ग्राहक तक्रार क्र. 66/2014
दाखल तारीख : 04/04/2014
निकाल तारीख : 04/02/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 01 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. चंद्रशेखर सिद्रामप्पा मुदकण्णा,
वय-50 वर्षे, धंदा – शेती,
रा.मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
तुळजापूर सोलापूर रोड, तुळजापूर.
2) कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद, शाखा उमरगा जि. उस्मानाबाद.
3) सहाय्यक कनिष्ठ अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी लि.
उस्मानाबाद, दुरुक्षेत्र – मुरुम ता. जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एम. टी. आपचे.
विरुध्द पक्षकारा क्र.1 ते 3 तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही. बी. देशमुख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम. व्ही. कुलकर्णी, यांचे व्दारा.
1) वीज पुरवठा करणा-या तारांमधून ठिणग्या पडून आपल्या शेतातील ऊस व केळीचे पीक जळाल्यामुळे झालेल्या सेवेच्या त्रुटीमुळे विरुध्द पक्ष (विप) वीज कंपनीकडून भरपाई मिळावी म्हणून तक्रार कर्त्याने (तक) ही तक्रार केलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात असे की मौज मुरुम ता. उमरगा येथील जमीन गट क्र. 531/3 तक चे मालकीचे आहे व तक ती जमीन कसतो जमीनीमध्ये विहीर असून त्यावर पंप चालविण्यासाठी विदयूत कनेक्शन घेतलेले आहे. त्याचा ग्राहक क्र. 596510755154 असा आहे. तक ने 80 आर. क्षेत्रामध्ये केळी व 40 आर. क्षेत्रामध्ये ऊस केलेला होता.
3) तक चे शेतातून विदयूत वाहीनीच्या तारा जातात तारांमध्ये झोळ तयार होऊन त्या एकमेकांजवळ आल्या होत्या त्याबाबत विप च्या कर्मचा-यास वारंवार सांगितले होते. दि.15/01/2013 रोजी दुपारी 2 चे सुमारास तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या त्या ऊसावर पडून ऊसाने पेट घेतला. 40 आर. क्षेत्रातील ऊस जळून गेला. केळीची 30 ते 40 झाडे जळून गेली. जळीत ऊस तोडण्यासाठी बराच खर्च झाला. ऊस परीपक्व झालेला होता. 40 आर. क्षेत्रामध्ये तक ला 80 टन ऊसाचे उत्पादन मिळाले असते त्याचे नुकसान झाल्यामुळे रु.1,50,000/- तक ला विप कडून मिळणे जरुरी आहे. तसेच केळीच्या बागेचे रु.50,000/- चे नुकसान झालेले आहे. पुढील वर्षाचे रु.1,00,000/- चे नुकसान झालेले आहे. अशा प्रकारे एकूण रु.3,00,000/- विप कडून वसूल होऊन मिळावे म्हणून ही तक्रार दिलेली आहे.
4) तक ने तक्रारीसोबत दि.15/01/2013 रोजी विप क्र. 3 यांना दिलेल्या अर्जाची प्रत, घटनास्थळ पंचनाम्याची प्रत, तलाठींनी केलेल्या पंचनाम्याची प्रत व वीजेचे बिल हजर केलेले आहे. त्यानंतर विदयुत निरीक्षक यांचा रिपोर्ट दि.07/07/2014 चा, तसेच शेताचे फोटो हजर केलेले आहेत. त्यानंतर जमीनीचा सातबारा ऊतारा हजर केलेला आहे.
5) सदर कामी हजर होऊन विप यांनी दि.05/07/2014 रोजी आपले लेखी म्हणणे दिले. ते पुढीलप्रमाणे.
6) तक ने ऊस लागवडीची तारीख दिलेली नाही. विदयुत तारांमध्ये झोळ आल्यामुळे घर्षण होऊन फ्यूज जात होता हे अमान्य आहे. घर्षणामुळे ठिणग्या पडून ऊसाने पेट घेतला व ऊस जळाला तसेच केळीचे पीक जळाले हे अमान्य जळीत ऊस तोडण्यासाठी खर्च झाला हे अमान्य. केलेले पंचनामे तक ला फायदा होईल अशा दृष्टी ने केले आहेत. विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही असे म्हंटले आहे तक चा ऊस कारखान्यास नेल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही असे म्हंटले आहे. सदरच्या लाईनवरुन तक ला विदयूत पुरवठा दिला नाही म्हणून तो विप चा ग्राहक होत नाही. सदची तक्रार ऊस जळीताबददल असल्यामुळे ती चालविण्याचा मंचास अधिकार नाही. विप कोणत्याही प्रकारे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. म्हणून तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
7) तक ची तक्रार त्याने दाखल केलेले कागदपत्रे व विप चे म्हणणे लक्षात घेता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 व 2 :
8) तक ने गट क्र.531/3 चा सातबारा उतारा हजर केला आहे. तक व त्याची पत्नी 4 हे. 10 आर. जमीनीचे मालक दाखविलेले आहेत. घटनेची तारीख दि.15/01/2013 दाखवली आहे. सन 2012/13 मध्ये पीकामध्ये 40 आर. केळी व 40 आर ऊस दाखवला आहे. जे फोटो तक ने हजर केले आहेत त्याप्रमाणे ऊस पिकाचा काही भाग व केळी पिकाचा काही भाग जळाल्याचे दिसते.
9) सातबारा मध्ये तक चे जमीनीत बोअरवेल असल्याचे नमुद आहे. तक ने शेती पंपासाठी वीज कनेक्शनचे बिल रु.4,000/- चे हजर केले आहे. जरी त्यावर तारीख नसली तरी ज्यार्थी जमीनीत बागायत पिके होती त्या अर्थी पिकास पाणीपुरवठा करण्याची सोय असणार हे उघड आहे. तक ने वीज ग्राहक क्रमांक आपल्या तक्रारीत नमूद केला आहे तो बिलाप्रमाणे बरोबर आहे. तक चे पुढे म्हणणे आहे की त्याचे शेतातून विदयूतवाहीनीच्या तारा गेल्या आहेत घटनास्थळ पंचनाम्यासोबत नकाशात शेताच्या पुर्व उत्तर व पश्चिम उत्तर कोप-याजवळ पोल दाखवले असून शेतातून तारा गेल्याचे दाखवले आहे. मात्र बोअर अगर वीज पंपाची जागा दाखवलेली नाही विप यांचे म्हणणे आहे की तक ला सदर लाईनवरुन विदयुत पुरवठा केलेला नाही मात्र कोणच्या लाईनवरुन केला हे स्पष्ट करायला पाहीजे होते ते केलेले नाही. तीH. T. लाईन असल्याचे म्हंटलेले नाही. दुसरी L.T. लाईन तिथे नाही तेव्हा त्याच लाईनवरुन तक ला विदयुत पुरवठा होत असल्याने तक हा विप चा ग्राहक होतो.
10) इलेक्ट्रीक इन्सपेक्टरचे रिपोर्टपमाणे तारा एकमेकांस चिकटल्यामुळे ठिणग्या पडल्याने ऊस जळाला व केळी जळाली. विप ने तारांची योग्य ती देखभाल केली असती तर अशी पिके जळाली नसती. म्हणून आपल्या सेवेत विप ने त्रुटी केली हे उघड आहे.
11) तक चे म्हणणे आहे की त्याचे 40 आर. क्षेत्रातील 80 टन ऊस जळून रु.1,50,000/- चे नुकसान झाले म्हणजे टनाला भाव रु.1,875/- असल्याचे दिसते. एका एकरात 40 टन ऊस या भागात कसाबसा मिळू शकतो जो ऊस जळाला तो सुध्दा निम्या किंमतीला साखर कारखाना विकत घेतो अशाप्रकारे जास्तीत जास्त 15 टनाचे नुकसान झाले आहे असे धरले तर रु.28,125/- चे नुकसान झाले. केळीची 30 ते 40 झाडे जळाली असे तकचे म्हणणे आहे. त्याचे नुकसान रु.10,500/- धरता येईल असे एकूण नुकसान रु.38,625/- धरता येईल. तेवढी भरपाई मिळणेस तक पात्र आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व पुढीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार अंशत: मंजूर करणे येते.
2) विप नी तक ला नुकसान भरपाई म्हणून रु.38,625/- (रुपये अडोतीस हजार सहाशे पंचवीस फक्त) दयावे वरील रकमेवर विप ने तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 9 दराने व्याज रक्कम फिटेपर्यत दयावे.
3) विप ने तक ला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावे.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.