::: आ दे श :::
( पारित दिनांक : 23/11/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता यांचा, पुसद नाका, वाशिम येथे ‘‘ दत्तात्रय वेल्डींग वर्क्स ’’ नावाने वेल्डींगचा व्यवसाय आहे. या दुकानात विद्युत मिटर असून, तक्रारकर्त्याचा ग्राहक क्र. 326010081419 व मिटर क्र. 5309272109 हा आहे. तक्रारकर्त्याला सुरुवातीपासुनच अनियमितपणे विज देयके देण्यात येत होती व दरमहा मिटरचे रिडींगही घेण्यास कोणीही येत नव्हते. त्याबाबत तक्रारकर्त्याने अनेकदा विरुध्द पक्षाकडे तोंडी तक्रारी केल्या, परंतु त्याकडे दूर्लक्ष केले. तक्रारकर्त्याला देण्यात येणारी देयके ही RNA असे दाखवत प्रती माह 113 युनिट प्रमाणे देण्यात आलेली आहेत. त्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 05/10/2011 रोजी रिसतर तक्रार अर्ज केला होता, परंतु त्यावर विरुध्द पक्षाने कार्यवाही केलेली नाही. पुढे माहे नोव्हेंबर 2013 मध्ये जुने मिटर विरुध्द पक्ष यांनी बदलले, परतु त्यानंतरही विद्युत देयके ही RNA असे दाखवत, प्रती माह 113 युनिट प्रमाणे देण्यात आलीत. तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल न घेता, उलटपक्षी विरुध्द पक्ष यांनी निव्वळ थकबाकी रक्कम रुपये 61,140/- तक्रारकर्त्याने भरावी असे सांगत हातानेच लिहलेले विद्युत देयक दिले. त्यानंतर विरुध्द पक्षाने देयक दिनांक 03/02/2015 प्रमाणे तक्रारकर्त्यास माहे डिसेंबर 05, 2014 ते जानेवारी 05, 2014 चे देयक रुपये 71,620/- दिले व त्यात निव्वळ थकबाकी रक्कम रुपये 62,206/- ही चुकीची दर्शविलेली होती. ऊपरोक्त देयकाबाबत विरुध्द पक्षाने दिनांक 20/02/2015 रोजीची नोटीस तक्रारकर्त्यास दिली व त्या नोटीसमध्ये देयक रक्कम 15 दिवसाचे आत न भरल्यास, विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल, असे नमुद केले आहे. त्याबाबत तक्रारकर्त्याने दिनांक 26/02/2015 व 02/03/2015 रोजी देयक दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज सादर केले, परंतु विरुध्द पक्षाने काहीही कळविले नाही. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या पत्रव्यवहाराची दखल न घेतल्यामुळे, तक्रारकर्त्यास मनस्ताप, मानसिक, शारीरिक त्रास व आर्थिक हानी होत आहे. विरुध्द पक्षाने सेवा देण्यात उणीव केलेली आहे. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचामध्ये दाखल करुन, विरुध्द पक्षाकडून नुकसान भरपाईची मागणी करुन, विनंती केली ती खालीलप्रमाणे . .
विनंती – तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज मंजूर व्हावा आणि विरुध्द पक्षाने दिनांक 03/02/2015 रोजी दिलेले देयक रुपये 71,620/- त्रुटीयुक्त प्रदान केलेले आहे, असे घोषीत व्हावे. सदर देयक रद्द करुन, नियमाप्रमाणे नवीन देयक देण्याचा विरुध्द पक्षास आदेश व्हावा. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला जास्तीचे दिलेले विज देयक रुपये 61,140/- गैरकायदेशिर असून ते तक्रारकर्त्यास बंधनकारक नाही, असा आदेश पारित करण्यात यावा. विरुध्द पक्षाने त्रुटीयुक्त सेवा प्रदान केल्यामुळे तक्रारकर्त्यास नुकसान भरपाई रुपये 20,000/- मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- नुकसान भरपाई देण्यात यावी. तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा व तक्रारकरर्त्याच्या हितामध्ये योग्य ती ईष्ट अशी दाद देण्यांत यावी.
तक्रारकर्त्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यास मनाई हुकूम मिळणेबाबत अर्ज केला तसेच सदर तक्रारीसोबत एकंदर 07 दस्तऐवज दाखल केलेली आहेत.
2) विरुध्द पक्ष यांचा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी निशाणी-13 प्रमाणे त्यांचा लेखी जबाब मंचात दाखल केला, त्यामध्ये त्यांनी तक्रारकर्ता यांचे बहुतांश कथन फेटाळले. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनात थोडक्यात नमुद केले की, तक्रारकर्ता यांना नियमानुसार दिनांक 3/02/2015 रोजी रक्कम रुपये 71,620/- चे देयक देण्यात आले, ते बरोबर व नियमानुसार आहे व ते भरणे तक्रारकर्ता यांचे ग्राहक नात्याने कर्तव्य आहे. ते देयक न भरल्यास, विद्युत पुरवठा खंडित करण्यास केलेला मनाई हुकूम अर्ज, खर्चासह खारिज करण्यात यावा. तक्रारकर्ता हे मुद्दामहून व जाणूनबुजून दिशाभुल करीत आहेत. त्यामुळे विरुध्द पक्षावर केलेले संपूर्ण आरोप हे बिनबुडाचे असून, विरुध्द पक्ष यांना रुपये 20,000/- नुकसान भरपाई मिळावी आणि शारीरिक व मानसिक त्रास झाल्यामुळे तक्रारकर्त्याकडून रुपये 50,000/- नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश व्हावा तसेच प्रकरणाचा खर्च रुपये 5,000/- तक्रारकर्त्याकडून देण्यात यावा. सोबत ग्राहकाचा वीज वापराचा तक्ता जोडलेला आहे.
3) कारणे व निष्कर्ष ::
सदर प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा संयुक्त लेखी जबाब/ लेखी युक्तिवाद, तक्रारकर्ते यांचा तोंडी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद करण्यात आला.
सदर प्रकरणात विरुध्द पक्षाला हे मान्य आहे की, तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे. तक्रारकर्ते यांनी मंचासमोर दस्तऐवज दाखल करुन, मंचाला अशी विनंती केली आहे की, विरुध्द पक्षाने दिलेले दिनांक 3/02/2015 रोजीचे रक्कम रुपये 71,620/- चे विद्युत देयक चुकीचे आहे तसेच विरुध्द पक्षाने दिलेले वीज देयक रुपये 61,140/- हे देखील गैरकायदेशीर आहे. म्हणून सदर देयके रद्द करुन, विरुध्द पक्षाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे नुकसान भरपाई मिळावी. या अनुषंगाने विरुध्द पक्षाने दाखल केलेले सदर कालावधीतील CPL ( Consumer Personal Leadger ) दस्त, मंचाने तपासले असता त्यात असे दिसून आले की, नोव्हेंबर 2013 मध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे मीटर बदलले होते. त्यानंतर मात्र नोव्हेंबर 2014 पर्यंत विद्युत देयके ही RNA असे दाखवत आहे. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर ‘ विद्युत ग्राहक हक्क विवरणपत्र ’ हे दस्त दाखल केले आहे, त्यावरुन असे दिसते की, ग्राहकांना विरुध्द पक्षाकडून विज पुरवठ्याबाबत माहिती जाणून घेण्याचा मुलभूत हक्क आहे. तसेच विरुध्द पक्षाने ग्राहकाने वापरलेली विज, कमाल मागणी, लागु असलेले विज दर व विज दराशी संबंधीत इतर मापदंडाची नोंद जी उर्जा मीटरवर होते, या माहितीच्या आधारे मासीक देयके तयार केली पाहिजे. तसेच मीटर बसविणे, त्याचे वाचन नियमीत करणे इ. कामे विरुध्द पक्षाच्याच अखत्यारीतील असतांना सुध्दा विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडील मीटरचे रिडींग नियमीतपणे घेतले नाही, असे दाखल दस्तांवरुन दिसून येते. दाखल CPL दस्तावरुन असेही दिसते की, जानेवारी 2012 ते डिसेंबर 2014 पर्यंत Meter – Status normal असे दर्शविले आहे व जानेवारी 2015 फेब्रुवारी 2015 मध्ये मीटर हे फॉल्टी आहे, असे दर्शविले आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने सदर कालावधीतील देयक कोणत्या आधारावर दिली हे सिध्द होत नाही. तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर Sample Bill दाखल केले आहे, त्या बिलाची व विरुध्द पक्षाकडील वादातील देयकांची पाहणी केल्यास असे आढळते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास जी देयके दिली, त्यावर तक्रारकर्त्याचे नांव व पूर्ण पत्ता दिलेला नाही, त्यावर मिटरचा फोटो नाही, मिटर क्रमांक बदललेला दिसत नाही, चालु रिडींग व मागील रिडींग सारखेच दर्शविले आहे. वास्तविक मीटर हे नोव्हेंबर 2013 मध्ये बदलले होते, त्यामुळे वादातील देयके त्रुटीपूर्ण आढळतात. विरुध्द पक्षाने दिलेले रुपये 61,140/- चे देयक हातानेच लिहलेले आहे, त्यात कोणत्याही तारखेची नोंद नाही, ते कोणत्या कालावधीबद्दल आहे त्याची नोंद नाही, त्यावर तक्रारकर्त्याचे नांव, पत्ता नमुद नाही, रिडींग संदिग्ध आहे ( मीटर बदलल्यानंतरचे ), तसेच त्यावर मीटर क्रमांक, गुणक अवयक, युनिट, समायोजीत युनिट, एकूण विज वापर यापैकी कोणत्याही बाबींची नोंद नाही व डिसेंबर 2014 ते जानेवारी 2015 चे विद्युत आकार देयक जे रुपये 71,620/- आहे, त्यात चालु रिडींग या ठिकाणी फॉल्टी दर्शविलेले आहे. सबब तक्रारकर्त्याच्या तक्रारीत मंचाला तथ्य वाटते. त्यामुळे सदर देयक देवुन विरुध्द पक्षाने त्रुटीयुक्त सेवा प्रदान केली आहे असे घोषीत करण्यात येवुन ते विरुध्द पक्षाने रद्द करुन नियमाप्रमाणे नवीन देयक तक्रारकर्त्यास द्यावे तसेच विरुध्द पक्षाकडील विज देयक रुपये 61,140/- या रकमेचे ते देखील गैरकायदेशीर असुन, तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही, असे मंचाचे मत आहे. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो तो खालीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
- विरुध्द पक्षाने दिनांक 3/02/2015 रोजीचे दिलेले रक्कम रुपये 71,620/- चे विद्युत देयक त्रुटीयुक्त आहे, असे घोषीत करण्यांत येते. त्यामुळे ते रद्द करुन, नियमानुसार नवीन देयक देण्याचा विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो. तसेच विरुध्द पक्ष यांनी जास्तीचे दिलेले विज देयक रक्कम रुपये 61,140/- हे देखील गैरकायदेशीर आहे म्हणून ते भरणे तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही, असे देखील आदेश पारित करण्यात येतात.
- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्तपणे वा वेगवेगळे, तक्रारकर्त्यास त्रुटीयुक्त सेवा प्रदान केल्यामुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 3,000/- (रुपये तीन हजार फक्त) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) तक्रारकर्त्यास दयावा.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे व तसा पूर्तता अहवाल मंचात दाखल करावा.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (सौ. एस.एम. उंटवाले)
सदस्या. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri