(आदेश पारीत व्दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्यक्ष)
1. तक्रारकर्तीने सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्तीने सामनेवालाकडून त्यांचे घराचे वापराकरीता विद्युत पुरवठा घेतलेला आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 850710236309 असा आहे. तक्रारकर्तीचा नियमितपणे वापर 100 ते 150 युनिट दरमहा होता. सामनेवालाने माहे ऑक्टोबर 2016 चे वापराकरीता वापरलेले विज देयकामध्ये मिटर नादुरुस्त (Faulty) अशी नोंद घेऊन त्याचा वापरलेले युनिट 368 असे दाखवून त्याकरीता रक्कम रुपये 390/- ची मागणी करण्यात आली. सदरचे विज देयक तक्रारकर्तीने भरले व मिटर नादुरुस्त असल्याचे सामनेवाला यांना तोंडी कळविले. त्यानंतर माहे नोव्हेंबर 2016, डिसेंबर 2016, माहे जानेवारी 2017, फेब्रुवारी 2017, मार्च 2017, एप्रिल 2017 व मे 2017 या कालावधीकरता विज देयक हे फॉल्टी रिडींग आर.एन.ए. (मिटर रिडींग नसतांना) असे दाखवून अवास्तव देयक पाठविण्यात आले. मे 2017 मध्ये वापरलेले विज 2255 युनिट दाखवून रक्कम रुपये 22,780/- भरण्याबाबत तक्रारकर्तीला कळविले. सामनेवाले दिनांक 14.06.2017 रोजी तक्रारकर्तीचे मिटर बदलून गेले. व तक्रारकर्तीला स्लॅब बेनिफिट असा शेरा मारुन दिला. नविन मिटर बसविल्यानंतर मे 2017 या कालावधीकरीता पाठविलेल्या विज देयकाप्रमाणे रुपये 22,780/- ऐवजी रक्कम रुपये 12,040/- तक्रारकर्तीस भरावयास सांगितले. तसेच सदरचे देयक न भरल्यास विज पुरवठा खंडीत करण्यात येईल असा दम दिला. सामनेवाला यांना वेळोवेळी मिटर नादुरुस्तीबाबत कळविले असून ते दुरुस्त केले नाही किंवा बदलून दिले नाही. अयोग्य देयक मे 2017 मध्ये पाठवून तक्रारकर्तीचा विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली, ही बाब सामनेवाला यांचे तक्रारकर्तीप्रति अनुचित व्यवहार प्रथेचा अवलंबना आहे. म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
3. तक्रारकर्तीने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाला यांनी तक्रारकर्तीचे सप्टेंबर 2016 पुर्वीचे येणारे विज देयक सरासरीप्रमाणे सरासरी विज बिल आकारुन रक्कम स्विकारावी. तसेच नादुरुस्त मिटरचा भुर्दंड तक्रारकर्तीला देऊ नये. तसेच तक्रारकर्तीस शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा.
4. तक्रारकर्तीची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्यात आली. सदरहू नोटीस प्राप्त झाल्यावर सामनेवाला प्रकरणात हजर झाले नसल्याने दिनांक 18.01.2018 रोजी निशाणी क्र.1 वर सामनेवाला यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
5. तक्रारकर्तीची दाखल तक्रार, दस्तावेज व सामनेवालाचे दस्तावेज व तक्रारकर्तीचा तोंडी युक्तीवादावरुन खालील निष्कर्षाप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
निष्कर्ष
6. तक्रारकर्तीने सामनेवालाकडून विद्युत पुरवठा घेतला होता ही बाब तक्रारकर्तीने दाखल दस्तावेजावरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्ती ही सामनेवालाचा “ग्राहक” आहे असे सिध्द होते.
7. तक्रारकर्तीला ऑक्टोंबर 2016 ते मे 2017 पर्यंत फॉल्टी मिटर दर्शवून सरासरी विज देयक सामनेवालाने दिले आहे ही बाब तक्रारकर्तीने दाखल दस्तावेज व देयकावरुन सिध्द होते. तक्रारकर्तीचा दिनांक 14.06.2017 रोजी मिटर बदलण्यात आला व तक्रारकर्तीला स्लॅब बेनिफिट मिळण्यात यावा असा दिनांक 29.05.2017 रोजीचे देयकामध्ये शेरा मारण्यात आला आहे असे सिध्द होते. सामनेवालाने तक्रारकर्तीला 29.05.2017 चे विज देयक योग्य दिले व सामनेवालाने तक्रारकर्तीला मिटर बदली करण्यास झालेल्या विलंबाबाबत स्लॅब बेनिफिट दिला ही बाब देयकावरुन सिध्द होते. परंतू सामनेलाने तक्रारकर्तीचे वांरवार मिटर बदलून देण्याचे विनंतीस दुर्लक्ष केले ही बाब सामनेवालाने तक्रारकर्तीप्रति न्यूनत्तम सेवा दर्शविते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अं ति म आ दे श –
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवालाने दिलेले दिनांक 29.05.2017 चे विज देयक योग्य आहे व त्यात देण्यात आलेले स्लॅब बेनिफिट योग्य आहे असे घोषीत करण्यात येते.
3. सामनेवालाने तक्रारकर्तीचे विज मिटर योग्य वेळी बदलून दिलेले नाही, त्यामुळे तक्रारकर्तीस झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्कम रु.दहा हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.2,500/- (रक्कम रु.दोन हजार पाचशे फक्त ) सामनेवालाने तक्रारकर्तीला द्यावे.
4. सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
6. तक्रारकर्तीस या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.