ग्राहक तक्रार क्र. : 166/2014
दाखल तारीख : 06/08/2014
निकाल तारीख : 25/08/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 20 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. संपत शंकर भोसले,
वय - 55 वर्ष, धंदा – शेती,
रा.नितळी, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ मर्या., उस्मानाबाद.
2. सहाययक अभियंता,
महाराष्ट्र विद्युत वितरण,
तेर, ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्ही.नन्नावरे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधिज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
विरुध्द पक्षकार (विप) विद्युत कंपनीने कनेक्शन देणेसाठी डिपॉझीट भरुन घेऊन कनेक्शन दिले नाही व सेवेत त्रुटी केली म्हणून त्वरीत कनेक्शन देण्याचा आदेश करावा व नुकसान भरपाई देण्याचा आदेश करावा म्हणून तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक चा मौजे नितळी ता.जि.उस्मानाबादचा शेतकरी असून त्यांला गट नंबर 103 मध्ये 42 गुंठे जमीन आहे. त्यांने सन 2009 मध्ये शेतात विहीर पाडलेली आहे व पाईपलाईन देखील केलेली आहे. तक ने विज कनेक्शन मिळवण्यासाठी विप कडे दि.21.4.2010 रोजी अर्ज केला व डिमांड रक्कम रु.4,000/- जमा केली. विप यांनी अद्यापपर्यत तक ला विद्यूत कनेक्शन दिलेले नाही. तथापि, ग्राहक नंबर 590680695182 या नंबरने तक ला बिल दिलेले आहे. तक ने त्याबाबत विपकडे विचारणा केली असता कनेक्शन ताबडतोब मिळून जाईल असे त्यांला सांगण्यात आले. विप यांचे कार्यालयात भेट देऊन विचारणा केली असता अधिका-याने सांगितले की, बिलाचा ताबडतोब भरणा करा म्हणजे कनेक्शन मिळून जाईल. तक ने रु.1,500/- असे बिले भरले. विप ने विद्यूत कनेक्शन दिले नाही. उलट सप्टेंबर 2013 मध्ये रु.9630/- चे बिल तक यांला दिले.
2. तक ने पुन्हा विद्यूत कनेक्शन देण्याबाबत विनंती केली. मात्र विप यांनी असे केले नाही. तक आपल्या जमिनीमध्ये पिकांना पाणी देऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे रु.50,000/- चे नुकसान झाले आहे त्यामुळे विप ने ताबडतोब कनेक्शन द्यावे व नुकसान भरपाई रु.50,000/- द्यावी म्हणून तक ने ही तक्रार दि.06.08.2014 रोजी दाखल केली आहे.
3. तक ने तक्रारीसेाबत डिमांड रक्कम रु.4,000/- भरल्याची दि.21.04.2010 ची पावती दि.18.10.2013 चे रु.9,530/- चे देयक, 7/12 चा उतारा, इत्यादी कागदपत्र हजर केली आहेत.
4. विप यांनी हजर होऊनही आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. मात्र लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. कनिष्ठ अभिंयता यांचा दि.06.06.2015 चा पंचनामा, तसेच सहायक अभिंयत्यांना दिलेला दि.12.02.2015 चा अहवाल इत्यादी कागदपत्रे पण दाखल केली आहे.
5. तक ची तक्रार त्यांनी दिलेले कागदपत्रे विप चे म्हणणे व विप ची कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
1. विप ने सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 ः-
6. विप चे म्हणणे आहे की, त्यांने तक ला विज पुरवठा दिलेला आहे. तो विद्युत पुरवठा दि.15.04.2011 रोजी सुरु केलेला आहे. जानेवारी 15 पर्यत तक कडे रु.15,600/- विज बिलाची थकबाकी आहे. विद्युत पुरवठा विहिरीपासून अंतरावर आहे. तक ला विहीरी जवळ पोल पाहिजे असल्यामुळे त्यांने ही तक्रार दिलेली आहे. तक जमिनीत ऊस गहू इत्यादी बागायती पिके घेत आहे. त्यामुळे तक्रार रदद होणेस पात्र आहे.
7. हे स्पष्ट आहे की, तक ने डिमांडची रक्कम दि.21.04.2010 रोजी भरली. आता विप चे म्हणणे आहे की, त्यांला दि.15.04.2011 रोजी विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला.तक चे म्हणण्याप्रमाणे विद्युत पुरवठा अद्यापही सुरु नाही. कनिष्ठ अभिंयत्यांचा दि.06.02.2015 चा पंचनामा असे दर्शवतो की, तक यांचे शेतातील विहीरीवर पाच एच पी चा पंप आहे.तक ने शेतात ऊस गहू व घास अशी पिके केलेली आहेत. लाईट असल्यामुळे तक चे आर्थिक नुकसान झालेले नाही. जो अहवाल उपकार्यकारी अभिंयता यांना दि.12.02.2015 रोजी पाठवला त्याप्रमाणे तक चा विज पुरवठा चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यांचे शेतात ऊस गहू व घास ही पिके आढळून आले.ग्राहकाला कनेकशन देण्यासाठी एक पोल लागतो. ग्राहकाचा एस एल डी पत्रासोबत दिला. यादीत नांव टाकून ग्राहाकाचे एक पोलचे काम करावे लागते.
8. कनिष्ठ अभिंयत्याच्या अहवालाप्रमाणे तक ला कनेक्शन देण्यासाठी एक पोल उभा करणे जरुर आहे. मात्र विपचे म्हणणे आहे की, तक ला दि.15.04.2011 पासून विद्युत पुरवठा सुरु झालेला आहे. सदरचा विद्यूत पुरवठा हा विहीरीपासून अंतरावरुन आहे. विद्युत पुरवठयासाठी पोल टाकावे लागतात. कारण विद्यूत तारांची जमिनीपासून किमान उंची राहीली पाहिजे. पोल न टाकता जुजबी प्रकाराने तारा ओढल्यास त्यामधून धोका होऊ शकतो. तसेच असा पुरवठा देणे व्यवहार्य नाही. असे दिसते की, आकार ह हॉर्स पॉवर पध्दतीने असल्यामुळे मिटर रिंडीग मिळण्याचा प्रश्न येत नाही. ब-याच वेळा विप चे कर्मचारी अवैधरित्या विद्यूत पुरवठा चालू करुन देतात.काही वेळा शेतकरी व ग्राहक तारेवर आकडे टाकून विद्यूत पुरवठा घेतात. अशा प्रकारे ग्राहक बिल देण्याचे टाळतो व विज कंपनीचे कर्मचारी बिल मागण्याचे टाळतात.
9. विप ने तक कडे बिलाची मागणी सुरु केली आहे. मात्र तक चे म्हणणे आहे की, त्यांला अद्याप विद्युत पुरवठा झालेला नाही. कनिष्ठ अभिंयत्याच्या पत्राप्रमाणे तक च्या कनेक्शनसाठी एक पोलची जरुरी आहे.यांचाच अर्थ जर विप ने विद्युत पुरवठा सुरु केला असेल तर तो चुकीच्या पध्दतीने सुरु केला आहे व त्यामध्ये धोका पण दिसून येतो. अशा प्रकारे विद्युत पुरवठा दिला असेल तर ती विप ची सेवेतील त्रुटी आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप ने दोन महिन्याचे आंत तक ला पोल टाकून वैधरित्या विद्यूत पुरवठा द्यावा.
3. तक ने नियमितपणे विद्यूत बिले भरणे चालू ठेवावे. विप ने तक ला नुकसान भरपाई पोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फकत) व या तकारीच्या खर्चापोटी रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराने परत न्यावेत.
5. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
6. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद..