ग्राहक तक्रार क्र. : 171/2014
दाखल तारीख : 12/08/2014.
निकाल तारीख : 24/08/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 13 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. सुशेन साहेबराव गंभीरे,
वय - 40 वर्षे, धंदा – शेती,
रा.इटकूर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
म. रा. वि. वि. कंपनी, उस्मानाबाद.
2. सहाय्यक कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी, सब स्टेशन ईटकूर,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.के.जी.बावळे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
विरुध्द पक्षकार विज कंपनीने घरगुती वापरासाठी विज कनेक्शन दिले असता अवास्तव बिल देऊन सेवेत त्रुटी केली. म्हणून वाढीव विज बिल कमी होऊन मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
1. तक हा मौजे इटकूर ता.कळंब येथील शेतकरी आहे. विप यांचेकडून घरी वापरण्यासाठी विज कनेक्शन घेतले. त्यांचा गाहक क्र.606240578188 असा आहे. तक ने नियमितपणे बिले भरलेली आहेत. मात्र विप यांनी एप्रिल 2014 मध्ये रु.46,610/- एवढे बिल दिले ते अवास्तव आहे. तक ने एवढया विजेचा वापर केलेला नाही. तक ने विप क्र.2 कडे त्याबद्दल सांगिेतले असता काहीही ऐकून घेतले नाही. उलट कनेक्शन तोडले जाईल अशी धमकी दिली. तक दि.18.05.2014 रोजी विप क्र.2 च्या कार्यालयात लेखी तक्रार घेऊन गेला पण तक्रार घेतली नाही. त्यामुळे विप यांनी अवास्तव बिल दुरुस्त करुन द्यावे व तक ला मानसिक त्रासापोटी रु.10,000/- द्यावेत म्हणून ही तक्रार दि.12.08.2014 रोजी दाखल केली आहे.
2. तक ने तक्रारीसेाबत दि.09.05.2014 चे बिल हजर केलेले आहे.
3. विप हे अॅड.व्ही.बी. देशमुख यांचे मार्फत हजर झाले. मात्र लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्याबद्दलचा आदेश दि.22.01.2015 रोजी पारीत झाला. मात्र विप यांनी दि.02.07.2015 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केला व तक च्या तक्रारी अमान्य केल्या. विप यांनी कंझूमर पर्सनल लेजर चा उतारा पण हजर केला आहे.
4. तक ची तक्रार त्यांनी दिलेले कागदपत्र विप चे म्हणणे त्यांचे कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणांसाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? अंशतः होय.
2. तक आनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
5. तक ने एप्रिल 2014 या महिन्यासाठीचे दि.09.05.2014 चे बिल हजर केले आहे. मागील रिडींग 7114 चालू 7150 वापर 36 युनिट व बिल रु.338.76 पैसे दाखवलेले आहे. थकबाकी रु.45,933/- दाखवलेली आहे. मागील 11 महिन्याचे विज वापर युनिट मध्ये पुढील प्रमाणे दसाखवला आहे. 47, 6340, 30, 22, 17, 30, 30, 30, 40, 42, 30. म्हणजेच वादातील बिल हे फेब्रूवारी 2014 चे असून त्या महिन्यात विज वापर 6340 दाखवला होता. तक चे म्हणण्याप्रमाणे त्यांने एवढा विज वापर केलेला नाही.
6. विप च्या म्हणण्याप्रमाणे तक ला वापरलेल्या युनिटपेक्षा कमी युनिटची बिले देण्यात आली होती. प्रत्यक्ष मिटरची पाहणी जेव्हा केली तेव्हा ही गोष्ट उघडकीला आली. त्यानंतर बिलाची विभागणी करुन रु.39,156/- मार्च 2014 च्या बिलातून कमी करुन दिलेले आहे. दि.19.03.2013 पासून तक ने कोणतेही बिल भरलेले नाही.
7. विप यांनी कझूंमर पर्सनल लेजर चा उतारा हजर केलेला आहे. जानेवारी 2012 पासून एप्रिल 2012 पर्यत कोणताही विज वापर नोंदवलेला नाही. त्यानंतर अल्प प्रमाणातला विज वापर नोंदवलेला दिसतो. जानेवारी 2014 मध्ये मागील रिंडीग 697 तर चालू रिंडीग 627 दाखवलेली आहे. फेबूवारी 2014 मध्ये मागील रिंडीग 627 तर चालू रिंडीग 7067 दाखवलेली आहे. त्यामुळे बिल रु.84,331/- झाले. पुढच्या महिन्यात रु.39,156/- कमी करुन बिल रु.45,884/- दाखवले. त्यानंतर थकबाकी वाढत गेलेली आहे असे दिसते.
8. विप च्या म्हणण्याप्रमाणे फेब्रूवारी 2014 पर्यत तक ने वापरापेक्षा कमी युनिटची बिले भरली. हे उघड आहे की, विप च्या कर्मचा-यानी कमी वापराच्या नोंदी केल्या. यामध्ये विप च्या कर्मचा-याचा हलगर्जीपणा किंवा विप चे कर्मचारी व ग्राहक यांची मिलीभगत अशी कारणे दिसून येतात. मात्र कधी ना कधी पितळ उघडे पडते. प्रत्यक्ष मिटरचे अवलोकन केल्यानंतर किती विज वापरली यांचा बोध होतो. मिटरमध्ये बिघाड होऊन अचानक जास्तीचा वापर नोंदवला गेला अशी तक ची तक्रार नाही. झालेली वाढ एका महिन्यात झालेली नाही. महिनो महिने कमी वापराची बिले तक ला मिळत गेली व तो ती भरत आला.
9. प्रत्यक्ष विज वापर नोंदल्यानंतर त्याप्रमाणे बिल भरणे हे ग्राहकाचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे आपले कर्मचारी प्रत्यक्ष विज वापर नेांदवतात हे पाहणे विज मंडळाचे अधिकारी म्हणजेच विप यांचे कर्तव्य आहे. त्या कर्तव्यात कसूर करुन विप यांनी अंशतः सेवेत त्रूटी केलेली आहे. त्यामुळे थकबाकी पैकी रु.5,000/- विप ला मागण्याचा अधिकार नाही व फक्त रु.40,933/- मागण्याचा अधिकार आहे. असे आमचे मत आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर अंशत होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप यांना फेब्रूवारी 2014 च्या थकबाकी पैकी फक्त रु.40,933/- (रुपये चाळीस हजार नऊशे तेहतीस फक्त) वसूल करणे अधिक विलंब आकार व व्याज वसूल करण्याचा अधिकार आहे. रु.5,000/- मागण्याचा अधिकार नाही. विप यांनी तक याला त्याप्रमाणे विज बिल द्यावे,
3. खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.