निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/11/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 12/11/2013 तक्रार निकाल दिनांकः- 09/05/2014
कालावधी 05 महिने. 27 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अशोक पिता बंडुजी जाधव, अर्जदार
वय 54 वर्षे. धंदा.नौकरी, अॅड.व्हि.पी.चोखट.
रा.ज्ञानेश्वर नगर, साखला प्लॉट, परभणी.
विरुध्द
1 कार्यकारी अभियंता, गैरअर्जदार.
म.रा. वि. वि. कं. मर्या. विभागीय कार्यालय, अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड, परभणी.
2 उप – अभियंता,
म.रा.वि.वि.कं.मर्या, कार्यालय,
जिंतुर रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे लाईट बिल देवुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा परभणी येथील रहिवाशी असून त्याने घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010157179 अन्वये विद्युत पुरवठा घेतला होता, व अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने जानेवारी 2013 पासून ते 15/06/2013 पर्यंत वेळोवेळी विद्युत बिलाचा भरणा गैरअर्जदाराकडे केला आहे. व मागील थकबाकी अर्जदाराकडे कांहीही नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने दिनांक 08/08/2013 च्या देयक कालावधी 15/06/2013 ते 15/07/2013 पर्यंत विज आकारणी शुल्क 490/- रु. चे बील गैरअर्जदाराने अर्जदारास दिले. तसेच त्या बिलामध्ये चालु रिडींग Locked अशी दर्शविण्यात आलेली आहे. व एकुण विज वापर 107 झाल्याचे दर्शविले आहे. खरे पाहता विद्युत मिटर बाहेर भिंतीवरच बसविले असल्यामुळे (Locked) लिहिण्याचे कांहीही एक कारण नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने दिनांक 06/09/2013 रोजी गैरअर्जदाराने 15/07/2013 ते 15/08/2013 पर्यंत 1 महिन्याचे बिल 7,830/- रु. चे अर्जदारास दिले. सदर बिलामध्ये चालु रिडींग 2542 दाखवुन एकुण विज वापर 2442 असे दर्शविण्यात आले. सदरचे विज बिल पुर्णपणे चुकीचे असून रद्द होवुन सुधारीत बिल गरजेचे आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास परत दिनांक 05/10/2013 रोजी देयक कालावधी 15/08/2013 ते 15/09/2013 रोजीचे विज बिल 3,517/- रु. चे दिले. व सदर बिलात चालु रिडींग 2967 व मागील रिडींग 2542 असे दाखवुन 425 युनीटचे विज बिल अर्जदारास दिले ते पुर्णतः चुकीचे आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदारानी दिनांक 06/09/2013 रोजी 15/07/2013 ते 15/08/2013 पर्यंतचे 7,830/- रु. व दिनांक 15/08/2013 ते 15/09/2013 चे 3,517/- रु. चे लाईट बिल रद्द करावे.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने दिनांक 10/09/2012 रोजी त्याचे मिटर सदोष असल्याबाबत व बदलुन देण्याबाबत गैरअर्जदाराकडे लेखी अर्ज केला होता, परंतु गैरअर्जदाराने ते आजपर्यंत बदलुन दिलेले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार दिनांक 22/10/2013 रोजी गैरअर्जदाराकडे जावुन सदरचे बिल दुरुस्त करुन द्या, म्हणून विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराचे बिल दुरुस्त करुन दिले नाही. व गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, दिनांक 15/07/2013 ते 15/09/2013 या दोन महिन्याचे चुकीचे बिल रक्कम 11,490/- रद्द करुन सदरचे बिल दुरुस्त करुन द्यावे व तसेच मानसिक त्रासापोटी 15,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 4 कागदपत्राच्या यादीसह 4 कागदपत्रे दाखल केली आहेत, ज्यामध्ये 08/08/2013 चे लाईट बिल, 06/09/2013 चे लाईट बिल, 05/10/2013 चे लाईट बिल, व दिनांक 10/09/2013 चा अर्ज, कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर केला नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 15/07/2013 ते
15/09/2013 पर्यंतचे चुकीचे लाईट बिले देवुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या जुलै 2013 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते.
अर्जदाराचे तक्रारीत म्हणणे की, गैरअर्जदाराने ऑगस्ट 2013 व सप्टेंबर 2013 चे चुकीचे लाईट बिल दिले आहे. याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वर दाखल केलेल्या ऑगस्ट 2013 च्या लाईट बिलाचे अवलोकन केले असता, मंचास असे निदर्शनास येते की, गैरअर्जदाराने अर्जदारास चालु रिडींग 2542 दाखवुन मागील रिडींग 100 एकुण विज वापर 2442 युनीट दाखवुन 7,830/- रु. चे अर्जदारास दिनांक 15/07/2013 ते 15/08/2013 पर्यंतच्या कालावधीचे लाईट बिले दिले होते. हे दिसून येते. सदर बिलाचे बारकाईने अवलोकन केले असता, असे दिसून येते की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या मिटरचे रिडींग न घेताच सप्टेंबर 2012 पासून ते जुलै 2013 पर्यंत दर महिन्याला 107 युनीटचे अंदाजे वापर दाखवुन अर्जदारास सदरच्या काळात लाईट बिल दिले होते. व एकदम चुकीच्या पध्दतीने गैरअर्जदाराने ऑगस्ट 2013 मध्ये 2442 युनीटचा वापर दाखवुन 7,830/- रु. चे बिल दिले. जे की, अयोग्य आहे. असे मंचास वाटते.
तसेच नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या सप्टेंबर 2013 च्या लाईट बिलचे अवलोकन केले असता, मंचास असे निदर्शनास येते की, गैरअर्जदाराने सदरचे बिल 15/08/2013 ते 15/09/2013 देयक कालावधी दर्शवुन चालु रिडींग 2967 व मागील रिडींग 2542 दाखवुन 425 युनीटचा वापर दाखवुन 11,490/- रु. चे बिल अर्जदारास दिले होते, जे एकदम चुकीचे आहे. असे मंचास वाटते, कारण गैरअर्जदाराने अर्जदारास त्याच्या मिटरचे रिडींग घेवुन बील दिले होते, हे सदर बिलावरुन दिसून येत नाही.
सदरचे दोन्ही बिले चुकीचे आहेत व ते रद्द करुन कायद्या प्रमाणे अर्जदारास सुधारीत करुन देणे गरजेचे आहे, असे मंचास वाटते.
तसेच गैरअर्जदाराने देखील सदरील बिलाबाबत लेखी जबाब दावा दाखल करण्याचे टाळून अप्रत्यक्षपणे अर्जदाराची तक्रार मान्य केले आहे. असे मंचास वाटते.
सदरचे लाईट बिले दुरुस्त करुन द्यावेत, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 10/09/2012 रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/4 वर दाखल केलेल्या तक्रार अर्जाच्या प्रतीवरुन सिध्द होते.
निश्चित गैरअर्जदाराने अर्जदारास सदरच्या कालावधीचे लाईट बिले दुरुस्त न करुन देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले माहे ऑगस्ट 2013 व सप्टेंबर 2013 चे
लाईट बिल रद्द करण्यात येते.
3 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदाराच्या मिटरचे
पूढील एक महिन्याचे अर्जदारा समक्ष Reading घ्यावेत, व आलेल्या Reading
प्रमाणे Average Bill काढून सदर कालावधीचे सुधारीत लाईट बील अर्जदारास
द्यावेत.
4 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
5 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.