Exh.No.15
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.17/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि. 16/07/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि.01/08/2013
शंतनु डेव्हलपर्स तर्फे पार्टनर
श्री संजय गुरुनाथ पिंगुळकर
वय 48 वर्षे, धंदा- बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर,
राहणार- मु.पो.कुडाळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उप विभाग
कुडाळ, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
2) सहाय्यक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कुडाळ युनिट,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
3) कनिष्ट अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कुडाळ युनिट,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारतर्फेः- विधिज्ञ श्री सुहास सावंत
विरुद्ध पक्षातर्फे- विधिज्ञ श्री राजीव बिले
निकालपत्र
(दि. 01/08/2013)
सौ. वफा जमशीद खान, सदस्या - तक्रारदार यांनी सर्व अटींची पुर्तता करुन देखील विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांच्या “शुभलक्ष्मी विहार” या इमारतीला विद्यूत पुरवठा केला नाही म्हणून विद्युत पुरवठा जोडून मिळावा म्हणून तक्रार अर्ज दाखल करणेत आला आहे. विरुध्द पक्ष हे महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी आहेत.
2) तक्रारदार यांनी कुडाळ शहरात भैरववाडी येथे “शुभलक्ष्मी विहार” या नावाने गृहनिर्माण प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्या महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीकडे विद्यूत जोडणीकरिता मागणी अर्ज सादर केला. तसेच विद्यूत जोडणीकरिता आवश्यक सर्व बाबींची पूर्तता केली आणि विरुध्द पक्ष यांचे कंपनीत रिसिट क्र.136730 ता.13/12/2012 प्रमाणे रक्कम रु.5390/- भरणा केले. अशाप्रकारे तक्रारदार यांस विरुध्द पक्ष यांनी विद्यूत जोडणी देण्याचे मान्य करुन विद्यूत जोडणीकरिता रक्कम स्वीकारली. असे असता विरुध्द पक्ष यांनी आजतागायत तक्रारदार यांचे इमारतीला विद्युत पुरवठा दिलेला नाही. तक्रारदार यांनी याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचेकडे माहे मे-2013 मध्ये वारंवार विचारणा केली; परंतु विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी विद्युत जोडणी करुन दिली नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्यांच्या “शुभलक्ष्मी विहार” या संकुलाला विद्युत पुरवठा द्यावा, मानसिक त्रास झाल्याबद्दल रु.50,000/-, अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावेत अशी तक्रार अर्जामध्ये मागणी केली आहे.
3) तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत शपथपत्र, नि.5 वर त्वरीत विद्युत जोडणी करुन मिळणेसाठी अंतरीम अर्ज तसेच नि.4 चे कागदांचे यादीसोबत विद्युत कंपनीशी झालेला पत्रव्यवहार, पावती आणि इमारतीसंबंधाने इतर कागदपत्रे पुराव्याकामी दाखल केली आहेत.
4) तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन घेणेस पात्र असल्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याने तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांस नोटीसा पाठविण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 त्यांचे वकील प्रतिनिधी मार्फत हजर होऊन त्यांनी तक्रारदार यांच्या अर्जातील काही बाबी नाकारल्या असून तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ‘ग्राहक’ आहे ही बाब मान्य केली आहे. तसेच तक्रार अर्जातील परिच्छेद क्र.2 ब मधील मजकूर मान्य असल्याचे त्यांचे लेखी म्हणणे नि.क्र.10 मध्ये नमूद केले आहे. तसेच विरुध्द पक्षांचे पुढे असेही म्हणणे आहे की, गाव कुडाळ शहरातील अभय गणपत राऊळ नावाच्या एका इसमाने तक्रारदार यांचेविरुध्द विरुध्द पक्ष यांचेजवळ तक्रार करुन विद्युत प्रवाह देणेस हरकत नोंदवली होती. त्या हरकतीचा आधार घेऊन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार याला विद्यूत प्रवाह दिलेला नव्हता. विरुध्द पक्ष यांने तक्रारदाराला विद्युत प्रवाह न देणेमागे तक्रारदाराला त्रास व्हावा असा हेतू विरुध्द पक्ष यांचा केव्हाही नव्हता; उलट तक्रारदारला विद्युत प्रवाह न दिलेमुळे विरुध्द पक्षाचेच नुकसान होणार आहे. विरुध्द पक्षाने अशा प्रकारे लेखी म्हणणे देवून तक्रारदारची तक्रार रद्द ठरविण्याची विनंती केली; तसेच सोबत अभय राऊळ यांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या झेरॉक्स प्रती जोडल्या.
5) विरुध्द पक्ष यांनी लेखी म्हणणे दिले त्याच दिवशी तक्रारदार यांनी रिजॉईंडर शपथपत्रासह दाखल करुन विरुध्द पक्षाने लेखी म्हणण्यात दिलेल्या बाबी अमान्य केल्या. तसेच अभय राऊळ ही व्यक्ती विघ्नसंतोषी असून त्याचा सदर इमारती अगर त्याखालील जमीनीशी काहीही संबंध नाही; तसेच अभय राऊळ या व्यक्तीने तक्रारदारने मागणी केलेल्या विद्युत जोडणीसंबंधाने कोणत्याही कोर्टाचा स्थगिती आदेश दाखल केला नसल्याने विरुध्द पक्ष कंपनीने विद्युत जोडणी न करण्यासंबंधाने दिलेल्या कोणत्याही बाबी मान्य करता येणार नाहीत, असे म्हटले आहे. तक्रारदारने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार हा विरुध्द पक्ष यांचा ‘ग्राहक’ असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारला विद्युत जोडणी करुन देणे बंधनकारक आहे; वैकल्पिकरित्या तक्रारदार यांचे असेही म्हणणे आहे की, जर विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस विद्युत पुरवठा दिल्यास तक्रारदार हा मानसिक त्रासापोटी मागणी केलेल्या रक्कमेची दाद सोडून देण्यास तयार आहे.
6) उभय पक्षाचे वकीलांनी तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदाराची तक्रार, रिजॉईंडर, दाखल कागदपत्रे, विरुध्द पक्षाचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभय पक्षाचा तोंडी युक्तिवाद विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार यांस देण्यात येणा-या ग्राहक सेवेमध्ये विरुध्द पक्षाने त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
7) मुद्दा क्रमांक 1- तक्रारदार यांने बांधलेल्या ‘शुभलक्ष्मी विहार’ या इमारतीला विरुध्द पक्ष कंपनीकडून विद्यूत जोडणी मिळणेसाठी सर्व अटींची पूर्तता केली असल्याचे विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मान्य केले आहे; परंतु विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, कुडाळ शहरातील अभय गणपत राऊळ नावाच्या इसमाने तक्रारदार यांचेविरुध्द विरुध्द पक्ष यांचेजवळ तक्रार करत विद्युत प्रवाह देणेस हरकत नोंदवली होती. त्या हरकतीचा आधार घेऊन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार याला विद्युत प्रवाह दिलेला नव्हता. विरुध्द पक्षातर्फे पुराव्याकामी जी कागदपत्रे दाखल करणेत आली आहेत त्यामध्ये अभय गणपत राऊळ यांनी दि.17/12/2012 रोजीचा विरुध्द पक्ष यांना दिलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत आहे आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडे दि.22/10/2012 रोजी दिलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत आहे. परंतु तक्रारदार यांस देण्यात येणा-या विद्युत जोडणीसंबंधाने कोणत्याही सक्षम न्यायालयाचा किंवा प्राधिकरणाचा स्थगिती आदेश दिसून येत नाही. त्यामुळे निव्वळ एखादया व्यक्तीने तक्रार दिली म्हणजे त्याकारणे विद्यूत प्रवाह न देणे हे विरुध्द पक्षाचे म्हणणे कायदेशीररित्या संयुक्तिक नाही. त्यामुळे तक्रारदारने सर्व अटींची पुर्तता करुन देखील कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय विरुध्द पक्षाने विद्यूत जोडणी करुन न देणे ही बाब ‘ग्राहक सेवेतील त्रुटी’ असल्याचे स्पष्ट होते असे मंचाचे मत आहे; म्हणून आम्ही सदरच्या मुद्दयाचे उत्तर होकारार्थी देत आहोत.
8) मुद्दा क्रमांक 2- वर नमूद विस्तृत विवेचनावरुन तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहेत ही बाब विरुध्द पक्षास मान्य आहे. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षास आवश्यक असणा-या सर्व अटींची पूर्ती केलेली आहे त्यामुळे विरुध्द पक्षातर्फे विद्युत पुरवठा जोडणी करुन देणे ही अत्यावश्यक बाब आहे; परंतु विरुध्द पक्षाने तसे न केल्यामुळे तक्रारदार यांस मानसिक त्रास झाल्यामुळे त्यांने या मंचामध्ये तक्रार दाखल केली आहे. सर्व अटींची पूर्तता करुन देखील विद्युत जोडणी करुन न दिल्यामुळे मानसिक त्रास होणे ही खरी बाब आहे; परंतु तक्रारदार यांनी नि.क्र.13 मध्ये दिलेल्या रिजॉईंडमध्ये जर विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस विद्युत पुरवठा दिल्यास तक्रारदार मानसिक त्रासापोटी मागणी केलेल्या रक्कमेची दाद सोडून देण्यास तयार आहे असे म्हटले आहे. तोंडी युक्तिवादादरम्यान देखील तक्रारदारने मानसिक त्रासाच्या रक्कमेची मागणी सोडत असल्याची बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी 15 दिवसांत विद्युत पुरवठा जोडणी करुन देणे गरजेचे आहे असे मंचाचे मत आहे. तसेच सदर मुदतीत तक्रारदारास विद्युत पुरवठा केला नाही तर तक्रारदार विरुध्द पक्षाकडून दररोज रु.1,000/- मिळण्यास पात्र राहील. याशिवाय तक्रारदार तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत.
9) सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांच्या ‘शुभलक्ष्मी विहार’ या संकुलाला या आदेशाचे प्राप्तीपासून 15 दिवसांचे आत विद्युत पुरवठा जोडणी करुन द्यावी.
3) वरील आदेश क्र.2 मधील मुदतीत तक्रारदार यांना वीज पुरवठा न केल्यास विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दररोज रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) दयावेत.
4) विरुध्द पक्ष यांनी तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- (रुपये एक हजार मात्र) या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसांच्या आत तक्रारदार यांस दयावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 01/08/2013
सही/- सही/-
(वफा खान) (डी. डी. मडके)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.