- नि का ल प त्र -
( दि.21-06-2018)
द्वारा : मा. श्री. व्ही.ए. जाधव, अध्यक्ष.
1) तक्रारदार हे गाव चिपळूण ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील रहिवाशी असून सामनेवाला हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आहे. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाला यांनी त्यांना दिलेल्या सेवेतील त्रुटीपोटी नुकसानभरपाई मिळावी यासाठी दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे-
तक्रारदारांचे वडील कै. नथुराम लक्ष्मण चिंगळे यांनी दि. 18-03-1991 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, चिपळूण यांचे कार्यालयातून घरगुती वापराकरिता विद्युत जोडणी घेतली असून त्याचा ग्राहक क्र. 219010162558 असा आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून घेतलेल्या विद्युत जोडणीची वीज बिले अदा करीत असतात. सामनेवाला यांनी जुन 2016 ते ऑक्टोबर 2016 या कालावधीचे तक्रारदाराचे वीज बिल हे चुकीच्या नोंदी करुन वाढीव स्वरुपात दिले ते महिना व वापरलेले युनिट पुढीलप्रमाणे- जुन -84, जुलै-73, ऑगस्ट-47, सप्टेंबर-53, ऑक्टोंबर-58 व नोव्हेंबर-58 असे एकूण 373 युनिट त्याचे दि. 28-12-2016 अखेर एकूण वीज बील रक्कम रु. 2,210/-. तक्रारदाराने 40 युनिट प्रतिमहिना याचेवर कधीच कमी वीज वापरलेली नाही. सदर वाढीव वीज बिलाबाबत तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केले. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांची विनंती धुडकावून लावली. अगोदर वीज बील भरा नंतरच तुमच्या अर्जाचा विचार करु असे सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे वीज बील कमी केले नाही. तसेच विद्युत मिटर तपासणी करण्यासाठी कंपनीचा माणूस पाठविला नाही. तक्रारदार यांनी रक्कम रु. 150/- प्रति वर्षी याप्रमाणे सात वर्षे विद्युत मिटर तपासणीची फी सामनेवाला यांचेकडे भरली. परंतु त्याचा खुलासा सामनेवाला यांनी केला नाही म्हणून तक्रारदार यांनी रजिस्टर ए.डी.ने सामनेवाला यांना दि. 1-08-2016 व दि. 20-11-2016 रोजी नोटीसा पाठविल्या. त्याचे उत्तर सामनेवाला यांनी दिले नाही म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द मंचात तक्रार दाखल करुन सामनेवाला यांनी तक्रारदार याचे घरातील वीज मिटरची नव्याने तपासणी करुन फक्त वापरलेली विजेची बिले दयावीत तसेच तक्रारदारास शारिरीक, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु. 15,000/- तसेच तक्रारदार यांचे घरातील विद्युत जोडणी कायम करुन दयावी तसेच साडेसात वर्षापासून वाढील स्वरुपात आकारलेली रक्कम रु. 15,000/- दि. परत दयावी. दि. 22-01-2017 रोजीपासून झालेल्या दैनंदिन नुकसानीपोटी रक्कम रु. 350/- प्रतिदिनी तसेच तक्रारदार व त्यांचे आईस झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 600/- प्रतिदिनी दयावीत अशी मागणी केली आहे.
3) तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी नि. 5/1 वर नोंव्हेबर-2016 चे वीज बिल, नि.7 वर जुन,ऑगस्ट व ऑक्टोंबर-2016 ची वीज बिले, तसेच डिसेंबर-2016 ची , जानेवारी-2017 ची वीज बिले. तसेच नि. 15 व 16 वर मार्च 1992 पासून मे-2016 पर्यत वीज बिले दाखल केली. नि.17 वर पुरावा बंदची पुरसीस दाखल केली. नि.20 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
4) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला यांनी हजर होऊन नि.14 प्रमाणे शामकांत विश्राम जाधव यांना व नि.18 प्रमाणे अशोक नारायण भोसले यांना आपली बाजू मांडण्यासाठी अधिकारपत्र दिले. नि.13 सोबत कागदपत्रे दाखल करुन तक्रारदार यांचे मे-2016 ते ऑक्टोंबर-2016 पर्यंतच्या बीलाचा तपशील सादर केलेला आहे तसेच त्यासोबत सीपीएल (Consumer Personal Ledger) सादर केलेले आहे. नि.21 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच नि.19 वर अगोदर दिलेले म्हणणे हाच पुरावा समजणेत यावा व पुरावा बंद अशी पुरसीस दिली.
5) तक्रारीचा आशय, दोन्ही बाजूचा पुरावा, युक्तीवाद याचे अवलोकन करता या मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यावरील विवेचन खालीलप्रमाणे-
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक होतात का? | होय |
2. | सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही. |
3. | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार. |
- का र ण मि मां सा-
मुद्दा क्र.1-
6) सामनेवाला यांनी तक्रारदार हे आमचे ग्राहक नाहीत असा युक्तीवाद केला की, विद्युत मीटर जोडणी ग्राहक क्र. 219010162558 हा आमचे नोंदीप्रमाणे नथुराम लक्ष्मण चिंगळे यांचे नावे आहे. नथुराम चिंगळे हे आमचे सन 1999 पासूनचे ग्राहक आहेत. सदरील विद्युत मीटर नथुराम लक्ष्मण चिंगळे यांचे नावे असलेने तक्रारदार अभय चिंगळे हे आमचे ग्राहक नाहीत. परंतु मंचाचे मते प्रस्तुत विद्युत मिटर जोडणी ही तक्रारदार यांचे वडील कै. नथुराम लक्ष्मण चिंगळे यांनी दि. 18-03-1991 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून घरगुती वापरासाठी विद्युत जोडणी घेतली होती. सदरील विद्युत जोडणी तक्रारदार यांचे वडील कै. नथुराम लक्ष्मण चिंगळे यांचे नावावर आहे हे नि. 7 तसेच नि. 15 व नि.16 यावरुन दिसून येते. तक्रारदार यांनी वापरलेली वीजेची बीले ही तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी अदा केलेली आहेत. तक्रारदार यांचे वडिलांचे 14 वर्षापूर्वी निधन झाले तदनंतरसुध्दा तक्रारदार यांनी सामनेवाला यांची वीज बिले वेळोवेळी अदा केलेली आहेत. सामनेवाला यांनी सन 2010 साली जुना विद्युत मीटर बदलून त्याठिकाणी नवा इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर बसवला. सदर नवीन विद्युत मीटर जरी तक्रारदार यांचे मयत वडिलांचे नावे असला तरी वीज बिले मात्र तक्रारदार यांनी वेळोवेळी अदा केलेली आहेत. त्यामुळे विद्युत मीटर ग्राहक क्र. 219010162558 ही विद्युत मीटर जोडणी नथुराम लक्ष्मण चिंगळे यांचे नावे फेब्रुवारी- 2017 म्हणजेच विद्युत पुरवठा कायमस्वरुपी बंद करेपर्यंत आहे. तक्रारदार यांचे वडिलांचे 14 वर्षापूर्वी निधन झाले तेंव्हापासून वीज बिले तक्रारदार सातत्याने व वेळोवेळी सामनेवाला यांना अदा करीत आलेले आहेत. सामनेवाला यांनी सदरची वीज बिले तक्रारदार यांचेकडून स्विकारलेली आहेत अगदी शेवटचे विद्युत बिल रक्कम रु. 640/- हे तक्रारदार यांनी दि. 26-05-2016 रोजी सामनेवाला यांना अदा केलेले आहे असे नि.13 वरुन दिसून येते. त्यामुळे फक्त वीज मीटर जोडणीही कै. नथुराम लक्ष्मण चिंगळे यांचे नावे आहे या तांत्रिक मुद्दयांवरुन तक्रारदार हे सामनेवाला यांचे "ग्राहक " होत नाहीत हा सामनेवाला यांचा युक्तीवाद मान्य होणारा नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 2 -
6) तक्रारदार असा युक्तीवाद करतात की, सन 1991 मध्ये विद्युत जोडणी घेतली तेंव्हा जी विद्युत उपकरणे घरामध्ये होती तीच आजसुध्दा घरामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने सन 2010 साली जुने विद्युत मीटरचे जागी नवीन इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर बसवले परंतु नवीन विद्युत मीटर वाढीव युनिट दाखवू लागले. त्यामुळे नवीन मीटर बसवल्यानंतर पहिल्या महिन्यातच सदर वाढीव रिडींगबाबत सामनेवाला यांचेकडे तक्रार दिली परंतु सदरील सामनेवाला यांचेकडे दिलेल्या तक्रारीबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे सन 2010 मध्ये मीटर रिडींगमध्ये न पेलवणारा फरक दिसू लागला. सदर बाबतीत सामनेवाला यांचेकडे तोंडी व लेखी तक्रार दिली. साडेसात वर्ष सामनेवाला यांचे ऑफिसमध्ये वाढीव रिडींगबाबत तक्रार केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या मागण्या वारंवार धुडकावून लावल्या परंतु तक्रारदार यांनी त्यांचे म्हणणेपुष्ठयर्थ सामनेवाला यांचेकडे मिटर तपासणीकरिता भरलेले रक्कम रु.150/- फी ची रिसीटस सादर केली नाही. तक्रारदार म्हणतात की, सन 2010 नंतर 20 युनिट एवढा मीटर रिडींगमध्ये जास्त फरक आलेला आहे. तसेच जुन 2016 ते ऑक्टोंबर 2016 मधील वाढीव रिडींग तसेच त्याचे वीज बिल आलेले आहे ते न पेलवणारे आहे. परंतु तक्रारदार यांनी नि. 15 व 16 वर दाखल केलेले वीज बिलाचे अवलोकन करता जुन 2016 ते ऑक्टोंबर 2016 या कालावधीची वीज बिले ही सरासरी बिले असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे खुपच जास्तीचे किंवा न पेलणारी वीज बिले सामनेवाला यांनी दिली हे तक्रारदार यांचे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. तसेच नि.15 व 16 वर दाखल केलेली सन 1991 पासूनच्या वीज बिलांचे अवलोकन करता असे दिसून येते की, तक्रारदारांची काही वीज बीले 330 युनिट प्रति तिमाही एवढयापर्यंत गेलेली दिसतात म्हणजेच तक्रारदाराचा सरासरी एका महिन्याचा वीज वापर हा 110 युनिट प्रतिमाह पर्यंत पुर्वीही झालेला दिसून येतो. फेब्रुवारी 1999 ते जुलै 1999 या कालावधीचे तक्रारदार यांची विद्युत बिले 250 युनिट प्रति तिमाही म्हणजेच सरासरी 80 युनिट प्रति महिना झालेचे नि.15 वरुन दिसून येते. त्यामुळे वीज मीटर रिडींगमध्ये सन जुन-2016 ते ऑक्टोंबर-2016 या कालावधीतील न पेलवणारी वाढ झाली हे तक्रारदाराचे म्हणणे न पटणारे आहे. तसेच तक्रारदाराने मागील शेवटचे बील हे दि. 26-05-2016 रोजी भरले आहे. त्यानंतर कोणतेही वीज बील भरलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे थकीत असणारे वीज बील रक्कम रु. 2210/- हे मे-2016 पासूनचे एकूण थकीत बील असल्याचे नि. 7 वरुन दिसून येते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यास वाढीव वीज बील दिले हे तक्रारदाराचे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. सदरील थकीत वीज बील रक्कम रु.2210/- हे तक्रारदाराने भरले नाही त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे प्रथम दि. 22-01-2017 रोजी तात्पुरते स्वरुपात वीज पुरवठा खंडीत केला. परंतु तक्रारदार यांना संधी देऊनही थकीत वीज बील भरले नसले कारणाने फेब्रुवारी-2017 मध्ये तक्रारदार यांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत केला. तसेच तक्रारदार यांना जे वाढीव वीज बील वाटते ते वीजेच्या वाढीव दरामुळे म्हणजेच सन 1991 मधील विजेचे दर व सन 2016 मधील विजेचे दर यामध्ये असणा-या तफावतीमुळे व थकीत वीज बिलाच्या रक्कमेमुळे असल्याचे दिसून येते आणि ते जास्त मीटर रिडींगमुळे नाही असे नि.15 व 16 तसेच नि. 13 वरील दाखल वीज बीलांचे अवलोकन करता दिसून येते. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यास जास्तीचे सन जुन 2016 ते ऑक्टोंबर 2016 या कालावधीचे वाढीव व न पेलणारी वीज बीले देऊन तसेच वीज पुरवठा खंडीत करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी दिली हे तक्रारदार यांचे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3 -
7) तक्रारदाराला सामनेवाला यांनी सदोष सेवा दिली किंवा सेवेत त्रुटी ठेवली ही बाब तक्रारदार यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार कोणत्याही खर्चाशिवाय खरीज करणे मंचाला न्यायोचित वाटते म्हणून अंतिम आदेश पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज क्र.01/2017 नामंजूर करण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3) सदर आदेशाची प्रत तक्रारदार व सामनेवाला यांना विनामुल्य दयावी.