( आदेश पारित द्वारा मा. अध्यक्षा, श्रीमती रोहिणी दि. कुंडले)
-- आदेश --
( पारित दि. 22 नोव्हेंबर, 2012)
1. तक्रार अतिरिक्त विद्युत बिलाबद्दल दाखल आहे. तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याला एप्रिल 2011 मध्ये 734 युनिटचे `18,000/- चे बिल आले. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, मार्च/एप्रिल 2011 मध्ये तक्रारकर्ता बाहेरगांवी गेला होता. त्यामुळे वीज वापर कमी झाला, म्हणून विरूध्द पक्ष यांनी दिलेले या काळातील बिल तक्रारकर्त्याला मान्य नाही. एरवी नेहमी सुध्दा तक्रारकर्त्याला 50 ते 80 युनिटचेच बिल येते असेही तक्रारकर्ता म्हणतो. तक्रारकर्त्याने एप्रिल 2011 पर्यंतची सर्व बिले भरली आहेत.
3. पुढे तक्रारकर्ता म्हणतो की, अतिरिक्त बिलाबद्दल जून 2011 मध्ये विरूध्द पक्ष यांच्याकडे अर्ज केला. त्यावर विरूध्द पक्ष यांनी कारवाई केली नाही.
4. विरूध्द पक्ष यांच्या सल्ल्यावरून तक्रारकर्त्याने दिनांक 22/11/2011 रोजी `100/- फी मीटर टेस्टींगसाठी भरली.
5. विरूध्द पक्ष यांनी दिनांक 15/06/2011 रोजी मीटर बदलून (Replace) दिले असे तक्रारकर्ता म्हणतो. मीटर बदलतांना कोणतेही नियम पाळले नाही. मीटर बदलण्याची तक्रारकर्त्याची मागणी नव्हती.
6. जुन्या मीटरचा टेस्ट रिपोर्ट दिनांक 01/12/2011 रोजी प्राप्त झाला. त्यात मीटर सदोष (Faulty) नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तक्रारकर्त्याला हा रिपोर्ट मान्य नाही.
7. दिनांक 09/03/2012 रोजी तक्रारकर्त्याने `20,250/- चे बिल under protest भरले असे तक्रारकर्ता म्हणतो. हे बिल कमी करून देण्याची मागणी तक्रारकर्त्याने अनेकवेळा केली. त्याची दखल विरूध्द पक्ष यांनी घेतली नाही. शेवटी वीज कापली जाईल या भीतीने व तशी धमकी विरूध्द पक्ष देत असल्याने तक्रारकर्त्याने नाईलाजाने बिल भरले असे तो म्हणतो.
8. CPL (वैयक्तिक लेजर) वरून तक्रारकर्त्याचा वीज वापर 50 ते 90 युनिटच्याच दरम्यान असतो असे सिध्द होते असे तक्रारकर्ता म्हणतो. CPL रेकॉर्डवर आहे.
9. तक्रारकर्त्याचे घर फक्त 2 खोल्यांचे आहे. तो गरीब आहे. त्यामुळे 734 युनिटचे `1,800/- चे वीज बिल भरण्यास असमर्थ आहे.
10. दिनांक 24/04/2012 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा विरूध्द पक्ष यांच्याकडे जुन्या मीटरच्या टेस्टींगसाठी इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर कडे अर्ज केला (डॉक्यु.5)
11. वीज वापर केलेला नसतांना अतिरिक्त बिल देणे आणि मागणी नसतांना मीटर बदलणे या विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी आहेत.
12. तक्रारकर्त्याला त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास झाला.
13. तक्रारकर्त्याची मागणीः-
- `12,000/- ची अतिरिक्त भरलेली रक्कम समायोजित करून मिळावी.
- जास्तीच्या भरलेल्या बिलाच्या रकमेवर 18% व्याज मिळावे.
- `15,000/- शारीरिक, मानसिक त्रासाची नुकसानभरपाई मिळावी.
- तक्रार खर्च `5,000/- मिळावा.
14. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत 5 दस्त दाखल केले आहेत.
15. विरूध्द पक्ष यांचे उत्तर थोडक्यात खालीलप्रमाणेः-
16. विरूध्द पक्ष नियमाप्रमाणे तक्रारकर्त्याकडून बिल वसूल करतात. मीटर रिडींगच्या आधारे वीज वापर निश्चित होत असतो. मार्च/एप्रिल 2011 मध्ये तक्रारकर्त्याचा वीज वापर 734 युनिट एवढा नोंदला गेला. त्याचे `20,250/- चे बिल भरण्यास तक्रारकर्ता बाध्य ठरतो.
17. तक्रारकर्त्याला जुन्या मीटरची 734 युनिटची नोंद मान्य नसल्याने जुने मीटर बदलून नवीन लावण्यात आले. जुने मीटर टेस्टींगसाठी लॅबमध्ये टेस्ट केले असता ते Faulty नसल्याचा अहवाल प्राप्त झाला (दि. 01/12/2011). यावरून जुन्या मीटरची 734 युनिटच्या प्रत्यक्ष वीज वापराची नोंद बरोबर आहे असे सिध्द होते.
18. तक्रारकर्त्याने स्वतंत्रपणे दिनांक 24/04/2011 रोजी इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टरकडे जुन्या मीटरच्या तपासणीसाठी अर्ज केल्याची माहिती विरूध्द पक्ष यांना नाही असे ते म्हणतात.
19. तक्रारकर्त्याचे सर्व आरोप विरूध्द पक्ष यांना अमान्य आहेत. सेवेत त्रुटी नसल्याने तक्रार खर्चासहित खारीज करण्याची विनंती विरूध्द पक्ष करतात.
20. मंचाने दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला व रेकॉर्डवरील सर्व दस्त तपासले. त्यावरून मंचाची निरीक्षणे व निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत.
- निरीक्षणे व निष्कर्ष -
21. तक्रारकर्त्याने त्याला दिलेल्या मार्च/एप्रिल 2011 च्या एकूण 734 युनिटच्या `20,250/- बिलाबद्दल आक्षेप घेतला आहे. हे जुने मीटर बदलून त्या जागी विरूध्द पक्ष यांनी नवीन मीटर लावून दिले. त्याबद्दलही तक्रारकर्त्याला हरकत आहे. जुने मीटर विरूध्द पक्ष यांनी लॅबमध्ये टेस्ट केले. ते सदोष नसल्याबद्दल दिनांक 01/12/2011 रोजीचा अहवाल सुध्दा तक्रारकर्त्याला मान्य नाही.
22. तक्रारकर्त्याला नक्की काय म्हणावयाचे आहे हे स्पष्ट होत नाही. मीटरमध्ये दोष आहे असे गृहित धरून 734 युनिटचा मार्च/एप्रिल 2011 चा वीज वापर तक्रारकर्ता अमान्य करतो. त्यासाठी कोणताही तांत्रिक आधार नाही असे मंच मानते.
23. याउलट जुने मीटर लॅबमध्ये रितसर तपासणी केल्यावर तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याचा निर्वाळा विरूध्द पक्ष यांनी दिला यामध्ये मंचाला तथ्य वाटते.
24. याउपरही तक्रारकर्त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने दिनांक 24/04/2011 रोजी विरूध्द पक्ष यांची स्वतंत्र यंत्रणा असलेल्या इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टरकडे अर्ज केला व जुन्या मीटरच्या तपासणीची रितसर मागणी केली. याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
25. म्हणून मंचाचा निष्कर्ष आहे की, हा अहवाल प्राप्त होईपर्यंत तक्रारकर्त्याने वाट पहावी. वादाच्या निराकरणासाठी एका फोरमची (इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर) निवड केल्यानंतर तो निर्णय येण्यापूर्वीच पुन्हा दुस-या फोरमकडे (ग्राहक मंच) धाव घेणे याला Forum hopping म्हणतात. कायद्यामध्ये ते निषिध्द ठरते.
26. सबब या तक्रारीच्या मेरीटवर कोणतेही finding न देता हे मंच तक्रार निकाली काढते.
सबब आदेश
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात मतप्रदर्शन न करता निकाली काढण्यात येते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.