जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 595/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 17/04/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 30/04/2008.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-01/09/2009
श्री.कमलाकर शिवराम पाटील,
उ.व.52 वर्षे, धंदाः नौकरी,
रा.गट नं.23/22+1, प्लॉट नं.12 ए,
हायवे दर्शन सोसायटी,जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
व्दाराः कार्यकारी अभियंता (वाणिज्य).
2. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
2.व्दाराः उप कार्यकारी अभियंता,
2.शहर तथा ग्रामीण विभागीय कार्यालय,
2.जुने पॉवर हाऊस, जळगांव. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/09/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री भरत बी. देशमुख वकील हजर
सामनेवाला 1 व 2 तर्फे श्री.कैलास एन.पाटील वकील हजर.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदाराचे गट नंबर 23/22+1, प्लॉट नं.12 ए, हायवे दर्शन सोसायटी, जळगांव येथे वास्तव्य असुन त्यांचे सदरील राहते घरी विज मिटर बसविलेले असुन त्यांचा ग्राहक क्रमांक 110012160089 असा आहे. तक्रारदार हे विज वितरण कंपनीकडुन आलेल्या बिलांचा नियमीतपणे भरणा करतात. दि.14/3/2008 रोजी तक्रारदाराचे मिटर अचानक बंद पडले त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला यांचे मानराज पार्क, जळगांव येथील कार्यालयात दि.14/3/2008 रोजी लेखी अर्ज दिला त्यानंतर दि.15/3/2008 रोजी सामनेवाला यांचेकडील श्री.प्रभाकर वराडे हे मिटरच्या पाहणीसाठी आले व मिटर तपासणी करुन तक्रारदाराशी विनाकारण वाद उपस्थित करुन पुढील महीन्याचे बिल अवास्तव रक्कमेचे देतो अशी धमकी दिली. तक्रारदाराचा वापर सरासरी 60 ते 142 युनीटपर्यंत मर्यादीत होता तथापी सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.9/4/2008 रोजी 342 युनीट विजेचा वापर दर्शवुन अवास्तव रक्कमेचे विज देयक दिले. तसेच दि.29/3/2008 रोजी तक्रारदाराचे घरी येऊन पंचनामा केला व तक्रारदारास व त्याच्या पत्नीस पोलीस केस करणेबाबत धमकावले व जुने मिटर काढुन त्या ठिकाणी नवीन मिटर बसविले. जुन्या मिटरचे शेवटचे रिडींग 2947 व चालु रिडींग 3016 एवढे होते तथापी नवीन मिटर बसविले असता बिलात चालु रिडींगचा उल्लेख न करता तक्रारदारास दि.9/4/2008 रोजी मागील बिलाचे व जुन्या मिटरचे रिडींग ऍडजेस्ट करुन व नवीन मिटरचे युनीट असे ऍडजेस्ट करुन एकुण विज वापर 342 असा दाखवुन कंम्पाऊंड चार्जेस रु.4,000/- व एम.डी.कॉस्ट रु.700/- असे एकुण बिल रक्कम रु.9,185/- चे दिले. सामनेवाला यांनी तक्रारदारास चुकीचे व अवास्तव रिडींग दर्शवुन बेकायदेशीर देयक देऊन सदोष सेवा दिलेली आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.9/4/2008 रोजी रक्कम रु.9,185/- चे वादग्रस्त बिल रद्य करुन मिळावे, तसेच सामनेवाला यांनी सदरचे देयक तक्रारदाराकडुन वसुल करु नये असे आदेश व्हावेत, सामनेवाला यांनी तक्रारदारावर विजचोरी केल्याचे आरोप रद्य करुन मिळावा, तक्रारदारास नियमित रिडींगप्रमाणे बिले देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत, शारिरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च वकील फीसह मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने गट नंबर 23/22+1, प्लॉट नं.12 ए, हायवे दर्शन सोसायटी, जळगांव येथे सामनेवाला यांचेकडुन दि.4/8/1987 रोजी घरगुती कारणास्तव सिंगल फेज विज पुरवठा घेतलेला असुन त्याचा ग्राहक क्र.110012160089 असा आहे. विज मोजणी करण्यासाठी मिटर सिरियल क्रमांक 6117369 बसविले होते ते नादुरुस्त झाल्याने डिसेंबर,2004 मध्ये बदलुन त्या जागी नवीन मिटर सिरियल क्रमांक 2514721 असे बसविले होते. दि.14/3/2008 रोजी तक्रारदार यांनी कनिष्ठ अभियंता, पिंप्राळा कक्ष क्र.1 जळगांव यांचेकडे मिटर ना-दुरुस्त झाल्याबाबत लेखी अर्ज दिला होता त्यावरुन सामनेवाला यांचे लाईनमन श्री.वराडे हे मिटरची तपासणी करण्यासाठी गेले असता मिटरची सिले हाताळलेली आढळुन आल्याची बाब त्यांनी कनिष्ठ अभियंता, पिंप्राळा कक्ष 1 यांचे निर्दशनास आणुन दिली होती. त्यानंतर दि.29/3/2008 रोजी कनिष्ठ अभियंता, पिंप्राळा कक्ष 1 यांनी तक्रारदाराचे मिटरची व मांडणी संचाची तपासणी तक्रारदारासमक्ष केली असता मिटर सिरियल क्र.2514721 ला 2 निळया रंगाचे प्लॅस्टीक सिल क्र.142842 व 142843 हाताळलेली दिसत होती तसेच मिटरला कंपनीचे दोन रिबेट सिल लावलेले होते त्यापैकी मिटरच्या डाव्या बाजुकडील रिबेट सिल उघडलेले दिसत होते. सदर मिटरवर 03024 असे रिडींग होते सदर मिटर व मांडणी संचाची माहिती स्थळ तपासणी अहवालावर तक्रारदारासमक्ष नमुद करण्यात आली त्यानंतर दोन पंचाना बोलावून त्यांचे समक्ष पंचनामा करुन त्यास तक्रारदाराचे सहीचे कागदी सिल लावून सिल बंद करण्यात आले व जप्त केलेल्या मिटरची एक प्रत तक्रारदारास देण्यात आली. त्यानंतर फॉर्म एम.आर 2 मध्ये संपुर्ण तपशिल भरुन सदरचे विज मिटर तांत्रीक तपासणीकामी मिटर चाचणी कक्षात पाठविण्यात आले व सदरचे मिटरवर दि.1/4/2008 रोजी मिटर चाचणी कक्षात तपासणी करण्यात येणार असल्याबाबत उपस्थित राहणेबाबत तक्रारदारास लेखी पत्र देण्यात आले त्यावेळी तक्रारदाराने सदरचे मिटर तपासणीअंती होणारे दंडात्मक विज बिल भरण्याचे मान्य केले होते व तसा लेखी जबाब पंचासमक्ष लिहुन दिला होता त्यामुळे तक्रारदाराविरुध्द मानवतेच्या दृष्टीकोनातुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. दि.1/4/2008 रोजी सदरचे मिटरची तक्रारदारासमक्ष तपासणी केली असता मिटरची सिले हाताळलेली आढळुन आली. मिटरच्या डाव्या बाजूचे रिबेट सिल उघडलेले आढळुन आले होते. मिटर उघडुन आत पाहीले असता पी.सी.बी. सर्कीट ते शंटला जाणारी लाल रंगाची वायर रिसॉल्ट करुन पी.सी.बी.सर्कीटवरील पिस्टन रिसॉल्ट केल्याचे निर्दशनास आले होते म्हणुन तक्रारदारास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग विनिमय,2005 चे नियम 8.6 नुसार विज बिलाचे निर्धारण करुन तक्रारदारास एकुण 342 युनीटचे रक्कम रु.5,185.40 चे विज चोरीचे बिल अधिक विद्युत कायदा 2003 चे कलम 152 नुसार गुन्हा तडजोड रक्कम रु.4,000/- असे एकुण रु.9,185.40 चे विज बिल दि.9/4/2008 रोजी देण्यात आलेले होते सदरचे विज बिल भरणा करण्याचे तक्रारदाराने मान्य करुन देखील अदा केलेले नाही व सदरची खोटी व बनावट तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदाराने विज चोरीचे बिलाची रक्कम अदा न केल्यास सामनेवाला यांचे अतोनात नुकसान होईल. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी व तक्रारदाराने सामनेवाला विरुध्द खोटी तक्रार दाखल करुन खर्चात टाकलेबद्यल रक्कम रु.10,000/- नुकसान भरपाई देणेबाबतचे तक्रारदारास आदेश व्हावेत अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
3. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदारची तक्रार या मंचासमोर चालण्यास
पात्र आहे काय? ...... नाही
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 तक्रारदाराचे तक्रारीचे स्वरुप पाहीले असता प्रामुख्याने एक बाब निर्दशनास येते की, तक्रारदाराचे विज मोजणी करण्यास असलेले मिटर बंद पडल्यानंतर त्याने सामनेवाला यांचेकडे तक्रार केल्यानंतर तक्रारदाराचे मिटरची सामनेवाला यांनी पाहणी केली असता तक्रारदाराचे मिटर मध्ये फेरफार केल्याची बाब सामनेवाला यांचे निर्दशनास आलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दि.29/3/2008 रोजी जबाब घेतलेला असुन तो लेखी म्हणण्यासोबत मंचासमोर सादर केला असुन त्यात तक्रारदाराने मिटर मधील दोन रिबेट सिल पैकी डाव्या बाजुकडील रिबेट सिल पत्रा उघडलेला दिसत असल्याचे मान्य करुन मिटर तपासणीसाठी जळगांव मिटर चाचणी कक्ष यांचेकडे पाठविण्यात आल्यानंतर जळगांव मिटर चाचणी कक्ष यांचे अहवालानुसार जे काही दंडात्मक विज बिल येईल ते भरण्यास तयार असुन तक्रारदाराविरुध्द कोणतीही पोलीस कारवाई करु नये अशी विनंती केली आहे. सदर जबाबावर भागवत साहेबराव सत्ताधीश व अविनाश दत्तात्रय भालेराव यांचे समक्ष स्वाक्षरी केली आहे. सकृतदर्शनी प्रस्तुत ग्राहक तक्रार ही विज चोरी ची केल्याने सामनेवाला यांनी दिलेल्या दंडात्मक देयकाबाबत दिसुन येते. विज चोरी बाबत न्यायनिवाडा करण्याचे अधिकार क्षेत्र या मंचास नाही या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे. सबब प्रस्तुत ग्राहक तक्रारीत नमुद मुद्यांबाबत काहीएक उहापोह न करता तक्रारदाराची तक्रार काढुन टाकण्याचे निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदाराची तक्रार काढुन टाकण्यात येते.
( ब ) खर्चाबाबत आदेश नाही.
( क ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/09/2009.
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव