::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/08/2015 )
आदरणीय अध्यक्षा, सौ.एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणातील मजकूर, थोडक्यात आढळून येतो तो येणेप्रमाणे,
तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचे विदयुत मिटर हे घरगुती वापराचे असून त्याचा पुरवठा क्र. 326030100550 हा आहे. तक्रारकर्त्याने विज पुरवठा सन 2003-04 मध्ये उपलब्ध करुन घेतला, तेंव्हापासून वीज देयक नियमीत भरत आहे. तक्रारकर्त्याचा वीज पुरवठा महिन्यात 4-5 वेळा रात्री अपरात्री खंडीत होत होता. सदर प्रकार दिड महिन्यापासून घडत होता. त्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 21/02/2014 ला कनिष्ठ अभियंता, देखभाल व दुरुस्ती यांना कळविले तसेच त्यापुर्वी सुध्दा फॉल्ट रजिष्टरला नोंद आहे. तक्रारकर्त्याचा व 4-5 घरांचाच विद्युत पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे घरातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, दवाखाना, कॉंम्प्युटर वर्ग, शिकवणी वर्ग यांचे नुकसान होत होते. त्यावर दोष निवारणाची कार्यवाही झाली नाही. तसेच दिनांक 27/02/2014 ला घरगुती मिटर जवळ MCB ही जळाल्यामुळे तक्रारकर्त्याने स्वखर्चाने ती आणून बसविली, हयाचा दिनांक 26/02/2014 ला पंचनामा केला. तक्रारकर्त्याने लोकशाही दिनी तक्रार करुन त्यात वरीलप्रमाणे तक्रारी कथन केल्या आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीवर कार्यवाहीकेली नाही. दरम्यानच्या काळात तक्रारकर्त्याची पत्नी आजारी असल्यामुळे व नेब्युलाईझर मशिनचा श्वासोश्वासा करिता वापर करता आला नाही व शेवटी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. दिनांक 21/03/2014 ला विद्युत दाब वाढल्यामुळे तक्रारकर्त्याच्या घरगुती उपकरणाचे नुकसान झाले. त्या नुकसानीची सुध्दा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास माहिती दिली. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या या सर्व तक्रारी त्यांना प्राप्त होऊनही त्याची दखल घेतली नाही व विरुध्द पक्षाने त्यांच्या सेवेत हलगर्जीपणा केला.
त्यामुळे तक्रारकर्त्याने ही तक्रार दाखल करुन, विनंती केली की, तक्रारअर्ज मंजूर व्हावा, तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाकडून शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 50,000/- ( रुपये पन्नास हजार ) देण्याचा आदेश व्हावा. विरुध्द पक्षाने कोणत्याही रितीने तक्रारकर्त्याची विद्युत जोडणी बंद करु नये, तसेच तक्रारीचा खर्च मिळावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत अनुक्रमणीका यादी निशाणी-3 प्रमाणे एकुण 18 दस्तऐवज पुरावे म्हणुन जोडलेले आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी निशाणी-12 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब / लेखी युक्तिवाद सादर केला. त्यानुसार तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबूल केली व नमुद केले की, तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याचा विद्युत पुरवठा रात्री अपरात्री खंडीत होत होता तसेच असा प्रकार दिड महिन्यापासून चालू होता, हे म्हणणे चुकीचे आहे. सदरहू कॉलनीमधील विद्युत पुरवठा नियमीत असतो. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द दिलेल्या संपूर्ण तक्रारी हया खोटया व खोडसाळपणाच्या आहेत. तक्रारकर्त्याने नियमीत विद्युत रक्कमेचा भरणा न केल्यास त्याचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा आदेश, वि. न्यायालयाने द्यावा. त्यामुळे विरुध्द पक्ष यांना तक्रारकर्त्याकडून रुपये 50,000/- देण्याचा आदेश व्हावा.
3) कारणे व निष्कर्ष -
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार व सोबत दाखल केलेले दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 चा संयुक्तीक लेखी जबाब, तक्रारकर्त्याची पुर्सीस, पुरावा, तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद व विरुध्द पक्षाचा लेखी युक्तिवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन पुढील निष्कर्ष कारणे देऊन पारित केला तो येणेप्रमाणे . . . .
तक्रारकर्त्याने असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्ता हा म.रा.वि.वि. कंपनी मर्यादीत, वाशिम यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याकडील विद्युत पुरवठा हा सन 2014 मध्ये महिन्यातून 4-5 वेळेस रात्री अपरात्री खंडित होत होता. तसेच सदर प्रकार हा दिड महिन्यापासून सतत घडत होता. म्हणून तक्रारकर्त्याने लेखी तक्रार दिनांक 21/02/2014 रोजी विरुध्द पक्षाकडे केली. तसेच फॉल्ट रजिस्टरला नोंद केली. तक्रारकर्त्याचा व 4-5 घरांचाच विद्युत पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे घरातील विद्यार्थ्यांचा अभ्यास, इतर ग्राहकांचा दवाखाना, कॉंम्प्युटर वर्ग, शिकवणी वर्ग यांचे नुकसान होत होते. विरुध्द पक्षाने सदर फॉल्टची दुरुस्ती न केल्यामुळे मिटर जवळील MCB जळाला. सदर MCB हा विरुध्द पक्षाचा असला तरी विरुध्द पक्षाने कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे तक्रारकर्ते व इतर नागरिकांनी तो आणून बसविला. त्याबददलची तक्रार तक्रारकर्त्याने लोकशाही दिनी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. परंतु विरुध्द पक्षाने सदर फॉल्टची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा याबाबत विरुध्द पक्षाकडे तक्रारी केल्या. दिनांक 06/03/2014 रोजी वादळवा-यामुळे सिमेंटचा पोल तुटून पडला व तक्रारकर्त्याच्या घराजवळचा पोल वाकला, ही देखील तक्रार विरुध्द पक्षाने दूर केलेली नाही. त्यामुळे ही विरुध्द पक्षाची सेवेतील न्यूनता ठरते. तक्रारकर्त्याच्या हया युक्तिवादावर विरुध्द पक्षाने जो लेखी जबाब दिला आहे, त्यात तक्रारकर्ता हा ग्राहक आहे, हे मान्य केले. परंतु त्यालाच लेखी युक्तिवाद स्विकारल्यामुळे निर्णय देतांना, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब विचारात घेतला.
विरुध्द पक्षाने लेखी जबाबात कोणताही बचाव घेतलेला नाही. याउलट विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांचा लेखी जबाब हा फक्त डिनायलच्या स्वरुपात आहे. त्यामुळे कायदयातील तरतुदीनुसार असा जबाब लेखी जबाब होऊ शकत नाही.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या सर्व तक्रार अर्जावरुन असा बोध होतो की, त्याच्याकडील विदयुत पुरवठा रात्री अपरात्री दिड ते दोन महिन्यापासून खंडीत होत होता. त्याची नोंद तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडील फॉल्ट रजिष्टरला दिली होती, असा बोध सुध्दा सदर अर्जातून होतो.तसेच विरुध्द पक्षाची MCB ही जळाल्यामुळे तक्रारकर्त्याने स्वखर्चाने ती आणून बसविल्याचे दिनांक 26/02/2014 च्या पंचनाम्यावरुन समजते. तसेच तक्रारकर्त्याच्या घराजवळचा विजेचा सिमेंट पोल वाकलेला आहे, अशी देखील तक्रारकर्त्याची तक्रार आहे. तक्रारकर्त्याने मा. जिल्हाधिकारी व तहसिलदार, वाशिम यांच्याकडे लोकशाही दिनी तक्रार करुन त्यात वरीलप्रमाणे तक्रारी कथन केलेल्या आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी ही तक्रार विरुध्द पक्षाकडे कार्यवाहीसाठी पाठविलेली होती, असे देखील या अर्जावरुन कळते. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या या सर्व तक्रारी त्यांना प्राप्त होऊनही त्याची दखल घेतल्याचे कुठेही आढळत नाही. शिवाय तक्रारकर्त्याच्या या सर्व तक्रारीपोटी विरुध्द पक्षाने कोणती कार्यवाही केली, याबद्दलचा ऊहापोह त्यांनी त्यांच्या लेखी जबाबात सुध्दा कथन केला नाही. यावरुन, विरुध्द पक्षाने त्यांच्या सेवेत हलगर्जीपणा केला हे सिध्द होते. तक्रारकर्त्याने तक्रारीत मागीतलेली नुकसान भरपाई देता येणार नाही, कारण ती त्यांनी त्यांच्या एरियातील इतरही ग्राहकांतर्फे मागीतलेली आहे असे दिसते, परंतु ते ग्राहक या तक्रारीमध्ये तक्रारदार नाहीत. तसेच स्वत:चे नुकसान किती झाले याबद्दलचे दस्तऐवज रेकॉर्डवर दाखल नाही. म्हणून यथायोग्य नुकसान भरपाई तथा तक्रारकर्त्याच्या सर्व तक्रारींचे निवारण विरुध्द पक्षाने करावे, असे आदेश पारित केल्यास, ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
:: अंतीम आदेश ::
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक वा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याच्या तक्रार अर्जातील सर्व तक्रारींचा निपटारा करावा, व तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी व प्रकरणाचा न्यायिक खर्च मिळून रुपये 8,000/- ( रुपये आठ हजार फक्त ) इतकी रक्कम द्यावी..
3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी या आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे.
4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri