जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 342/2016.
तक्रार दाखल दिनांक : 07/12/2016.
तक्रार आदेश दिनांक : 04/07/2017. निकाल कालावधी: 00 वर्षे 06 महिने 27 दिवस
गणपत बळवंत भोसले, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. गंधोरा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी संचालक/चेअरमन, पल्स इंडिया लिमीटेड,
रजिस्टर्ड ऑफीस, 22, तिसरा मजला, अंबर टॉवर,
संसार चंद रोड, जयपूर – 302 004.
(विरुध्द पक्ष क्र.1 यांचेविरुध्द तक्रार रद्द)
(2) कार्यकारी संचालक, पल्स इंडिया लिमीटेड, कोर्पोरेट,
7 वा तिसरा मजला, गोपालदास भवन, 28,
बारा खंडा रोड, नवी दिल्ली – 110 001.
(3) व्यवस्थापक, पल्स इंडिया लिमीटेड, ग्राहक सेवा केंद्र,
पहिला मजला, हैदर अली कॉम्प्लेक्स, शिरीन कॉलनी,
जिल्हा कारागृहासमोर, उस्मानाबाद, औरंगाबाद रोड,
उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
(विरुध्द पक्ष क्र.3 यांचेविरुध्द तक्रार रद्द)
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : बी.ए. बेलुरे
विरुध्द पक्ष क्र. 2 अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांचेविरुध्द तक्रार रद्द.
न्यायनिर्णय
श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीद्वारे गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार मंचापुढे दाखल करण्यात आलेली आहे.
2. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, तक्रारकर्ता यांनी दि.16/2/2009 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती क्र. 9072943 अन्वये 6 वर्षाकरिता पेमेंट प्लान; ज्याचे एकूण वार्षिक 6 हप्ते असलेली पॉलिसी घेतली होती. त्याची मुदत दि.16/2/2015 रोजी पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.46,200/- देण्याचे मान्य केलेले होते. तक्रारकर्ता यांचे असे वादकथन आहे की, विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या नियम व अटीप्रमाणे वार्षिक हप्त्यांची एकूण रक्कम रु.30,000/- भरणा केली. तसेच पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर दि.16/2/2015 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रितसर कागदपत्रे दाखल केलेले आहेत. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी जमा रकमेची मागणी केली असता विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली. विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केल्याचा वादविषय उपस्थित करुन मुदत ठेव पावतीची रक्कम रु.46,200/- व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर, तसेच वैयक्तिक कार्यकारी संचालक मंडळाच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर देय रकमेचा बोजा ठेवून जप्ती हुकूम आदेश करण्यात यावा, अशीही विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा मंचाच्या नोटीसची बजावणी झाल्यानंतर ते जिल्हा मंचापुढे उपस्थित राहिले नाही आणि योग्य व उचित संधी देऊनही अभिलेखावर लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश पारीत करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 3 यांना नोटीस बजावण्याकरिता तक्रारकर्ता यांनी उचित पावले न उचलल्यामुळे त्यांच्याविरुध्द तक्रार रद्द करण्यात आली.
4. तक्रारकर्ता यांची तक्रार व त्यांनी अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
2. तक्रारकर्ता यांचेद्वारे गुंतवणूक करण्यात आलेली
रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
5. मुद्दा क्र. 1 व 2 :- अभिलेखावर दाखल रजिस्ट्रेशन लेटरचे अवलोकन केले असता दि.16/2/2009 च्या रजिस्ट्रेशन क्र. यू-181287463 प्रमाणे विरुध्द पक्ष यांच्याकडे 600 स्क्वे. यार्ड मोजमापाच्या प्लॉटचा मोबदला रु.30,000/- देण्याकरिता रु.5,000/- च्या हप्त्याप्रमाणे वार्षिक 6 हप्ते तक्रारकर्ता यांनी भरण्याचे होते आणि मुदतपूर्तीनंतर त्याचे अंदाजे मुल्य रु.46,200/- अपेक्षीत असल्याचे निदर्शनास येते. प्रस्तुत रजिस्ट्रशन लेटरच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी रक्कम भरणा पावत्या दाखल केलेल्या आहेत. त्यांचे अवलोकन केले असता दि.16/2/2009, दि.6/3/2010, दि.3/4/2012 व दि.30/3/2014 रोजी प्रत्येकी रु.5,000/- प्रमाणे हप्त्यांचा भरणा केल्याचे निदर्शनास येते. अभिलेखावरील दाखल कागदपत्रांप्रमाणे तक्रारकर्ता यांनी नोंदणी पत्राप्रमाणे एकूण 6 हप्त्यांचा भरणा केलेला दिसून येत नाही. परंतु पावती क्र.5952532 चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी दि.30/3/2014 रोजी सहावा हप्ता भरणा केल्याचा उल्लेख दिसून येतो.
6. विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा मंचातर्फे नोटीस बजावणी झाल्यानंतर ते अनुपस्थित राहिले आणि उचित संधी देऊनही लेखी उत्तर केलेले नाही. आमच्या मते तक्रारकर्ता यांच्या वादकथनाचे खंडण करण्यासाठी लेखी उत्तर व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यास विरुध्द पक्ष यांना उचित संधी उपलब्ध होती. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे एका अर्थाने तक्रारकर्ता यांच्या तक्रारीतील वादकथने व दाखल कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
7. मुख्य वादविषयाकडे गेल्यानंतर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीनुसार रक्कम जमा केल्याचा उल्लेख केलेला आहे. पावतीची मुदत पूर्ण झाल्यानंतर विरुध्द पक्ष यांनी ठेव पावतीची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली, असे तक्रारकर्ता यांचे वादकथन आहे. परंतु अभिलेखावर दाखल कागदपत्रांवरुन विरुध्द पक्ष यांनी विशिष्ट अटी व शर्तीस अधीन राहून तक्रारकर्ता यांचे नांवे प्लॉटची नोंदणी केल्याचा उल्लेख रजिस्ट्रेशन लेटरमध्ये आढळून येतो. रजिस्ट्रेशन लेटरमध्ये प्लॉटकरिता विरुध्द पक्ष यांना प्राप्त होणारे प्रतिफल, प्लॉटचा आकार, कराराचा कालावधी, करार कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लॉटचे अपेक्षीत मुल्य इ. बाबी नमूद आहेत. करार संपुष्टात येताना जमिनीचे अपेक्षीत मुल्य रु.46,200/- दर्शवलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये प्लॉट खरेदी-विक्री करार झालेला असला तरी करार संपुष्टात येत असताना तक्रारकर्ता हे अपेक्षीत मुल्य किंवा प्लॉटचे अलॉटमेंट मिळण्याकरिता पात्र होते.
8. हे खरे आहे की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक केलेली नाही. रजिस्ट्रेशन लेटरमध्ये करार कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लॉटचे अपेक्षीत मुल्य निर्देशीत केलेले आहे. असे दिसते की, उभयतांमधील करार कालावधी पूर्ण झालेला आहे. आमच्या मते तक्रारकर्ता हे अपेक्षीत करार मुल्य परत मिळण्यास पात्र नसले तरी त्यांनी प्लॉटकरिता भरणा केलेले मुल्य परत मिळण्यास ते पात्र होते आणि प्रस्तुत रक्कम परत न करुन विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
9. आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे दि.16/2/2009, दि.6/3/2010, दि.3/4/2012 व दि.30/3/2014 रोजी प्रत्येकी रु.5,000/- प्रमाणे हप्त्यांचा भरणा केल्याचे निदर्शनास येते. पावती क्र.5952532 चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी दि.30/3/2014 रोजी सहावा हप्ता भरणा केल्याचा उल्लेख दिसून येत असला तरी सकृतदर्शनी तक्रारकर्ता यांनी रु.20,000/- भरणा केल्याचे दिसून येत असल्यामुळे तक्रारकर्ता हे रु.20,000/- रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना रजिस्ट्रेशन क्र. यू-181287463 करिता गुंतवणूक केलेली रक्कम रु.20,000/- परत करावी. तसेच प्रस्तुत रकमेवर तक्रार दाखल तारीख 7/12/2016 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 9 दराने व्याज द्यावे.
(2) विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुद्ध पक्ष क्र. 2 यांनी आदेश प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत करावी.
(4) उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-