ग्राहक तक्रार क्र. 143/2013
अर्ज दाखल तारीख : 10/10/2013
अर्ज निकाल तारीख: 05/01/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिना 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रमोद भालचंद्र कुलकर्णी,
वय-66 वर्षे, धंदा–व्यापार व शेती,
रा.मुरुम ता. उमरगा, जि. उस्मानाबाद, विभागीय संघटक,
महाराष्ट्र ग्राहक पंचायत. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं. लि.,उस्मानाबाद.
2. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कं.लि.
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
1) तक्रारकर्ता (तक) या नोंदणीकृत ग्राहक संघटनेच्या सदस्याने विरुध्द पक्ष (विप) विदयूत वितरण कंपनीचे अधिका-या विरुध्द ग्राहकांना वीज बिले उशीरा देऊन विलंब आकार उकळण्याची अनुचित व्यापार पध्दती व सेवेतील त्रुटी दूर होऊन मिळावी म्हणून ही तक्रार दिलेली आहे.
2) तकचे तक्रारीतील कथन थोडक्यात असे की, तो ग्राहक पंचायत महाराष्ट्र या नोंदणीकृत ग्राहक संघटनेचा विभागीय संघटक आहे व प्रतिनीधी या नात्याने सर्व ग्राहकांच्या हिताचे दृष्टीने त्याने ही तक्रार दाखल केलेली आहे. विप क्र.1 व 2 यांनी उस्मानाबाद जिल्हयातील वीज ग्राहकांना दि.25/06/2013 ते 25/07/2013 या कालावधीसाठी चे देयक दि.06/08/2013 चे म्हणून वितरीत केले. देयकांच्याशेवटी छोट्या अक्षरात देयक कोणी तयार केले व किती तारखेला तयार झाले याचा तपशील असून देयक दि.08/08/013 रोजी तयार झाले असे दिसून येते. म्हणजेच देयक दि.06/08/2013 रोजी तयार झाले नव्हते अशा प्रकारे देयक नंतर तयार करुन विप यांनी ग्राहकांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सदर देयके ग्रारहकांपर्यंत पोहचण्यास 2 ते 3 दिवस लागले असणार म्हणजेच देयके ग्राहकांना दि.11 किंवा 12/08/2013 रोजी मिळाली असणार. देयक भरण्यासाठी ता.15/08/2013 नमूद आहे त्यांनंतर दि.26/08/2013 रोजी पर्यंत वाढीव देयक देण्याची तारीख आहे. म्हणजेच ग्राहकांना दंड भरावा लागणार. दि.15/08/2013 ही स्वातंत्र्य दिनाची सुटी होती म्हणजे त्या दिवशी देखील ग्राहकांना देयके भरता येणार नव्हती. अशा प्रकारे ग्राहकांना दंडासह देयक भरण्यास भाग पाडून विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे विप यांनी अशा प्रकारे चुकीचा दंड ग्राहकांकडून वसूल केला त्याची रक्कम ग्राहकांना परत दयावी अगर पूढील देयकात वजा करावी तसेच या तक्रारीचा खर्च म्हणून तक यांना रु.10,000/- देण्याचाआदेश करावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3) तक्रारीसोबत तकने ग्राहक पंचातीचे पत्र हजर केले आहे. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र हजर केले आहे, श्री.बी.एम. कुलकर्णी रा. मूरुम यांचे जुलै 2013 चे देयक हजर केले आहे, श्री. एस.एस. मोरे रा. मुरुम यांचे पण जुलै महीन्याचे देयक हजर केलेले आहे.
4) विप यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. देयक दि.08/08/2013 रोजी तयार झाले हे अमान्य केले आहे. ग्राहकांना देयक देण्याची तारीख 15/08/2013 व वाढीव तारीख 26/08/2013 दिली हे मान्य आहे. ग्राहकाने देयक मिळाल्यापासून दोन तीन दिवसात रक्कम भरली नाही तर वाढीव रक्कम भरावी लागते हे कबूल आहे. विपचे म्हणणे आहे की ग्राहकास देयक प्रत्येकमहिन्यात भरावे लागते याची जाणीव असते त्यामुळे देयक देण्यास अल्पकालावधी मिळाला तर देयक भरता येत नाही हे कारण संयुक्तिक नाही. ग्राहकांकडून जादा रक्कम वसूल करुन गैरव्यवसायीक मार्गाचा अवलंब करुन विपने सेवेत त्रुटी केली हे अमान्य आहे. ग्राहकांना दि.15/08/2013 च्या सुटीपूर्वी देयक भरणे बंधनकारक होते. तसेच देयके ऑनलाईन भरण्याची सुध्दा व्यवस्था आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट चे सुटीचे दिवशीसुध्दा ग्राहकास देयक भरता येत होते ग्राहकांकडून दंड वसूल करण्याची विपची इच्छा होती हे नाकबूल आहे. तक यास इतर ग्राहकांतर्फे तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही त्यामुळे तक्रार रदद व्हावी असे म्हंटले आहे.
5) तकची तक्रार त्याने दाखल केलेली कागदपत्रे विपचे म्हणणे इत्यादीचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुदये निघतात आम्ही त्यांची उत्तर त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणांसाठी दिलेली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता अनूतोषास पात्र आहे काय ? अंशता होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा.
मुद्दे क्र.1 व 2 चे उत्तर:
6) तकने श्री.बी.एस.कुलकर्णी रा. मुरुम जिल्हा उस्मानाबाद ग्राहक क्रमांक 596510158334 या ग्राहकाचे दि.25/06/2013 या कालावधीचे बील हजर केलेले आहे दि.15/08/2013 पर्यंत भरल्यास बिलाची रक्कम रु.560/- आहे. दि.26/08/2013 पर्यंत रु.570/- व त्यानंतर रु.580/- दाखवली आहे. श्री.एस.एस. मोरे ग्राहक क्र. 596520179232 यांचे बिलाची रक्कम ता.15/08/2013 पर्यंत रु.2,660/- व त्यानंतरही रु.2,660/- दाखवली आहे या बिलाच्या खाली सुक्ष्म अक्षरात बिल तयार करणा-याचे नाव सोहम व दि.08/08/2013 लिहिले आहे मात्र वरच्या बाजूला देयकचा दि.06/08/2013 लिहिला आहे.
7) तकची तक्रार आहे की बिल दि.08/08/2013 ला तयार झाले असल्यास ग्राहकाचे हातात दि.11 किंवा 12/08/2013 ला पडले असणार त्यानंतर दि.15/08/2013 पर्यंतचे सवलतीचे बिल देता येत होते त्यानंतर वाढीव देयक ग्राहकांना भरावे लागणार होते. दि.15 ऑगस्ट स्वतंत्र्यादिनाची सुटी असल्याने त्या दिवशी ग्राहकांना बिल भरणे शक्य नव्हते. अशाप्रकारे विप यांनी जिल्हयातील सर्व ग्राहकांकडून जादा बील वसूल करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहकांना सवलतीचे बिल भरण्यास दोन ते तीन दिवसांचाच अवधी मिळाला हे विपला मान्य आहे. विपचे म्हणणे आहे की ग्राहकांनी बिलाचे पैसे तयारच ठेवले पाहीजेत. ग्राहकांना online बील भरणेची व्यवस्था आहे. त्यामुळे विपने गैरव्यवसायीक मार्गाचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केलेली नाही.
8) वर म्हंटल्याप्रमाणे बिलाचे अवलोकन केले असता हे दिसुन येते की बिल दि.08/08/2013 रोजी तयार झाले. मात्र देयकाचा दिनांक 06/08/2013 दाखवला आहे. दि.15/08/2013 नंतर सवलतीच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम बिलात दाखवली आहे. तकचे म्हणणे आहे की सवलतीची रक्कम भरणेस 2 ते 3 च दिवस ग्राहकांना मिळाले यात तथ्य आहे. असे दिसते की श्री. कुलकर्णी यांचेकडे थकबाकी नसल्यामुळे दि.15/08/2013 रोजी पर्यंत सवलतीने बिल देता येत होते मात्र श्री. मोरे यांचेकडे थकबाकी असलेमुळे कोणतीही सवलत त्यांना मिळणार नव्हती.
9) तकने विपची बिलासंबंधीची नियमावली हजर केली असून नियम 15.5.1 प्रमाणे देय दिनांक निवासी व कृषी ग्राहकांसाठी देयकाच्या दिनांकापासून एकवीस दिवसापेक्षा कमी असणार नाही. श्री.कुलकर्णी यांचे बाबतीत सवलतीचे दिवस 2-3 च होते तर बिगर दंडाचे दिवस जास्तीत जास्त 15 असतील कारण बिल दि.08/08/2013 ला तयार झाल्याचे दिसते. दि.06/08/2013 रोजी तयार झाले असते तरीही जास्तीत जास्त 18 – 19 दिवसच देय दिवस होते व त्यानंतर दंड बसणार होता. म्हणजेच विप यांनी सेवेत नियमबाहय वर्तणूक करुन त्रुटी केली आहे म्हणून आम्ही मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विप यांनी त्यांच्या ग्राहकांना दि.06/08/2013 चे बिलात देय दिवस कमी दाखवून दंड वसूल केला तो त्यांनी परत दयावा अथवा पुढील देयकात जमा दाखवावा.
3) विप यांनी तक यांना रु.5,000/-(रुपये पाच हजार फक्त) तक्रारीचा खर्च म्हणून दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.मुकुंद.बी.सस्ते) (श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.