निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) वीज वितरण कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिने गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून ग्राहक क्रमांक 490011662771 द्वारे वीज जोडणी घेतली आहे. दिनांक 28/12/2009 रोजी वीज वितरण कंपनीने तिला रक्कम रु 43720/- चे देयक दिले. वीज वितरण कंपनीने दिलेले मीटर फॉल्टी असून ते बदलून मिळावे म्हणून मागणी करुनही वीज वितरण कंपनीने मीटर बदलून दिले नाही आणि चुकीचे देयक दिले. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, डिसेंबर 2009 मध्ये दिलेले देयक कमी करुन द्यावे तसेच मीटर बदलून मिळावे व नुकसान भरपाई देण्यात यावी. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराला दिनांक 28/12/2009 रोजी देण्यात आलेल्या देयकामध्ये रु 32945.76 मागील बाकी असून रु 10217.30 थकबाकीचे व्याज आहे. तक्रारदाराने दिनांक 11/8/2007 रोजी रु 1525.00 भरले. त्यानंतर तिने आजतागायत कोणतीही रक्कम भरली नाही. तक्रारदाराला जास्त रकमेचे देयक देण्यात आलेले नसून थकबाकीमुळे देयकाची रक्कम जास्त झाली आहे. तक्रारदाराला मीटर बदलून देण्यात आलेले असून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी वीज वितरण कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय? होय. 2. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- तक्रारदार हजर नाही. गैरअर्जदार वीज वितरण कंपनीच्या वतीने अड दुसाने आर.टी. यांनी युक्तीवाद केला. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला डिसेंबर 2009 मध्ये रक्कम रु 43720.47 चे देयक दिले होते याविषयी वाद नाही. तसेच तक्रारदाराने दिनांक 11/8/2007 रोजी रु 1525 भरल्यानंतर आजपर्यंत वीज वितरण कंपनीकडे कोणतीही रक्कम भरलेली नाही, ही बाब सीपीएल (नि.6/1) वरुन स्पष्ट दिसून येते. परंतु वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला फेब्रूवारी 2008 ते डिसेंबर 2008 या कालावधीमध्ये चुकीच्या सरासरीनुसार देयके आकारल्यामुळेच तक्रारदाराकडील थकबाकी वाढल्याचे दिसुन येते. वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला मे 2007 पासुन डिसेंबर 2008 पर्यंत प्रत्यक्ष मीटर रिडींगनुसार देयके न देता सरासरीनुसार देयके दिली. सरासरीनुसार देयके देताना वीज वितरण कंपनीने जून 2007 व ऑक्टोबर 2007 ते जानेवारी 2008 या महिन्यामध्ये 25 युनीट सरासरी वीज वापरानुसार देयके दिली. परंतु फेब्रूवारी 2008 ते डिसेंबर 2008 या महिन्यांमध्ये सरासरी 240 युनीट प्रतिमाह वीज वापरानुसार तक्रारदाराला देयके देण्यात आली. तक्रारदाराला 25 युनीट प्रतिमाह सरासरीनुसार काही महिने देयके दिल्यानंतर अचानक 240 युनीट प्रतिमाह सरासरी वीज वापरानुसार देयके देण्याचे काय कारण आहे याबाबत वीज वितरण कंपनीने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. जून 2008 ते जानेवारी 2008 या कालावधीत तक्रारदाराचा 25 युनीट सरासरी वीज वापर दर्शविल्यानंतर तो वीज वापर अचानक 10 पट वाढवून फेब्रूवारी 2008 पासून 240 युनीट दर्शविण्यामागचे तत्व काय याचा काहीही खुलासा न करता वीज वितरण कंपनीने देयकाची आकारणी करणे योग्य ठरत नाही. तसेच वीज वितरण कंपनीला दीड ते दोन वर्ष सतत सरासरीनुसार देयकाची आकारणी करण्याचा अधिकार नाही. वीज वितरण कंपनीने जानेवारी 2009 मध्ये तक्रारदाराच्या मीटर मधील रिडींग नोंदल्याचे सीपीएल (नि.6/1) वरुन दिसते. परंतु फेब्रूवारी 2009 मध्ये 359 युनीटचे समायोजन कशामुळे करण्यात आले व तेवढा वीज वापर अतिरिक्त दर्शवून 636 युनीटसाठी देयकाची आकारणी कशामुळे करण्यात आली याचा देखील खुलासा वीज वितरण कंपनीने केला नाही. फेब्रूवारी 2009 मधील रिडींग जर 278 असेल आणि जानेवारी 2009 मधील सुरुवातीची रिडींग 1 असेल तर जानेवारी 2009 व फेब्रूवारी 2009 या दोन महिन्यातील तक्रारदाराचा वीज वापर केवळ 277 युनीट होतो. परंतु सीपीएल (नि.6/1) पाहता वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा या दोन महिन्यातील वीज वापर 866 युनीट दर्शविल्याचे दिसते. त्याचप्रमाणे मार्च 2009 मधील सुरुवातीची रिडींग 278 अशी होती व जून 2009 मधील शेवटची रिडींग 327 अशी होती म्हणजे मार्च 2009 ते जून 2009 या कालावधीतील तक्रारदाराचा वीज वापर केवळ 49 युनीट झालेला होता. परंतु वीज वितरण कंपनीने तक्रारदाराचा या कालावधीतील वीज वापर 305 युनीट दर्शविलेला आहे. अशाप्रकारे वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला वेळोवेळी चुकीच्या पध्दतीने वीज वापर दर्शवून देयके दिल्याचे सीपीएल (नि.6/1) वरुन दिसून येते. वीज वितरण कंपनीने तक्रारदारास योग्य मीटर रिडींग न नोंदविता अत्यंत मनमानीपणे चुकीची देयके देऊन निश्चितपणे त्रुटीची सेवा दिली आहे. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रर मंजूर करण्यात येते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला डिसेंबर 2009 मध्ये दिलेले रक्कम रु 43720.71 चे देयक रद्द करण्यात येते व त्यामुळे सदर देयकाच्या अनुषंगाने पुढील कालावधीत दर्शविलेली थकबाकी आपोआपच रद्द होते.
- गैरअर्जदार वीज वितरण कंपनीने तक्रारदाराला फेब्रूवारी 2008 ते डिसेंबर 2008 या कालावधीसाठी प्रतिमाह फक्त 25 युनीट सरासरीनुसार वीज देयकाची आकारणी करावी तसेच जानेवारी 2009 ते मार्च 2010 या कालावधीसाठी 683 युनीट वीज वापराची प्रतिमाह समान विभागणी करुन सुधारीत देयके निकाल कळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावीत.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |