निकाल
दिनांक- 14.08.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्यक्ष)
1. तक्रारदार बालाजी महिपतराव कोटुळे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची मौजे चिंचवण ता.वडवणी येथे गट नं.263,264, 166 येथे शेत जमिन आहे.तक्रारदाराचे वडिलांचे नांवे विज कनेक्शन घेतलेले असून त्यांचा ग्राहक क्र.5827500405010/7 व 582750380076/7 असे आहेत. तक्रारदार हे नियमीतपणे विज बिले भरतात. तक्रारदाराचे शेतातून विज वितरण कंपनीचे एल.टी. लाईन (3 फेज 3 वायर उभी तार रचना) गेलेली आहे. दि.14.02.2011 रोजी सकाळी 10 वाजता विज कंपनीच्या एल.टी. लाईनच्या तारा एकमेकास चिकटुन स्पार्कीग झाल्यामुळे त्यांच्या ठिणग्या त्याखालील गट क्र.264, 263, 266 मधील शेतातील ऊस पिकावर पडून ऊसाला आग लागली. त्यामुळे वरील नमूद गट क्रमांकामधील संपूर्ण ऊस जळाला. ऊसाचे नियोजनासाठी ठिंबक सीचंन योजनेचे पाईप व इतर साहित्य संपूर्ण जळून खाल झाले.
3. ऊस तोडणीला आला असताना वरील घटना घडली. आग लागण्यापूर्वीचे फक्त 13 टन ऊसाचे उत्पादन भरलेले असून उर्वरित सर्व ऊस जळाल्यामुळे त्यांचे वजन कमी झालेले आहे. त्यामुळे फक्त 114.5 टन एवढे जळीत ऊसाचे वजन भरलेले आहे. तक्रारदार यांना सरासारी 40 टन प्रति एकर याप्रमाणे पाच एकरामध्ये 200 टन एवढे उत्पादन होणे अपेक्षित होते. त्यामुळे तक्रारदारास 72 टन ऊस कमी भरलेला आहे.तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रु.1750/- प्रति टन प्रमाणे 72 टनाचे रु.1,26,000/- चे नुकसान झाले आहे. जळीत ऊस दरामधील कपात 15 टक्के त्यांचे रु.29,000/- असे एकूण रु.1,55,000/- चे नुकसान झाले आहे. तसेच पाईप व इतर साहित्य जळाल्यामुळे त्यांचे नुकसान रु.1,43,129/- असे सर्व मिळून तक्रारदाराचे रु.2,98,129/- चे नुकसान सामनेवाले यांच्या विज वायर मुळे झाले आहे.
4. तक्रारदाराने घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन वडवणी यांना दिली. त्यांनी आ.ज.नं.3/2011 दि.14.02.2011 रोजी नोंदणी केली. दि.15.02.2011 रोजी घटनास्थळाचा पंचनामा केला. तलाठी सज्जा चिंचवण यांनी दि.14.02.2011 रोजी गावातील पंच लोकासमोर नुकसानी बाबतची पाहणी करुन पंचनामा केला. दि.15.02.2011 रोजी कनिष्ठ अभिंयता विज वितरण कंपनी यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत व योग्य ती कार्यवाही करण्यासाठी अर्ज दिला होता. विद्युत निरिक्षक विद्युत निरिक्षण विभाग, बीड यांनी तक्रारदाराचे शेतावर येऊन पाहणी करुन निष्कर्ष काढला आहे. त्यात घेतलेले जवाब, केलेली निरीक्षणे,चौकशी, पोलिस पंचनामा व तलाठी पंचनामा यावरुन मौजे चिंचवण ता.वडवणी जि. बीड येथील तक्रारदाराचे शेतात सामनेवाले यांच्या विज वायर मुळे ऊस व ठिंबक सिंचन योजनेचे संच जळाल्याचे त्यांचे अहवालात मान्य केले आहे.
5. वरील सर्वाचे अहवाल असून सुध्दा तक्रारदार यांस सामनेवाले यांनी नुकसान भरपाई दिलेली नाही. तक्रारदाराने दि.07.03.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. सदर नोटीस दि.08.03.2011 रोजी मिळून सुध्दा त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही व रक्कमही दिली नाही. त्यामुळे तक्रारदारास दि.20.07.2010 रोजी तक्रार दाखल करण्यास कारण घडले आहे. सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे नुकसान झालेले आहे, त्यांची मागणी की, तक्रारदारास ऊस पिक जळाल्यामुळे झालेली नुकसान भरपाई रक्कम रु.3,00,000/- व मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/- असे एकूण रु.3,15,000/- व त्यावर रक्कम वसूल होईपर्यत 18 टक्के व्याज देण्याचा आदेश व्हावा.
6. सामनेवाले यांनी त्यांचा लेखी जवाब दि.12.01.2012 रोजी दाखल केला. त्यांचें कथन की, तक्रारदारांचे वडिलांचे नांवे विज कनेक्शन आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. पंचनामे हे सामनेवाले यांच्या पश्चात झालेले असल्यामुळे त्यांना ते मान्य नाहीत. ते पंचनामे सामनेवाले यांचे बंधनकारक नाहीत व पंचनाम्यामुळे तक्रारदाराच्या ऊस जळीताची तक्रार सिध्द होत नाही.विद्युत निरिक्षकांचा अहवाल त्यांना मान्य नाही.सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचा ऊस जळालेला नाही.त्यामुळे ते कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. विज तारा एकमेकानां घासुन स्पार्कीग होऊन तक्रारदाराच्या शेतातील ऊस जळाला हे तक्रारदाराचे म्हणणे हा केवळ अपघात असून सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत.सामनेवाले यांनी मा.राज्य आयोग, मुंबई यांचे अपिल क्र.1423/2008 चे निकालाची प्रत दाखल केली आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक नसल्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
7. तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व कागदपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय ? नाही.
2. तक्रारदार हे सिध्द करु शकतात की,सामनेवाले
यांचे सेवेत त्रूटी आहे काय ? नाही.
3. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
काय ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 4 ः-
8. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीचे कथन काळजीपुर्वकपणे वाचले असता असे आढळून येते की, तक्रारदार यांनी प्रर्कषाने सामनेवाले यांच्या निष्काळजीपणामुळे व विज वाहक ताराची योग्य काळजी न घेतल्यामुळे तारांचे ऐकमेकांना घर्षन होऊन त्यांच्या ठिणग्या ऊस पिकावर पडल्या व त्यामुळे ऊसाचे पिक जळून नूकसान झाले असे कथन केले आहे. तेव्हा प्रथम तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदयाच्या संज्ञेनुसार ग्राहक या संज्ञेत बसतो का हे पाहणे महत्वाचे आहे. तक्रारीतील कथन वाचले असता तक्रारदार यांचे वडिलांचे नांवे गट नंबर 263,264,266 मध्ये विज जोडणी घेतलेली आहे.सबब, तक्रारदार यांचे वडीलांचे नांवे विज जोडणी घेतलेली असल्यामुळे ते ग्राहक होऊ शकतात. तक्रारदार यांचे शेतावरुन विजेचे खांब गेलेले आहेत व विजेचे तारेचे घर्षन होऊन ठिणगी ऊसाचे पिकावर पडली व त्यामुळे ऊसाचे पिकाचे नुकसान झाले ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
9. तक्रारदार यांनी आपल्या शपथपत्रासोबत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेला अर्ज दाखल केला आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा, 7/12 चे उतारे, फोटोग्राफस दाखल केलेले आहेत. त्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे ऊसाचे पिक आकस्मीक जळीत झाल्या बाबत नोंद आहे. तसेच तक्रारदार यांचे ऊसाच्या पिकाचे तोंडणी त्यावेळेस सुरु होती. त्यावेळी विज तारेचे ऐकमेकास घर्षन होऊन त्यांची ठिणगी ऊसात पउली व त्यांस आग लागली.
10. तक्रारदार यांनी नमूद केलेली वस्तूस्थिती व संपूर्ण कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय ? हे पाहणे आवश्यक आहे. तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीमध्ये सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे त्यांचे नूकसान झालेले आहे असे कथन केलेले आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे या बाबत कोठेही नमूद केलेले नाही.तसेच तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत ग्राहक संज्ञेत बसतो ही बाब ही नमूद केलेली नाही. केवळ तक्रारदार यांचे म्हणणे की, विज ठिणगी पडल्यामुळे ऊसाचे पिकास आग लागून नूकसान झाले. यामुळे तक्रारदार हा सामनेवाले यांचा ग्राहक होऊ शकत नाही. सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले असल्यास दिवाणी कायदया अंतर्गत तक्रारदार यांनी दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल करावा. जिल्हा मंचा पुढे तक्रार दाखल करावयाची असल्यास तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक असला पाहिजे. तक्रारदार हा सामनेवालायांचा ग्राहक नाही असे या मंचाचे मत आहे. म्हणून सदरील तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही असे या मंचाचे मत आहे.
11. मा.राज्य आयोग मुंबई यांनी फस्ट अपिल नंबर 1423/2008 कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित विरुध्द कृष्णदेव बब्रुवान वाघचौरे व इतर यामध्ये तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही असे निर्देश दिलेले आहेत. सदरील तक्रारीमध्ये शॉर्टसर्किट मुळे स्पॉकींग होऊ ऊसाचे पिकाला आग लागली आहे व त्यामध्ये तक्रारदार यांचे नूकसान झाले होते. सदरील बाबीचा पुराव्याचे आधारे मा.राज्य आयोग यांनी विचार करुन ऊसाचे पिकास अपघाताने आग लागली आहे. सदरील बाब ही सेवेत त्रूटी आहे असे म्हणता येणार नाही. तसेच ऊस आग ही इलेक्ट्रीक वायरचे स्पार्कीग मुळे झाली ही बाब ही सदरील तक्रारीत शाबीत केल्या गेली नव्हती.
12. तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे शेतात ऊस जळाल्याचे स्पष्ट दिसत आहे पंरतु तो ऊस शॉर्टसर्कीट मुळे जळाला आहे या बाबत तक्रारदार यांनी पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी पोलिसामध्ये सदरील ऊस इलेक्ट्रीक पार्कीगमुळे जळाला आहे या बाबत कथन केले आहे व पोलिसांनी पंचनाम्यातही कथन केलेले आहे. परंतु घटनास्थळ पंचनाम्यामध्ये आकस्मीत जळीत झाले आहे असे स्पष्ट नमूद केले आहे. जे काही पोलिसा समोर कथन केले आहे ते तक्रारदार यांनी सांगितले त्याप्रमाणे लिहीलेले आहे. तसेच तारा एकमेकास घर्षन झाल्या असाव्यात त्यामुळे स्पॉर्कीग होऊन त्यांची ठिणगी ऊसावर पडून आग लागली असावी अशी शक्यता नमूद केलेली आहे.
13. तक्रारदार यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, सदरील इलेक्ट्रीक पोल व तारा तक्रारदार यांचे शेतातून गेल्या आहेत त्या व्यवस्थित ठेसणे व काळजी घेण्याची जबाबदारी सामनेवाला यांची होती. सामनेवाला यांनी ती काळजी घेतली नाही. इलेक्ट्रीक वायर एकमेकास घासल्यामुळे स्पॉर्कीग झाली व ऊसावर ठिणगी पडली व आग लागून ऊसाचे खुप नुकसान झाले. आपले युक्तीवादाचे समर्थनार्थ तक्रारदार यांनी The consumer law digest 2001-2005 मध्ये पान 447 नोट नंबर 20 मध्ये नमूद केलेल्या केसचा हवाला दिला. सदरील केसमध्ये तक्रारदार यांचें नांवे विज जोडणी घेतली होती व शेतामध्ये त्यांचे विहीरीवर इलेक्ट्रीक पंप बसविला होता व वायरमध्ये स्पॉर्कीग झाली व त्यामुळे तक्रारदाराचे पिक जळाले. तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत व तसेच इलेक्ट्रीक कंपनीने सेवा देण्यास कसूर केला आहे असे नमूद केलेले आहे. सदरील केसची वस्तूस्थिती व या मंचासमोर असलेल्या तक्रारीचा विचार केला असता वस्तूस्थितीमध्ये भिन्नता आढळून येते. तक्रारदार यांचे नांवे विज जोडणी नाही अगर त्यांचे नांवे विहीरीवर पंपही घेतलेला नाही. सर्वसाधारणपणे शेतातून इलेक्ट्रीक पोल गेलेले असतात व आजूबाजूच्या शेतक-यांना त्यांचे विहीरीवर इलेक्ट्रीक प्रवाह पुरविला जातो. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नसल्यामुळे असे जरी गृहीत धरले की, वायरची स्पॉर्कीग होऊन तक्रारदार यांचा ऊस जळाला आहे व तो सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे जळाला आहे व त्यासाठी तक्रारदार यांस दिवाणी न्यायालयात दाद मागून नुकसान भरपाई मागता येते.
14. सबब, तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेत येत नसल्यामुळे त्यांची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सामनेवाले यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचे काही नुकसान झाले आहे त्याकामी तक्रारदार हे योग्य त्या दिवाणी न्यायलयात दावा दाखल करुन दाद मागू शकतात असे मंचाचे मत आहे.
15. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रूटी केली ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत.
16. मुददा क्र.1 ते 4 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
17. सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.