(घोषित दि. 28.05.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक असून त्यांना देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा सरासरी वीज वापर 250 ते 350 युनिट प्रतिमाह असून ते नियमितपणे वीज बिलाचा भरणा करतात. गैरअर्जदार यांनी त्यांना दिनांक 17.06.2012 ते 16.07.2012 या कालावधीचे 20,605/- रुपयाचे वीज बिल आकारले. या वाढीव वीज बिला विरुध्द दिनांक 30.07.2012 रोजी त्यांनी तक्रार दाखल केली. दिनांक 16.08.2012 रोजी गैरअर्जदार यांच्या कनिष्ठ अभियंता यांनी पाहणी करुन योग्य बिल देण्याची सूचना केली. गैरअर्जदार यांनी त्याची दखल न घेता सुधारीत वीज बिल न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. वाढीव वीज बिल रद्द करण्याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत वाढीव वीज बिलापोटी वीज पुरवठा खंडीत न करण्याबाबत अंतरिम आदेश पारित करण्याची विनंती केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिलाच्या प्रती, कनिष्ठ अभियंता यांचा अहवाल, गैरअर्जदार यांना केलेली तक्रार इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
वीज पुरवठा खंडीत करु नये याबाबत केलेल्या अर्जावर दिनांक 24.11.2013 रोजी सुनावणी घेण्यात आली व गैरअर्जदार यांनी पुढील आदेशापर्यंत अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचा अंतरिम आदेश पारित करण्यात आला.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार मे 2012 व जून 2012 या दोन महिन्याचे सरासरीवर आधारीत वीज बिल देण्यात आले होते. जुलै 2012 मध्ये अर्जदारास मागील रिडींग 8491 व चालू रिडींग 11047 नुसार 2556 युनिट वीज वापराचे बिल आकरण्यात आले असून त्यातून मे 2012 व जून 2012 या दोन महिन्याचे बिल कमी करण्यात आले आहे. अर्जदारास देण्यात आलेले बिल योग्य असल्याचे सांगून अर्जदाराची तक्रार खारीज करण्याची विनंती मंचास केली आहे.
गैरअर्जदार यांनी जवाबासोबत जानेवारी 2011 ते फेब्रूवारी 2013 या कालावधीचे सी.पी.एल. जोडले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. त्यांचा ग्राहक क्रमांक 510030122036 असा आहे. गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की, अर्जदाराने जानेवारी 2011 ते जून 2012 या काळात वीज बिलाचा नियमितपणे भरणा केलेला आहे. या काळात अर्जदाराकडे लावण्यात आलेल्या वीज मीटरचा क्रमांक 12930889 असा असल्याचे दिसून येते. मे 2012 व जून 2012 या दोन महिन्यात गैरअर्जदार यांनी अर्जदारास मीटर रिडींग न घेता सरासरीवर अधारीत 233 युनिट या प्रमाणे वीज बिल आकारणी केली असल्याचे दिसून येते. जुलै 2012 मध्ये मागील रिडींग 8491 व चालू रिडींग 11047 दर्शवून गैरअर्जदार यांनी अर्जदारास 2556 युनिट असे तीन महिन्याचे वीज बिल आकारले व या वीज बिलाबाबतच अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराने या वाढीव बिलाबाबत दिनांक 30.07.2012 रोजी उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असल्याचे पोहोच पावतीवरुन स्पष्ट होते. अर्जदाराने या तक्रारीत मीटर तपासणी करण्याची विनंती केली असल्याचे दिसून येते. कनिष्ठ अभियंता, शहर युनिट नंबर 4 यांनी दिनांक 16.08.2012 रोजी अर्जदाराच्या मीटरची स्थळ पाहणी केली व अर्जदाराचा वीज भार 1215 वॅट असल्याचे व त्यानुसार सुधारीत वीज बिल देण्याचे अहवालात नमूद केलेले दिसून येते. या अहवालात अर्जदाराचा मीटर क्रमांक 133868 असा नमूद केला आहे. यावरुन जुलै - ऑगस्ट 2012 या दरम्यान अर्जदाराचे जुने मीटर (क्रमांक 12930889) बदलून त्या जागी 0133868 या क्रमांकाचे मीटर लावण्यात आल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी जुन्या मीटरचा चाचणी अहवाल किंवा मीटर बदली अहवाल मंचात दाखल केलेला नाही. त्यामुळे जुन्या मीटर वरील अंतिम रिडींग किती होती याचा खुलासा होत नाही. अशा परिस्थितीत अर्जदारास सरासरी वीज वापराच्या आधारे वीज बिल आकरणी करणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
अर्जदाराच्या सी.पी.एल. चे अवलोकन केल्यावर जानेवारी 2011 ते एप्रिल 2012 या 16 महिन्याच्या कालावधीत अर्जदाराचा सरासरी वीज वापर 320 (5106 – 16) = असल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे मीटर बदली केल्यानंतर पुढील तीन महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2012 या कालावधीत अर्जदाराचा सरासरी वीज वापर हा 737 – 3 = 245 प्रतिमाह आहे. यावरुन मे 2012 ते जुलै 2012 या तीन महिन्याचे वीज बिल मीटर बदलण्याच्या आगोदरचा सरासरीवर म्हणजेच 320 युनिट प्रतिमाह प्रमाणे आकरणी करणे योग्य ठरेल.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेले मे 2012 ते जुलै 2012 या तीन महिन्याचे बिल रद्द करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास वरील तीन महिन्याच्या कालावधीसाठी 320 युनिट प्रतिमाह या प्रमाणे वीज बिल आकरणी करावी .
- वरील प्रमाणे वीज बिल आकरणी करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास 30 दिवसात सुधारीत वीज बिल द्यावे त्यामध्ये कोणतेही व्याज व दंड आकरु नये.
- खर्चाबाबत आदेश नाही.