नि.२१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १८९७/२००९
----------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – १२/०६/२००९
तक्रार दाखल तारीखः – २४/०६/२००९
निकाल तारीखः - २७/०९/२०११
----------------------------------------
श्री रामचंद्र गणपती रणदिवे
व.व.७५, धंदा – पिठाची गिरणीचालक
रा.चिंतामणी नगर, माधवनगर रोड, सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.
सांगली कार्यालय, रिसाला रोड, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : +ìb÷. श्री एस.बी.होतकर
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री यु.जे.चिप्रे
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज आपल्या विद्युत देयकाबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक असून तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून आपले पिठाचे गिरणीसाठी विद्युत कनेक्शन घेतले आहे. तक्रारदार यांचा मीटर क्र.२४७९५८ असा आहे. तक्रारदार यांचे विद्युत मीटर जाबदार यांनी दि.८/५/२००६ रोजी बदलला आहे. दि.३०/५/२००६ रोजी मीटरचे सील तुटले व मीटरमध्ये फेरफार केला म्हणून रु.६६,६२०/- व रक्कम रु.२,००,०००/- दि.७/६/२००६ पर्यंत भरावे अन्यथा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशा खोटया आशयाची नोटीस जाबदार यांनी पाठविली. तक्रारदार यांनी सदरची बाब नाकारल्याने जाबदार यांनी तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला व तक्रारदार यांचेवर विद्युत चोरी केल्याबाबत फिर्याद दाखल केली. वीज कनेक्शन तोडलेने तक्रारदार यांची पीठाची गिरणी बंद पडली व त्यांचे व्यवसायाचे नुकसान होवू लागले, त्यामुळे तक्रारदार यांनी नाईलाजास्तव दि.१४/६/२००६ रोजी अंडर प्रोटेस्ट रक्कम रु.५१,७७०/- आणि रु.२,२५०/- असे एकूण मिळून रु.५४,०२०/- जाबदार यांचेकडे भरले. त्यानंतर तक्रारदार यांचा विद्युत पुरवठा जाबदार यांनी चालू केला. तक्रारदारविरुध्द करण्यात आलेली विद्युत केस त्याचा सेशन केस नं.१४७/२००६ चा निकाल दि.१३/५/२००८ रोजी झाला असून तक्रारदार यांना वीजचोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. सदर विद्युत केसचा निकाल लागलेनंतर तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे अंडर प्रोटेस्ट भरलेली रक्कम रु.५४,०२०/- परत मागितली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज सदरची रक्कम मिळण्यासाठी दाखल केला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने ११ कागदपञे दाखल केली आहेत.
३. जाबदार यांचेविरुध्द प्रस्तुत प्रकरणी नो से चा आदेश करण्यात आला होता. सदरच्या आदेश जाबदार यांनी नि.१२ चे अर्जान्वये रद्द करुन घेतला व नि.१३ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारअर्जदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार हे जाबदार यांचे औद्योगिक ग्राहक आहेत. तक्रारदार यांचेविरुध्द दाखल करण्यात आलेल्या विद्युत चोरीच्या केसमधून तक्रारदार यांची संशयाचा फायदा घेवून मुक्तता केली आहे. परंतु तक्रारदार यांनी जमा केलेली रक्कम रु.५४,०२०/- ही परत करण्याविषयी कोणताही आदेश केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनीही सदरची रक्कम परत मिळावी असा सेशन कोर्टात कोणताही अर्ज दिलेला नाही. तक्रारदार स्वत:ची गिरणी ही स्वत: चालवित नसून सदरची गिरणी भाडेतत्वावर चालविण्यास दिली आहेअसे नमूद केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. तक्रारदार यांची तक्रार मुदतीत नाही. तक्रारदार यांची केसमधून सुटलेनंतर रक्कम परत देणेची हमी देवून रक्कम स्वीकारली नाही. जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर होणेस पात्र नसलेने फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१४ च्या यादीने २ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१५ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणणेमधील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी नि.१८ वर म्हणणे हाच युक्तिवाद समजणेत यावा अशी पुरसिस दाखल केली आहे. तक्रारदार यांनी नि.२० वर श्री एस.बी.होतकर यांचे वकीलपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांचे विधिज्ञांनी लेखी युक्तिवादाप्रमाणेच तोंडी युक्तिवाद असल्याचे नमूद केले. जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
५. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल कागदपञे, दाखल प्रतिउत्तर, दाखल युक्तिवाद यांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
१. तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक आहे का ? नाही.
२. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
६. मुद्दा क्र.१
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज आणि जाबदार यांनी दिलेले म्हणणे याचे अवलोकन करता तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो का ? हे याठिकाणी प्रथमत: ठरविणे गरजेचे आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार याने औद्योगिक कारणासाठी विद्युत कनेक्शन घेतले असल्याने तो ग्राहक होत नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी त्याच्या तक्रारअर्जामध्ये त्याने सदर विद्युत कनेक्शन पिठाच्या गिरणीसाठी घेतले होते ही बाब नमूद केली आहे. तक्रारदारच्याच तक्रारअर्जावरुन तक्रारदार याने विद्युत कनेक्शन हे व्यापारी कारणासाठी घेतले होते ही बाब स्पष्ट होते. ग्राहक संरक्षण कायद्यामधील ग्राहक या शब्दाच्या व्याख्येचे अवलोकन केले असता व्यापारी कारणासाठी एखादी वस्तू अथवा सेवा घेतली असेल तर सदरची वस्तू अगर सेवा घेणारी व्यक्ती ग्राहक होत नाही. परंतु त्यामध्ये पुढे असेही म्हटले आहे की असा व्यापार जर त्या व्यक्तीने स्वत:च्या स्वयंरोजगारातून स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी केला असेल तर ते व्यावसायिक कारण हे ग्राहक या संज्ञेमध्ये येते. ग्राहक या व्याख्येचे अवलोकन केले असता तक्रारदार याने सदरची पिठाची गिरणी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी स्वत:च्या स्वयंरोजगारातून चालविली आहे का ? हे याठिकाणी पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१९/५/२००६ रोजी दिलेल्या पत्राची प्रमाणीत प्रत नि.१४/१ वर दाखल आहे. सदर पत्रामध्ये तक्रारदार याने सदरची चक्की मी भाडेतत्वावर दिली होती. त्या कालावधीत सदरचे मीटर सील तुटलेले आहे असे नमूद केलेले आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार याने सदर पत्रात चक्की भाडेतत्वावर दिली होती असे नमूद केले आहे. सदरच्या पत्रातील मजकूर तक्रारदार याने प्रतिउत्तरामध्ये अमान्य केला आहे. परंतु तक्रारदाराने याकामी सेशन केस नं.१४७/२००६ चे निकालाची प्रत नि.५ चे यादीने दाखल केली आहे. त्यामध्ये जाबदार यांचा उलटतपास घेताना तक्रारदार यांचे विधिज्ञांनी सदरचे पत्राचा उल्लेख केला आहे व जाबदार यांना उलटतपासामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जाबदार यांनी पुढीलप्रमाणे दिले आहे. It is true that vide letter 19/5/2006, accused has informed that he has given flour mill on hire for running to another person. सदर प्रश्नाचे उत्तर पाहता तक्रारदार यांचे विधिज्ञांनी तक्रारदारतर्फे सदरचे पत्र फौजदारी प्रकरणामध्ये मान्य केले आहे ही बाब स्पष्ट होते. यावरुन तक्रारदार यांना मी सदरचे पत्रच दिले नव्हते असा बचाव घेता येणार नाही. तक्रारदार यांच्या पत्रावरुनच तक्रारदार याने सदरची चक्की भाडयाने दिली होती ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार हा त्याचा व्यवसाय स्वयंरोजगारातून करत नसल्याची बाब दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. सन्मा.राष्ट्रीय आयोग यांनी II (2011) CPJ Page 147 या Kiran Khatri Vs. Dakshin Haryana Bijli Vitaran Nigamया निवाडयाचे कामी पुढील निष्कर्ष काढला आहे. Complainant running poultry farm and connection used for commercial purpose – complainant not a consumer u/s 2(1)(d). सदर निवाडयाचे अवलोकन करता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहक होत नसल्याने तक्रारदार हा मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
२. खर्चाबाबत आदेश नाही.
सांगली
दि. २७/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.