मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर अंतरिम अर्ज क्रमांक : 01/2011 मूळ तक्रार अर्ज क्रमांकः 12/2011 श्री.शंकर भिवा पवार ... तक्रारदार विरुध्द कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., रत्नागिरी व इतर नऊ ... सामनेवाला नि.6 वरील आदेश (दि.17/03/2011) 1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 च्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे तो विद्युत पुरवठा पूर्ववत जोडून मिळावा व नुकसानभरपाई मिळावी यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आपला विद्युत पुरवठा जोडून मिळावा यासाठी नि.6 वर अंतरिम अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार मंचाचे रजिस्ट्री विभागाने तक्रारदाराची तक्रार नोंदवहीत नोंदवून आज मंचासमोर ऍडमीशन हिअरींगसाठी ठेवली आहे. 2. आज मंचासमोर तक्रारदार व त्यांचे वकिल हजर असून तक्रारदाराचे वकिलांचे अंतरिम अर्ज कामी तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले. तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत नि.5 वर जोडलेली कागदपत्रे अंतरिम अर्ज कामी वाचावेत अशी विनंती तक्रारदाराचे वकिलांनी केली. तक्रारदाराने अंतरिम अर्जासोबत नि.7 वर स्वतंत्र शपथपत्र दाखल केले आहे व आपणास विद्युत पुरवठा जोडून मिळावा व विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी खंडीत केलेली विद्युत सेवा पूर्ववत सुरु करुन द्यावी अशी मागणी अंतरिम अर्जात करण्यात आली आहे. 3. तक्रारीचे अवलोकन केल्यास तक्रार अर्जातील परिच्छेद क्र.10 मध्ये करण्यात आलेली मागणी क्र.अ व ब व अंतरिम अर्जाच्या परिच्छेद क्र.11 मध्ये करण्यात आलेली मागणी क्र.अ व ब हया दोन्ही मागण्या सारख्याच दिसून येतात. याचाच अर्थ तक्रार अर्जात तक्रारदाराने त्याचा विद्युत पुरवठा पुन्हा जोडण्याचे आदेश विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना करण्यात यावेत व खंडीत झालेली सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली असताना व या मागणीनुसार तक्रारीचा निकाल तक्रारीच्या गुणदोषांवर होणारा असतानादेखील नि.6 वरील अंतरिम अर्जामध्ये पुन्हा तीच मागणी तक्रारदाराने केली आहे. त्यामुळे मूळ तक्रारीत केलेली मागणी अंतरिम अर्जाव्दारे मंजूर केली जावू शकत नाही असे कायद्याचे गृहीत तत्व असतानादेखील तक्रारदाराने अंतरिम अर्जात मागणी केली असल्यामुळे तक्रारदाराचा अंतरिम अर्ज मंजूर होणेस पात्र नाही. 4. तक्रार अर्जाचे व अंतरिम अर्जाचे अवलोकन केल्यास तक्रारदाराचा विद्युत पुरवठा दोन्ही अर्जाच्या परिच्छेद क्र.8 मध्ये नमूद केल्यानुसार दि.07/08/2010 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी खंडीत केल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे; परंतु या दिनांकापासून तक्रार दाखल करेपर्यंत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटून गेला असून तक्रारदाराने तातडीने तक्रार दाखल केली नाही किंवा विद्युत पुरवठा पूर्ववत करुन मिळणेसाठी अर्ज दाखल केला नाही व तक्रारदार सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी शांत राहिले त्यामुळे तक्रारदाराचे अंतरिम अर्जावर तातडीने तूर्तातूर्त ताकीद देण्याचे आदेश पारीत होणे संयुक्तिक होणार नाही. 5. सकृतदर्शनी तक्रार अर्जाचे व अंतरिम अर्जाचे व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यास तक्रारदाराच्या बाजूने न्यायाचे पारडे अजिबात झुकलेले दिसून येत नसून तक्रारदाराचा अंतरिम अर्ज कोणतेही कारणे दाखवा नोटीसीचे आदेश पारीत न करता फेटाळण्यास पात्र असून त्यादृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदाराचा नि.6 वरील अंतरिम अर्ज फेटाळण्यात येतो. 2. खर्चाबद्दल काहीही हुकूम नाही. 3. अंतरिम अर्ज क्र.01/2011 निकाली काढण्यात येवून नस्तीबध्द करण्यात येतो. रत्नागिरी दिनांक :17/03/2011. (एम.एम.गोस्वामी) अध्यक्ष (स्मिता देसाई) सदस्य
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |