::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा गुळखेडा ता. औसा जि. लातूर येथील रहिवाशी असून तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून शेतीसाठी 7.5 एचपी विज कनेक्शन प्राप्त केले, त्याचा ग्राहक क्र. 626550374311 असा आहे. तक्रारदाराचे गट क्र. 235 मध्ये 75 आर व 81 आर एवढी शेतजमीन आहे.
दि. 19.05.2010 रोजी दुपारी 2.15 चे सुमारास तक्रारदाराच्या शेता लगत असलेल्या डी.पी.मध्ये अचानक स्फोट होवुन आग लागल्यामुळे तक्रारदाराच्या शेतातील ऊस, केळीची 500 झाडे, आंब्याची 4 झाडे, सागवानाची 09, लिंबाचे एक झाड व कडबा जळाला. सदर घडनेची तक्रार पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. दि. 19.5.2010 रोजी गाव कामगार तलाठी यांनी तक्रारदाराचा पंचनामा करुन रु. 9,72,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दि. 22.05.2010 रोजी पोलिस स्टेशन यांनी तक्रारदाराच्या सांगण्या वरुन पंचनामा करुन तक्रारदाराचे रु. 5,16,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांना दि. 24.05.2010 रोजी रु. 9,72,000/- चे नुकसान झाल्या संदर्भातील लेखी तक्रार केली. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या सदर तक्रारीस दाद न दिल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 18.11.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठवुन सविस्तर नुकसानीचे वर्णन करुन रु. 9,72,000/- मिळण्याची मागणी केली आहे. सदर नोटीसचे उत्तर सामनेवाले यांनी दिले नाही. म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने शेतीत डी.पी.तील स्फोटामुळे ऊस, केळी, आंब्याची झाडे, सागवानाची झाडे ईत्यादी जळाल्यामुळे रु. 9,72,000/- नुकसान झाले व शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 28,000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 15 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाले यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून त्यांचे लेखी म्हणणे दि. 15.07.2013 रोजी दाखल केले. त्यांचे विरोधात दि. 06.11.2012 रोजी लेखी म्हणणे दाखल न केल्याचा आदेश पारित करण्यात आला होता, म्हणुन त्यांचे म्हणणे रु. 100/- कॉस्ट भरणा करुन दाखल करुन घेतले.
सामनेवाला यांनी तक्रारदारास गट क्र. 235 मध्ये वीज पुरवठा दिला असल्याचे मान्य केले असून, दि. 19.05.2010 रोजी ज्या डी.पी.वर तक्रारदाराने स्फोट होवुन आग लागल्याची तक्रार दिली आहे, तो डी.पी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. तक्रारदाराने दि. 19.05.2010 रोजी दुपारी 2.15 वाजताचे सुमारास स्फोटामुळे तक्रारदाराचे रु. 9,72,000/- नुकसान झाल्याचे म्हटले आहे हे अमान्य केले आहे. तसेच तक्रारदार यांनी या संदर्भात आम्हास कोणतीही नुकसानीची माहिती दिली नसल्यामुळे, तक्रारदारास दयावयाच्या सेवेत आम्ही कोणताही कसुर केला नसल्याकारणाने तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्रा व्यतिरिक्त अन्य कोणतेही कागदपत्रे दाखल केले नाहीत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व सोबतची कागदपत्रे, सामनवेाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे आणि तक्रारदाराने दि. 04.04.2015 रोजी केलेला तोंडी युक्तीवाद , सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने वाचन केले असता, तक्रारदार सामनेवाला यांचा ग्राहक आहे, हे त्यांना मान्य आहे. तक्रारदाराने पोलिस पंचनाम्यात रु. 5,61,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. गाव कामगा तलाठी यांच्या पंचनाम्यात रु; 9,72,000/- चे नुकसान झाल्याचे दर्शविले आहे.
तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेला दि. 24.05.2010 रोजी दिलेला लेखी अर्ज व दिनांक 18.11.2010 रोजी दिलेी कायदेशीर नोटीसमध्ये तक्रारदाराने रु. 9,72,000/- चे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने यासर्व नुकसानी बाबत आवश्यक असणारा कृषी विभागाचा अहवाल जोडलेला नाही.
सामनेवाला क्र. 2 यांना दि. 24.05.2010 रोजी लेखी तक्रार मिळून ही त्यांनी तक्रारदाराच्या सत्यते बाबत कोणतीही हालचाल केली आहे, याबाबत कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नसुन, सामनेवाला यांना अशी घटना माहिती होताच त्यांनी MARC च्या निर्देशित नियमानुसार विदयुत निरिक्षक यांना तात्काळ कळवणे बंधनकारक असतांना ते त्यांनी केल्या बद्दलचा कोणताही पुरावा या न्यायमंचात दाखल केला नाही. सामनेवाला यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात तक्रारदाराची कोणतीही तक्रार प्राप्त नाही. व कायदेशीर नोटीस मिळुनही त्याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.
तहसीलदार व पोलीस पंचनामा याचा विचार करता, तक्रारदाराच्या शेतात आगीमुळे नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे; तक्रारदाराने दाखल केलेले 2 फोटोग्राफ्स यावरुन, तक्रारदाराचा ऊस नुकताच तोडुन कारखान्यास गेला असल्यामुळे किंवा त्या ऊसाचे उत्पन्न घेतल्याचे दिसून येत आहे. दुस-या फोटोमध्ये केळाची लहान झाडे आगीमुळे होरपळल्याचे दिसत आहे. यावरुन शेतक-याचे खरे नुकसान किती झाले हे तक्रारदाराने योग्य प्रकारे सिध्द करणे आवश्यक होते, ते तक्रारदाराने तक्रार सिध्द होण्यासाठी आवश्यक असणारे पुरावे, आणि तक्रारदाराची त्या अनुषंगाने असणारी तक्रारीतील मागणी ही अयोग्य असल्याचे दिसून येत आहे. म्हणुन तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे;
आदेश
- तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.