( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 03 मे, 2013)
1. तक्रार वीज वापराच्या अतिरिक्त रकमेबदृल दाखल आहे.
2. तक्रार थोडक्यात ः-
3. तक्रारकर्त्याकडे घरगुती वापरासाठी वीज मिटर दिनांक 17.09.1964 पासून आहे. ही विद्यूत जोडणी तक्रारकर्त्याच्या वडीलांच्या (मयत) गन्नासिंग फकिरसिंग ठाकूर यांचे नावे आहे.
4. तक्रारकर्त्याला जुलै-2011 मध्ये 437 युनिटचे वीज वापराचे बिल प्राप्त झाले नंतर जून-2012 चे 231 रिडींग चे बिल प्राप्त झाले, त्यानंतर जुलै-2012 मध्ये 1044 रीडींग असलेले बिल प्राप्त झाले. तक्रारकर्त्याने 1044 एवढया युनिटचा वीज वापर गेल्या 50/55 वर्षात केला नाही, म्हणून त्याला हे जास्तीचे वीज बिल मान्य नाही असे तक्रारकर्ता म्हणतो.
5. दिनांक 06.08.2012 रोजी तक्ररकर्त्याने विरुध्द पक्षाला पत्र लिहून जुलै-2012 चे बिल दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. त्याची दखल विरुध्द पक्षाने घेतली नाही.
6. तक्रारकर्त्याला तांत्रिक माहिती नाही. मीटर सदोष असल्यामुळे प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त युनिटची नोंद झाली असावी. विरुध्द पक्षाने याबदृल खुलासा/चौकशी करायला पाहिजे होती ती केली नाही.
7. तक्रारकर्त्याची प्रार्थना आहे की, जुलै-2012 चे विज-बिल दुरुस्त करुन मिळावे.
8. तक्रारीसोबत जुलै-2012 चे विज-बिल आणि तक्रारकर्त्याचा दिनांक 06.08.2012 चा विज-बिल कमी करुन देण्याबदृलचा अर्ज जोडला आहे.
09. विरुध्द पक्षाचे उत्तर रेकॉर्डवर आहे.
10. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक ठरतो हे विरुध्द पक्ष मान्य करतात.
11. जुलै-2012 चे विज-बिल मीटरमधील प्रत्यक्ष वीज वापराच्या नोंदिच्या आधारावर 1044 युनिटचे बिल तक्रारकर्त्याला दिले. मीटर सदोष आहे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे विरुध्द पक्षाला मान्य नाही.
12. तक्रार खोटी व निरर्थक आहे. विरुध्द पक्षाच्या सेवेत त्रृटी नाही, म्हणून तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरुध्द पक्ष करतात.
13. मंचाने दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकला, रेकॉर्डवरील संपूर्ण कागदपत्रे तपासली, मंचाची निरिक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे-
- निरीक्षणे व निष्कर्ष -
14. तक्रारकर्ता वापरत असलेले वीज मिटर त्यांच्या मयत वडिलांच्या नावे आहे, म्हणून वीज-बिलही त्यांच्याच नावे जारी केली जातात. लाभार्थी म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ‘’ग्राहक’’ ठरतो असे मंचाचे मत आहे. ही बाब विरुध्द पक्षानेही उत्तरात मान्य केली आहे.
15. तक्रारकर्त्याला जुलै-2012 चे 1044 युनिट वीज वापराचे बिल मान्य नाही. कारण गेल्या 50/55 वर्षात त्याचा वीज-वापर एवढा जास्त कधीच नव्हता प्रत्यक्ष वीज वापर केलेल नसतांना 1044 युनिटची नोंद वीज मीटरमध्ये झाली तर मीटर सदोष असले पाहिजे असे तक्रारकर्ता म्हणतो.
16. मंचाला तक्रारकर्त्याच्या उपरोक्त कथनात तथ्य वाटत नाही. कारण तक्रारकर्त्याने जुलै-2012 पूर्वीची व नंतरची बिले तुलनात्मक निरिक्षणासाठी सादर केली नाहीत. मीटर faulty आहे ही बाबही तक्रारकर्त्याने सिध्द केली नाही. किंबहुना मीटर सदोष नाही असाच मंचाचा निष्कर्ष आहे. जुलै-2012 मधील तक्रारकर्त्याचा वीज वापर आणि 50/55 वर्षापूर्वीचा वीज वापर यांची तुलना कधीही करता येणार नाही. तक्रारकर्त्याची ही अपेक्षा की त्याला 50/55 वर्षापूर्वी जेवढया युनिटचे बिल प्राप्त होत होते तेवढयाच युनिटचे आताही प्राप्त व्हावे. मुळातच तक्रार निराधार व निरर्थक तर आहेच पण हास्यास्पदही आहे. 50/55 वर्षापूर्वी पंखे, फ्रीज, टी.व्ही. इत्यादी वीजेवर चालणरी यंत्रे फार कमी प्रमाणात होती. आज (जुलै-2012) घरोघरी वीजेवर चालणा-या अनेक वस्तू असतात. तक्रारकर्त्याकडे किती व कोणती विजेवर चालणारी उपकरणे आहेत, किती खोल्या आहेत, इत्यादी कोणताही तपशील/पुरावा तक्रारकर्त्याने सादर केला नाही. केवळ तक्रारकर्ता म्हणतो की त्याचा वीज वापर जुलै-2012 मध्ये 1044 युनिटचा झाला नाही, म्हणून तसे कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय किंवा तज्ञाच्या अहवालाशिवाय ग्राह्य धरता येत नाही असा मंचाचा निष्कर्ष आहे.
17. मीटर सदोष असावे हे तक्रारकर्त्याचे म्हणणेही मंच ग्राह्य मानत नाही. कारण जुलै-2012 पुर्वीची व नंतरची वीज बिले योग्य आहेत असे तक्रारकर्ता म्हणतो. केवळ मधे एकच महिना मीटर बिघडले त्याने चुकीची नोंद केली व नंतर पून्हा आपोआप दुरुस्त होऊन बरोबर नोंदी केल्या असे गृहीत धरता येणार नाही असे मंच मानते.
18. तक्रारकर्त्याने तक्रारीत रकमेचा उल्लेख न करता केवळ युनिटचाच उल्लेख केला आहे.
19. वादग्रस्त जुलै-2012 चे बिल तपासले त्यावर तक्रारकर्त्याने रुपये 6,880/- भरल्याची नोंद आहे तरीही बाकी रुपये 9,920/- दिसते. (आता ती वाढली असावी)
20. तक्रारकर्त्याने जुलै-2012 चे 1044 युनिटचे विज बिल सदोष ठरते म्हणून भरले नाही. त्यामुळे त्याचा विद्यूत पुरवठा विरुध्द पक्ष खंडीत करतील अशी आशंका वाटल्यावरुन तक्रारकर्त्याने मुळ तक्रार क्रमांक 39/2012 सोबतच किरकोळ प्रकरण क्रमांक 02/2012 विरुध्द पक्षाने विद्यूत पुरवठा खंडीत करु नये असा अंतरिम आदेश मिळण्याबदृल दाखल केले. त्यावर दिनांक 16.10.2012 रोजी विद्यूत पुरवठा खंडीत न करण्याबदृल एकतर्फी अंतरिम आदेश मंचाने पारीत केला. नंतर दिनांक 16.11.2012 रोजी दोन्ही पक्षांच्या वकीलांचा युक्तिवाद ऐकून एकतर्फी अंतरिम आदेश मुळ तक्रारीच्या (सी.सी.39/2012) निकलापर्यंत कायम करण्यात आला.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याने त्याची तक्रार सिध्द न केल्याने खारीज करण्यात येते.
2. दिनांक 16.10.2012 रोजीचा एकतर्फी अंतरिम आदेश जो दिनांक 16.11.2012 रोजी या तक्रारीच्या निकालापर्यंत कायम करण्यात आला होता, तो आता या तक्रारीचा निकाल लागल्याने रदृ करण्यात येतो.
3. खर्चाबद्दल आदेश नाहीत.