(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी- मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचेतर्फे सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ता नं.1 व 2 यांनी तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे मालकीची शेतजमीन गट नंबर 217/2 क्षेत्र 1 हे 93 आर असून तक्रारकर्ता नं.1 व 2 यांनी सदर शेतजमीनीत ऊस खोडवा असे ऊसाचे पिक उभे केले होते. ऊसास पाणी देण्यासाठी जैन कंपनीचा ठिंबक संच टाकलेला होता व ठिंबकाने पाणी देत होते. तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे ऊसाचे पिक हे संपुर्णपणे परिपक्व झाले होते व ते कारखान्यास जाण्यास तयार झाले होते. असे असताना दिनांक 15.03.2016 रोजी दुपारी 1.00 वाजेच्या सूमारास सामनेवाला यांचे कंपनीच्या बोर्डाच्या रोहित्रा वितरण पेटी म्हणून डी.पी. जवळ झालेल्या शॉर्ट सर्कीटमुळे तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे मालकीचे ऊस खोडवा पिकांस आग लागली व त्या आगीमध्ये तक्रारकर्ताचे संपुर्ण क्षेत्राचे ऊस पिक ठिंबक संचासह जळीत झाले. व त्या आगीमध्ये तक्रारकर्ताचे खूप मोठया नुकसान झाले. तक्रारकर्ताचे जवळपास 4,90,000/- रुपयाचे नुकसान झाले. सामनेवालाचे हलगर्जीपणामुळे नुकसान झाले. सदर घटनेबाबत तक्रारकर्ताने तहसिलदार नेवासा यांना कळविले. सदर घटनेची चौकशी करुन पाहणी करुन, पंचनामा तयार करण्यात आला. सामनेवाला कंपनीचे अधिकारी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली. तक्रारकर्ताचे झालेले नुकसान पाहिले. तक्रारकर्ताने वेळोवेळी सामनेवालाकडे नुकसान भरपाई करता विनंती केली. परंतू नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून तक्रारकर्ताने दिनांक 25.04.2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनसुध्दा सामनेवालाने कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्ताने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्ताचे रु.4,90,000/- नुकसान तसेच तक्रारकर्ताने घेतलेली मेहनत रु.2,00,000/- असे एकूण रु.6,90,000/- नुकसान भरपाई म्हणून सामनेवालाकडून मिळण्यास हुकूम व्हावा. तसेच तक्रारीचा खर्च मिळण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सदर नोटीस प्राप्त होऊनसुध्दा सामनेवाला क्र.1 व 2 हे प्रकरणात हजर झाले नाहीत. म्हणून दिनांक 06.03.2017 रोजी सामनेवाला विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, लेखी युक्तीवाद व तोंडी युक्तीवादावरुन मंचासमक्ष खालील मुद्दे विचारार्थ येतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारकर्ता नं.1 व 2 हे सामनेवाला क्र.1 व 2 चे “ग्राहक” आहेत काय.? | ... नाही. |
2. | सदर तक्रार चालविण्यास या मंचाला अधिकारक्षेत्र आहे काय.? | ... नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
6. मुद्दा क्र.1 – तक्रारकर्ताने तक्रारीत असे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे नावाने शेतजमीन आहे. त्या शेतजमीतीत तक्रारकर्ताने ऊसाचे पिक लावलेले होते व ते परीपक्व झाले. दिनांक 15.03.2016 रोजी दुपारी 1.00 वाजता सामनेवाला यांचे कंपनीचे बोर्डाच्या रोहित्रा वितरण पेटी म्हणून डी.पी. जवळ असलेल्या शॉर्ट सर्कीटमुळे तक्रारकर्ताचे पिकास आग लागली, ऊसाचे शेतीमध्ये आग लागली व त्याचे ठिंबक संचासह जळीत झाले. तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे जवळपास 4,90,000/- नुकसान झाले. सदर तक्रारीत तक्रारकर्ता नं.1 व 2 यांनी पुर्ण तक्रारीत ते सामनेवालाचे कसे ग्राहक आहेत या संदर्भात काहीही नमुद केलेले नाही. तक्रारकर्ता नं.1 व 2 सदर तक्रारीत किंवा शपथपत्राव्दारे ते सिध्द करु शकले नाही की, तक्रारकर्ता नं.1 व 2 यांचे सामनेवाला सोबत ग्राहक नाते आहे, तसेच त्यासंदर्भात काहीएक वर्णन तक्रारीमध्ये व शपथपत्रात नमुद करण्यात आले नाही. म्हणून तक्रारकर्ता नं.1 व 2 हे सामनेवालेचे ग्राहक नाहीत असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.2 – तक्रारकर्ता नं.1 व 2 चे शेतीचे नुकसान सामनेवालाचे डी.पी.मध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागल्यामुळे तक्रारकर्ता नं.1 व 2 हे सामनेवालाचे ग्राहक होत नाहीत असे सिध्द झाल्यावर सदर नुकसानीची तक्रार चालविण्यास या मंचाला अधिकारक्षेत्र नाही असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
8. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्तां नं.1 व 2 ची तक्रार खारीज करण्यात येते.
2. उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3. तक्रारकर्ता नं.1 व 2 यांना न्यायाचे दृष्टीने योग्य न्यायालयात नुकसान मिळणेकरीता तक्रार दाखल करण्यास परवानगी देण्यात येते.
4. या आदेशाची प्रथम प्रत उभयपक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
5. तक्रारकर्तां यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.