(घोषित दि. 07.08.2013 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 510030254226 असा आहे. तक्रारदाराचे मीटर हे घरगुती वापरासाठी आहे. तक्रारदारांनी सदरची तक्रार ही त्यांचे मुखत्यार श्री.अनंत दादाराव कतारे यांचे मार्फत दाखल केली आहे व तशा अर्थाचे मुखत्यार पत्र तक्रारीसोबत दाखल केलेले आहे.
तक्रारदारांना दिनांक 26.11.2012 रोजी रुपये 3,40,649/- (अक्षरी तिन लाख चाळीस हजार सहाशे एकोणपन्नास फक्त.) इतका भरणा करण्याबाबतचे बिल गैरअर्जदार यांचेकडून मिळाले. तक्रारदारांच्या मागील वीज वापराचे अवलोकन करता सदर 26722 युनिटचे बिल अवाजवी आहे. दिनांक 01.12.2012 रोजी तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडे चौकशी केली परंतू गैरअर्जदारांच्या अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व अपमानास्पद वागणूक दिली. म्हणून तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत ते वरील बिल कमी करण्यात यावे तसेच गैरअर्जदाराने त्यांना सेवेत केलेल्या त्रुटीची नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- द्यावेत अशी मागणी करत आहेत. आपल्या तक्रारी सोबत त्यांनी विद्युत देयके, पैसे भरल्याच्या पावत्या व मुखत्यारपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदारांनी त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे तो पूर्ववत करण्यात यावा असा अंतरिम अर्ज देखील केला आहे त्यावर दिनांक 02.03.2013 रोजी अंतरिम आदेश होवून या मंचाने सदरचा अर्ज मंजूर केलेला आहे.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या लेखी जबाबानुसार तक्रारदारांनी कधीही विद्युत देयके वेळेवर भरलेली नाहीत. अर्जदारांनी दिनांक 11.01.2013 रोजी मागणी करुनही रुपये 2,91,250/- भरले नाहीत म्हणून त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तक्रारदारांच्या मीटरची दिनांक 23.04.2012 रोजी तपासणी केली असता ‘Weak display-not visible’ आढळून आला त्यानंतर रितसर पंचनामा करुन ग्राहक प्रतिनिधी समक्ष मीटर ताब्यात घेण्यात आले व मीटर रिप्लेसमेंट अहवाल तयार केला त्यावर ग्राहक प्रतिनिधी व संबंधित अधिका- यांच्या सहया आहेत. मीटर व्यवस्थित फिरते होते व त्यावरील रिडींग 26965 इतके होते. सर्व कागदपत्रांच्या प्रती ग्राहक प्रतिनिधींना देण्यात आल्या होत्या. तक्रारदारांनी वापरलेल्या व न भरलेल्या वीज युनिटचेच देयक तक्रारदारांना देण्यात आले आहे. गैरअर्जदाराची सेवेतील कमतरता नाही सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदारांनी आपल्या जबाबासोबत स्थळ तपासणी अहवाल, जप्ती पंचनामा, मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट, मीटर चाचणी पंचनामा, तक्रारदाराच्या बिला संबंधीचा नोंद अहवाल मीटर क्रमांक 510030254226 चे सी.पी.एल इत्यादी कागदपत्रे दाखल केली.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एस.बी.मोरे व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
- तक्रारदार हा गैरअर्जदार वीज वितरण कंपनीचा ग्राहक असून त्यांचा मीटर क्रमांक 510030254226 असा आहे.
- दिनांक 26.11.2012 रोजी तक्रारदारांना 3,40,649/- रुपयांचे बिल आले व ते भरण्याबाबत गैरअर्जदारांचे पत्र आले. तक्रारदारांच्या मीटरचे सी.पी.एल बघता त्यांनी जून 2001 पासून कधीही नियमितपणे वीज बिले भरलेली नाहीत.
- गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार दिनांक 23.04.2012 रोजी भरारी पथकाने तक्रारदार यांच्या मीटरची तपासणी केली. त्यात “display weak not visible” असा मीटर संबंधात शेरा आहे. मीटर ताब्यात घेतले म्हणून जप्ती पंचनामा केला आहे. त्यावर गैरअर्जदार यांचे अधिकारी तसेच जप्ती देणारा म्हणून तक्रारदारांच्या प्रतिनिधी अनंत कतारे यांची सही आहे. मीटर रिप्लेसमेंट रिपोर्ट मध्ये जुन्या मीटरचे रिडींग 26965 युनिट इतके दाखवलेले आहे. त्यावर देखील तक्रारदारांच्या प्रतिनिधीची सही आहे. जुन्या मीटरच्या टेस्टींग रिपोर्टमध्ये मीटर ok दिसते आहे. गैरअर्जदारांनी मीटर चाचणी संयुक्त पंचनामा देखील दाखल केला आहे. वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे मीटर योग्य पध्दतीने चालत होते असे स्पष्ट होते. केवळ display weak आहे म्हणून 26965 युनिटचे रिडींग चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. कारण जुने मीटर उपरोक्त रिडींग दाखवत आहे असे पंचनाम्यात व इतर कागदपत्रात स्पष्ट केले आहे त्यावर ग्राहक प्रतिनिधी, पंच यांच्या सहया आहेत.
- तक्रारदारांचे वादग्रस्त मीटर नोव्हेंबर 2009 ला बसवलेले आहे ते नंतर पुन्हा मे 2012 ला बदलण्यात आले. दरम्यानच्या काळात वरील मीटरवरुन तक्रारदार वीज पुरवठा करत होते. परंतू मीटरचा display weak असल्यामुळे त्यांना मीटरच्या रिडींग प्रमाणे बिल दिली गेली नाहीत. एप्रिल 2012 ला भरारी पथकाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मे 2012 ला मीटर पुन्हा बदलण्यात आले. त्यावेळी पंचनाम्यात म्हटल्या प्रमाणे वादग्रस्त मीटरचे रिडींग 26965 इतके होते. गैरअर्जदारांनी तक्रारदारांना वरील वीज वापराचे बिल व्याज व दंडाची रक्कम वजा करुन नोव्हेंबर 2012 ला 2,86,000/- revisid bill पाठवले आहे. तसेच दिनांक 11.01.2013 रोजी रुपये 2,91,250/- चे एनर्जी बिल पाठवले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन गैरअर्जदारांनी तक्रारदारांना दिलेले उपरोक्त बिल तक्रारदारांनी वापर केलेल्या वीजेबाबतचे आहे. ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदारांना वरील रक्कम तक्रारदारांकडून वसूल करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणे योग्य ठरेल असा निष्कर्ष मंच काढीत आहे. त्याच प्रमाणे सदरच्या वादग्रस्त बिलापोटी जी रक्कम तक्रारदाराने अगोदरच गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली आहे ती या बिलातून वजा करणे आवश्यक आहे.
गैरअर्जदारांनी वेळोवेळी तक्रारदारांना मीटरच्या रिडींग प्रमाणे बिले दिली नाहीत त्यामुळे तक्रारदारांकडे 2,86,000/- इतकी बाकी रक्कम राहीली आहे. तक्रारदारांनी एवढी संपूर्ण रक्कम एकदम भरणे शक्य होणार नाही. म्हणून तक्रारदारांना सदरची रक्कम चार टप्यात भरण्याची मुभा गैरअर्जदारांनी द्यावी असे मंचाला वाटते.
सबब मंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वादग्रस्त वीज बिलाच्या रक्कमेतून (रुपये 2,91,250/- अक्षरी रुपये दोन लाख एक्यान्नव हजार दोनशे पन्नास फक्त) त्यांनी त्यापोटी आता पर्यंत भरलेली रक्कम वजा करुन उर्वरित रक्कम चार समान हप्त्यात गैरअर्जदार यांचेकडे भरावी.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी जानेवारी 2013 नंतरची तक्रारदारांची बिले मीटर वरील रिडींग नुसार कोणताही व्याज अथवा दंड न लावता आकारावीत.
- खर्चाबाबत आदेश नाही.