जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –56/2011 तक्रार दाखल तारीख –05/04/2011
दिनकर पि.बळवंतराव कदम
वय सज्ञान धंदा शेती .तक्रारदार
रा.हु.मु.पो.सावरकर नगर,नवगण कॉलेज रोड,
बीड,ता.जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी
मार्फत कार्यकारी अभिंयता,
जालना रोड,बीड, ता.जि.बीड ..सामनेवाला
2. मा.उप अभिंयता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
माळीवेस, बीड ता.जि. बीड
3. मा.सहायक अभिंयता
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी
बार्शी रोड, बीड ता.जि. बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.बी.व्ही.खोसे
सामनेवाले तर्फे :- अँड.डी.बी.बागल.
निकालपत्र
( श्री.अजय भोसरेकर, सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा लातूर येथील रहिवासी असून तक्रारदाराच्या वडिलाने शेतीस पाणी पुरवठा करण्यासाठी एक विदयूत कनेक्शन सर्व कागदपत्राची पुर्तता करुन प्राप्त केलेले आहे. त्यांचा ग्राहक क्र.A.G. 3713 असा आहे. तक्रारदार हा स्वतःच्या व कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेती हा व्यवसाय करतो. तक्रारदारास गट नंबर 87 व 102/अ यामध्ये स्वतःच्या मालकीची शेत जमिन आहे. तक्रारदाराने दि.8.2.2011 रोजी सामनेवाला यांनी जमिनीतून टाकलेल्या विज वाहीनीमध्ये बिघाड झाल्यामुळे तक्रारदाराच्या शेतातील ऊसावरुन गेलेल्या विदयूत तारामध्ये स्पॉर्कीग होऊन त्यांच्या थिणग्या तक्रारदाराच्या ऊसावर पडल्या. त्यामुळे तक्रारदाराचा पाच एकर ऊस गाळपास जाण्यासाठी, 12 महिने पूर्ण झालेला असा परिपक्व ऊस जळाला. सोबत 15 नारळाची झाडे ज्यांचे वय वर्ष 10 ही जळाली म्हणून तक्रारदाराने सदर तक्रार या जिल्हा मंचात दाखल केली.
तक्रारदाराने आग विझवण्यासाठी नगर परिषद बीड यांचे अग्निशामन दलाच्या आणीबाणी विभागाच्या सेवेस कळवून अग्निशामन टँकरच्या मदतीने सदर आग आटोक्यात आणली असे म्हटले आहे. तक्रारदाराने दि.8.2.2011 रोजी सामनेवाला यांना व विद्यूत निरिक्षक, तलाठी, तहसीलदार व पोलिस यांना लेखी कळवून सदर घटने बाबत अवगत केले. त्यानुसार तक्रारदाराने पोलिस पंचनामा, मंडळ अधिकारी व तलाठी यांचा पंचनामा केला व विद्यूत निरिक्षक यांचा अहवाल दाखल केला.
तक्रारदाराने स्वतःचे ऊसाचे व नारळाचे आर्थिक नुकसान रु.4,50,000/- इतर खर्च रु.30,000/-, मानसिक त्रासापोटी नूकसान रु.10,000/- व आरपीऐडीने नोटीस वकिलामार्फत त्यांचा खर्च रु.1,000/- असे एकूण रु.4,91,000/-ची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 19 कागदपत्रे दाखल केलेली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणे दि.15.7.2011 रोजी दाखल केलेले असून तक्रारदार हा त्यांचा ग्राहक आहे हे त्यांना मान्य आहे. तक्रारदाराकडे गट नंबर 87 व 102/अ यामध्ये ऊसाच नव्हता असे म्हटले आहे. परंतु सदर घटना ही कपोकल्पीत स्वरुपाची असल्याबददल व खोटी तक्रार दाखल केली असल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास देऊ करावयाच्या सेवेत कोणताही कसूर केला नाही असे म्हटले आहे त्यामुळे सामनेवाला यांचे विरुध्दची तक्रारदाराचा अर्ज खर्चासह खारीज करावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले म्हणणेचे पूष्टयर्थ एकूण दोन कागदपत्रे दाखल केली आहेत.
त्यात त्यांनी कनिष्ठ अभिंयता श्री.चेचर यांचे माहीती अधिका-याचे मत असणारे एक पत्र दाखल केले आहे. त्या पत्रानुसार खांबावरुन तूटून पडलेली तार ही न्यूट्रल फेजची होती त्यावेळेस त्यात विदयूत प्रवाह बंद होता अशा परिस्थितीत स्पॉर्कीग होत नाही त्यामुळे आम्ही निष्काळजीपणा केला नाही असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा जळीत ऊस हा गजानन सहकारी साखर कारखाना मर्यादित राजूरी ता.जि.बीड येथे गेल्याचे पत्र दाखल केले आहे. त्यानुसार तक्रारदारास दोन हेक्टरमध्ये जळीत ऊसाचे 101.971 टन वजनाचे रु.1,19,816/- एवढी रक्कम मिळाल्याचे पत्र सामनेवाला यांनी दाखल केले आहे.
तक्रारदाराने विद्यूत निरिक्षक यांचा अहवाल दि.2.8.2011 रोजी दाखल केला असून त्यात त्यांनी तक्रारदाराच्या गट नंबर 87 व 102/अ यामधील ऊस सामनेवाला यांच्या एलटी तारांच्या एकमेकांच्या स्पर्शामुळे थिणग्या पडून जळाला असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे. भारतीय विज नियमावली 1956 चे नियम 29 व 50 यानुसार सामनेवाला हे तक्रारदाराच्या नूकसानीस जबाबदार आहेत असे म्हटले आहे. विद्यूत निरिक्षक हे राज्य शासनाचे सामनेवाले यांचेवर नियंत्रण ठेवणारा विशेष विभाग आहे.
तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले आपले लेखी म्हणणे व त्यांस आवश्यक असणारे योग्य पुरावे व दोघाचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता.
सामनेवाला यांनी तक्रारदारास त्यांच्या जळीत ऊसाची रक्कम न देऊन सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्द होते.
तक्रारदाराने स्वतःचा जळीत ऊस गजानन सहकारी साखर कारखाना मर्यादित राजूरी ता.बीड यांचेकडे गेलेला असताना ही बाब झाकून ठेऊन तक्रारदाराने पूर्ण जळीत ऊसाच्या रक्कमेची मागणी केली परंतु तक्रारदाराने गत वर्षीच्या ऊसाचे उत्पन्नाचा पुरावा व सदर कारखान्याने देऊ केलेल्या दराचा पुरावा या जिल्हा मंचात दाखल केला नाही. म्हणून तक्रारदार आपले एकूण नूकसान किती झाले हे योग्य प्रकारे सिध्द करु शकलेले नाहीत. परंतु एकंदर सर्व पंचनाम्यावरुन तक्रारदाराचे ऊस जळीतापासून नूकसान झाले हे स्पष्ट होते. म्हणून तक्रार हा त्यांचे जळीत ऊसाचे गजानन सहकारी साखर कारखान्याने दिलेल्या पत्राच्या रक्कमेप्रमाणे व पनन मंडळाचे 2010-11 या वर्षाचे सरासरी 40 टन उत्पन्न ऊसाचे निघते असे अहवालात आहे. त्यानुसार तक्रारदाराचे पाच एकरचे 200 टन उत्पन्न निघाले असते असे पाहता गजानन सहकारी साखर कारखाना लि. बीड यांनी तक्रारदारास 102 टनाचे बील देऊ केले आहे. म्हणजेच 50 टक्केच उत्पन्नाचे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार हा रु.1,20,000/- एवढया जळीत ऊसापोटी मिळण्यास पात्र आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामेनवाला यांना आदेश देण्यात येतो की,तक्रारदारास रक्कम रु.1,20,000/- (अक्षरी रु.एक लाख विस हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
3. सामेनवाला यांना आदेश देण्यात येतो की,आदेश क्र.2 चे पालन मूदतीत न केल्यास दि.12.05.2011 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज तक्रारदाराच्या पदरीपडेपर्यत देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामेनवाला यांना आदेश देण्यात येतो की, मानसिक त्रासापोटी रु.3,000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्त) व खर्चापोटी रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड