निकाल
(घोषित दि. 14.03.2017 व्दारा श्री.सुहास एम.आळशी, सदस्य)
-2-
तक्रारदाराने हिने तक्रार अर्जात नमुद केलेले आहे की, ती जालना, ता जि. जालना येथील रहिवासी आहे. गैरअर्जदार ही वीज वितरण कंपनी आहे. तक्रारदार हिने गैरअर्जदार यांच्याकडुन घरगुती वापराचे वीज कनेक्शन घेतले आहे, त्याचा ग्राहक क्र. 510038509002 हा आहे. तक्रारदार हिने दि. 30/10/2014 रोजी गैरअर्जदाराकडुन वीज कनेक्शन घेतले आहे. तेव्हा पासुन गैरअर्जदार हिला माहे फेब्रुवारी 2016 पर्यत 174 युनिट प्रतिमाह या सरासरी नुसार देयके आली. माहे मार्च 2016 मध्ये तक्रारदार हिला 68,920/- रु.चे देयक आले ते तिला मान्य नाही. तक्रारदार हिने गैरअर्जदार यांना ते देयक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली, गैरअर्जदार यांनी ते देयक दुरुस्त करुन दिले नाही. एप्रिल महिन्याचे वीज वापरापोटी रु. 8177/- चे देयक दिले व मागील थकबाकीसह एकुण 78990/- रु. चे देयक आले. त्यानंतर माहे मे 2016 मधील वीज वापराचे 21,836/- रु.चे देयक तक्रारदार हिला आले व मागील थकबाकी रु. 79,228/- सह एकुण रुपये 1,01,070/- चे देयक दिले. सदर देयके दुरुस्त करुन देण्याची तक्रारदार हिने गैरअर्जदार यांनावारंवार विनंती केली, परंतु गैरअर्जदार यांनी देयकांची दुरुस्ती करुन दिली नाही. या उलट गैरअर्जदार यांनी दि.16/06/2016 रोजी वरील देयक न भरल्यामुळे तक्रारदार हिचा वीज पुरवठा खंडित केला. उपरोक्त देयकांमध्ये दुरुस्ती करुन मिळण्याकरीता, खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत जोडून मिळावा, मिटर तपासणी करुन मिळावी व 25,000/- रु. नुकसान भरपाई मिळावी, असे आदेश गैरअर्जदार यांना देण्याकरीता तक्रारदार हिने मंचामध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हिने तक्रार अर्जासोबत वीज देयके जोडली आहेत.
गैरअर्जदार यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 9 वर दाखल केला आहे. गैरअर्जदार यांनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यतचे रिडींग उपलब्ध न झाल्याने सरासरी 174 युनिट प्रतिमाह वीज देयक दिले व मार्च 2016मध्ये तक्रारदाराचे मिटरचे रिडींग उपलब्ध झाल्याने त्याने वापर केलेले 7854 युनिटच्या वापराचे देयक दिले व तिने बारा महिने 174 युनिट वीज वापरानुसार भरलेली रक्कम वजा करुन दिली. मार्च 2016 ला लॉक क्रेडीट म्हणुन 12349.73/- रु. कमी करुन देण्यात आले. त्यामुळे तिचे कोणतेही नुकसान झाले नाही. तक्रारदार हिला माहे एप्रिल 2016 मध्ये 731 व एप्रिल 2016 चे 1486 युनिटचे देयक तिचे वीज वापरानुसारच देण्यात आले असे नमुद केले आहे. तक्रारदार हिची तक्रार चुकीची असल्याने व गैरअर्जदार यांनी सेवेमध्ये कोणतीही त्रुटी न केल्याने तिची तक्रार फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
तक्रारदाराची तक्रार, युक्तीवाद, दाखल दस्तऐवज, गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जबाब, युक्तीवाद दाखल दस्त याचा विचार केला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
-3-
मुददे उत्तर
1) गैरअर्जदाराने तक्रारदारास सेवा
देण्यास कसुर केला आहे काय? होय.
3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुद्दा क्र.ः- 1) तक्रारदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे याबाबत दोन्ही पक्षात वाद नाही.
तक्रारदारा हिने दाखल केलेल्या देयकांचे व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सी.पी.एल. उता-याचे अवलोकन केले. तक्रारदार हिने घरगुती वीज वापराचे कनेक्शन दि. 30/10/2014 रोजी घेतले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे डिसेंबर 2014 व जानेवारी 2015 मध्ये 174 युनिटचे देयक दिले. त्यानंतर माहे फेब्रवारी 2015 मध्ये 301, मार्च 2015 मध्ये 221 युनिटचे देयक रिडींगनुसार दिले. मात्र ते एप्रिल 2015 ते फेब्रवारी 2016 पर्यत करंट व प्रिव्हीयस रिडींग 696 दर्शविले आणि 174 युनिट प्रतिमाह प्रमाणे सरासरी देयक तक्रारदारास दिले आहे. माहे मार्च 2016 मध्ये तक्रारदार हिला 7854 युनिटचे 68,920/- रु. माहे एप्रिल 2016 मध्ये 731 युनिटचे रु. 79070/- व मे 2016 मध्ये 1486 युनिटचे रु.1,00,880/- चे देयक तक्रारदाराला दिले. या तीन देयकाबाबत तक्रारदार हिची हरकत आहे. ही देयके गैरअर्जदार यांनी रिडींग प्रमाणे दिली नसल्याचे गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या सी.पी.एल.वरुन दिसते.
2) मिटर स्टेटस नॉर्मल असताना गैरअर्जदार यांनी फेब्रवारी 2015 मध्ये 301 युनिट मिटरचे रिडींग घेतले. त्यावरुन तक्रारदाराचा वीज वापर हा 301 युनिटपेक्षा जास्त नाही. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे मार्च-एप्रिल-व मे 2016, ची रु एकुण रु.1,00,880/- देयके कोणत्या आधारावर दिले याचा उलगडा होत नाही.
3) तक्रारदार हिने घरगुती वीज वापराचे कनेक्शन दि. 30/10/2014 रोजी घेतले तेव्हापासुन तिला दरमहा तिचे वीज वापरानुसार देयक देणे हे गैरअर्जदार यांचे Maharashtra Electricity Regulation Commission ने नियमित केलेल्या Electric Supply Terms and Condition Regulation 2005 चे 15.3.2 नुसार कर्तव्य होते, त्याचा गैरअर्जदार यांनी भंग केला आहे. गैरअर्जदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम (2)(1)(जी) नुसार तक्रारदाराचे सेवेत त्रुटी केली आहे.
4) वरील परिच्छेद क्रं.2 मधील निरीक्षण आधारभूत धरुन आम्ही मार्च,एप्रील व मे 2016ची बिले प्रतिमहिणा 300 प्रमाणे गृहित धरणक योग्य राहील असा निष्कर्ष काढतो.
-4-
5) त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही मुद्दा क्र. 2 नुसार खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) गैरअर्जदार यांनी तक्रारदारास माहे मार्च-एप्रिल-व मे 2016, ची रु.1,00,880/-
ची देयके रद्द करुन ती 300 युनिट प्रतिमाह प्रमाणे द्यावी. त्यावर दंड व
व्याजाची आकारणी करु नये.
3) वरील प्रमाणे देयकांची रक्कम तक्रारदार हिने भरल्यावर तिचा वीज पुरवठा
पुर्ववत सुरु करावा.
4) तक्रारदारास झालेल्या शारीरीक, मानसिक त्रासापोटी रु. 2500/- व प्रकरणाचे
खर्चापोटी रु. 1000/- गैरअर्जदार यांनी द्यावे.
5) वरील आदेशाचे पालन हा आदेश पारीत झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना