ग्राहक तक्रार क्र. 126/2013
अर्ज दाखल तारीख : 04/09/2013
अर्ज निकाल तारीख: 29/01/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. भगवान लक्ष्मण सस्ते,
वय-75 वर्षे, धंदा – शेती,
रा.येडशी, ता. जि. उस्मानाबाद.
2. शामसुंदर भगवान सस्ते,
वय-45 वर्षे, धंदा- शेती,
रा.सदर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि.,
उस्मानाबाद सोलापूर रोड, उस्मानाबाद.
2. सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद, शाखा- तेर, ता. जि. उस्मानाबाद.
3. कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद, दुरुक्षेत्र- येडशी, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.आर.एस.मुंढे.
विरुध्द पक्षकारां तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. सदस्या श्रीमती विद्युलता जे.दलभंजन यांचे व्दारा:
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1) अर्जदार भगवान लक्ष्मण सस्ते आणि शामसुंदर भगवान सस्ते हे येडशी ता. जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी विरुध्द पक्ष (संक्षिप्त रुपात वितरण कंपनी) यांचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे.
2) अर्जदार हे शेती करतात त्यांचे मौजे येडशी येथे जमीन गट कं. 158 मध्ये अर्जदार क्र.1 यांचे क्षेत्र 2 हे 26 आर व अर्जदार क्र.2 यांचे नावे 2 हेक्टर एवढी जमीन आहे. गट क्र.158 मध्ये असलेल्या जमिनीवर 2 विहीरी आहेत वितरण कंपनीचे विदयूत पुरवठा आहे व त्याचा अर्जदार क्र.1 यांचा ग्राहक क्र.591140035805 हा असून अर्जदार क्र.2 यांचा ग्रा. क्र.591140036577 असा आहे.
3) अर्जदार क्र.1 व 2 यांचे शेतातील विदयुत तारांची चोरी झाल्याचे सदर कनेक्शन सात ते आठ वर्षापुर्वी बंद होते व पाठपुरावा केल्याने जोडण्यात आले व घटनेच्या 1 वर्षापासून चालू झाले होते.
4) सदर पोल तारा चोरी झालेबददल तक्रार वितरण कंपनीने पोलीस स्टेशनला दिली व ती तक्रार अज्ञात व्यक्तिच्या विरोधात असून तपास चालू आहे.
5) सदरचे पोल हे व्यवस्थितरित्या परत न बसवलेने (क्रॉक्रीट न करता स्टे सपोर्ट न देता हे तिरप्या अवस्थेत ब-याच काळापासून होते असे अर्जदाराचे म्हणणे आहे व तारांचे झोळ तयार होऊन त्या खाली जमीनीकडे झूकलेल्या व एकमेकांच्या जवळ जवळ आलेल्या होत्या त्यामुळे एकमेकास घर्षण होऊन प्यूज जाण्याचे प्रमाणे वारा सुटलेल्या वेळी जास्त होत असे. त्यामुळे वितरण कंपनीला ब-याच वेळा व्यवस्थित करणेबाबत तोंडी व पत्राने सांगितले होते परंतु आमच्याकडे माणसे नाहीत आपण सरळ करुन घ्या असे सांगितल्याने आम्ही लाईट बंद करुन दया व सरळ करता वेळी तारा तुटल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही असे सांगितल्यावर लवकरच बसवून देऊ असे वितरण कंपनीने आश्वासन देत वेळ मारुन नेत होते असे अर्जदारांचे म्हणणे आहे.
6) सदरचे पोल उसाचे शेतातून जात असलले ऊस हा परीपक्व झालेला असल्याने तारा व उस यांचेतील अंतर कमी झाले व वारा सुटल्यावर तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उसावर पडून दि.08/01/2012 रोजी दुपारी 2 ते 2.30 वा दरम्यान उसाने पेट घेतला व अर्जदार क्र.1 यांचे क्षेत्रातील उस जळून गेला व त्यासोबत अर्जदार क्र.2 यांचे शेतातील काढलेल्या पिवळया ज्वारीच्या कडब्याच्या 1200 (बाराशे) पेंढया, जनावरांना खाण्यास योग्य असे भुसकट ज्याची किंमत रु.10,000/- एवढी होती ती जळून गेले असे एकूण रु.50,000/- चे नुकसान झाले.
7) अर्जदार क्र.1 च्या शेतातील ऊस अंदाजे 150 टन जळाल्याने उर्वरीत ऊस कारखाण्यास घालून मिळालेली रक्कम वगळता रक्कम रु.2,00,000/- एवढे नुकसान झाले सदर घटना वितरण कंपनीला सांगितल्यावर वितरण कंपनीचे 3 लोक येऊन ऊस जळतांना पाहून ताबडतोब डिपी बंद केला व अर्जदार क्र.1 व 2 यांनी घटनेची लेखी तक्रार दि.08/01/2012 रोजी व कनिष्ट अभियंता यांना दिली सदरचा अर्ज घेण्यास नकार दिल्याने व साहेब आल्यावर अर्ज दया असे सांगितल्यामुळे दि.13/01/2012 रोजी सदर अर्ज दाखल केला.
8) अर्जदार क्र.1 व 2 यांनी तलाठी, पो.स्टे. उस्मानाबाद (ग्रामिण) आऊट पोस्ट येडशी. यांना जागेवर येऊन घटनास्थळी पंचनामे केले व तालूका दंडाधिकारी साहेब आकस्मीत जळीत क्र.1/12 चा चौकशी अहवाल सादर केला.
9) घटना घडल्यानंतर अर्जदार क्र.1 यांनी 4 ते 5 दिवसात मालक ऊसतोड करुन भरुन देणे विषयी सुचना केली व ऊस कारखान्यास पाठवला.
10) अर्जदार क्र.1 यांचे जमीन गट क्र.158 क्षेत्र 2 हे. 26 पैकी 1 हे. 20 आर. मध्ये ऊसचे पिक जोमात आलेले होते.
11) सदर उसाचे 3 एकरी 50 टन प्रमाणे 3 एकर मध्ये एकूण 150 टन उसाचे उत्पन्न निघाले. परंतु वितरण कंपनीच्या सेवेतील त्रुटी मुळे 90 टन उसाचे नुकसान झाले आहे. अर्जदार क्र.1 यांचे रु.1,80,000/- एवढे नुकसान झाले. कारखान्यास रु.59,351/- मे. टन ऊस गेला. त्याचे बिल रु.83091/- एवढे झाले. जळीत ऊस म्हणून 50 टक्के कपात करुन रक्कम रु.43,030/- अर्जदार क्र.1 यांना मिळाली सदरची नुकसान भरपाई. अर्जदार क्र.1 व 2 यांना न दिल्यामुळे अर्जदार क्र.1 व 2 यांनी प्रस्तुत तक्रारी मार्फत रक्कम रु.150/- मे 2 X 2000 = 3,00,000/- - 43030/- 2,56,970/- इतकी रक्कम 12 टक्के व्याज दराने अर्जदार क्र.1 यास मिळावी तसेच अर्जदार क्र.2 यांना पिवळीच्या रु.1,200/- पेंढया जळाल्याने व जनावरांना खाण्या योग्य भुसकट जळाल्याने रक्कम रु.50,000/- 12 टक्के व्याज दराने वितरण कंपनीकडून मिळावे अशी विनंती केलेली आहे.
12) वितरण कंपनीने त्यांचे म्हणणे दिलेले आहे त्यांचे म्हणण्यानुसार सदरची तक्रार चालू शकत नाही. अर्जदार क्र.1 व 2 यांनी वेगवेगळया तक्रारी दाखल करणे गरजेचे होते. तारा जमिनीकडे झूकलेल्या होत्या, हे खोटे आहे. तारा तुटल्या तर आम्ही जबाबदार राहणार नाही व आम्ही लवकरच तारा बसवून देऊ हे सर्व खोटे आहे. ज्वारीच्या कडब्याच्या 12,00/- पेंडया ज्याची किंमत रु.40,000/- भुसकट रु.10,000/- हे म्हणणे खरे नाही. त्याबाबत पुरावा दिलेला नाही.
13) 150 टन ऊस जळाला उर्वरीत ऊस कारखान्यास घालून रक्कम वगळता रु.20,000/- नुकसान झाले हे म्हणणे खरे नाही. घटनेची खबर अभियंता यांना दिली व तक्रार घेण्यास इन्कार केला हे म्हणणे खरे नाही. अर्जदारास नुकसान भरपाई मागण्यास अधिकार पोहचत नाही. विदयूत निरीक्षकाची मागणी केली यांची माहिती वितरण कंपनीला नाही. पीक जोमात आहे हे खरे नाही. ऊस लागणीची तारीख नाही ऊस 1 हे. 20 आर. होता हे खरे नाही 50 टनाप्रमाणे. 3 एकर मध्ये 159 टन उसाचे उत्पन्न निघाले याबाबत पुरावा नाही. एखादया ग्राहकाचा ऊस विदयूत ठिणग्या पडून जळाला नंतर त्याबाबतची तक्रार चालविण्याचा अधिकार कोर्टास येत नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती वितरण कंपनीने केलेली आहे.
14) अर्जदाराने तक्रारीबरोबर अर्जदाराचा अर्ज दि.08/01/2012 फेरीस्त प्रथम माहीती अहवाल, दि.08/01/2012 घटनास्थळ पंचनामा, दि.09/01/2012 जबाब अर्जदार क्र.2 यांचा दि.09/01/2012 जबाब मिठू भिवा शेटे यांचा दि.09/01/2012 जबाब, नवनाथ दिगंबर मुंढे दि.09/01/2012, जबाब तानाज शेंकर मुंढे दि.09/01/2012 विदयूत निरीक्षकास दिलेला अर्ज दि.29/11/2012 शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. ढोकी येथे जळीत ऊस पाठ दिलेली पावती, पंचनामा तलाठी यांचा दि.08/01/2012 रोजीचा पंचनामा तलाठी यांचा दि.08/01/2011 लेखी म्हणणे, अर्जदार क्र.1 यांचा नावाचे विदयुत देयक व अर्जदार क्र.1 व 2 यांच्या नावाचा 7/12 इ. कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले तसेच दोन्ही विधीज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे.
1) अर्जदार क्र. 1 व 2 यांना देण्यात येणा-या सेवेत
वितरण कंपनीने त्रुटी केली का ? होय.
2) अर्जदार क्र.1 व 2 हे नुकसान भरपाई
मिळविण्यास पात्र आहेत काय ? अंशत: होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
निष्कर्ष
16) मुद्दा क्र. 1 व 2 :
15) अर्जदारांचा ऊस व ज्वारी कडब्याच्या पेंढया वितरण कंपनीमुळे जळाल्या ही प्रमुख तक्रार अर्जदारांची आहे. अर्जदारांनी प्रकरणात संबधीत काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. घटनास्थळ पंचनाम्यात 9 नंबरचा कॉलम मध्ये नकाशा काढलेला दिसत नाही. चर्तुंसिमा काढलेली दिसून येत नाही. तसेच विदयूत निरीक्षकांना पत्र दिलेले निदर्शनास येते पण विदयूत निरीक्षकांनी घटनेचा अहवाल दिलेला नाही. तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे. तसेच अर्जदार क्र.2 यांचाही पंचनामा केलेला आहे सदर तलाठी पंचनाम्यात तुरीच्या शेतात आग लागून तुरीचे साधारण दहा पोते भूस्सा व पिवळिचा साधारणत: रु.1,000/- कडबा जळाल्याचे दिसून येते असे म्हंटलेले आहे. 7/12 चे जर सुक्ष्म अवलोकन केले तर उसाची व तुरीची व ज्वारीचे पीक घेतल्याची नोंद दिसून येत नाही. कारण पीक पहाणीचा कॉलम दिसून येत नाही. एकूण जमीन 6 हे. 26 आर. असून तक्रारकर्ते तसेच मुकुंद भगवान सस्ते तसेच शाईन फार्मास्यूटीकल्स अशी मालकी हक्काची नोंद आहे त्यापैकी बागायत क्षेत्र 96 आर. असल्याचे दाखवले आहे.
16) तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे दि.10/04/2012 चा दाखला असे दाखवतो की भगवान सस्ते यांचा दि.01/01/2012 ते 10/04/2012 चा कालावधीत एकूण रु.39,379/- टन असा आला व भाव टनाला रु.1,400/- होता त्यामुळे बिल रु.6,3091/- आले असते पण ऊस जळीत असल्याने कपात रु.40061/- करण्यात आली. (सुमारे 5000/-) तक चे म्हणणे प्रमाणे एकूण रु.150/- टन झाला असता संपूर्ण 96 आर. दोन उसाखाली असते तर एकरी 60 टन उस झाला असता असे तक चे म्हणणे आहे ते अवास्तव वाटते. एकरी 40 हा या भागात सर्वसाधारण उतार आहे त्यामुळे 100 टन ऊस झाला असता. त्यापैकी रु.59,351/- टन कारखान्यास गेला म्हणजे रु.40,649/- टन ऊस जळाल्यामुळे कमी गेला. त्याचे टनास रु.1,400/- प्रमाणे रु.56,908/- चे नुकसान झाले + कारखान्याने कपात केले रु.40,061/- व 1,06,969/- (रुपये एक लाख सहा हजार नऊशे एकोण सत्तर फक्त) चे नुकसान झाले.
17) तक ने पिवळ्या ज्वारीच्या 1120 पेंढया कडबा जळाल्याचे रु.40,000/- मागितले आहे. म्हणजेच पेंढीची किंमत रु.35/- दाखवली आहे. तलाठी पंचनाम्यातील पिवळीच्या 1,000/- पेंढीची किंमत रु.20/- पेंढीप्रमाणे त्याचे रु.20,000/- येतील तसेच तुरीचा भुसा 10 पोते जळाल्याचे म्हंटले आहे त्याचे रु.4,000/- होतील असे एकूण रु.1,30,969/- होतात. वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की अर्जदार यांना देण्यात येणा-या सेवेत वितरण कंपनीने त्रुटी केली आहेत व अर्जदार क्र.1 व 2 हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.
2) अर्जदार क्र. 1 व 2 यांना वितरण कंपनीने जळीत उसाचे रु.1,06,969/- ( रुपये एक लाख सहा हजार नऊशे एकोणसत्तर फक्त) कडबाच्या पेंडीचे रु.20,000/-,(रुपये वीस हजार फक्त ) तुरीचा भुस्साचे रु.4,000/- (रुपये चार हजार फक्त) असे एकूण रु.1,30,969/- (रुपये एक लाख तीस हजार नऊशे एकोणसत्तर फक्त) दि.04/09/2013 पासून 9 टक्के व्याज दराने आदेश दिल्या तारखेपासून 30 दिवसात अर्जदारास दयावेत.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(सौ.विद्युलता जे.दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
.