ग्राहक तक्रार क्र. 280/2014
दाखल तारीख : 04/12/2014
निकाल तारीख : 23/11/2015
कालावधी: 0 वर्षे 10 महिने 05 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. साहेबराव दाजीबा बिटके,
वय - 70 वर्ष, धंदा- शेती,
रा.लोहटा (पा), ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कं., उस्मानाबाद.
2. कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी, सबस्टेशन, शिराढोण,
ता. कळंब, जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विद्युलता जे. दलभंजन सदस्य.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.के.जी. बावळे.
विरुध्द पक्षकार क्र.1 व 2 तर्फे विधीज्ञ : श्री.व्हि.बी.देशमुख.
न्यायनिर्णय
मा.अध्यक्ष, श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे द्वाराः
विरुध्द पक्षकार (विप) विज कंपनीने आपल्या जमिनीत विद्युत पुरवठा दिला त्यामध्ये त्रुटी ठेवली म्हणून आपले बैलाला शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला म्हणून भरपाई मिळवण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1 तक यांला मौजे शिराढोण येथे जमिन गट नंबर 39 आहे. जमिनीत पाणी पुरवठयाची सोय आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी विप यांचेकडून विज कनेक्शन विद्यूत पंपासाठी घेतलेले आहे. ग्राहक क्रमांक 606930478763 असा आहे. जमीनीत डि.पी.उघडा होता. दि.6.6.2014 रोजी तक आपल्या शेतामध्ये कोळपणी करत होता. त्यावेळेस त्यांचे बैलाचा डि.पी.ला स्पर्श झाला व बैल मरण पावला. विप चे निष्काळजीपणामुळे तक चा बैल मेला व त्यांचे रु.45,000/- चे नुकसान झालेले आहे. तक ने तात्काळ पोलिस स्टेशन कळंब विप चे कनिष्ठ अभिंयता, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी व तहसील कार्यालय यांना माहीती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. तलाठी यांनी पण पंचनामा केला.बैलाचे पि एम करण्यात आले. बैल मेल्यामुळे झालेले नुकसान रु.45,000/- मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2000/- विप कडून वसूल होऊन मिळावे म्हणून तक ने ही तक्रार दि.4.12.2014 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक्रारीसोबत तक ने तलाठी रिपोर्ट, दि.6.6.2014 चा तलाठी पंचनामा दि.6.6.2014 चा, पोलिस पंचनामा दि.7.6.2014 चा, पि एम रिपोर्ट दि.7.6.2014 चा, ग्रामपंचायत लोहाटा चा दाखला, विज बिल, बिल भरल्याची पावती, 7/12 उतारा, विद्यूत निरीक्षक, पत्र दि.30/10/2014 चे इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
3. विप यांनी हजर होऊन दि.7.4.2015 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.तक ने बैल रु.45,000/- ला खरेदी घेतल्याचे विप यांना माहीती नाही. ती किंमत जास्त दाखवली आहे. तक ने तलाठी पोलिस इत्यादीना घटनेची माहीती दिली. याबददल विप ला माहीती नाही. केलेला पंचनामा यांची माहीती विप ला नाही व विप च्या परस्पर तक च्या सांगण्यावरुन पंचनामा केलेला आहे. विप ने डिपी ची व्यवस्थीत देखभाल केली नाही. त्यामुळे तारा मध्ये विज पसरुन बैल जागीच ठार झाला हे अमान्य आहे.बैलाच्या मृत्यूस विप चा निष्काळजीपणा कारणीभूत आहे हे अमान्य आहे. याउलट तक हाच निष्काळजीपणे राहीला व घटनेस तो जबाबदार आहे. त्यामुळे विप नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. पोलिस पंचनामा पाहिला असता डिपी ला आधार म्हणून तारेची ओढणी दिलेली होती. परत वळवताना कुळव अडकला. स्टे वायरला जोरात धक्का लागल्यामुळे स्टे वायर मध्ये विद्यूत करंट आला. तक ने काळजीपूर्वक कुळव वळवला असता तर सदरची घटना घडली नसती. त्यामुळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे
4. तक ची तक्रार, त्यांनी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी दिली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय,अंशतः
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2ः-
5. तक ने तक्रारीत म्हटले आहे की आपली जमिन गट नंबर 39 मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांने विप कडून विद्यूत पुरवठा घेतलेला आहे. ही बाब विप यांनी नाकबूल केलेली नाही. जमिनीचा 7/12 उतारा गट नंबर 39/3 चा असे दाखवतो की, तक हाही हिस्सेदार असून 44 आर क्षेत्र मांजरा प्रकल्पात गेलेले होते. मांजरा प्रकल्पातील जलसिंचनाची सोय असल्याचे नमूद केलेले आहे. 2011-12 या वर्षात ऊस सोयाबिन,व तूर अशी पिके घेतल्याचे नमूद आहे. लाईट बिल असे दर्शविते की, तक यांला पाच एच पी पंप चालविण्यासाठी दि.25.10.2007 पासून विद्यूत पुरवठा केलेला होता. त्यामुळे तक हा विप चा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे.
6. तक चे म्हणणे आहे की, त्यांचे शेतामध्ये डिपी होता व तो उघडा होता. शेतामध्ये कोळपणी करताना बैलाला विजेचा धक्का लागून तो मरण पावला. तक यांनी याबददल तलाठी तसेच पोलिसांना माहीती दिल्याचे दिसते. पोलिस पंचनाम्याप्रमाणे जमिनीमध्ये डिपी आहे व त्यांची स्टे वायर जमिनीवर तिरकी बसवलेली दिसते. बैलाचा स्टे वायरला धक्का लागला याबददल फारसा वाद नाही. शवविच्छेदन अहवालप्रमाणे बैलाचा मृत्यू इलेक्ट्रीक शॉकमुळे झाला.
7. विप चे म्हणणे आहे की, तक चे निष्काळजीपणामुळे कुळव ओढणीमध्ये अडकला. त्यामुळे ओढणीत करंट आला. विप चे म्हणणे मान्य करता येणार नाही. ओढणी ही इन्सूलेटर वापरुन पुर्णपणे वेगळी ठेवावी लागते. जरी ओढणीला धक्का लागला तरी त्यामुळे ओढणीमध्ये करंट येणे शक्य नसते. मात्र इन्शूलेशन खराब असेल तर ओढणीत करंट येऊ शकतो. बैलाचा धक्क लागला किंवा कूळवाचा धक्का लागला तरी वायरमध्ये करंट येण्याची शक्यता नसते. हे खरे आहे की, तक ने कूळव अंतरावरुन न्यायला पाहिजे होते. मात्र तिरप्या स्टे वायरमूळे जमिनीचा बराचसा भाग पडीक ठेवावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी जास्तीत जास्त भाग वहीतीखाली आणण्याचा प्रयत्न करतो. हे ही लक्षात घेतले पाहिजे की साधारण्तः कूळव हे लाकडाचे असतात. त्यामुळे त्यामधून विद्यूत वहन होत नाही. शिवाय बैला सारखा प्राणी आपले अंग हलवत असतो. तसेच मूंडी फिरवत असतो त्यामुळे स्टे वायरच्या जवळून जाताना वायरला स्पर्श होणे शक्य असते. मात्र योग्य त्या इन्शूलेशन अभावी वायरमध्ये करंट येऊन शॉक बसणे शक्य असते. कूठल्याही परिस्थितीत शॉक बसण्यास योग्य इन्शूलेशनचा अभाव हेच कारण असते व त्यांची संपूर्ण जबाबदारी विपवरच येते. त्यामुळे विप ने निष्काळजीपणा करुन सेवेत त्रुटी केली हे उघड होत आहे.
8. तक ने बैल खरेदीचा दि.17.6.2013 चा ग्रामपंचायतलचा दाखला हजर केला आहे. तक ने तो 7 वर्षाचा बैल रु.45,000/-ला घेतल्याचे दिसून येत आहे. विप चे म्हणणे आहे की, जी किंमत दाखवली ती जास्त आहे. मात्र दाखला संरपचाने दिलेला आहे. तो खोटा दिला असेल असे मानण्याचे कारण नाही. त्यामुळे तक बैलाची किंमत विपकडून मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्यात येते.
2. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला भरपाई रु.45,000/-
(रुपये पंचेचाळीस हजार फक्त) 30 दिवसांत द्यावी, न दिल्यास तक्रार
दाखल दिनांकापासून प्रत्यक्ष रक्कम फिटेपर्यत त्यावर द.सा.द.शे.9 दराने व्याज द्यावे.
3. विप क्र.1 व 2 यांनी स्वतंत्रपणे व संयूक्तपणे तक ला तक्रारीचा खर्च म्हणून
रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4. वरील आदेशाची पुर्तता करुन विप यांनी 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर
सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची
पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी आदेशाची पुर्तता केली नसल्याबाबत
मंचात अर्ज द्यावा.
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.