निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 07/03/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 07/03/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/11/2013
कालावधी 01 वर्ष. 08 महिने.12 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 आशिष पिता बंकटलालजी काबरा. अर्जदार
वय 33 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.अजय गोपाल व्यास.
रा.शिवाजी रोड, परभणी.
2 आनंद पिता बंकटलालजी काबरा.
वय 39 वर्षे, धंदा. व्यापार.
रा.शिवाजी रोड, परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
सर्कल ऑफीस,जिंतूर रोड, परभणी.
2 उप-कार्यकारी अभियंता,
महावितरण- शहर उपविभाग,फ्युज कॉल सेंटर -1,
नवा मोंढा,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.सौ.अनिता ओस्तवाल.सदस्या.)
गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी.
अर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार यांच्याकडून दुकानासाठी विद्युत जोडणी घेतलेली असून त्याचा ग्राहक क्रमांक 530010002043 व मीटर क्रमांक 05439127 असा आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने मीटर रिडींग न घेता व फॉल्टी असा शेरा मारुन अंदाजाने व चुकीची बिले दिलेली असल्यामुळे अर्जदाराने दिनांक 03/12/2008 रोजी गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली होती, परंतु त्याची गैरअर्जदाराने दखल घेतलेली नाही. दिनांक 24/06/2009 रोजी गैरअर्जदार हे अर्जदाराच्या दुकानात आले व त्यांनी मिटरची टेस्टींग केली व मीटर फॉल्टी असल्यामुळे जुने मिटर काढून नवीन मीटर बसवले, त्याचा मीटर क्रमांक 11560199 असा आहे. अर्जदाराने जुन्या मीटर प्रमाणे विद्युत देयकाचा भरणा नियमीतपणे गैरअर्जदाराकडे केलेला आहे. नवीन मीटर बसवल्यानंतर देखील जुन्या मीटरचा मीटर क्रमांक नमुद करुन अर्जदारास विद्युत देयक देण्यात आलेली आहेत, यावरुन गैरअर्जदाराचा निष्काळजीपणा दिसून येतो, पुढे दिनांक 26/07/2011 रोजी अर्जदारास रु. 9320/- चे विद्युत देयक दिले, ज्यामध्ये चालू 1694 व मागील रिडींग 1528 व एकुण विज वापर 166 युनीट दर्शविण्यात आला होता या विद्युत देयकाच्या रक्कमेचा भरणा अर्जदाराने केलेला आहे. तदनंतर अर्जदारास एक ही विद्युत देयक प्राप्त झाले नाही.
पूढे दिनांक 25/02/2012 रोजी अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करण्यासाठी गैरअर्जदाराचे कर्मचारी आले असता, अर्जदाराने त्याच्या सांगण्यावरुन रक्कम रु. 5,000/- चा क्रमांक 22286 चा धनादेश गैरअर्जदारांच्या कर्मचा-यांना दिला. पुढे दिनांक 27/02/2012 रोजी अर्जदारास रकम रु. 37,410/- चे विद्युत देयक दिले. त्यामध्ये चालूल रिडींग 5762 मागील रिडींग 5223 व एकूण विज वापर 539 युनीटचे असे दर्शविण्यात आले होते, दिनांक 24/02/2012 रोजी रक्कम रु. 49,550/- चे विद्युत देयक अर्जदारास दिले. त्यात मागील रिडींग 5762 व चालू रिडींग 7012 व एकुण विज वापर 1250 युनीट असे नमुद करण्यात आले होते, अर्जदाराने सदरील विद्युत देयक चुकीचे असून ते दुरुस्त करुन द्यावे अशी विनंती गैरअर्जदाराकडे केली असता त्यांनी त्यांच्या विनंतीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन ग्राहक क्रमांक 530010002043 बाबत दिलेले रक्कम रु. 49,550/- चे दिनांक 24/02/2012 चे विद्युत बील व दिनांक 24/06/2009 रोजी पासून दिलेले सर्व विद्युत बील रद्द करण्याबाबत मंचाने गैरअर्जदारास आदेश द्यावेत, तसेच सदरील मीटर हे फॉल्टी असल्या कारणाने ते बदलून मिळावे तसेच दिनांक 24/06/2009 च्या मीटरच्या 0001 रिडींग प्रमाणे आताची मिटर रिडींग घेवुन रिव्हीजन करुन स्लॅब बेनिफीटसह व्याज आकारणी न करता नवीन विद्युत देयक तयार करावीत. अर्जदाराने नवीन मिटरच्या देयकापोटी भरलेले सर्व पैसे त्यातून वळते करुन उरलेले सर्व पेसे अर्जदारास तक्रार दाखल केल्याच्या दिनांका पासून अर्जदारास 12 टक्के व्याजासह गैरअर्जदाराने परत करावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व दावाखर्च रक्कम रु. 5,000/- अर्जदारास मिळावेत अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत.
अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि. 2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 7 वर मंचासमोर दाखल केली.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर त्यांनी मंचासमोर हजर राहून लेखी निवेदन दाखल करण्यासाठी वेळ मागीतला, परंतु अनेक वेळा संधी देवुनही त्यांनी लेखी निवेदन दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरोधात विना जबाब आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विद्युत वितरण कंपनीने अर्जदारास त्रुटीची सेवा
दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार याने त्याच्या दुकानासाठी गैरअर्जदाराकडून विज जोडणी घेतलेली आहे. अर्जदाराचे मिटर सदोष असल्यामुळे दिनांक 24/06/2009 रोजी गैरअर्जदाराने नवीन मीटर बसविले. त्याचा मिटर क्रमांक 11560199 असा आहे. गैरअर्जदाराने दिनांक 26/07/2011 रोजी अर्जदारास रक्कम रु. 9320/- चे विद्युत देयक दिले व त्या विद्युत देयकांचा अर्जदाराने भरणा देखील केलेला आहे. त्यानंतर अर्जदारास विद्युत देयक मिळालेली नाही, पुढे दिनांक 25/02/2012 ला अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करुन नये यासाठी गैरअर्जदाराकडे अर्जदाराने रक्कम रु. 5,000/- चा भरणा केला दिनांक 27/02/2012 रोजी अर्जदारास रक्कम रु. 37,410/- चे व विज वापर 539 युनीटचे विज बील दिले तसेच दिनांक 24/02/2012 रोजी रक्कम रु. 49550/- व विज वापर 1250 युनीटचे विज बील दिले सदरील विद्युत देयक दुरुस्ती करुन देण्याची विनंती अर्जदाराने केली असता गैरअर्जदाराने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. मंचासमोर अर्जदाराने नि. 7 वर दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते दिनांक 24/06/2009 ला गैरअर्जदाराने अर्जदाराचे मीटर सदोष असल्यामुळे नवीन मीटर मीटर क्रमांक 11560199 बसविल्याचे निदर्शनास येते त्यानंतरही प्रतिमहा 71 युनीटचा विज वापर दाखवून अर्जदारास विद्युत देयक देण्यात आले. जुलै 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत अनुक्रमे 166 युनीट, 761 युनीट, 720 युनीट, 1536 युनीट, 512 युनीट, 539 युनीट व 1250 युनीट एवढया विज वापराची विद्युत देयक अर्जदारास दिलेली आहेत, जे की, चुकीचे अवास्तव असल्याचे दिसून येते, त्यामुळे अर्जदारास त्याच्या विज वापरानुसार विद्युत देयक न देता मनास वाटेल तेवढी रिडींग नोंदवून अव्वाच्या सव्वा रक्कमेचे विद्युत देयक अर्जदारास देवुन गैरअर्जदाराने नक्कीच त्रुटीची सेवा दिल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे दिनांक 24/06/2009 रोजी पासून ते आज पर्यंत अर्जदारास दिलेली सर्व विद्युत देयक रद्दबातल करणे न्यायोचित होईल. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 24/06/2009 ते आज पर्यंत दिलेली विद्युत
देयक रद्द बातल करण्यात येत आहेत.
3 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास मीटर
क्रमांक 11560199 च्या जागी नवीन व दोषरहीत मीटर सर्व औपचारीकता पूर्ण
करुन घेवुन बसवून द्यावा. नवीन मीटर बसवून दिल्यानंतर अर्जदाराच्या
मीटरची प्रतिमहा प्रमाणे रिंडींग घ्यावी. अशा प्रकारे तीन महिने रिडींग घेतल्या
नंतर त्यानुसार अर्जदाराचा विज वापर सरासरी प्रतिमहा किती युनीट आहे हे
स्पष्ट झाल्यानंतर दिनांक 24/06/2009 पासून ते आज पर्यंत अर्जदारास
तेवढयाच युनीट प्रतीमहा या प्रमाणे विज वापराची स्लॅब बेनिफिटसह विद्युत
देयक द्यावी,
त्यावर दंडव्याज कोणत्याही प्रकारे आकारु नये. उपरोक्त कालावधीसाठी
अर्जदाराने विद्युत देयकापोटी भरलेली रक्कम समायोजित करावी व उर्वरित
रक्कम अर्जदाराकडून वसूल करावी.
4 गैरअर्जदाराने उपरोक्त कार्यवाही निकाल कळाल्यापासून 135 दिवसांच्या आत
पूर्ण करावी.
5 गैरअर्जदार विज वितरण कंपनीने अर्जदार क्रमांक 1 यास मानसिक त्रासापोटी
रक्कम रु.1000/- फक्त ( अक्षरी रु.एकहजार फक्त ) व तक्रारीच्या खर्चापोटी
रक्कम रु. 1000/- फक्त ( अक्षरी रु.एकहजार फक्त ) निकाल कळाल्यापासून
30 दिवसांच्या आत द्यावेत.
6 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.