निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 14/06/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 15/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 03/01/2011 कालावधी 06 महिने 19 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. जयसिंग पिता ज्ञानोबाराव कच्छवे. अर्जदार वय 46 वर्षे.धंदा.नोकरी. अड.ए.ए.गिते. रा.कृषी सारथी कॉलनी बसमत रोड. परभणी ता.जि.परभणी. विरुध्द एक्झीक्युटिव्ह इंजिनियर. गैरअर्जदार. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कं.लि. अड.एस.एस.देशपांडे. परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) अवास्तव विज बिला बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराने त्याच्या मालकीच्या कृषीसारथी कॉलनी परभणी येथील घरात गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010410605 घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतलेले हे. कनेक्शन घेतल्या नंतर फक्त 4/6 महिन्यापर्यंतच मिटर व्यवस्थित चालले त्यानंतर ते बंद पडले. ही बाब गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांना रिडींग घेते वेळी निदर्शनास आणुन मीटर बदलण्याबाबत तक्रार केली होती. परंतु त्यानी दुर्लक्ष केले व सरासरी युनिटची बिले देण्यात आली फेब्रुवारी 2010 पर्यंतची अर्जदाराने नियमितपणे बिले भरली आहेत त्यानंतर तारीख 28/02/2010 ते 31/03/2010 या कालावधीचे 2065 युनिटचे रु.6,830/- रक्कमेचे अचानक भरमसाठ व अवास्तव रक्कमेचे बिल दिले. त्याबाबत गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली होती.परंतु त्याची दखल न घेता बिल भरले नाही तर विज पुरवठा खंडीत केला जाईल अशी धमकी दिली. अर्जदाराचे म्हणणे असे की, माहे एप्रिल 09 पासून मार्च 2010 पर्यंत अर्जदाराने 37 युनिट प्रमाणे बिले दिलेली आहेत व तेवढाच घरात विज वापर होतो असे असतांना वादग्रस्त फेब्रुवारी / मार्च 2010चे बिल भरमसाठ युनिटचे दिलेले आहे.बिल दिल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे गैरअर्जदारांनी 31/03/2010 ते 31/04/2010 चे 27 युनिट विज वापराचे बिल दिलेले आहे त्यावरुनही गैरअर्जदारांनी वादग्रस्त बिल चुकीचे दिलेले आहे हे स्पष्ट होते. तक्रार अर्ज देवुनही गैरअर्जदारांनी बिल दुरुस्त करुन दिलेले नाही,म्हणून त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन माहे फेब्रुवारी / मार्च 2010 चे देयक तारीख 09/04/2010 रद्द व्हावे जुने मिटर बदलुन नविन मिटर जोडून द्यावा असा गैरअर्जदारास आदेश द्यावा मानसिकत्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचा खर्च रु.2500/- द्यावा अशी शेवटी विनंती केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ शपथपत्र आणि पुराव्यातील कागदपत्रात निशानी 6 लगत वादग्रस्त तारीख 09/04/2010 चे देयक, गैरअर्जदारांना 19/04/2010 रोजी दिलेल्या तक्रार अर्जाची स्थळप्रत, तारीख 06/05/2010 ची देयक.अशी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना नोटीस पाठवल्यावर गैरअर्जदारांनी तारीख 09/09/2010 रोजी आपला लेखी जबाब ( नि.15 ) दाखल केला.त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराच्या घरी दिलेल्या विज कनेक्शनचा मिटर क्रमांक 900555949 हा दोन वर्षांपूर्वी बसवला होता पण मिटर कधीही बंद नव्हता अर्जदाराला दिलेले माहे फेब्रुवारी / मार्च 2010 चे 2065 युनीटचे रु. 6,830/- दिलेले बील ते मागील 11 महिन्यात केलेल्या विज वापराचे आहे.सदर मिटर वर एप्रिल 09 मध्ये रिडींग 610 युनिट होते त्यानंतर रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे सरासरी 37 युनिटची बिले देण्यात आली होती मार्च 2010 मध्ये प्रत्यक्ष रिडींग पाहिली असता रिडींग 2675 युनिट असल्याचे दिसले त्यामुळे त्यातून पूर्वीचे रिडींग 610 वजा करुन 2065 युनिटचे बिल दिलेले आहे.अर्जदाराने मागील बिलापोटी भरलेली रक्कम रु. 1065 वरील बिलाच्या आकारणी मधून वजा केलेली आहे त्यामुळे दिलेले बिल हे योग्य व बरोबर आहे.अर्जदाराने 19/04/2010 चा तक्रार अर्ज निष्कारण दिला आहे.गैरअर्जदारा कडून कोणत्याही प्रकारे चुकीचे बिल दिलेले नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. तक्रार अर्जाचे अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार तर्फे अड.गिते आणि गैरअर्जदारा तर्फे अड.एस.एस.देशपांडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार यांनी अर्जदारास तारीख 28/02/2010 ते 31/03/2010 या कालावधीचे रु.6,830/- अवास्तव रक्कमेचे व चुकीचे बिल देवुन सेवात्रुटी केल्याचे अर्जदाराने शाबीत केले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या घरी ग्राहक क्रमांक 530010410605 व मिटर क्रमांक 9005255949 घरगुती विज वापराचे कनेक्शन घेतले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे.शिवाय नि.6 लगत दाखल केलेल्या बिलाच्या नोंदीवरुन हे शाबीत होते.अर्जदाराचे म्हणणे असे की, दोन वर्षांपूर्वी विज कनेक्शन घेतल्यानंतर सुरवातीचे फक्त 4,6 महिनेच मिटर चालले व त्यानंतर 450 युनिट वर अचानक बंद पडले गैरअर्जदारांच्या कर्मचा-यांकडे रिडींग घेतांना तक्रार दिली असतांना ही मिटर बदलण्याची दखल घेतली नाही व तिथपासून सलग 18 महिने म्हणजे एप्रिल 09, पासून मार्च 10 पर्यंत सरासरी युनिट प्रमाणे गैरअर्जदार बिले देत आले.अर्जदाराने ती बिले नियमितपणे भरलेली असतांना अचानक तारीख 28/02/2010 ते 31/03/2010 चे बिल ( देयक तारीख 09/04/2010 ) 2065 युनिटचे रु.6,830/- चे अवास्तव रक्कमेचे चुकीचे बिल दिले सदर वादग्रस्त बिला बाबत अर्जदाराने 19/04/2010 रोजी तक्रार केली होती त्या तक्रारीची स्थळप्रत पुराव्यात नि. 6/2 ला दाखल केलेली आहे. प्रस्तुत वादग्रस्त बिला संदर्भात गैरअर्जदारातर्फे असा बचाव घेण्यात आलेला आहे की, सदरचे बिल मागील 11 महिन्याचे आहे.माहे एप्रिल 09 मध्ये मिटरची रिडींग 610 युनिट होते त्यानंतर रिडींग उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी मार्च 10 मध्ये रिडींग घेतली त्यावेळी 2675 युनिट विज वापर झाल्याचे दिसले त्यातून पूर्वीचे मार्च 09 मधील युनिट 610 वजा केली असता एकुण 2065 मागिल 11 महिन्यात अर्जदाराच्या घरी विज वापर झाला होता त्याप्रमाणे आकारणी करुन मागील कालावधीत तेवढी रक्कम भरली होती ती रक्कम रु 1065/- वजा करुन फेब्रुवारी / मार्च 2010 चे बिल दिले आहे. ते योग्य व बरोबर आहे. मागील 11 महिन्यात रिडींग उपलब्ध झाली नाही असे गैरअर्जदारांचे म्हणणे आहे.परंतु ती का उपलब्ध झाली नाही या संबंधीचा कसलाही स्पष्ट खुलासा अगर त्याचा ठोस पुरावाही मंचासमोर सादर केलेला नाही. उलट अर्जदाराचे म्हणणे असे की, घरातील मिटर हा मुख्य दरवाज्याच्या बाहेर उघडा आहे.त्यामुळे रिडींग उपलब्ध न होण्याचा प्रश्नच उपलब्ध होत नाही.युक्तिवादाच्यावेळी देखील अर्जदाराने मंचासमोर हे निवेदन स्पष्टपणे केले असल्यामुळे व शपथपत्रातून ही शपथेवर ही गोष्ट सांगितलेली असल्यामुळे ते मुळीच खोटी मानता येणार नाही.त्यामुळे मागील 11 महिन्यात रिडींग उपलब्ध नव्हती हा गैरअर्जदाराने घेतलेला बचाव निरर्थक आहे.नि.6/5 वरील वादग्रस्त बिलाचे बारकाईने अवलोकन केले असता सदर बिलावर मागील 1 वर्षाच्या विज वापराच्या तपशिलात सरासरी 37 युनिट प्रमाणे विज वापर होता असे ग्राहय धरुन अर्जदाराला एक वर्षभर बिले दिलेली आहेत म्हणजेच 37 युनिट पर्यंतच अर्जदाराच्या घरी विज वापर होता हे गैरअर्जदारांना ही मान्य व कबुल होते म्हणूनच त्यांनी ते बिल दिले पाहिजेच असा यातून निष्कर्ष निघतो. या वादग्रस्त बिला मधील मागील व चालू रिडींग प्रमाणे 2065 युनिटचा वापर गैरअर्जदारांच्या म्हणण्या प्रमाणे एकुण 11 महिन्याचा आहे म्हणजे दरमहा 187 युनिट विज वापर केला असा हिशोब निघतो परंतु गैरअर्जदाराने त्यानंतर दुस-याच महिन्यात म्हणजे तारीख 31/03/2010 ते 31/04/2010 चे दिलेले बिल ( देयक तारीख 06/05/2010 ) जे अर्जदाराने पुराव्यात नि.6/3 ला दाखल केलेले सदरच्या बिलात चालू रिडींग 2702 व मागील रिडींग 2675 ( जे वादग्रस्त बिलात हे चालू रिडींग दाखवलेले होते ) प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे त्या महिन्यात एकुण फक्त 27 युनिटचा विज वापर झाला होता हे स्पष्ट होते. व त्याप्रमाणे रु.122.33 ची आकारणी करुन मागील थकबाकीसह रु.7,090/- चे बिल दिलेले आहे.माहे मे 2010 च्या बिलातील वस्तुस्थिती लक्षात घेता अर्जदाराच्या घरी प्रत्यक्ष 27 ते 30 युनिट पेक्षा जास्त विज खर्च मुळीच होत नाही हे बिलातील प्रत्यक्ष रिडींग वरुन शाबीत झालेले आहे त्यामुळे माहे एप्रिल / मार्च 2010 चे बिल गैरअर्जदारांच्या म्हणण्या प्रमाणे जरी 11 महिन्याचे असले तरी 11 महिन्यात 2065 युनिट म्हणजे दरमहा 187 युनिट अर्जदाराने विज वापर केला हे मुळीच पटण्या सारखे नाही व मान्यही करता येणार नाही त्यामुळे वादग्रस्त दिलेले विज बिल हे निश्चितपणे चुकीचे आहे. असाच निष्कर्ष निघतो. अर्जदाराचा मिटर घरी बाहेर उघड्यावर असतांना देखील रिडींग उपलब्ध नव्हती हा घेतलेला बचाव खोटा व चुकीचा आहे. मीटर वरील फोटो देखील सुस्पष्ट नाही युक्तिवादाच्या वेळी अर्जदार तर्फे अड.गिते यांनी या संदर्भात असे ही निवेदन केले की, रिडींग घेणारे कर्मचारी मीटरवर केवळ हाताने आकडे लिहून त्यांचे फोटो घेत होते हे देखील कृत्य निश्चितपणे चुकीचे असल्याचे पुराव्यातील नि.6/11 आणि नि.6/3 वरील बिलाचे निरीक्षण केले असता स्पष्ट दिसते.गैरअर्जदाराच्या कर्मचा-याने प्रत्यक्ष रिडींग न घेता निष्काळजीपणा दाखवुन अर्जदारावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे.एवढेच नव्हेतर वादग्रस्त माहे फेब्रुवारी / मार्च 10 चे बिल चुकीचे व अवास्तव रक्कमेचे दिलेले आहे याबद्दल कोणतीही शंका उरत नाही.त्यामुळे ते निश्चित रद्द होण्यास पात्र ठरते.माहे मार्च / एप्रिलच्या बिलाची प्रत्यक्ष रिडींग वरुनच अर्जदाराच्या घरी जास्तीत जास्त 27 ते 30 युनिट विज वापर होता हे शाबीत झालेले आहे त्यामुळे ते विचारात घेवुन मुद्दा क्रमांक 1 चा उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. गैरअर्जदाराने तारीख 09/04/2010 चे दिलेले रु. 6,830/-चे देयक रद्द करण्यात येत आहे.त्या ऐवजी माहे फेब्रुवारी, मार्च 2010 मध्ये फक्त 30 युनिट विज वापर केला होता असे ग्रहीत धरुन आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत दुरुस्त बिल द्यावे.तसेच त्या पुढील बिले ही त्या प्रमाणेच प्रत्यक्ष रिडींग घेवुन केलेल्या आकारणीचीच कोणतीही मागील थकबाकी न आकारता द्यावीत. 3 याखेरीज मानसिकत्रासापोटी रु. 1,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |