::: आ दे श :::
( पारित दिनांक : 31/12/2014 )
आदरणीय अध्यक्षा, मा. सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता यांनी शेख युसुफ शेख इमाम नौरंगाबादी यांनी दिलेल्या अधिकारपत्रावरुन तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्यास त्यांचे शेतातील विदयुत पुरवठा जोडणीसाठी विरुध्द पक्ष यांचे कार्यालयामार्फत दिनांक 01/10/2013 रोजी पावती क्र. 976 प्रमाणे रुपये 8,700/- चे कोटेशन मंजूर करण्यात आले. तक्रारकर्त्याने दिनांक 05/10/2013 रोजी 8,700/- रुपयाचा भरणा केल्यानंतर, विरुध्द पक्षाव्दारे तक्रारकर्त्याला विदयुत मिटर / ग्राहक क्रमांक 32860001061 देण्यात आले व शेतातील मोटरपंपाला विदयुत पुरवठा पुरविण्यात आला. विदयुत पुरवठा दिल्यानंतर तक्रारकर्त्याने आपल्या शेतामध्ये गव्हाचे पीक पेरले व त्याला पाणी देणे सुरु केले. गव्हाचे पीक चांगल्या स्थितीत असतांना विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही पुर्वसुचना न देता दिनांक 07/12/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या शेतातील विदयुत पुरवठा खंडित केला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे 50 % पीक पाण्याअभावी सुकून गेले. तक्रारकर्त्याने त्यानंतर दिनांक 16/12/2013, 26/12/2013, 06/01/2014 व दिनांक 22/01/2014 रोजी विरुध्द पक्षाकडे विनंती अर्ज केले. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विदयुत पुरवठा पुर्ववत केला नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 06/01/2014 रोजी जिल्हाधिकारी, वाशीम यांच्यासमक्ष लोकशाही दिनी तक्रारअर्ज केला. तरीही, विरुध्द पक्षाने विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा पुर्ववत केला नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या शेतातील विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा कोणतीही पुर्वसुचना न देता खंडित केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे 3,00,000/- रुपयाचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होऊन, शेतातील विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा पुर्ववत करण्याचा आदेश दयावा तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी 3,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकुण 31 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी त्यांचा लेखी जबाब (निशाणी-6 प्रमाणे) मंचात दाखल केला. विरुध्द पक्षाचे थोडक्यात म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने त्याच्या शेतामध्ये एक गैरकायदेशीर जास्तीचा वीज खांब लावलेला आहे, त्यामुळे त्याचा विदयुत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने ही तक्रार खोटी व खोडसाळपणे केली असल्यामुळे विरुध्द पक्षाला झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासापोटी 3,00,000/- रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारित व्हावा व तक्रारकर्त्याची तक्रार ही खर्चासह खारिज करण्यांत यावी.
विरुध्द पक्षाने त्यांचा जबाब शपथेवर सादर केला असून त्यासोबत एकुण 07 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व प्रतिज्ञालेख तसेच उभय पक्षाने दाखल केलेला युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला, तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, शेख युसुफ शेख इमाम नौरंगाबादी हा विरुध्द पक्ष – म.रा.वी.वि.कंपनी मर्यादीत, वाशिम यांचा मुळ ग्राहक आहे व ही तक्रार त्याने दिलेल्या अधिकारपत्रावरुन, शेख इस्माईल शेख इमाम नौरंगाबादी यांनी दाखल केली आहे. ग्राहक शेख युसुफ शेख इमाम नौरंगाबादी यांनी त्यांच्या शेत जमिनीमध्ये बोराळा लघुसिंचन तलावावरुन पाईप लाईन व्दारे शेतामध्ये पाणी आणण्यासाठी विरुध्द पक्षाकडे विदयुत कनेक्शन मिळणेकरिता अर्ज केला होता. विरुध्द पक्ष यांनी रुपये 8,700/- ही रक्कम स्विकारुन दिनांक 05/10/2013 रोजी त्याला विदयुत मिटर देऊन शेतातील मोटर पंपाला विदयुत पुरवठा पुरविला होता.
तक्रारकर्त्याच्या मते दिनांक 07/12/2013 रोजी विरुध्द पक्षाने कोणतीही पुर्वसुचना न देता हा विदयुत पुरवठा खंडित केला. त्यामुळे पाण्याअभावी पीक सुकून गेले. म्हणून ही विरुध्द पक्षाची सेवेतील न्युनता ठरते. त्यामुळे मंचाने असे आदेश दयावे की, शेतामधील विदयुत पंपाचा विदयुत पुरवठा पुर्ववत सुरु करुन, झालेली नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- विरुध्द पक्षाकडून वसुल करुन दयावी. या उलट विरुध्द पक्षाने लेखी युक्तिवाद दाखल करुन, असे कथन केले की, तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक नाही व त्यांचा मुळ ग्राहक शेख युसुफ शेख इमाम नौरंगाबादी हा आहे व त्यामुळे त्यांनी 20/- रुपयाच्या स्टँम्प पेपरवर तक्रारकर्त्याला दिलेले हे अधिकारपत्र कायदेशीर ठरत नाही. या प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या नावे कोणतीही शेतजमीन नाही अथवा त्याच्या नावे विरुध्द पक्षाचे कोणतेही वीज कनेक्शनही नाही. मुळ ग्राहकाला नियमानुसार दोन पोलचे कनेक्शन दिले असतांना या प्रकरणातील तक्रारकर्त्याने अवैधरित्या दुस-या व्यक्तीकडून विरुध्द पक्षाची पुर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या एक पोल उभा करुन विदयुत जोडणी करुन घेतलेली आहे. त्याबद्दलचे सर्व दस्तऐवज विरुध्द पक्षाने मंचात दाखल केले आहे. या बेकायदेशीर विदयुत जोडणीमुळे आजुबाजूच्या लोकांना त्यांच्या वीज कनेक्शनमध्ये होल्टेज प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यांनी तशा तक्रारी विरुध्द पक्षाकडे दाखल केल्या असल्यामुळे ही तक्रारकर्त्याची अवैध वीज जोडणी खंडीत केलेली आहे.
उभय पक्षांचा हा युक्तिवाद एैकल्यानंतर मंचाने दाखल सर्व दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, असे दिसून आले की, विरुध्द पक्षाचा मुळ ग्राहक हा शेख युसुफ शेख इमाम नौरंगाबादी हा होता व ही तक्रार तक्रारकर्त्याने
त्याने दिलेल्या 20/- रुपयाच्या भारतीय गैरन्यायीक स्टँम्प पेपरवरील अधिकारपत्रांन्वये दाखल केलेली आहे व हे अधिकारपत्र रजिष्टर्ड अथवा नोटरी कडील रजिष्टर्ड दस्तऐवज नाही. या प्रकरणात जरी तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम, कलम : 12 अन्वये दाखल आहे, तरी यात वीज कायदयाच्या तरतुदी अंतर्भूत आहेत व या तरतुदीनुसार तक्रारकर्ता, विरुध्द पक्ष / म.रा.वी.वि. कंपनी यांचा एकतर ग्राहक पाहीजे किंवा तो बेनिफीशीयरी या व्याख्येमध्ये बसणारा इसम पाहिजे. तक्रारकर्त्याने याबाबत प्रकरणात कोठेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे नुसत्या अधिकारपत्रा मुळे मंचासमोर ही तक्रार प्रतिपालनीय राहणार नाही, असे मंचाचे मत आहे. ही तांत्रिक बाब या प्रकरणात उद्भवल्यामुळे मंचाने तक्रारीतील इतर मुद्दे तपासलेले नाहीत. तक्रारकर्ता वरील दोन्ही कायदयातील तरतुदीनुसार योग्य ती नवीन तक्रार दाखल करण्यास मोकळा आहे, असे मंचाचे मत आहे. त्यामुळे अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्ता यांची तक्रार तांत्रिक मुद्यामुळे फेटाळण्यात येते.
2. तक्रारकर्ता यांना कायदयातील तरतुदीनुसार योग्य ती नवीन तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येत आहे.
3. न्यायिक खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.