(घोषित दि. 30.03.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून, त्यांनी घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. वीज बिलाचा नियमितपणे भरणा करुन देखील गैरअर्जदार यांनी थकबाकी रकमेची मागणी केली. याबाबत केलेल्या तक्रारीची गैरअर्जदार यांनी दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी घरगुती वापरासाठी गैरअर्जदार यांच्याकडून वीज पुरवठा घेतला आहे. जून 2011 पर्यंत देण्यात आलेल्या वीज बिलाचा भरणा त्यांनी नियमितपणे केला आहे. जुलै 2011 मध्ये त्यांना देण्यात आलेल्या वीज बिलात 9,310/- रुपये समायोजित रक्कम दाखविण्यात आली. या चुकीच्या वीज बिला बाबत त्यांनी दिनांक 26.08.2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे तक्रार केली व सुधारीत वीज बिल देण्याची मागणी केली. गैरअर्जदार यांनी पुढील वीज बिलात ही रक्कम कमी करुन देण्यात येईल असे सांगून चालू महिन्याचे वीज बिल भरण्यास सांगितले त्याप्रमाणे अर्जदाराने वीज बिलाचा भरणा केला. गैरअर्जदार यांनी वीज बिल बिलात दर्शविलेली जुनी थकबाकी कमी न करता त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिल्यामुळे त्यांनी 5,000/- रुपयाचा भरणा केला. गैरअर्जदार यांनी वीज बिलात दर्शविलेले 9,310/- रुपये कमी करण्याची तसेच सेवेतील त्रुटीबाबत नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत त्यांना देण्यात आलेली वीज बिले, गैरअर्जदार क्रमांक 2 यांना केलेला अर्ज इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 यांच्या तर्फे संयुक्तपणे दाखल करण्यात आलेल्या जवाबानुसार भरारी पथक नागपूर यांनी भोकरदन शहरातील ग्राहकांच्या मीटरची पाहणी केली. अर्जदाराच्या मीटरमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार अर्जदारास 9,310/- रुपये वीज बिल भरण्याची मागणी करण्यात आली व जी योग्य असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदारास देण्यात आलेले वीज बिल योग्य असून अर्जदारास देण्यात आलेल्या सेवेत कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 9000620310 असा असून मीटर क्रमांक 9000620310 असा आहे. जून 2011 पर्यंत अर्जदाराची वीज बिलाबाबत तक्रार नव्हती हे 180/- रुपयाचे वीज बिल दिनांक 25.07.2011 रोजी भरलेले आहे. यावरुन दिसून येते. जुलै 2011 मध्ये त्यांना 9,390/- रुपयाचे वीज बिल गैरअर्जदार यांच्या तर्फे देण्यात आले ज्यामध्ये चालू महिन्याचे वीज बिल 77.30 रुपये व समायोजित रक्कम 9,310/- रुपये दर्शविण्यात आल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात सदरील समायोजित रक्कम भरारी पथक, नागपूर यांच्या सूचनेवरुन आकारण्यात आली असल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी या रकमेबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा भरारी पथकाचा अहवाल मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही समायोजित रक्कम कोणत्या आधारावर आकारण्यात आली आहे याचे नेमके कारण दिसून येत नाही. अर्जदाराने दिनांक 26.08.2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे केलेल्या तक्रारी नंतर देखील त्यांना या रकमेचे विश्लेषण किंवा कारण याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणतेही विश्लेषण किंवा पाहणी अहवाल दाखल न करता अशी रक्कम आकारणे हे नैसर्गिक न्याय तत्वा विरुध्द असल्याचे मंचाचे मत आहे. अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येत असून ते नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
आदेश
1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास जुलै 2011 मध्ये आकारलेली समायोजित रक्कम 9,310/- रुपये रद्द करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार यांनी ही समायोजित रक्कम वगळून अर्जदारास सुधारीत वीज बिल 30 दिवसात द्यावे
3. वरील प्रमाणे देण्यात येणा-या सुधारीत वीज बिलात व्याज व दंड आकारु नये व अर्जदाराने भरलेल्या रकमेची वजावट करावी
4. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 1,500/- 30 दिवसात द्यावे.