(घोषित दि. 24.03.2014 व्दारा श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून कारला ता.जि.जालना येथील रहिवासी आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 हे अकोला येथे महाबीज बियाणे नावाने बियाणे निर्मितीचा व्यवसाय करतात तर गैरअर्जदार क्रमांक 2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून तक्रारदारांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी निर्मिती केलेले सोयाबिनचे बियाणे दिनांक 01.06.2011 ला खरेदी केले. त्यात जे एस 335 जातीच्या 6 बॅगा होत्या त्यासाठी त्यांनी प्रती बॅग 850 रुपये दिले. त्यानंतर दिनांक 10.07.2011 रोजी त्यांनी बियाणे गट क्रमांक 403 मौजे कारला येथील स्वत:च्या शेतात पेरले. परंतु ठराविक कालावधीत उगवण न झाल्याने दिनांक 16.07.2011 रोजी कृषी अधिकारी जि.जालना, गैरअर्जदार क्रमांक 2 व मा.जिल्हाधिकारी यांना अर्ज केला. दिनांक 19.07.2011 रोजी तक्रारदारांच्या शेतात जावून पंचनामा केला. त्यात 95 टक्के ऐवढी कमी उगवण झाल्याचे व 100 टक्के नुकसान झाल्याचे आढळले असे नमूद केलेले आहे. अर्जदाराची सोयाबिनचे बियाणे न उगवल्याने नुकसान झाले म्हणून त्यांनी गैरअर्जदारांना वेळोवेळी नुकसान भरपाईची मागणी केली. परंतू त्यांनी भरपाई देण्यास टाळाटाळ केली. शेवटी तक्रारदारांनी गैरअर्जदारांना दिनांक 13.06.2012 रोजी रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस दिली. परंतू त्यांनी नोटीसीला उत्तर दिलेले नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. त्या अंतर्गत तक्रारदार रुपये 2,00,000/- ऐवढी नुकसान भरपाई मागत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत बियाणे खरेदीची पावती, पंचनामा, त्यांच्या शेताचा 7/12 चा उतारा, त्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे व गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे केलेला तक्रार अर्ज, त्यांनी गैरअर्जदार यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसची स्थळप्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 मंचा समोर हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे जाबाबानुसार ते सोयाबीन जे.एस. 335 या वाणाचे बियाणे उत्पादित करतात व शासन यंत्रणेने ते तपासल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र मिळते. असे प्रमाणित बियाणेच तक्रारदारांना विकण्यात आले. बियाणाची उगवण शक्ती इतरही अनेक गोष्टींवर जसे जमिनीची प्रत, खते व औषधांची मात्रा, हवामान, पेरणीची पध्दत इत्यादी अवलंबून असते. तक्रारदारांनी बियाणे खरेदी केल्यानंतर सव्वा महिन्याने त्याची पेरणी केली आहे. सोयाबिनचे बियाणाचे नाकान नाजूक असते या काळात ते नीट हाताळले नाही तर त्याची उगवणशक्ती कमी होते. पंचनामा कृषी संबंधीच्या तज्ञ व्यक्तीने केलेला नाही. पंचनामा करण्यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस दिलेली नव्हती. तक्रारदारांनी गैरअर्जदारांना पाठवलेली नोटीस सुमारे एक वर्षानंतर दिलेली आहे. त्यापूर्वी त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केलेली नव्हती म्हणून तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या लेखी जबाबानुसार ते केवळ गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले बियाणे विक्री करण्याचे काम करतात. त्यांनी तक्रारदारांना वरील जे एस 335 वाणाच्या सोयाबिन बियाणाच्या 6 बॅग सीलबंद अवस्थेत विकल्या आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेला पंचनामा संशयास्पद आहे. त्यावर कृषी तज्ञांची स्वाक्षरी नाही. बियाणे सदोष असल्यास त्या गोष्टीसाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. त्यांना पंचनाम्याची नोटीस मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार त्यांचे विरुध्द खारिज करण्यात यावी.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.टि.बी.पिसुरे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विव्दान वकील श्री. प्रदिप कुलकर्णी गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विव्दान वकील श्री.एस.जी.राठी यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला. त्यावरुन खालील गोष्टी स्पष्ट होतात.
दिनांक 16.07.2011 रोजी केलेल्या पंचनाम्यावर केवळ तक्रारदार त्यांचे भाऊ व इतर 2 शेतकरी यांच्याच सहया आहेत. त्यावर सरकारी परिपत्रकात नमूद केल्या प्रमाणे जिल्हा स्तरीय नियंत्रण समितीतील कृषी तज्ञांची स्वाक्षरी नाही. पंचनाम्याच्या वेळी गैरअर्जदारांचे प्रतिनिधी तेथे उपस्थित असल्याचे दिसत नाही. पंचनाम्यात केवळ जमिनीत आवश्यक ओलावा होता व शेतात सोयाबिनची लागवड झाली नाही ऐवढाच उल्लेख केलेला आहे. त्यात बियाणे सदोष असल्याचा उल्लेख नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या वकीलांच्या युक्तीवादानुसार जमिनीची प्रत, हवामान, खताची मात्रा असे इतरही अनेक घटक बीज न उगवण्यास कारणीभूत असतात. या बाबतचा कोणताही खुलासा पंचनाम्यावरुन होत नाही. अशा परिस्थितीत पंचनाम्यावरुन तक्रारदारांना गैरअर्जदार यांनी सदोष बियाणाची विक्री केली ही गोष्ट सिध्द होत नाही असे मंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी बियाणे दिनांक 10.07.2011 रोजी पेरले. त्यानंतर दिनांक 19.07.2011 रोजी त्यांच्या शेतात पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यात सोयाबिन बियाणाच्या 6 बॅग पैकी 5 बॅगची पेरणी केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. बियाणाची 1 बॅग शिल्लक असताना देखील तक्रारदारांनी कथित सदोष बियाणे तपासणीसाठी प्रयोग शाळेत का पाठवले नाही याचे स्पष्टीकरण तक्रारदार देवू शकलेले नाहीत.
वरील विवेचनावरुन तक्रारदारांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी विकलेले व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी उत्पादित केलेले सोयाबिनचे बियाणे सदोष होते ही गोष्ट तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु शकलेले नाहीत असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चाबाबत आदेश नाही.