::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे)मा. सदस्या)
(पारीत दिनांक :-08/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले कि, अर्जदार हे मौजा मांडवा तह. कोरपना जि. चंद्रपूर येथिल रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहे. अर्जदाराने दि. 30/09/97 रोजी पिकाला पाणि पुरवठा करण्यासाठी शेतामधील विहीरीला मोटार पंप बसविला. व त्याकरीता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने दि. 30/09/97 रोजी मोटार पंपासाठी विज पुरवठा दिला. अर्जदाराचा ग्राहक क्रं. 456700001486 हा आहे. अर्जदार शेतामध्ये सोयाबीन कपासी, तुरी इत्यादी पिकांची लागवड करतात. अर्जदाराने पुढे कथन केले कि, सन 2011 मध्ये शेतीच्या नापिकीमुळे अर्जदाराने विज बिल भरले नव्हते परंतु सन 2011 मध्ये शेतक-यांसाठी सरकारने कृषी संजिवनी योजना लागु केली होती या योजने अंतर्गत डिसेंबर 2011 पर्यंत किंवा त्यापूर्वी एकूण थकीत रकमेपैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्क्म व त्यावरील व्याज, दंड माफ करण्यात आला होता. अर्जदारने पुढे कथन केले कि, सदर योजने अंतर्गत दि. 28/11/11 रोजी 7,650/- रु. भरले. अर्जदाराने पुढे असे कथन केले कि, गैरअर्जदारानी अर्जदारास मार्च, जून, व सप्टैंबर व डिसेंबर 2012 ही चारही बिले दिलेले नव्हते अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर बिलाची मागणी केल्यावरही गैरअर्जदाराने सदर बिले दिले नाही शेवटी डिसें. 2012 या महिण्याचे बिल दि. 16/01/2013 रोजी दिले. सदर बिलामध्ये निव्वळ थकबाकी एकूण रु. 6,495.96/- व व्याजाची थकबाकी 5,989.94/- रु. व पूर्ण देयक रु. 13,830/- दर्शविण्यात आले. सदर बिलाची रक्कम न भरल्यास अर्जदाराचा विज पुवठा बंद करण्याची धमकी गैरअर्जदाराने दिली म्हणून अर्जदाराने दि. 28/11/13 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवून सुधारीत बिलाची मागणी केली परंतु गैरअर्जदाराने सदर नोटीसची पुर्तता केली नाही म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास व्याजाची थकबाकीच्या बिलात गैरकायदेशिर दर्शविलेली रक्कम कमी करुन सुधारीत बिल दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी 20,000/- रु. व तक्रार खर्च 10,000/- ची मागणी केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 12 वर लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने महाराष्ट्र शासन यांनी काढलेल्या परिपञकानुसार शर्ती व अटीचे पालन केले नव्हते म्हणून अर्जदार शेतकरी असूनही महाराष्ट्र शासनाने लागु केलेल्या योजनेचा लाभ घेवू शकले नाही. तसेच अर्जदाराने तक्रारीत लावलेले आारोप खोटे असून गैरअर्जदाराला नाकबुल आहे. अर्जदाराने योजने अंतर्गत दि. 19/12/11 रोजी फक्त 7,650/-एवढी रक्कम भरलेली आहे व उर्वरित भरायची रक्कम 3,802/- ही दि. 31/3/12 पर्यंत भरलेली नसल्यामुळे अर्जदाराने कृषी संजिवनी योजनेच्या अंतर्गत दिलेल्या अटी व शर्तीचे पालन केलेले नाही. म्हणून अर्जदाराला व्याजासहीत दिलेले थकीत रक्कमेचे बिल योग्य व नियमानुसार आहे. सबब अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
3. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
// कारण मिमांसा //
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. अर्जदार हे मौजा मांडवा तह. कोरपना जि. चंद्रपूर येथिल रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहे. अर्जदाराने दि. 30/09/97 रोजी पिकाला पाणि पुरवठा करण्यासाठी शेतामधील विहीरीला मोटार पंप बसविला. व त्याकरीता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने दि. 30/09/97 रोजी मोटार पंपासठी विज पुरवठा दिला. अर्जदाराचा ग्राहक क्रं. 456700001486 हा आहे. म्हणून अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे सिध्द होते सबब मुदद्दा क्रं.1 चे उत्तर होंकाराथी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5. अर्जदार हे मौजा मांडवा तह. कोरपना जि. चंद्रपूर येथिल रहिवासी असून व्यवसायाने शेतकरी आहे. अर्जदाराने दि. 30/09/97 रोजी पिकाला पाणि पुरवठा करण्यासाठी शेतामधील विहीरीला मोटार पंप बसविला. व त्याकरीता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने दि. 30/09/97 रोजी मोटार पंपासठी विज पुरवठा दिला. अर्जदाराचा ग्राहक क्रं. 456700001486 हा आहे. सन 2011 मध्ये शेंतक-यांसाठी सरकारने कृषी संजिवनी योजना लागु केली होती या योजने अंतर्गत डिसेंबर 2011 पर्यंत किंवा त्यापूर्वी एकूण थकीत रकमेपैकी 50 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित रक्क्म व त्यावरील व्याज, दंड माफ करण्यात आला होता. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे. गैरअर्जदाराने युक्तीवादाच्या वेळी गैरअर्जदार क्रं. 1 ने काढलेला वाणिज्य परिपञक क्रं. 229 दि. 12/09/14 रोजीची प्रत सदर प्रकरणात दाखल केली आहे. त्या परिपञकानुसार अर्जदार ‘’ कृषी संजिवनी योजना – 2014 ‘’ चा लाभ घेवू शकतो सदर कृषी योजनेची मुदत 31/10/14 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सबब मंचाच्या मताप्रमाणे सदर तक्रारीचे कारण राहीलेले नाही. अर्जदार आताही सदर कृषी संजिवनी योजनेचा लाभ घेवू शकते व गैरअर्जदार वरील वाणिज्य परिपञकाप्रमाणे अर्जदाराला योजने अंतर्गत लाभ देण्यास बाध्य आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
.
//अंतीम आदेश//
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराला ‘’ कृषी संजिवनी योजना – 2014’’ चे अंतर्गत चालु विज देयक सुधारीत करुन दयावे.
3) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 08/10/2014