Exh.No.32
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 15/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि.12/03/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि.16/12/2015
श्री प्रकाश राजाराम जैतापकर
वय 52 वर्षे, व्यवसाय – शेती व व्यापार
रा.मु.पो.ओरोस बुद्रुक (जैतापकर कॉलनी),
ता.कुडाळ, जिल्हा – सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्या, कुडाळ,
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
2) उप कार्यकारी अभियंता,
श्री अॅन्थोनी ग्रॅबाइल ईरकल
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्या,
उपविभाग कुडाळ II (ओरोस)
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
3) सेक्शन इंजिनिअर,
श्री सुमित पाध्ये,
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्या,
उपविभाग कुडाळ II (ओरोस)
ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
4) वरीष्ठ तंत्रज्ञ,
श्री सुरेश आत्माराम मार्गी
महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी मर्या,
उपविभाग सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री प्रसन्न सावंत.
निकालपत्र
(दि.16/12/2015)
द्वारा : मा.सदस्या, श्रीमती वफा जमशीद खान.
1) विरुध्द पक्ष वीज वितरण कंपनीकडून चुकीच्या पध्दतीने दिलेल्या वीज कनेक्शनमुळे दुहेरी रिडींगचे बील भरणा करणेत आले. त्याच्या परताव्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज करुनही निवारण करणेत आले नाही म्हणून तक्रार अर्ज दाखल करणेत आला आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार यांचे गाव मौजे ओरोस येथील घर नं.660 व घर नं.992 यांना दि.27/09/2005 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडून नवीन वीज कनेक्शन देण्यात आले. त्यांना अनुक्रमे ग्राहक क्रमांक 237760017566 आणि 237760017574 असे आहेत. त्यापैकी घराचा वरचा मजला बंद असल्याने ग्राहक क्र. 237760017566 या मीटरचा वीज वापर सातत्याने होत नव्हता. तरीदेखील त्या मीटरसंबंधाने आलेली वीज देयके तक्रारदार यांनी भरलेली आहेत. माहे मे 2014 मध्ये सदर ग्राहक मीटरचा वीज वापर केला नसल्याने म्हणजे ते घर बंद असल्याने वीज कंपनीकडून सदर मीटरचे शुन्य वीज वापराचे मिनिमम वीज बील पाठवणे अभिप्रेत असतांना रक्कम रु.1230/- चे वीज बील पाठवणेत आले. सदर मीटरची विरुध्द पक्ष यांचेमार्फत तपासणी करणेत आली. त्यावेळी निदर्शनास आले की, मिटरचे रिडिंग हे वापर नसतांनाही अंकीत होत होते. म्हणून लाईनमन श्री सुरेश मार्गी यांना सदर कनेक्शन तात्पुरते बंद करण्याची विनंती केली. श्री मार्गी यांनी मीटर बंद केल्यावर ग्राहक क्र.237760017574 या मीटरचे वीज कनेक्शन आपोआप बंद झाले. श्री मार्गी यांना विचारणा केली असता त्यांच्या तपासणीवरुन सदर दोन्ही मीटरचे वीज कनेक्शन एकाच सर्व्हीस वायरने दिल्याने दोन्ही मीटर बंद झाले. त्यावेळी लक्षात आले की सदर दोन्ही मीटर एकाच सिरीजमधून जोडलेले आहे. पोलवरुन टाकलेली मीटरपर्यतची सर्व्हीस वायर सुध्दा एकच आहे. एकाच सिरिजमधून जोडणी केल्याने घर क्र.992 चे बील भरुन सुध्दा घर क्र.660 वरील मीटरचे रिडिंग व घर क्र. 992 चे मीटरचे रिडिंग असे दोन्ही मीटरचे रिडिंग घर क्र.660 वर येत होते व ते 2005 पासून भरत असल्याचे तक्रारदार यांचे कथन आहे.
3) तक्रारदार यांचे पुढे असे कथन आहे की, त्यांनी सन 2005 पासून जादा भरलेल्या वीज देयकांच्या रक्कमांची मागणी दि.30/6/2014 रोजी लेखी अर्जाद्वारे विरुध्द पक्ष यांचेकडे केली; परंतु विरुध्द पक्ष यांनी अर्जाचे निवारणासाठी कोणतेही सहकार्य केले नाही. सदर तक्रारीकडे दुर्लक्ष व टाळाटाळ करुन जून 2014 ते जानेवारी 2015 पर्यंत लांबवणेत आले आणि तक्रारदारास सदरचे चुकीचे बील भरणा करण्याचे व वीज कनेक्शन बंद करण्याची धमकी वजा नोटीस पाठविण्याचे काम विरुध्द पक्ष कंपनीकडून करण्यात आले. विरुध्द पक्ष यांच्या चुकीच्या वीज बिलापोटी झालेले आर्थिक, मानसिक त्रासापोटी व गेलेला वेळ यांच्या त्रासापोटी रु.10,000/-, प्रकरण खर्च रु.10,000/- वीज बिलातील फरकाची रक्कम रु.30,215/- मिळावी, तसेच तक्रारीचा निर्णय होईपर्यंत बील भरण्यास स्थगिती मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केली आहे. तसेच नि.क्र.3 चे कागदाचे यादीलगत 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये वीज देयके, तक्रार अर्ज खाते पुस्तिका (C.P.L.) विरुध्द पक्ष यांनी पाठविलेल्या नोटीसा, श्री मार्गी यांचा खुलासा इ. कागदपत्रे आहेत.
4) सदर तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीसा पाठविण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र.1 ते 4 त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत मंचात हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.14 वर दाखल करुन तक्रार खोटी असल्याने खर्चासह नामंजूर करावी असे म्हटले आहे.
5) विरुध्द पक्ष यांचे प्रतिकथन असे आहे की, तक्रारदार यांने सन 2005 पासून भरलेल्या वीज बिलांच्या रक्कमेची मागणी केली असल्याने तक्रार अर्ज मुदतीत नाही. विरुध्द पक्ष यांचे म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष यांनी केव्हाही तक्रारदाराला दिलेल्या वीज पुरवठयाचे मीटर सिरीजमध्ये बसविलेले नव्हते. दोन्ही मीटरना विजेच्या पोलावरुन स्वतंत्र सर्व्हीस लाईनद्वारे कनेक्शन दिलेले होते. परंतु तक्रारदाराच्या वरच्या मजल्यावरील वीज मीटरची सर्व्हीस लाईन जळाल्यामुळे तक्रारदार यांने त्याबाबत विरुध्द पक्ष यांचेकडे कोणतीही तक्रार न करता अगर विरुध्द पक्ष यांना कोणतीही कल्पना न देता स्वतःच्या खाजगी वायरमनद्वारे खालच्या मजल्यावरील मीटरमधून वरच्या मजल्यावरील वीज मीटरला वीज जोडणी दिल्यामुळे सदरचा दोष निर्माण झाला आहे व त्याला तक्रारदार हेच जबाबदार आहेत. तक्रारदाराने केलेला फेरबदल विरुध्द पक्ष यांच्या निदर्शनास आल्यावर जणू सदरचा फेरबदल विरुध्द पक्ष यांनीच केल्याचे तक्रारदार खोडसाळपणे भासविण्याचा प्रयत्न करत आहे. जर तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे तो वरच्या मजल्याचा वापर करत नव्हता तर दोन्ही मीटरचे रिडिंग सारखे येणे गरजेचे होते. परंतु रिडिंग हे वेगवेगळे आलेले दिसून येते.
6) विरुध्द पक्ष यांचे कथन असे की, तक्रारदाराच्या तक्रारीची दखल घेऊन मीटरची तपासणी करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.4 यांना आदेश देणेत आले. तपासणीच्यावेळी तक्रारदाराच्या वीज मीटरच्या ठिकाणी एकाच सर्व्हीस लाईनवरुन सेरीजमध्ये दोन वीज मीटर जोडल्याचे विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या निदर्शनास आले. सदर बाब त्यांनी तक्रारदार यांस दाखवून दिली. त्यावेळी तक्रारदार स्वतः विरुध्द पक्ष क्र.4 यांच्यासमोर बोलला की, ‘रात्रीच्यावेळी मीटरची सर्व्हीस वायर जळाल्यामुळे आमच्याच लोकांनी दुस-या मीटरवरुन चुकीच्या पध्दतीने वायर जोडली. त्यानंतर विरुध्द पक्ष क्र.4 यांनी सेरीज लावून दोन्ही मीटरची तपासणी केली. दोन्ही मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळला नाही. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तपासणीचा अहवाल विरुध्द पक्ष कंपनीचे कार्यालयात दिल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांने चुकीच्या पध्दतीने केलेल्या जोडणीबाबत व फेरबदलाबाबत कारवाई होईल असे सांगितले. त्याच गोष्टीचे भांडवल करुन कारवाई टाळण्याकरीता तक्रारदार यांने खोटी तक्रार दाखल केली आहे. ती खर्चासह नामंजूर करावी आणि विरुध्द पक्ष यांना प्रत्येकी रक्कम रु.10,000/- नुकसानी मिळावी असे म्हणणे मांडले आहे.
7) तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.16 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विचारलेली प्रश्नावली नि.क्र.20 वर असून तक्रारदार यांनी दिलेली लेखी उत्तरावली नि.क्र.21 वर आहे. विरुध्द पक्षातर्फे श्री भगवानदास मुरलीधर साळवे यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.क.23 वर आणि श्री सुरेश आत्माराम मार्गी यांचे पुराव्याचे शपथपत्र नि.क्र.25 वर आहे. विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेली कागदपत्रे नि.क्र.27 वर आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांनी दि.28/5/2014 रोजी दिलेला मीटर तपासणीचा अर्ज, दि.28/5/2014 रोजी मार्गी यांना मीटर तपासणीसाठी दिलेले आदेश, श्री मार्गी यांचा अहवाल, तक्रारदार यांस पाठविलेले पत्र, वीज मीटर कायमस्वरुपी बंद केला असल्यासंबंधाने अहवाल दाखल केला आहे. तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद अनुक्रमे नि.30 आणि 31 वर आहे. विरुध्द पक्षाने नि.31 सोबत तक्रारदाराचे दोन्ही मीटरसंबंधाने वापरणेत आलेल्या युनिटचा तक्ता दाखल केला आहे. तक्रारदार यांनी स्वतः तोंडी युक्तीवाद केला आणि विरुध्द पक्षातर्फे वकील श्री. प्रसन्न सावंत यांनी तोंडी युक्तीवाद केला. तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांची कथने, आक्षेप, कागदोपत्री पुरावा, लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदाराने तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ? | होय. |
2 | तक्रारदार या ग्राहकास सेवा देण्यात विरुध्द पक्ष यांनी त्रुटी ठेवली आहे काय ? | होय. |
3 | तक्रार मंजूर करण्यास पात्र आहे काय ? | होय. अंशतः |
4 | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
8) मुद्दा क्रमांक 1 – विरुध्द पक्ष यांचा आक्षेप आहे की तक्रारदार यांने तक्रारीमध्ये सन 2005 पासून त्यांने अतिरिक्त भरलेल्या वीज बिलाच्या रक्कमेची मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कोणतीही तक्रार कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत दाखल करावयाची असते. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार मुदतीत दाखल केलेली नसल्यामुळे नामंजूर करण्यात यावी. याउलट तक्रारदारांचे म्हणणे आहे की, माहे मे 2014 मध्ये ग्राहक क्र. 237760017566 या मीटरचा वीज वापर न करता विरुध्द पक्ष कंपनीकडून त्यास रक्कम रु.1230/- चे वीज बील पाठवण्यात आले. म्हणून त्यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे मीटर तपासणीची मागणी केली. तपासणीचेवेळी दोन्ही मीटर एकाच सिरिजमधून जोडलेले असलेचे जून 2014 मध्ये प्रथम निदर्शनास आले म्हणून जादा वीज बील भरलेल्या रक्कमांची मागणी करण्यात आली. त्यामुळे तक्रार मुदतीत दाखल केली आहे. तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांची कथने विचारात घेता तक्रारदार यांच्या वीज मीटरची तपासणी विरुध्द पक्ष क्र.4 श्री मार्गी यांनी जून 2014 मध्ये केल्याचे व त्यावेळी एकाच सिरीजमधून वीज पुरवठा चुकीच्या पध्दतीने सुरु असल्याचे विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदोपत्री पुराव्याने सिध्द होत आहे. त्यामुळे तक्रारदार यांस प्रथम जून 2014 मध्ये चुकीच्या पध्दतीने वीज जोडणी केल्याचे निदर्शनास आले ही बाब मंच मान्य करत आहे. जून 2014 पासून 2 वर्षाच्या आत तक्रार दाखल केली असल्यामुळे तक्रार मुदतीत दाखल केली आहे या निष्कर्षाप्रत मंच येत आहे.
9) मुद्दा क्रमांक 2 व 3 - i) तक्रारदार यांचे घर क्र.660 आणि 992 यांना एकाचवेळी वीज पुरवठा देण्यात आला ही बाब तक्रारदार आणि विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. विरुध्द पक्ष यांचे म्हणणे आहे की, तक्रारदार यांना ज्यावेळी वीज पुरवठा करण्यात आला त्यावेळी दोन्ही मीटरना स्वतंत्र सर्व्हीस वायरद्वारा वीज पुरवठा करण्यात आलेला होता. दोन्ही मीटर एकाच सिरीजमधून कधीही जोडलेले नव्हते. घराच्या वरच्या मजल्यावरील सर्व्हीस वायर जळाल्यावर तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना कोणतीही जाणीव न देता परस्पर स्वतःचे कामगारामार्फत एकाच सिरीजमध्ये दोन्ही मीटरना वीज जोडणी करुन घेतली. त्यामुळे तक्रारदार यांनी केलेल्या चुकांचा फायदा त्याला मिळणारा नाही. तक्रारदार यांनी स्वतःच सदरची जोडणी केल्याचा पुरावा म्हणून विरुध्द पक्ष यांनी विरुध्द पक्ष क्र.4 श्री मार्गी, तंत्रज्ञ यांचा दि.14/6/2014 चा अहवाल सादर केला आहे. तो नि.27/3 वर आहे. याउलट तक्रारदार यांचे म्हणणे आहे की, विरुध्द पक्ष यांनीच सदर वीज जोडणी एकाच सिरिजमधून एकाच सर्व्हीस वायरने करुन दिलेली आहे आणि ही बाब श्री मार्गी यांनी स्थळ तपासणी केली त्यावेळी त्यास समजून आलेली आहे. तसेच वरच्या मजल्यावरील मीटरचे कनेक्शत तात्पुरते बंद केले असता तळमजल्याच्या मीटरचा प्रवाह बंद झाला. त्यामुळे तळमजल्यावरील मीटर रिडींग हे ग्राहक क्र.237760017566 या मीटरमध्ये समाविष्ट होत असल्यामुळे त्या मीटरचे बील जास्त येत होते. त्यामुळे ती अतिरिक्त भरणा केलेली रक्कम परत मिळावी अशी त्यांने दि.30/6/2014 रोजी अर्जाद्वारे विरुध्द पक्षाकडे मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची मागणी फेटाळली आणि वीज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस तक्रारदार यांस दिली अशी सेवात्रुटी केली आहे.
ii) विरुध्द पक्ष यांचे विदयमान विधिज्ञ श्री सावंत यांचा युक्तीवाद असा की तक्रारदार हे बिल्डर असल्याने त्यांनी स्वतःच मीटरच्या लाईनमध्ये कामगारामार्फत बदल करुन घेतलेला आहे. तक्रारदार यांना ही बाब मान्य नाही. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, मीटर बसवितांना वीजेच्या पोलवरुन पहिले कनेक्शन घराच्या वरच्या मजल्याला देण्यात आलेले आहे. त्याचा ग्राहक क्र.237760017566 आहे. तसेच त्याच मीटरवरुन घराच्या तळमजल्याला वीज प्रवाह देण्यात आला आहे. त्याचा ग्राहक क्र. 237760017574 असा आहे. जर तक्रारदार यांने स्वतःहून त्यामध्ये बदल केला हे विरुध्द पक्षाच्या निदर्शनास आले त्यावेळी विरुध्द पक्ष यांनी पंचनामा का केला नाही ? ज्याअर्थी त्यांनी तसा पंचनामा केला नाही त्याअर्थी विरुध्द पक्षाने जी वीज जोडणी केली त्यामध्येच दोष होता असा तक्रारदाराचा युक्तीवाद आहे.
iii) विरुध्द पक्ष यांनी श्री मार्गी यांचा अहवाल नि.27/3 वर दाखल केलेला पाहता त्यावर तक्रारदार अथवा श्री मार्गी यांच्यासोबत असलेले दोन कामगार यांची सही दिसून येत नाही. तक्रारदार यांने स्वतःहून चुकीची वीज जोडणी केलेसंबंधाने स्थळपरिक्षणच्या वेळेचा पंचनामा विरुध्द पक्ष यांनी पुराव्याकामी सादर केला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी चुकीची वीज जोडणी केली हा विरुध्द पक्ष यांचा आक्षेप मान्य करता येणारा नाही.
iv) विरुध्द पक्ष यांनी लेखी युक्तीवादासोबत तक्रारदार यांचे दोन्ही वीज मीटरच्या C.P.L. वरुन मासिक वीज वापराची आकडेवारी दाखल केली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदाराचे ग्राहक क्रमांक 237760017566 या मीटरचे रिडिंग हे मीटर जोडणीपासून म्हणजेच सन 2005 पासून जुलै 2014 पर्यंत ग्राहक क्र.237760017574 या मीटर रिडिंगपेक्षा जास्त युनिटची नोंद दिसून येते. वीजेच्या पोलपासून मीटरपर्यंतची वीज जोडणी ही विरुध्द पक्ष कंपनीकडूनच करणेत येते. त्यामुळे तक्रारदार हा बिल्डर असल्यामुळे त्यांचे कामगाराने तशी चुकीची वीज जोडणी केली हा विरुध्द पक्ष यांचा आक्षेप मान्य करता येणार नाही. तक्रारदार यांनी मंचामध्ये दि.12/3/2015 रोजी तक्रार दाखल केली आणि विरुध्द पक्ष यांनी दि.24/3/2015 रोजी ग्राहक क्रमांक 237760017566 मीटरचे वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद केल्याचे विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या नि.27/5 वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे वीज जोडणी कशा प्रकारे करण्यात आली होती यासंबंधीचा पुरावाच विरुध्द पक्ष यांनी नष्ट केला आहे असे मंचाचे निदर्शनास आले आहे.
v) वरील विवेचनावरुन तक्रारदार यांनेच स्वतःहून चुकीची वीज जोडणी केल्याचे कागदोपत्री पुराव्याने विरुध्द पक्ष यांनी सिध्द केले नाही. वीज जोडणी ही विरुध्द पक्ष कंपनीच्या कर्मचा-यांमार्फत केली जाते. ती वीज जोडणी एकाच सिरिजमधून केल्याचे विरुध्द पक्ष यांचेच कर्मचा-यांचे निदर्शनास आल्याने वापरापेक्षा जास्त युनिटच्या रक्कमा मिळण्यास तक्रारदार हे पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांना अदा केलेल्या जादा रक्कमांची लेखी मागणी करुनही ती त्यांना देण्यात आलेली नाही. याउलट त्यांचे मीटरचे कनेक्शन कायमस्वरुपी बंद करणेत आले ही तक्रारदार या ग्राहकाला देण्यात येणा-या विदयूत सेवेतील त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10) मुद्दा क्रमांक 4 – i) विरुध्द पक्ष यांच्या वकीलांनी युक्तीवादादरम्यान मंचाचे लक्ष तक्रारदार यांची तक्रार अर्जातील विधाने, प्रश्नावलींना दिलेली उत्तरे आणि युक्तीवादामधील विधाने याकडे वेधले. तक्रारदार यांनी ग्राहक क्रमांक 237760017566 च्या वीज वापरासंबंधाने केलेली विधाने परस्पर विरोधी असल्याने तक्रार खोटी असल्याचे सिध्द होत आहे असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे. मीटर सुस्थितीत आहे हे उभय पक्षांना मान्य आहे. त्यामुळे तक्रारदार जरी वीज वापर करत नाही असे म्हणत असतील तरी रिडिंग येते म्हणजे वीज वापर होता हे स्पष्टच आहे. तक्रारदाराची मागणी ही वाढीव युनिट संबंधाने आहे आणि एकाच सिरिजमधून वीज प्रवाह जात असल्याने वाढीव युनिटच्या रक्कमांची मागणी ही रास्त मागणी आहे असे मंचाचे मत आहे.
ii) तक्रारदार यांनी सन 2005 पासून दुहेरी रिडिंगमध्ये जादा भरणा झालेल्या वीज बिलांच्या रक्कमांची मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदयामध्ये कोणतीही तक्रार तक्रारीस कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत करावयाची असते. तक्रारीस कारण जुन 2014 मध्ये घडले आहे. मुदतीच्या कायदयानुसार रक्कम मागणी ही 3 वर्षाच्या आत करावयाची असते. त्यामुळे जुन 2014 चे पुर्वी म्हणजेच माहे जुलै 2011 पर्यंतच्या वीज देयकांच्या वाढीव रक्कमा विरुध्द पक्ष यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे ग्राहक क्रमांक 237760017566 आणि ग्राहक क्रमांक 237760017574 यांचे C.P.L. मधील रिडिंगची आकडेवारी विचारात घेऊन ग्राहक क्रमांक 237760017574 च्या मीटर रिडिंगप्रमाणे युनिटची संख्या ग्राहक क्रमांक 237760017566 च्या मध्ये दाखवलेल्या युनिटमधून वजा करावी व शिल्लक राहणारे युनिट हे ग्राहक क्रमांक 237760017566 चे युनिट समजावे. अशा प्रकारे माहे जुलै 2011 पासून जून 2014 पर्यंत ग्राहक क्रमांक 237760017566 च्या मीटर संबंधाने ज्या रक्कमा जादा घेतल्या त्या विरुध्द पक्षाने तक्रारदारास परत करणे आवश्यक आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांच्या कृतीमुळे विनाकारण वीज बिलाची जादा रक्कम दयावी लागली, तक्रार प्रकरण दाखल करावे लागले. त्यामुळे त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाचे नुकसानीपोटी रक्कम रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रु.2,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) महाराष्ट्र राज्य विदयूत वितरण कंपनी करीता विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या जुलै 2011 ते जून 2014 पर्यंतच्या ग्राहक क्रमांक 237760017566 मध्ये वीज बिलापोटी जादा स्वीकारलेल्या रक्कमा तक्रारदार यांना परत कराव्यात असे आदेश देण्यात येतात.
3) उपरोक्त रक्कमा परत करतांना तक्रारदार यांचे ग्राहक क्रमांक 237760017566 च्या वीज बिलाची मे 2014 पासून मार्च 2015 पर्यंतची थकबाकी वसुल करुन घ्यावी. त्यावेळी तक्रारदार यांचे सदर मीटरची एकाच सिरीजमधून गेलेली जोडणी काढेपर्यंत ग्राहक क्रमांक 237760017574 च्या मीटर रिडिंगप्रमाणे जादा युनिटची रक्कम अदा करण्यात यावी.
4) आदेश क्र.2 व 3 प्रमाणे होणा-या रक्कमांचे विवरणपत्र विरुध्द पक्ष यांनी मंचासमोर सादर करावे.
5) ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी ठेऊन तक्रारदारास दिलेलया मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) आणि प्रकरण खर्चाबद्दल रक्कम रु.2,000/- (रुपये दोन हजार मात्र) विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारदार यांस दयावेत.
6) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारदार यांचे ग्राहक क्रमांक 237760017566 चे वीज कनेक्शन स्वतंत्ररित्या जोडून दयावे.
7) आदेश क्र.2 ते 6 ची पुर्तता विरुध्द पक्ष 1 ते 4 यांनी आदेश प्राप्तीच्या दिनांकापासून 45 दिवसांत करण्यात यावी. न केलेस तक्रारदार हे विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये कारवाई करु शकतील.
8) मा.राज्य आयोग, मुंबई यांचे परिपत्रक्र क्र.राआ/महा/आस्था/-3/जि.मं.कामकाज/परिपत्रक/2014/3752 दि.05 जुलै 2014 नुसार उभय पक्षकारांनी 45 दिवसानंतर म्हणजेच दि.01/02/2016 रोजी आदेशाची पुर्तता झाली किंवा नाही ? हे
कळवणेसाठी या मंचासमोर हजर रहावे असे आदेश देण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 16/12/2015
sd/- sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.