न्या य नि र्ण य
(दि.19-01-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 35 प्रमाणे सामनेवाला यांचेकडून योग्य वीज बील आकारणी करुन मिळणेसाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार यांची मौजे सोमेश्वर ता.जि.रत्नागिरी येथील सर्व्हे नं.44 हिस्सा नं.3येथे स्वकष्टार्जित मिळकत आहे. सदरहू सर्व मिळकतीची देखभाल, मशागत तक्रारदार यांचे मुखत्यार श्री सुहास भास्कर पटवर्धन करतात. तक्रारदार यांचा शेती व पशुपालनाचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायामधून मिळणा-या उत्पन्नावर तक्रारदार चरितार्थ चालवतात. तक्रारदारांच्या सदर मिळकतीमध्ये पाणी पुरवठा करणेसाठी मोजे सोमेश्वर ता.जि.रत्नागिरी येथील सर्व्हे नं.42 हिस्सा नं.8 ही मिळकत तक्रारदार यांचे वडीलांच्या व काकांच्या मिळकतीमध्ये विहीरीला पाणी भरपूर असल्यामुळे तेथून पाईपलाईनच्या सहाय्रयाने कृषी पंपाव्दारे पाणी तक्रारदाराचे मिळकतीमध्ये नेण्याचे ठरवले. सदर कृषीपंपाकरिता सामनेवालांकडे वीज कनेक्शनची मागणी केली. सामनेवाला यांनी तक्रारदारास 3 एचपी चा भार मंजूर करुन दि.08/06/2014 रोजी मिटर नं.210250008974 अन्वये वीज कनेक्शन देण्यात आले. सदरचे मिटर तक्रारदार यांनी वडीलांचे मिळकतीमध्ये जोडले होते. तक्रारदार यांचे वडील मयत झाल्यानंतर त्यांचे वारसतपासाने त्यांचे हिश्याचे मिळकतीला तक्रारदार यांचे नांव दाखल झाले आहे.
सामनेवाला यांचे कार्यालयाकडून मार्च-2017 पासून सदरहू मिटरचे रिडींग न घेता तक्रारदारास 84 युनिट इतके Consumption दाखवून दर महिन्याला वेगवेगळया किंमतीची अव्वाच्या सव्वा बील पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.07/05/2021 रोजी व दि.19/05/2021 रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली. वीजेचा जास्त वापर होत नसताना वीज बील कसे येते याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सदरचे मिटर हे कृषी कारणास्तव असल्यामुळे दर तीन महिन्यांनी वीजबीलाची आकारणी होते. सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 या कालावधीकरिता सामनेवाला यांनी सुमारे 20830 युनिट इतके consumption दाखवून तक्रारदार यांना रक्कम रु.1,05,320/- इतक्या रक्कमेचे वीज बील मिटर रिडींग न घेता पाठवले. त्याबाबत चौकशी करण्यास सामनेवाला यांचे कार्यालयात गेले असता सदरहू वीज बील तुम्हाला भरावेच लागेल अन्यथा आपला वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल अशी कोणतीही कायदेशीर नोटीस न पाठवता धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच मिटर रिडींग घेतले असून मिटर बरोबर आहे असे सांगून तक्रारदारास वीजबील पाठवले. माहे जुन ते नोव्हेंबर हा पावसाचा कालावधी असल्यामुळे शेती करता तसेच झाडांकरिता पाण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे पावसात वीज वापरण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे महितीच्या अधिकाराखाली अर्ज केला त्यामध्ये मिटर बसवल्यापासून सप्टेंबर-2021 पर्यंतचा बील भरल्याचा सर्व तपशील आहे. सदर तपशील सामनेवाला कार्यालयातील कर्मचा-यांना दाखवला असता त्यांनी चुक मान्य करुन बीलामधून रक्कम रु.59,260/- इतकी रक्कम वजा करुन रक्कम रु.46,060/- इतकी रक्कम भरण्यास सांगितली. परंतु सदरची रक्कमही जास्त असलेने तक्रारदाराने वीज बील भरण्यास नकार दिला.
जुन-2014 ते डिसेंबर-2016 च्या वीज बीलांची सरासरी आकारणी सुमारे महिन्याला रक्कम रु.1,000/- पेक्षा कमी आहे. जुन-2014 पासून आजपर्यंत तक्रारदारांनी वीज वापरात कोणताही बदल केलेला नाही. सदरचे मीटर कृषीपंपाकरिता घेतलेला असल्यामुळे आजतागायत कृषिपंपाकरिताच सदरहू मीटरचा वापर करण्यात येत आहे. सदर मीटरचे ॲव्हरेज सुमार 80 ते 130 युनिटप्रती 3 महिना इतके आहे. सदर वीज बीलाची आकारणी ही 3.23 रुपये प्रती युनिट इतकी वीज बीलात नमुद आहे. जुन-2014 रोजी मीटर घेतेवेळी दर संकेत हा LT IV AG (MTR) 3 HP असा होता. मात्र माहे नोव्हेंबर-2021 रोजी दर संकेत हा LT IV AG (c ) AG cold Storage असा संकेत वीजबीलावर दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला. तक्रारदाराने सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसला सामनेवाला यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्याकारणाने प्रस्तुतचा तक्रार अर्ज या आयोगात दाखल करणे भाग पडले आहे. सबब माहे नोव्हेंबर-2021 रोजी पाठविलेले रक्कम रु.46,060/- इतक्या रक्कमेचे अवास्तव बील रदद करुन मीटर योग्य् स्थितीत नसल्यामुळे जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवून तीन महिन्याचे वीज बील काढून त्याच्या वापराची सरासरी काढून त्यानुसार माहे सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 रोजीचे वीज बील आकारणी LT IV AG (MTR) 3 HP दर संकेतानुसार करुन मिळण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबददल रक्कम रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने तक्रार अर्जात केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.6/1 कडे मुखत्यारपत्र, नि.6/2 कडे तक्रारदाराने उपकार्यकारी अभियंता यांचेकडे केलेला अर्ज, नि.6/3 कडे दि.1/11/21 रोजी पाठविण्यात आलेले वीज बील, नि.6/4 कडे सामनेवाला तर्फे माहितीच्या अधिकाराखाली पाठविण्यात आलेले लेजर, नि.6/5 कडे सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठविलेले मीटरबाबतचे पत्र व त्यासोबत पाठविण्यात आलेले वीज बील, नि.6/6 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस, नि.6/7 कडे नोटीस पोहोचलेबाबतचे स्टेटस, नि.6/8 कडे सन-2017 पासून तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीचा तपशील, नि.6/9 कडे मार्च-2021 अखेर बील भरल्याची पावती, नि.6/10 कडे सामनेवाला यांनी दुरुस्ती करुन दिलेले बील, नि.6/11 कडे LT IV AG (MTR) 3 HP ची नोंद असलेले डिसेंबर-2017 चे वीज बील इत्यादी कागदपत्रे दाखल केली. नि.18 कडे एकूण 7 कागदपत्रे दाखल केलेली असून त्यमाध्ये 18/1 कडे माहितीच्या अधिकारात मागविलेले स्थिर आकार बदलल्याबाबतचे दरपत्रक व माहिती, नि.18/2 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना वीज आकारणीबाबत लिहिलेले पत्र, नि.18/3 कडे तक्रारदाराने सामनेवाला यांना बीला सुधारणा करण्याबाबतचे दिलेले पत्र, नि.18/4 कडे माहितीच्या अधिकारात मागविलेले वीजदराबाबत झालेली विभागणी व त्यानुसार लावलेले दर, नि.18/5 कडे LT IV AG (MTR) 3 HP बदलल्याबाबतची माहिती, नि.18/6 कडे माहितीच्या अधिकारात मागविलेले commercial, agriculture, cold storage मध्ये येणा-या उत्पादनाची माहिती आणि लावलेले युनिटचे दर, नि.18/7 कडे माहे 24, नोव्हेंबर, 2020 पासून 1 नोव्हेंबर,2021 पर्यंतची सर्व वीज बील इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.19कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.20कडे पुरावासंपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.26 कडे सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले दि.18/08/2021 रोजीचे वीज बील दाखल केले आहे. नि.27 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
3. सामनेवाला यांनी प्रस्तुत कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.12 कडे त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे कथनात पुढे सांगतात, सामनेवाला ग्रहकांचे मीटर रिडींग मे. बी.आर.इन्फोमेडिया, शॅाप नं.1, एकदंत अपार्टमेंट, साळवी स्टॉप, ता.जि.रत्नागिरी-415639 यांचेकडून घेतले जाते. परंतु सदर एजन्सीने तक्रारदार यांचे मार्च-2017 ते सप्टेंबर-2021 या कालावधीत मीटर रिडींग सामनेवाला कार्यालयाला उपलब्ध करुन दिले नव्हते. त्यामुळे सामनेवाला कार्यालयाने तक्रारदार यांच्या मागील वीज वापराच्या रिडींगवरुन सरासरी वीज देयके तक्रारदार यांना दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने काही अंशी बीलांचा भरणादेखील केलेला आहे. ग्राहकांच्या मीटरचे रीडींगबाबत सदर रीडींग एजन्सी यांना तक्रारी स्वरुप सामनेवालाकडून पत्रव्यवहार देखील करण्यात येऊन नियमाप्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना व ताकीद देखील देण्यात आल्या आहेत.
सामनेवाला पुढे कथन करतात की, तक्रारदार यांच्या ग्राहक जोडणी क्र.210250008974 च्या माहे सप्टेंबर-2021 मध्ये मिळालेल्या रिडींगनुसार तक्रारदाराचा मार्च-2017 ते सप्टेंबर-2021 या कालावधीतील एकूण वीज वापर 19732 युनिट इतका होता. त्यानुसार सामनेवाला यांच्या सिस्टिममधून तक्रारदाराचे सप्टेंबर-2021 चे बील बदललेल्या वर्गीकरण AG to Ag Other नुसारच्या दराप्रमाणे रक्कम रु.1,05,320/- तक्रारदारास डिफॉल्ट सिस्टिमव्दारे पाठवण्यात आले. सदरचे बील चुकीचे पाठविलेचे सामनेवाला यांचे लक्षात आलेवर दि.17/11/2021 रोजी सदर बीलामध्ये माहे सप्टेंबर-2020 आधीच्या युनिटची AG दराप्रमाणे आकारणी करुन रक्कम रु.59,260/- ची वजावट करुन रक्कम रु.46,060/- चे सुधारीत बील तयार करण्यात आले. The Electricity Act 2003 नुसार कमर्शियल सर्क्यूलर नंबर 243 दि.03/07/2015 नुसार शेती व बागायती शेती असे दोन वेगवेगळे दर संकेत (Tariff) केले आहेत. तक्रारदारांचा वीज वापर हा फळे, भाज्या, पशूपालन इत्यादीकरिता होत असल्याने सप्टेंबर-2020 मध्ये त्यांची वर्गवारी AG to AG Other (LT IV (c)) अशी करण्यात आली. तशी कल्पना तक्रारदारास देण्यात आली होती. सुधारीत वीज देयक रु.46,060/- भरण्याबाबत तक्रारदारास सांगितले, तसेच सदर बील एकरकमी तक्रारदार यांना भरणे शक्य नसल्यास हप्त्यामध्ये बील भरण्यास तक्रारदारास पर्याय उपलब्ध करुन दिला होता, परंतु तक्रारदार सदर बील भरण्यास तयार नाहीत. तसेच तक्रारदाराने मीटर तपासणीबाबत विनंती केल्याने सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून मीटर टेस्टिंगची फी भरुन घेऊन सामनेवालाने तक्रारदाराचे मीटर टेस्टिंग युनिटकडे तपासणी करता पाठविले. दि.21/02/2022 रोजी मीटर टेस्टिंग रिपोर्टमध्ये Error within permissible limit. Meter ok असा शेरा नमुद आहे. सदरचा अहवाल तक्रारदारास मान्य नसलेस सदरचा रिपोर्ट वरिष्ठ मीटर टेस्टिंग लॅब अथवा खाजगी मीटर टेस्टिंग लॅब यांचेकडून तपासून घेता येऊ शकतो. तक्रारदाराचे बीलाची आकारणी ही AG OTHER-COLD STORAGE या दराप्रमाणे केली असे बीलावर नमुद असले तरी COLD STORAGE व AG OTHER यांचे वीजदर वेगवेगळे नसून एकच आहेत. तक्रारदार यांचेकडून विजेचा वापर होऊनदेखील ते कधीही वीज देयक वेळेवर भरत नाहीत. सामनेवाला यांचेकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा गैरफायदा तक्रारदार घेत आहेत. तक्रारदार हे आयोगासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.14 कडे एकूण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.14/1 कडे तक्रारदाराच्या नोटीसला सामनेवाला यांनी दिलेले उत्तर, नि.14/2 कडे तक्रारदाराचे पत्राला सामनेवाला यांनी दिलेले उत्तर, नि.14/3 ते 14/5 कडे बी.आर.इन्फोमेडीया या मीटर रिडींग एजन्सी यांना सामनेवाला यांनी दिलेले पत्र, नि.14/6 कडे तक्रारदार यांचा बील रिव्हीजन रिपोर्ट, नि.14/7 कडे वीज जोडणी संदर्भात स्थळ तपासणी अहवाल, नि.14/8 कडे मीटर रिडींग रिपोर्ट, नि.14/9 कडे कमर्शिअल सर्क्यूलर क्र.243, नि.14/10 कडे तक्रारदारांची वीज जोडणी वर्गीकरण AG to AG Other झालेबाबत Static Data Change ची प्रत. नि.14/11 कडे तक्रारदाराने वीज बील कधी-कधी भरलेबाबतचे Consumer Personal Ledger (CPL) ची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.22कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.24 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.28 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराला चुकीचे बील देऊन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-विवेचन-
6. मुददा क्र.1 :– तक्रारदार यांनी सामनेवाला वीज कंपनीकडून विदुयत कनेक्शन घेतलेले असून ग्राहक क्र.210250008974 असा आहे. सदरची बाब सामनेवाला यांनी मान्य केली आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.26/1 कडे दाखल केलेल्या वीज बीलावर तक्रारदार यांचे नांव असलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. मुददा क्र.2 :– तक्रारदार यांची मौजे सोमेश्वर ता.जि.रत्नागिरी येथील सर्व्हे नं.44 हिस्सा नं.3 येथे मिळकत आहे. सदरहू सर्व मिळकतीची देखभाल, मशागत तक्रारदार यांचे मुखत्यार श्री सुहास भास्कर पटवर्धन करतात. तक्रारदार यांचा शेती व पशुपालनाचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायामधून मिळणा-या उत्पन्नावर तक्रारदार चरितार्थ चालवतात. तक्रारदारांच्या सदर मिळकतीमध्ये पाणी पुरवठा करणेसाठी कृषीपंपाकरिता सामनेवालांकडे वीज कनेक्शनची मागणी केली. सामनेवाला यांनी तक्रारदारास 3 एचपी चा भार मंजूर करुन दि.08/06/2014 रोजी मिटर नं.210250008974 अन्वये वीज कनेक्शन देण्यात आले. सामनेवाला यांचे कार्यालयाकडून मार्च-2017 पासून सदरहू मिटरचे रिडींग न घेता तक्रारदारास 84 युनिट इतके Consumption दाखवून दर महिन्याला वेगवेगळया किंमतीची अव्वाच्या सव्वा बील पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.07/05/2021 रोजी व दि.19/05/2021 रोजी ऑनलाईन तक्रार दाखल केली. वीजेचा जास्त वापर होत नसताना वीज बील कसे येते याबाबत अनेकदा तोंडी तक्रार केली. त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सदरचे मिटर हे कृषी कारणास्तव असल्यामुळे दर तीन महिन्यांनी वीजबीलाची आकारणी होते. सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 या कालावधीकरिता सामनेवाला यांनी सुमारे 20830 युनिट इतके consumption दाखवून तक्रारदार यांना रक्कम रु.1,05,320/- इतक्या रक्कमेचे वीज बील मिटर रिडींग न घेता पाठवले. तक्रारदाराने सामनेवाला मिटर बसवल्यापासून सप्टेंबर-2021 पर्यंतचा बील भरल्याचा सर्व तपशील सामनेवाला कार्यालयातील कर्मचा-यांना दाखवला असता त्यांनी चुक मान्य करुन बीलामधून रक्कम रु.59,260/- इतकी रक्कम वजा करुन रक्कम रु.46,060/- इतकी रक्कम भरण्यास सांगितली. परंतु सदरची रक्कमही जास्त असलेने तक्रारदाराने वीज बील भरण्यास नकार दिला.
8. सदरचे मीटर कृषीपंपाकरिता घेतलेला असल्यामुळे आजतागायत कृषिपंपाकरिताच सदरहू मीटरचा वापर करण्यात येत आहे. सदर मीटरचे ॲव्हरेज सुमार 80 ते 130 युनिटप्रती 3 महिना इतके आहे. सदर वीज बीलाची आकारणी ही 3.23 रुपये प्रती युनिट इतकी वीज बीलात नमुद आहे. जुन-2014 रोजी मीटर घेतेवेळी दर संकेत हा LT IV AG (MTR) 3 HP असा होता. मात्र माहे नोव्हेंबर-2021 रोजी दर संकेत हा LT IV AG (c) AG cold Storage असा संकेत वीजबीलावर दिसून येत आहे. माहे नोव्हेंबर-2021 रोजी पाठविलेले रक्कम रु.46,060/- इतक्या रक्कमेचे अवास्तव बील रदद करुन मीटर योग्य् स्थितीत नसल्यामुळे जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवून तीन महिन्याचे वीज बील काढून त्याच्या वापराची सरासरी काढून त्यानुसार माहे सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 रोजीचे वीज बील आकारणी LT IV AG (MTR) 3 HP दर संकेतानुसार करुन मिळण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाबददल रक्कम रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून मिळावी अशी तक्रारदार यांची मागणी आहे.
9. सामनेवाला यांनी नि.12 कडे दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार, सामनेवाला यांचे ग्राहकांचे मीटर रिडींग मे. बी.आर.इन्फोमेडिया, शॅाप नं.1, एकदंत अपार्टमेंट, साळवी स्टॉप, ता.जि.रत्नागिरी-415639 यांचेकडून घेतले जाते. परंतु सदर एजन्सीने तक्रारदार यांचे मार्च-2017 ते सप्टेंबर-2021 या कालावधीत मीटर रिडींग सामनेवाला कार्यालयाला उपलब्ध करुन दिले नव्हते. त्यामुळे सामनेवाला कार्यालयाने तक्रारदार यांच्या मागील वीज वापराच्या रिडींगवरुन सरासरी वीज देयके तक्रारदार यांना दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने काही अंशी बीलांचा भरणादेखील केलेला असलेचे सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे. तसेच ग्राहकांचे मीटर रिडींग मे. बी.आर. इन्फोमेडिया, यांनी घेतले नाही यात तक्रारदाराचा कोणताही दोष नाही. सदर कंपनीने ग्राहकांचे मिटर रिडींग घेतले नाही तर सामनेवाला कंपनी इतकी वर्षे शांत का बसली याबाबत कोणताही खुलासा सामनेवाला यांनी केला नाही. तसेच सामनेवाला यांना सप्टेंबर-2021 मध्ये तक्रारदाराचे मिटर रिडींग 19732 असलेचे आढळले. त्यानंतर डिफॉल्ट सिस्टिमव्दारे तक्रारदारास रक्कम रु.1,05,320/- इतक्या रक्कमेचे बील पाठविण्यात आले. सदरचे बील चुकीचे पाठविलेचे सामनेवाला यांचे लक्षात आलेवर दि.17/11/2021 रोजी सदर बीलामध्ये माहे सप्टेंबर-2020 आधीच्या युनिटची AG दराप्रमाणे आकारणी करुन रक्कम रु.59,260/- ची वजावट करुन रक्कम रु.46,060/- चे सुधारीत बील तक्रारदारास पाठविलेचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे.
10. तसेच मार्च-2017 ते सप्टेंबर-2021 या कालावधीत एकूण रिडींग 19732 युनिट सामनेवालाने दाखवली आहेत. सदर काळात पावसाळा व पाईप लाईन बंद होती. या कालावधी व्यतिरिक्त वीजवापर त्यात समाविष्ट आहे हे सामनेवालाचे कथन हे आयोग विचारात घेत आहे. सामनेवाला कंपनीने नि.14 कडील अ.क्र.3ते 5 कडे ग्राहकांचे रिडींग घेणा-या एजन्सीला दिलेली पत्रे दाखल केलेली आहेत. सदर वीजबीले तयार करताना काही तांत्रिक बाबीमुळे अडचण येवू शकते ही बाब गृहीत धरली आहे. परंतु यामुळे तक्रारदाराचे नुकसान होत आहे असा युक्तीवाद तक्रारदाराचे वकीलांनी केला आहे.
11. सामनेवाला यांनी तक्रारादाराचे मीटर रिडींग घेतलेले नाही व सरासरीनुसार तक्रारदाराला वीज बील दिले ही बाब स्पष्टपणे मान्य केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वीज कनेक्शन खंडीत केलेले नाही ही बाबही तक्रारदारास मान्य व कबूल आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीने दाखल केलेला मीटर टेस्टींग रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. परंतु त्यांनी केव्हाही तो वरिष्ठांकडे किंवा सक्षम व्यक्तीकडे आव्हानीत केलेला नाही. त्यामुळे सामनेवालाचे कथन अमान्य करता येणार नाही.
12. तक्रारदारांचा वीज वापर हा फळे, भाज्या, पशूपालन इत्यादीकरिता होत असल्याने सप्टेंबर-2020 मध्ये त्यांची वर्गवारी AG to AG Other (LT IV (c)) अशी करण्यात आली असे सामनेवाला यांनी कथन केले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून वीजेचा वापर होऊनदेखील वीज देयक वेळेवर भरली नसलेचे कथन केले आहे. शेवटचे बील 24/01/2022 भरलेले असून त्यानंतर आजअखेर तक्रारदाराने वीज देयक भरलेले नाही. तसेच तक्रारदाराचे वीज कनेक्शन सुरु असून अदयाप वीज पुरवठा खंडीत केलेला नाही ही बाब स्पष्ट होते. परंतु डिफॉल्ट सिस्टिमव्दारे तक्रारदारास रक्कम रु.1,05,320/- इतक्या रक्कमेचे चुकीचे बील पाठविलेचे सामनेवाला यांचे लक्षात आलेवर दि.17/11/2021 रोजी सदर बीलामध्ये माहे सप्टेंबर-2020 आधीच्या युनिटची AG दराप्रमाणे आकारणी करुन रक्कम रु.59,260/- ची वजावट करुन रक्कम रु.46,060/- चे सुधारीत बील तक्रारदारास पाठविलेचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे.
13. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये The Electricity Act 2003 नुसार कमर्शियल सर्क्यूलर नंबर 243 दि.03/07/2015 नुसार शेती व बागायती शेती असे दोन वेगवेगळे दर संकेत (Tariff) नुसार तक्रारदारांचा वीज वापर हा फळे, भाज्या, पशूपालन इत्यादीकरिता होत असल्याने सप्टेंबर-2020 मध्ये त्यांची वर्गवारी AG to AG Other (LT IV (c)) अशी करण्यात आली. तशी कल्पना तक्रारदारास देण्यात आली होती. त्यानुसार सुधारीत वीज देयक रु.46,060/- भरण्याबाबत तक्रारदारास सांगितले असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या सामनेवालाकडील Consumer Personal Ledger चे अवलोकन करता जुन-2014 ते डिसेंबर-2016 अखेर मिटर व्यवस्थीत असून तक्रारदाराने वीजेचा वापर हा तीन महिन्यांकरिता 80 ते 130 युनिटचे दरम्यान वापर केलेचे दिसून येते. परंतु मार्च-2017 पासून ते जुन-2021 पर्यंत करंट रिडींग 1098 एवढेच दिसून येते तर सप्टेंबर-2021 मध्ये अचानक करंट रिडींग 20830 दिसून येते. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास बसवून दिलेले मिटर माहे सप्टेंबर-2017 पासून नादुरुस्त असलेचे स्पष्ट होते. यावरुन सामनेवाला यांनी चुकीच्या दराने वीज आकारणी करुन जादा रक्कमेचे देयक भरावयास लावून तक्रारदार ग्राहकास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, सामनेवाला यांचा निष्काळजीपणा व बेजबाबदार पणा दिसून येतो. त्याकारणाने मुददा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
14. मुददा क्र.3 :– वरील सर्व विवचेनांचा विचार करता सामनेवालांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळणेस अंशत: पात्र आहेत. सबब माहे नोव्हेबर-2021 रोजी पाठविलेले रक्कम रु.46,060/- इतक्या रक्कमेचे बील रदद करण्यात यावे व सामनेवाला यांनी तक्रारदारास जुन-2014 ते डिसेंबर-2016 अखेर वीज वापराची सरासरी काढून त्याप्रमाणे सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 चे नवीन सुधारीत वीज बील दयावे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास सदरच्या बीलाची आकारणी ही LT IV AG (MTR) 3 HP दर संकेतनुसार करावी. सामनेवाला यांनी तक्रारदारास नवीन मीटर बसवून दयावे व सदर नवीन मीटरचा खर्च तक्रारदाराकडून घ्यावा या निष्कषर्काप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार यांनी शारिरीक व मानसिक त्रासाबददल रक्कम रु.25,000/- ची केलेली मागणी ही अवास्तव व अवाजवी असलेने ती अमान्य करण्यात येते. परंतु तक्रारदार शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
15. मुददा क्र.4 :– वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
(2) सामनेवाला यांनी तक्रारदारास माहे-नोव्हेंबर-2021 रोजी पाठविलेले रक्कम रु.46,060/- इतक्या रक्कमेचे बील रद्रद करण्यात येते. सामनेवाला यांनी तक्रारदारास जुन-2014 ते डिसेंबर-2016 अखेर वीज वापराची सरासरी काढून त्याप्रमाणे सप्टेंबर-2021 ते नोव्हेंबर-2021 चे नवीन सुधारीत वीज बील दयावे.
(3) सामनेवाला यांनी तक्रारदारास नवीन मीटर बसवून दयावे व सदर नवीन मीटरचा येणारा खर्च तक्रारदाराकडून घ्यावा.
(4) तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (र.रुपये दहा हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(र.रुपये पाच हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(5) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(6) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(7) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.