-04 चे रुपये 70/- चे दि. 12-07-04 चे रुपये 430/- चे व दि. 30-08-05 चे रुपये 6700/- देयक भरलेले आहे.
14. सदर ग्राहक तक्रारीत स्पष्टपणे असे दिसून येते की, वि.प.यांनी सुरुवातीपासूनच तक्रारकर्ता यांचे मीटर रिडिंग घेण्यात निष्काळजीपणा दाखविला आहे. विद्युत देयके ही नियमितपणे न देता अनेक महिन्यांचे रिडिंग न घेता नंतर खूप सा-या युनिटची देयके तक्रारकर्ता यांना देण्यात आलेली आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दि. 12-07-04 चे रुपये 430/- चे देयक दि. 16-09-04 रोजी तर दि. 30-08-05 चे रुपये 6,700/- चे एरिअर्स देयक दि. 22-09-2005 रोजी भरले असले तरी सुध्दा वि.प.यांनी नियमितपणे रिडिंग न घेता नंतर मोठया रक्कमेची विद्युत देयके तक्रारकर्ता यांना पाठविलेली असल्यामुळे देयकाची रक्कम अवास्तवपणे वाढलेली आहे. याबद्दल शंका नाही. तक्रारकर्ता यांच्या शपथपत्रानुसार ते एक गरीब शेतकरी आहेत व कोणत्याही गरीब शेतक-याला एकदम आलेले मोठया युनिटचे बिल भरणे शक्य नाही. वि.प.यांनी सुरवातीपासून जर का नियमितपणे रिडिंग घेवून वापरण्यात आलेल्या युनिटचे देयक तक्रारकर्ता यांना दिले असते तर ते भरणे तक्रारकर्ता यांना सुध्दा सोपे गेले असते व थकबाकीचे रुपये 39,211.92 व रुपये 39,260/- अशा पध्दतीची देयके तक्रारकर्ता यांनी येवू शकली नसती.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना पाठविलेले दि. 17-05-07 चे रुपये 39260/- चे विद्युत देयक देयक रद्द करण्यात येत आहे.
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना कोणताही व्याज व दंड न लावता एकूण वापरल्या गेलेल्या युनिटवर आधारित देयक द्यावे. तक्रारकर्ता यांनी विद्युत देयकाची आता पर्यंत भरलेली रक्कम रुपये 70 + रुपये 430+रुपये 6,700/- म्हणजेच एकूण रुपये 7,200/- ही समायोजित करुन द्यावी.
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- द्यावेत, ही एकूण रुपये 4000/- ची रक्कम सुध्दा वि.प.यांनी विद्युत देयकामध्ये समायोजित करुन घ्यावी.
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना एकूण वापरल्या गेलेल्या युनिटचे देयक रुपये 7200+ रुपये 4000/- म्हणजेच एकूण 11,200/- ही रक्कम समायोजित करुन घेतल्यानंतर उर्वरित रक्कमेचे द्यावे. वि.प.यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत देयक भरण्यासाठी 3 (Instalment) हप्ते पाडून द्यावेत.
- वि.प.यांनी तक्रारकर्ता यांचे मीटर रिडिंग नियमितपणे घ्यावे व मीटर रिडिंगवर आधारित देयके त्यांना नियमितपणे द्यावीत.
- वि.प.यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत करावे अन्यथा ते ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम -27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.